समीर गायकवाड
- रेणू यादवला जगाने 'दस्युसुंदरी' किंवा 'डाकूराणी' म्हणून ओळखले. पण तिची कहाणी गुन्हेगारीची नसून अपहरण, लैंगिक अत्याचार, राज्ययंत्रणेचे अपयश आणि समाजाच्या नाकारण्याची आहे.
- चंबळच्या बिहडमध्ये बंदूक हाती घ्यायला भाग पडलेल्या या तरुणीचा प्रवास आणि 'शापित' मानल्या गेलेल्या चंबळ नदीचा इतिहास एकमेकांत विलक्षण गुंतलेला आहे.
- एका स्त्रीची आणि एका नदीची ही समांतर शोकांतिका उलगडणारा हा लेख.
या लेखाच्या फोटोत जी दिसतेय ती रेणू यादव आहे. तिच्या खांद्यावर लटकणारी बंदूक खरी आहे आणि हातातलं रोपही खरंच आहे! तिच्या आयुष्यातल्या विरोधाभासास साजेशी ही तसबिर! रेणू एकेकाळी चंबळची डाकू राणी होती! तिची आणि चंबळची ही गोष्ट…
चंबळ नदीचे नाव गत शतकातच बदनाम झालेय असे काही नाही. यमुनेच्या पाठीकडील भागांत जे विस्तीर्ण भकास बिहड आहेत त्यांच्या मधोमध चंबळचे देखणे पात्र आहे. आश्चर्य वाटेल की, उत्तरेकडील ही एकमेव उपनदी आहे जी प्रदूषणमुक्त आहे परंतु मानवी समुदाय ह्या नदीचे पाणी पीत नाही. गंगा, यमुना, कृष्णा, क्षिप्रा यांसारख्या अनेक नद्यांची भारतात पूजा होते. किंबहुना देशात अशी कोणतीच नदी नसावी की जिची पूजाअर्चना होत नाही अपवाद फक्त चंबळचा असावा! कारण उत्तरेकडे चंबळला शापित नदी (!) म्हणून ओळखले जाते.
चंबळचा संदर्भ पुराणकाळातही आढळतो. महाभारताशी तिचे नाते आहे. मुरैनाच्या नजीक चंबळच्या काठावर शकुनीने पांडवांना द्यूतामध्ये हरवले होते. याच ठिकाणी द्रौपदीच्या चिरहरणाचे आदेश दिले गेले होते. म्हणून चिडलेल्या द्रौपदीने या नदीला शाप दिला होता. अजूनही हा शाप प्रमाण मानून या नदीची पूजा केली जात नाही किंवा तिचे पाणी पिले जात नाही.

या कथित शापामुळेच या नदीकाठची लोकवस्ती अतिशय कमी आहे, म्हणूनच ही नदी अतिशय स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त आहे. या परिसरात चंबळ हा पाण्याचा एकमेव स्त्रोत आहे आणि जो बऱ्याचदा कोरडा पडतो. इथे सर्वच डाकूंना आश्रय मिळाला नाही. इथे आपली सत्ता चालावी म्हणून सातत्याने संघर्ष होत राहिले त्याला कारण दर दुष्काळात आकसत जाणारे हिचे पात्र!
चंबळच्या याच वेदनेशी मिळतीजुळती कथा रेणू यादव तिच्या आयुष्यात जगलीय. रेणूविषयी अधिक जाणून घेण्याआधी चंबळची गुन्हेगारी पार्श्वभूमी जाणून घेणे क्रमप्राप्त ठरते.
आजघडीला चंबळचे खोरे शांत आहे. मात्र बरोबर वीस वर्षांपूर्वी 5 जानेवारी 2005 रोजी इथे अखेरची मोठी चकमक झडली होती. त्या रात्री डाकू रामवीर गुर्जरने आपल्याच गँगचा म्होरक्या चंदन यादववर गोळीबार करुन ठार मारले होते. चंबळच्या खोऱ्यात अनेक हत्या झाल्यात, डाके पडलेत, लूटमार झालीय, काही प्रसंगी स्त्रियांवर हात टाकले गेलेत मात्र एका स्त्रीच्या प्राप्तीसाठी आपल्याच गॅंगच्या लीडरला खलास करण्याचे कटकारस्थान क्वचित घडलेय. रामवीरने जिच्यासाठी ही हत्या केली तिची कथा ही जणू चंबळचीच कथा होय!
