कोमल ठोंबरे
- तालिबानने गर्भनिरोधक गोळ्यांवर बंदी घातलीआहे.
- पुरुष म्हणतात, मुलं म्हणजे अल्लाची देणगी. कितीही दिली तरी घ्यायची. स्त्रीला त्यात नकाराचा हक्कच नाही.
- लो ब्लड प्रेशर, अॅनिमिया, व्हिटॅमिन डिफिशियन्सीने बायकांचे देह पोखरले गेले आहेत.
36 वर्षांची परवाना आता आपल्या मुलांना ओळखूही शकत नाही. कंधारच्या गावात आपल्या आईच्या घरी बसलेली ती शांतपणे हलत राहते. नऊ वेळा गर्भवती आणि सहा वेळा गर्भपात झाला आहे. पती आणि सासरच्यांच्या दबावामुळे परवाना मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खचली आहे. तिची आई शरीफा म्हणते की, तिला भीती आणि सततच्या गर्भधारणेने तोडले आहे.
काबुलच्या कुठल्याही गल्लीत गेल्यावर एक विचित्र शांतता जाणवते. अंगावर काटा आणणारी… जुन्या शहरातील अरुंद रस्त्यांमधून चालताना जाणवतं की इथलं आयुष्य थांबलेलं आहे. प्रत्येक खिडकी, प्रत्येक पडदा, प्रत्येक बंद दाराच्या आत काहीतरी दडलेलं आहे आणि त्या प्रत्येक दडलेल्या आठवणीत महिलांचा श्वास दाबला गेला आहे, एक स्वप्न मोडलेलं आहे, एक शरीर वाकवलेलं आहे.
गेल्या काही वर्षांत तालिबानने महिलांच्या आयुष्यांवर लादलेल्या निर्बंधांमध्ये आता एक नवीन काळोख उतरला आहे तो म्हणजे गर्भनिरोधकांवरील बंदी. ही बंदी जरी अधिकृत कायद्यासारखी जाहीर केली गेली नसली तरी तिचा परिणाम मृत्यूपेक्षाही अधिक घातक आहे. तालिबानच्या बंदुकींच्या छायेत फार्मसीचे दरवाजे बंद झाले, रुग्णालयं शांत झाली, दवाखान्यातल्या काउंटरवर ठेवलेल्या गर्भनिरोधकां गोळ्या गायब झाल्या आणि महिलांच्या हातात असलेली शेवटची एक छोटीशी निवडही नाहीशी झाली.
ही बंदी फक्त औषधांवर नाहीये तर ही बंदी म्हणजे स्त्रीच्या हक्कांवर उभं राहिलेलं एक निर्दय साम्राज्य. तिच्या देहावर, तिच्या गर्भाशयावर, तिच्या श्वासावर, तिच्या भवितव्यावर अनधिकृत, अनाहूत, निर्दयी ताबा.
तालिबानने गर्भनिरोधक गोळ्यांवर बंदी घातली
काबुलच्या एका जुन्या गल्लीत केमिस्टचं दुकान आहे. अतिशय साधं, दुकानाचा फलक अर्धवट तुटलेला. एका बाजूला काच फुटलेली. दुकानात एक वृद्ध फार्मासिस्ट बसले होते.
"गर्भनिरोधक मिळतात का?"
तो चेहरा वळवून म्हणाला, “मिळत नाहीत आणि मिळाले तरी देऊ शकत नाही. काही महिन्यांपूर्वी तालिबानच्या दोन गाड्या इथे आल्या. त्यांनी आम्हा सर्व फार्मासिस्टना चौकशीसाठी नेलं. सांगितलं की, ही औषधं म्हणजे वेस्टर्न कल्चर आहे. त्यांनी स्टॉक जप्त केला. काही दुकानं जाळलीसुद्धा.”
अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकारने महिलांसाठी गर्भनिरोधक गोळ्यांच्या वापरास बंदी घातली आहे. तालिबान डॉक्टरांना धमकी देतात की औषध दिल्यास क्लिनिक बंद करतील. देशभरात क्लिनिकही बंद होत आहेत. महिलांना गर्भधारणा किंवा गर्भपातावर उपचार मिळत नाहीत. बदगीस प्रांतातील एका खाजगी क्लिनिकमध्ये इशारा देऊन सर्व औषधे नष्ट करण्यात आली. जवजजान प्रांतात 30 वर्षांपासून क्लिनिक चालवणारे एक डॉक्टर म्हणतात, तालिबान सत्तेत आल्यापासून गर्भनिरोधक गोळ्या वेगाने संपत आहेत. येथे 70 पैकी 30 महिलांना याची गरज होती, आता आम्ही सांगतो की आमच्याकडे काहीही नाही. कंधार प्रांतासह अनेक ठिकाणी थेट पुरुष डॉक्टरांकडून उपचार घेण्यावर कठोरता आहे.
