समीर गायकवाड
- एस. जानकी यांचं नाव घेतलं की, सर्वप्रथम आठवतो तो त्यांच्या आवाजातील विलक्षण कोमलपणा. दक्षिण भारतीय शास्त्रीय संगीताच्या परंपरेत रुजलेला हा स्वर केवळ हजारो गाण्यांचा नव्हता; तो विरह, भक्ती, शृंगार आणि आयुष्याच्या खोल जखमांचा स्वर होता.
- पती आणि एकुलत्या एक मुलाच्या निधनानंतर आयुष्यभर रंगांचा त्याग करून जगलेल्या जानकी अम्मांच्या गायकीतही काळानुसार एक संन्यस्त शांतता उतरली.
- त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसंगीतातील एका सुवर्णपर्वाचा शेवट झाला आहे.
चोल, पल्लव आणि विजयनगर साम्राज्य काळात एस. जानकी जन्मल्या असत्या तर त्यांचा इतिहास आतापेक्षा अधिक वेगळ्या आणि ओजस्वी शब्दांत लिहिला गेला असता. राजा बुक्क राया याच्या कलावंतांच्या ताफ्यातील रामप्पा ह्या महान शिल्पकाराने जानकी यांचेही उत्कट आर्त शिल्प बनवले असते!
शतकानु शतकांपासून उत्तरेकडील राज्यात नाचगाणं व्हायचं मात्र ते कोठयावर चालायचं. त्या बदनाम गल्ल्यात जाऊन गाणी ऐकणारी दोनच प्रकारची माणसं होती, एक म्हणजे अट्टल शौकीन आणि दुसरे म्हणजे अय्याश कदरदान!
मात्र दक्षिणेकडील इतिहास पाहिला तर असं लक्षात येतं की तिकडे तवायफ आणि कोठे नव्हते! मात्र तिथे वेगळा पर्याय होता आणि तो देवदासी परंपरेचा होता! या परंपरेतील स्त्रियांना नाचगाणं करण्यास भाग पाडले जाई. पुढे जाऊन हे सगळं त्यांच्या अंगवळणी पडलं की त्या बायका त्यात मुरत असत! नाचगाणं त्यांच्या रोमरोमात भिनत असे आणि त्यांचे एक वेगळेच रूप समोर यायचे.
सद्र कचेरी किंवा सदर कचेरी ह्या नावाने याला तत्कालीन राजेशाहीतही मान्यता असे. पुढे जाऊन मंदिर, सभागृह आदी ठिकाणी देखील देवदासी नाचू लागल्या, गायकी सादर करू लागल्या. यात प्रामुख्याने पदम आणि जावळी हे दोन प्रकार असत. अत्यंत संथ लय असलेली शृंगारिक आणि भावपूर्ण गाणी पदम श्रेणीत असत. यामध्ये नायक आणि नायिकेमधील प्रेम, विरह आणि मिलन यांचे वर्णन असे. जावळी हा गाण्याचा प्रकार 'ठुमरी'शी अत्यंत साधर्म्य असणारा. जावळी ही जलद लयीत गायली जाणारी, काहीशी चंचल, थेट आणि थेट शृंगारिक भावना व्यक्त करणारी गाणी असत. ही गाणी प्रादेशिक भाषांमध्ये तेलगू, तमिळ, कन्नड, मल्याळम असत.
देवदासी परंपरेच्या स्वरविश्वातून उमललेली गायिका
ह्या गायकीत ख्यातनाम होण्यासाठी ज्या प्रकारचा स्वर, ज्या प्रकारचा आलाप घेणं अपेक्षित असे, आरोह अवरोहवरची हुकूमत आवश्यक मानली जाई त्यात एस. जानकी यांचा आवाज अगदी परफेक्ट सूट होतो. अशी वैशिष्ट्ये असलेली त्यांनी गायलेली गाणी नजरेसमोर आणली तर हे नक्की पटेल. विशेषतः त्यांची कन्नड आणि तमिळ गाणी अधिक चपखल ठरतील. 'सत्यमेव जयते' ह्या हिंदी सिनेमामधलं दिल में हो तुम.. आंखो में तुम' हे गाणं नव्याने ऐका, तुम्हालाही उमगेल. असो…
साऊथच्या फिल्म आणि म्युझिक इंडस्ट्रीमध्ये जानकीअम्मा ह्या नावानेच त्या ओळखल्या जायच्या. त्यांच्या क्लिप्स किंवा फोटो पाहिले तर लक्षात येईल की एके काळी त्या रंगीत साडी घालून, साधाच पण नेटका शृंगार करून गायनाला उभ्या असत. मात्र मागील तीन दशकातले त्यांचे फोटो, व्हिडीओ क्लिप्स पाहिल्या तर त्यांचे राहणीमान आणि वेशभूषा लक्षणीय बदलल्याचे जाणवते.