चंबळच्या बिहडची निर्मिती आणि डाकू संस्कृतीचा उगम
चंबळचे नाव घेताच हिंदी सिनेमातले डाकूपट आठवतात, हिंदी साहित्यातल्या दरोडेखोरांच्या कथा समोर येतात. चंबळ म्हटले की दुर्गम प्रदेश, डोंगरदऱ्यांचे चित्र डोळ्यांपुढे तरळते. बिहड शब्द कानी येतो. बिहड म्हणजे जमिनीचे उंचसखल असणारे रुक्ष निकृष्ठ भूस्वरूप, चंबळच्या कृपेने हा शब्द जगभर ज्ञात झाला! चंबळ ही यमुनेची उपनदी. मध्यप्रदेश, राजस्थान आणि उत्तरप्रदेश या राज्यांतून वाहते. या तिन्ही राज्यांच्या सीमा चंबळच्या उष्ण कटीबंधीय जंगलाला लागून आहेत. मध्यप्रदेशातील 'जानापाव' येथे विंध्य पर्वतात चंबळचा उगम. चंबळ नदीची एकूण लांबी 960 कि.मी. तिच्या क्षेत्रातील लोकसंख्या पन्नास लाखाच्या आसपास आहे. चंबळच्या घाटीत असणाऱ्या ओसाड उष्ण जंगलात बिहडमध्ये आश्रय घेऊन राहणार्या डाकूंनी चंबळची कुप्रसिद्ध ओळख निर्माण केली असं म्हणणं या नदीचा अवमान ठरेल आणि सत्य पुन्हा एकदा दडपले जाईल!
1960 च्या दशकात चंबळचे खोरे मध्यप्रदेशातच नव्हे तर संपूर्ण भारतात कुप्रसिद्ध होते. तेव्हा या खोऱ्यात डाकूंच्या अनेक टोळ्या होत्या. त्यांच्यात आपसांत लढाया व्हायच्या. रोज खून, लुटालूट होई आणि बंदुकीच्या गोळ्यांचा पाऊस पडत असे. इथले लोक अक्षरशः जीव मुठीत घेऊन जगायचे.
लेडी डाकू झालेल्या रेणू यादवची लाईफस्टाईल एखाद्या मॉडेलसारखी होती. निळी डेनिम, पांढरा शर्ट, स्पोर्ट शूज व कपाळावर लाल टिळा. ही तिची ओळख. दस्यु सुंदरी या नावाने ती फेमस होती. चंबळच्या दऱ्याखोऱ्यांत तिची दहशत होती. ती इतकी देखणी होती की तिचे सौंदर्यच तिच्या हिताआड आले. तिच्या प्राप्तीसाठी रक्ताचे पाट वाहणारे डाकू परस्परांचा जीव घेण्यास आतुर झाले होते. हेमांगी काया, नितळ, निरागस नि सुंदर चेहरा, पाच फूट आठ इंच उंची, लांब घनदाट काळे केस असं तिचं रुपडं होतं. पाहणाऱ्यावर तिची मोहिनी पडे.
शाळेत जाताना अपहरण; रेणूच्या आयुष्याला लागलेलं वळण
पाच बहिणींतली सर्वात थोरली होती. युपीच्या औरेया जिल्ह्यातील जमालीपूर गावातला तिचा जन्म. तिचे वडील विद्याराम यादव अत्यंत गरीब सालदार कष्टकरी होते. खाणारी तोंडे पुष्कळ असल्याने संसार कसाबसा चालत होता. तरीही त्यांनी रेणुला शिकवले. तिला पुस्तकांची आवड होती. शिकून सावरून वडिलांना मदत करण्याचे तिचे स्वप्न होते. पण तिच्या नशिबात दुसरेच काहीतरी होते. चंबळचेही असेच होते! द्रौपदीने कथित शाप देण्याआधी ती निहायत खास होती!
29 नोव्हेंबर 2003 रोजी सकाळी रेणू तिच्या मैत्रिणींसोबत शाळेत जात असताना चंबळचा डाकू चंदन यादवने तिला पाहिले. तिचे सीधेसाधे वर्तन आणि देखणंपण यामुळे तो अक्षरशः बहकला! थेट तिचे अपहरणच केले. संध्याकाळ होऊनही रेणू घरी न आल्यामुळे तिचे कुटुंब काळजीत पडले. रेणूचे वडील विद्याराम यांनी पोलिसांत तक्रार दखल केली. पण पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतर डाकू चंदन यादवने तिच्या वडिलांकडे तिच्या मोबदल्यात दहा लाखांची खंडणी मागितली. रेणूचे वडिल खचून गेले. चार गरीब मुलींचा तो बाप इतकी रक्कम कुठून आणणार होता? अशक्य होतं हे! काही केल्या त्यांची जुळवाजुळव होत नव्हती. दरम्यान ते रोजच पोलिसचौकीच्या पायऱ्या चढत.