पहिली मुलगी वाढायच्या आधीच दुसरं पोट आलं. मग तिसरं… मग चौथं.”
कंदहारमधील एका अंधाऱ्या घरात शरीफा राहते. तिच्या चेहऱ्यावरील प्रत्येक रेषा सांगते की तिनं आयुष्याशी तडजोड केली आहे. तिचा पोटाचा घेर अनेक वेळा फाटला आहे. तिच्या कुशीत तीन लहान मुलं खेळत आहेत, दोन बाहेरच्या खोलीत. तब्बल नऊवेळा शरीफा घर्बवती राहिली आहे. तिच्या आवाजात एक थरथर आणि वेदना आहे, जणू प्रत्येक शब्द तिच्या शरीरातूनच गळून पडतो.
“पहिली मुलगी झाली तेव्हा मी अठरा वर्षांची होते. तिचा जन्म झाल्यावर डॉक्टरांनी सांगितलं होतं की माझं शरीर कमजोर आहे, जास्त गर्भ उचलू नये. पण आम्हा महिलांना विचारतो तरी कोण? औषध तरी मिळत नव्हतं, आणि पुरुषांच्या मनात अल्लाची इच्छा हा एकमेव न्याय. पहिली मुलगी वाढायच्या आधीच दुसरं पोट आलं. मग तिसरं… मग चौथं.”
शरीफा सांगते की चौथ्या प्रसूतीनंतर ती सलग तीन महिन्यांनी बेशुद्ध पडू लागली. रक्त कमी झालं, हाडं कमजोर झाली. पण तरीही गर्भधारणेचं चक्र थांबलं नाही. ती म्हणते,
“कधी कधी मला वाटायचं की मी गाय आहे, माणूस नाही. माझे हात थरथरतात,श्वास कमी होतात, पण गर्भ वाढत जातो.
‘’गोळ्या घ्यायला केमिस्टकडे गेली, तर त्याने हाकलून लावलं’’
काबुलची जमील…एक नाव जे हजारो महिलांचं प्रतिनिधित्व करतं. तिचं घर साधं आहे, भिंतीवर एक साधा गालिचा, खिडकीला एका बाजूने फाटलेला पडदा. त्या पडद्यातून येणारा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडतो. एक चेहरा जो सुंदर नसला तरी प्रखर आहे.
जमील म्हणते, मी आधी शिक्षण घ्यायची. गणित आवडायचं. माझं शिक्षक होण्याचं स्वप्न होतं. पण आता माझ्या आयुष्यात फक्त गर्भ येतात. दोन मुलं आधीच आहेत. तिसरं होणार आहे आणि मला हे तीनही गर्भ माझ्या इच्छेने नाही मिळाले.”
जमीलने दोन वेळा गर्भनिरोधक गोळ्या मिळवण्याचा प्रयत्न करताना फार्मसीने थेट हाकलून दिलं. एकदा तर फार्मासिस्टने तिच्या हिजाबला पकडून विचारलं,
“तुझ्या नवऱ्याने तुला यासाठी पाठवलंय का? की स्वतःच्या मनाने आलीस?”
ती त्या आठवणीवर ओठ म्हणाली, “त्या वेळी मला वाटलं, माझं शरीर माझं नाही. माझ्या आत वाढणारा गर्भ माझ्या मनाचा नाही. मी एक कैद झालेली स्त्री आहे.”
रुग्णालयातली शोकांतिका… दाईंची भीती
अफगाणस्तानच्या ग्रामीण भागातील एक दाई सांगते की, आधी ती महिलांना चोरून गर्भनिरोधक गोळ्या देत असे. तिने त्या आपल्या कपड्यांच्या आत एका पिशवीत लपवून ठेवलेल्या होत्या. गावातील महिला तिच्या खिडकीच्या जाळीवर गुपचुप टकटक करायच्या आणि दाई त्यांना गोळ्या द्यायची. फार काळ हे टिकलं नाही. तालिबानचे दोन सैनिक तिच्या घरी आले होते. त्यांनी तिच्या हातातून पिशवी हिसकावली, तिची तपासणी केली. गोळ्या सापडल्या नसल्या तरी तिला धमकावण्यात आलं की पुढे जर एखाद्या महिलेला गर्भनिरोधक दिलं तर परिणाम भयंकर होतील.