कपाळावर आडवा शिवगंध लावलेल्या आणि पांढुरक्या शेडच्या साडीत त्या सर्रास दिसू लागल्या. कसलाही साजशृंगार नाही की, कसला लेप नाही! जे आहे ते असे आहे अशा पद्धतीचे त्यांचे दर्शन होई. इतकेच नव्हे तर एस. जानकींची पहिल्या पाच दशकातली गाणी आणि शेवटच्या दोन दशकातली गाणी पाहिली तर एक फरक नक्की लक्षात येईल की, त्यांनी शांत शीतल मधुर गाणी नंतरच्या काळात अधिक गायलीत.
इलायराजाने जानकीच्या गायकीला हिऱ्याचे पैलू पाडले
ह्या सगळ्यामागे एक गोष्ट होती.. एस. जानकींची विरह गीते अधिक फेमस झाली. त्यांच्या आवाजाचा खास स्वर आणि कोमलता त्यात अधिक गहिरी जाणवते. कन्नड, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम या चारही भाषेत त्यांनी हिट गाणी दिली आहेत. एस. पी. बालसुब्रमण्यम आणि येसुदास हे त्यांचे आवडते सहगायक. इलायराजाने त्यांच्या गायकीला हिऱ्याचे पैलू पाडले.

एस. जानकी यांचा जन्म गुंटूर येथील पल्लापटला, रेपल्ले गावात एका तेलगू भाषिक ब्राह्मण कुटुंबातला. करीमनगर जिल्ह्यातील सिरसिला येथे डिस्पेन्सरी चालवणारे त्यांचे वडील शिष्टला श्रीराममूर्ती हे शिक्षक आणि आयुर्वेदिक डॉक्टर होते. जानकींना लहानपणापासूनच संगीताची आवड होती आणि त्यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षी सादरीकरण करण्यास सुरुवात केली. त्यांनी नादस्वरम विद्वान श्री पैडीस्वामी यांच्याकडून फक्त एक वर्ष संगीताचे शिक्षण घेतले. त्यांनी कोव्वूर येथे वाराणसी बलरामय्या यांच्याकडून काही गाणीही शिकली. त्यांना चित्रपट संगीताची प्रेरणा मिळाली आणि चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी त्या रंगमंचावर लता मंगेशकर, पी. लीला, जिक्की आणि पी. सुशीला यांची गाणी सादर करत असत. मात्र ह्या सगळ्याहून अधिक प्रेरणा त्यांना एका व्यक्तीने दिली आणि ते म्हणजे त्यांचे मित्र, गुरु, हितैषी आणि प्रियकर असणारे व्ही. रामप्रसाद! रामप्रसाद यांनी जानकींच्या करियरला खरा आकार दिला. पुढे जाऊन ते दोघे विवाहबद्ध झाले.
रामप्रसाद... आयुष्यभराचा आधार
प्रभू रामचंद्र यांच्या पत्नीचे नाव जानकी होते आणि रामप्रसाद यांच्या पत्नीचे नावही जानकीच होते! ‘एक जान है हम’ अशा पद्धतीचे त्यांचे प्रेम होते. मुरली कृष्णा हे त्यांचे एकुलते एक अपत्य! ह्या त्रिकोणी संसारात अफाट सुख होते. मात्र 1996 मध्ये रामप्रसाद यांचे निधन झाले आणि जानकी अम्मानी काही काळ स्वतःला कोंडून घेतलं. आपल्या रामाशिवाय जगणं त्यांना मान्य नव्हतं. अखेर त्यांची समजूत काढण्यात आली.
सर्वांना वाटलं, लवकरच सारं सुरळीत होईल. काही अंशी गाडी मार्गी लागली देखील, मात्र काही ओरखडे तसेच राहिले जे जगाला दिसले नाहीत. मात्र जानकीच्या काळजावर त्याचे चरे कायम राहिले. त्यांचे बाह्यवर्तन पद्म गायकी गाणाऱ्या गायिकेसारखे झाले! त्यांनी आयुष्यातले सर्व रंग वर्ज्य केले. शृंगार कायमचा त्यागला. एखाद्या संन्यस्त गायिकेसारख्या त्या दिसू लागल्या. त्यांच्या चाहत्यांनी समजून घेतलं की, जानकीने रामाचं निर्गमन काळजाला लावून घेतलंय!
विरहानंतर बदललेलं आयुष्य, बदललेली गायकी
ह्यानंतर त्यांची गायकीही धीरगंभीर शांतशीतल होत गेली. दरम्यान वाढत्या वयाने त्यांना शारीरिक थकवा येऊ लागला. भरतनाट्यम मध्ये निपुण असणाऱ्या उमासोबत मुरली कृष्णचे लग्न झाले. मुरली कृष्णने गायन संगीत अभिनय क्षेत्र निवडण्याऐवजी नृत्याविष्कारावर जीव लावला. त्यात त्याने नाव कमावले. उमा आणि मुरली यांना दोन मुली झाल्या, त्याही उत्तम नर्तिका आहेत. अलीकडील काळात जानकी अम्मा ह्या सुखात रमल्या होत्या मात्र पुन्हा एकदा त्यांना वियोगाचा सामना करावा लागला.