मात्र हाती काहीच लागले नाही. शाळेला निघालेली ती पोर थेट डाकूंच्या अड्ड्यावर पोहोचली. त्यांच्या टोळीत ती एकमेव स्त्री होती. आपली सुटका व्हावी म्हणून तिने मिनतवाऱ्या केल्या पण फरक पडला नाही. सुरुवातीच्या दिवसांत तिच्यावर घोर अत्याचार झाले. मारझोडीपासून ते उपाशी ठेवण्यापर्यंतचे छळ केले गेले. ज्या पद्धतीने एखाद्या स्त्रीला इच्छेविरुद्ध बाजारात बसवले जाते तसे तिच्या मर्जीविरुद्ध हाती बंदूक ठेवली गेली. शस्त्र चालवण्यासाठी दबाव आणला गेला.
सौंदर्य ठरलं शाप; रक्तरंजित सत्तासंघर्षाची सुरुवात
तिच्या विरोधास न जुमानता तिच्यावर जबरदस्ती केली गेली. कुणीतरी आपली सुटका करेल या आशेवर ती दिवस काढत होती. मात्र तसे घडले नाही. वडील, पोलीस कुणीच आलं नाही मग चंबळच्या कुशीत जगण्याशिवाय पर्याय उरला नाही. यातूनच डाकू रेणू यादव घडली! द्रोपदीच्या अन्यायप्रसंगी मौन राहण्याची साक्षीदार असल्याची चंबळला जशी शिक्षा मिळाली तशीच सजा रेणू यादवला मूक राहून अन्याय साहण्यापायी मिळाली.
चंदन यादवने स्वतःला दस्यु सम्राट घोषित केले होते. आता रेणू यादव त्याच्या गँगची दस्यु सुंदरी म्हणून ओळखली जाऊ लागली. त्या दिवसांत डाकू चंदन यादव त्याच्या गँगची राजस्थान, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशातील काही गावांत दहशत होती. सर्वसामान्य नागरिकच नव्हे तर इतर डाकूही चंदन यादवला घाबरत होते. दरम्यान रेणूच्या नावानेही लुटमार, अपहरण, खंडणी सारखे अनेक गुन्हे दाखल झाल होते. पुढे जाऊन ती चंदन यादवच्या मुलीची आईही झाली होती. पण तिच्या समस्या काही सुटल्या नव्हत्या.
एव्हाना तिच्या सौंदर्याची दास्तान चौदिशेला आकळली. चंदन यादव प्रमाणेच इतर डाकूंनाही ती हवी होती. पण चंदनच्या दहशतीमुळे तिच्यावर हात टाकण्याची कुणाची हिंमत होत नव्हती. अखेर रामवीर गुर्जरने हे काम पार पाडले! त्याने चंदनची हत्त्या केली. जवळपास एका आठवड्याने रामवीर गुर्जरने रेणूवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी रेणूने रामवीरच्याच सेल्फ लोडिंग रिव्हॉल्वरने त्याला गोळ्या घातल्या. चंदन यादवचा पूर्वीच मृत्यू झाला होता. आता रामवीर यादवलाही तिने गोळ्या घातल्या होत्या. त्यामुळे ती संधी साधून जंगलात पळून गेली. सात दिवस जंगलात भटकल्यानंतर ती आपल्या घरी परतण्यात यशस्वी झाली! विशेष बाब म्हणजे तेव्हा ती गर्भवती होती!
डाकूंच्या तावडीतून सुटका, पण पोलिसांनीच गुन्हेगार ठरवलं
आत्मसमर्पणासाठी तिने थेट इटावा पोलिसांशी संपर्क केला नि इथेच घात झाला. दरोडेखोरांच्या तावडीतून सुटलेल्या रेणूसोबत पोलिसांचे वर्तन भयंकरच होते! 14 फेब्रुवारी 2005 रोजी इटावाचे तत्कालीन एसएसपी दलजीत चौधरी कोतवाली प्रभारींसोबत रेणूच्या घरी पोहोचले आणि तिला सुरक्षिततेचे आश्वासन दिल्यानंतर तिला कोतवालीत आणले. तेथे पोहोचताच तिला अटक करण्यात येऊन जालौन, इटावा, कानपूर देहातसह अनेक जिल्ह्यांमध्ये चंदन यादववर नोंदवलेले सर्व गुन्हे तिच्या नावावर दाखल करण्यात आले. योग्य त्या पद्धतीने सुटका होण्याऐवजी तिची रवानगी थेट तुरुंगात केली गेली.