ती म्हणाली, "माझ्या हातात महिलांची वेदना आहे. पण तोंडात कुलूप आहे. त्यांना मदत करायची आहे, पण माझा जीवही माझाच नाही. कोणाचं आयुष्य वाचवायचं? माझं की तिचं?"
२९ वर्षांची जरघोना भूकंपांनंतर तंबूत राहू लागली होती. सलग तीन दिवस ती शौचालयात जाऊ शकली नाही. तिला आतड्यांचा त्रास झाला. डॉक्टरांनी तिला इशारा दिला की आता ती गर्भवती झाल्यास तिचा जीव जाऊ शकतो. पण एका वर्षानंतर तिला पुन्हा गर्भधारणा झाली. तिने बाळाला जन्म दिला. तिचा जीव वाचला, पण आता ती रक्तस्रावाशी झुंज देत आहे.
अफगाणस्तानातील एका झोपडीत एका तरुण आईला पाहिलं. तिच्या मांडीवर दोन मुलं झोपलेली होती. तिसरं मुल घराच्या कोपऱ्यात बसून कच्च्या अन्नाच्या तुकड्यांशी खेळत होतं. आणि तिच्या पोटाचा घेर स्पष्टच सांगत होता की चौथं मूल वाटेत आहे. ती चालताना लटपटत होती. तिच्या हाडांवरचं मांस वितळल्यासारखं वाटत होतं. आवाजात दम होता.
"मी दिवसाला एकच वेळ खातेय. पण पोटातलं मूल वाढतंय. मी नको म्हणण्याचा अधिकारच नाही. माझं आरोग्य विचारात घेतलं जात नाही. माझं शरीर मरत जातंय, पण गर्भ वाढतो. मी माझ्या मुलांची काळजी घेऊ की स्वतःची? मला कळत नाही."
अशा प्रत्येक घरात एकच प्रश्न भिरभिरत असतो, किती जन्मांनी एका स्त्रीचा जीव जातो?
पुरुष म्हणतात, हा तर अल्लाचा निर्णय…
इथल्या अनेक पुरुषांशी बोलताना एक चित्र स्पष्ट होतं. त्यांना वाटतं की महिलांचं मुख्य काम म्हणजे मुलांना जन्म देणं. पुरुषांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास असतो, टोकाचं वर्चस्व असतं, आणि गर्व असतो. एका पुरुषाने सांगितलं, “मुलं म्हणजे अल्लाची देणगी. कितीही दिली तरी घ्यायची. स्त्रीला त्यात नकाराचा हक्कच नाही.”
या वाक्यातच स्त्रीच्या अस्तित्वाचा पूर्ण अंत आहे. स्त्रीच्या शरीराचं नाव तिथे ‘आई’ आहे, पण तिला माणूस म्हटलं जात नाही. प्रसूती म्हणजे युद्ध, जिथे सैनिक आई असते, आणि रणांगण तिचं गर्भाशय…
गर्भनिरोधकांच्या अभावामुळे अफगाणस्तानात प्रसूत मृत्यूदर वाढतोय. महिलांच्या शरीरात पोषणाची कमतरता, रक्त कमी, उपचार नाहीत. रुग्णालये अनेकदा निष्क्रिय, डॉक्टर भयभीत, नर्सेसकडे साधनं नाहीत. अनेक महिलांनी स्वतःच्या घरी मृत्यू पाहिलाय. एका वृद्ध स्त्रीने सांगितलं, "पूर्वी आम्ही प्रसूतीचा आनंद साजरा करायचो. आता प्रत्येक प्रसूती एक भय आहे. एखादं मूल जन्माला आलं तर देवाचे आभार, कारण आईचा जीव वाचतोच याची खात्री नसते."