सहा महिन्यापूर्वीच त्यांचा एकुलता एक मुलगा मुरली कृष्ण याचे वयाच्या ६५ व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. जानकी अम्मा कायमच्या कोलमडून गेल्या. त्यांनी सार्वजनिक जीवनातून स्वतःला अलग केलं. आधी पती आणि नंतर एकुलता एक मुलगा ह्यांच्या जाण्याने त्यांची उमेद नष्ट झाली आणि त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या आवाजातले ‘गगनवो येल्लू’ हे कन्नड गाणं ज्यांनी ऐकले असेल त्यांना एस. जानकी यांच्या आवाजाचा खरा टोन नक्की उमजेल.
मुरुगन हे दक्षिणेकडचे आद्य दैवत! मुरुगनचे एकही मंदिर नसेल जिथे एस. जानकीचे ‘सिंगार वेळनि देवा’ हे गाणं लावलं जात नसेल! मुरुगन, एस. जानकी आणि हे गाणं यांचं एक अजब समीकरण आहे! दुसरी गोष्ट एस. जानकी यांच्या चाहत्यांची! जेन झेड पासून ते शंभरी गाठलेले चाहते मिळण्याचे भाग्य असणारी विविध भाषांमध्ये हिट गायकी सादर करणारी चतुरस्त्र गायिका सद्यकाळात तर दृष्टीक्षेपात नाहीये. कदाचित चित्रा यांचे नाव त्यात असू शकेल, मात्र चित्रा स्वतःच जानकी भक्त आहेत!

एका सुवर्णकार कुटुंबात जन्माला येऊनही वयाच्या अठराव्या वर्षी आईचे निधन झाल्यावर घर सोडून परागंदा झालेल्या फारूक कैसरने त्याची पत्नी आयेशा हिच्यासाठी एक गाणं लिहिलेलं - दिल में हो तुम, आँखो में तुम! सत्यमेव जयते चित्रपटात विनोद खन्ना आणि अनिता राज यांच्यावर हे गाणं चित्रित झालं. बप्पीदा आणि जानकी यांनी हे अप्रतिम गाणं गायलं. चित्रपट रिलीज झाल्यानंतर बरोबर सहा महिन्यात फारूक कैसरचे निधन झाले. त्यांच्या दोन मुलांचेही निधन झाले. हे गाणं नीट ऐकलं तर लक्षात येईल की, ही तर एस. जानकी यांच्या आयुष्याची कथा आहे! त्यांच्या निधनाने एका पर्वाची सांगता झालीय. एस. जानकी यांच्या जाण्याचं सर्वाधिक दुःख चित्रा यांनाच झालं असेल, त्यांचं औदासिन्य लवकर दूर होवो!
पद्मभूषण नाकारणारी स्वाभिमानी कलाकार
- जानकी अम्मा यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट गाणी सादर केली. त्यांच्या अतुलनीय अभिनयामुळे त्यांना चार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले.
- संगीतातील योगदानाबद्दल त्यांना ३३ राज्य चित्रपट पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलं होतं. जानकी अम्मा यांनी आपल्या कलेशी किंवा सन्मानाशी कधीही तडजोड केली नाही. म्हणूनच, २०१३ मध्ये जेव्हा केंद्र सरकारनं देशाचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या पद्मभूषण पुरस्कारासाठी त्यांची निवड केली, तेव्हा त्यांनी तो पुरस्कार स्पष्टपणे नाकारला.
- त्यावेळी जानकी अम्मा यांचं म्हणणं होतं की, भारतीय संगीतातील त्यांच्या दीर्घ आणि महत्त्वपूर्ण योगदानामुळे त्यांना भारतरत्न पुरस्कार खूप आधीच मिळायला हवा होता..
- एस. जानकी यांनी सहा दशकांच्या कारकिर्दीत चित्रपट, अल्बम आणि रेडिओसाठी ४८,००० हून अधिक गाणी रेकॉर्ड केली. त्या भारतातील सर्वात अष्टपैलू गायकांपैकी एक होत्या. त्यांनी तेलुगू, तमिळ आणि हिंदीसह २० भारतीय भाषांमध्ये, तसेच अनेक परदेशी भाषांमध्ये आपल्या आवाजाची जादू पसरवली.
- त्यांनी वयाच्या नवव्या वर्षी, एक बालकलाकार म्हणून पहिल्यांदा रंगमंचावर सादरीकरण केलं. वयाच्या १९ व्या वर्षी पहिलं तमिळ गाणं रेकॉर्ड केलं.
- संगीत उद्योगाला ६० वर्षे समर्पित केल्यानंतर, त्या २०१६ मध्ये निवृत्त झाल्या. पण, त्यांनी २०१८ मध्ये एका तमिळ चित्रपटातून पुन्हा पदार्पण केलं.
- एस. जानकी तमिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी या भाषा अस्खलितपणे बोलायच्या. एस. जानकी यांनी आपली बहुतेक गाणी कन्नड आणि मल्याळम भाषेत गायली.