हे धक्कादायक होतं! आधी डाकूंशी आणि नंतर समाजाशी लढणाऱ्या रेणूला आता कायद्याचा सामना करायचा होता! तिने तो पुरजोर ताकद लावून केला. रेणूचे मामा शिवसिंग, वायुसेनेचे माजी सैनिक आणि रमाबाई नगरचे जिल्हा पंचायत सदस्य यांनी आपल्या भाचीला कायदेशीर लढाईत पूर्ण पाठिंबा दिला. न्यायालयाने रेणूला सर्व 17 खटल्यांतून दोषमुक्त केले. या प्रकरणी पोलिसांची कारवाई अत्यंत बेजबाबदार असल्याचे लक्षात घेऊन न्यायालयाने पोलिसांना खडसावले. सात वर्षे चाललेली न्यायालयीन लढाई जिंकून रेणूची 29 मे 2012 रोजी लखनौच्या नारी बंदी निकेतनमधून सुटका झाली.
न्यायालयीन लढाईनंतर निर्दोष मुक्तता
दरम्यान तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. कारावासातून मुक्त होताच उर्वरित आयुष्य सुलभ नव्हतं. रामवीरला गोळ्या घालूनदेखील त्याच्या टोळीचे अस्तित्व शाबूत राहिले होते हे रेणूला अटकेनंतर काही महिन्यांनी कळले होते मात्र ती डगमगली नव्हती. सुटकेनंतर तिने आपले मांडलिकत्व स्वीकारावे म्हणून रामवीरच्या टोळीने तिच्यावर दडपण आणले. खलास करण्याच्या धमक्या दिल्या मात्र रेणूने त्यास भीक घातली नाही. तिने यूपीमधील तत्कालीन एसपी सरकारकडे आर्जव केलं, सुरक्षा मागितली. अखिलेश यादवांनी तिला सुरक्षा बहाल केली. तिला बिहडमध्ये जायचे नव्हते.
कोणत्याही स्थितीत पुन्हा जंगलात परतण्याची इच्छा नव्हती. आपल्या मुलीचे चांगल्या पद्धतीने संगोपन व्हावे, आपल्या आयुष्याची सावली तिच्यावर पडू नये यासाठी तिने आपल्या मुलीलाही आपल्या आईकडे पाठवून दिले. रेणू यादवच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. पण ती खचली नाही. तिची आपल्यासारख्या महिलांसाठी कार्य करण्याची इच्छा आहे. हा मार्ग तिला राजकारणाकडे घेऊन गेला. निवडणूक लढवून तिने स्थानिक लोकप्रतिनिधीत्वही मिळवले. मात्र समाजाने तिला पुरते स्वीकारले नाही. आपल्या जन्मगावी ती आता शांततेत आयुष्य जगतेय.
फुलन देवी, सीमा परिहार, नीलम गुप्ता, सरला जाटव, सीमा यादव यांच्या जीवनकथा कमी अधिक फरकाने अशाच आहेत. चंबळने त्यांना नाव दिले मात्र त्यांचे चरित्र दागदार केले, कथित रित्या त्यांचे शील लुटले गेले तरी त्या पवित्रच होत्या कारण त्यांचे मन कधीच भ्रष्ट झाले नव्हते. समाजाने त्यांना कधीही अंतःकरणापासून पुरते स्वीकारले नाही मग त्यांना उचित मानसन्मान मिळण्याची गोष्ट दूरच!
चंबळचेही असेच झालेय, तिला नावलौकिक आहे मात्र तिला सन्मान लाभला नाही की तिचे पूजन होत नाही. प्रत्येक स्त्रीमध्ये एक नदी नांदते याचा विलविलक्षण प्रत्ययकारी अनुभव या डाकूराणींचे चरित्र अभ्यासताना येतो. भारतीय स्त्रिया आणि चंबळ यांच्या वाट्याला आलेले गुणलक्षणातले साम्य विलक्षण आहे!
(साभार - समीर गायकवाड यांच्या फेसबुक पेजवरून)