लो ब्लड प्रेशर, अॅनिमिया, व्हिटॅमिन डिफिशियन्सीने बायकांचे देह पोखरले
अफगाणिस्तानच्या ग्रामीण प्रांतांमध्ये स्त्रिया आज जणू आरोग्यव्यवस्थेच्या पूर्ण कोसळण्याखाली गाडल्या गेल्यात. दवाखाने बंद पडल्यामुळे प्रसूतीसाठी मैलोनमैल चालत जाण्याशिवाय त्यांच्याकडे पर्यायच उरलेला नाही. डोंगरांच्या कड्याकपारीत अडकलेल्या, चिखलाच्या रस्त्यांनी वेढलेल्या गावांत तर परिस्थिती आणखी भीषण, तिथे अनेक बायका घरातच, अनेकदा एकट्याच, पोटातल्या लेकराला जन्म देतात. मधे दाई मिळाली तर मिळाली; नाहीतर त्या रक्तस्त्रावात दिवसन्-दिवस झुंज देत राहतात, एखाद्या दवाखान्यापर्यंत पोहोचण्याआधीच दम छूटतो.
ही प्रजनन-संकटाची कहाणी आता देशाच्या आर्थिक पडझडीपासून वेगळी राहिलेलीच नाही. उत्तरेकडील जव्झजान प्रांतातील एका डॉक्टरच्या मते, ८० टक्के गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रिया कुपोषित असतात. हातावर मोजण्याइतकी केंद्रे उरलीत, औषधे नाहीत, पोषण नाही, त्यामुळे त्यांची शरीरे गर्भारपणाची जबाबदारी पेलण्याइतकी सक्षमच राहिलेली नाहीत. “लो ब्लड प्रेशर, अॅनिमिया, व्हिटॅमिन डिफिशियन्सी अशा आजारांनी यांनी या बायकांचे देह आतून पोखरून गेले आहेत,” ती डॉक्टर सांगते. “गर्भ पेलणे म्हणजे त्यांच्या शरीरासाठी आता धोक्याचा करारच बनला आहे.”
या भयावह परिस्थितीत घरगुती हिंसा तर पुन्हा-पुन्हा, प्रत्येक साक्षीतून, एखाद्या काळ्या नदीसारखी वाहतच राहते. गर्भपाताचे कारण म्हणूनही, आणि स्त्रीला वश करण्याच्या घरगुती ‘शिस्ती’च्या नावाखालीही. घरातून बाहेर पडता येत नाही, आश्रय शोधता येत नाही, आणि गर्भनिरोधकांवर अव्यक्त पण कठोर बंदी….
कंधारमधील रेहाना तिच्या बहिणीची, सकीनाची कथा सांगताना थरथरते. नवरा मेलेला तरुण वय, सासरकडून सुटका नाहीच. त्यांनी तिला भावजयीच्या जागी देऊन टाकलं. सकीनाने विरोध केला, तर तिच्यावर दिवसेंदिवस अत्याचार झाले. “प्रत्येक मारहाणीवर ती रक्तस्त्राव करत असे. आणि एके दिवशी… तिने पोटातलं लेकरू गमावलं.”
कंधारमधील एका गर्दीने भरलेल्या प्रसूतीगृहात काम करणारी हमीदा सांगते, हिंसा ही तिथे रोज दिसणाऱ्या गर्भपातांची मोठी कारणं आहे. “चोवीस तासांत शंभरच्या वर प्रसूती, आणि त्यात दररोज जवळपास सहा गर्भपात. त्यातले बरेचजण मारहाणीमुळे किंवा जड ओझं उचलताना, दमछाक होताना झाल्याने,”.
गर्भनिरोधकांवर अनधिकृत बंदी लागू होण्यापूर्वी ग्रामीण दवाखान्यांमध्ये बाळांमधील अंतर ठेवण्याच्या मोहिमा नियमित चालायच्या. आता त्या पूर्ण थांबल्या. “औषधच नाही तर जागृती करायची कशासाठी? तालिबानचे लिखित आदेश नाहीत, पण भीती मात्र मुठीभर जीव दाबून ठेवायला पुरेशी आहे. आम्ही उघड बोललो, तर दवाखाना बंद करतीलही भीती सर्वांच्या श्वासात आहे,” एक डॉक्टर कबूल करते.
संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांच्या मते, गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय निधी कमी झाल्यामुळे ४४० हून अधिक रुग्णालये आणि दवाखाने बंद पडले. ग्रामीण भागात महिला अनेक तास चालत दवाखान्यांपर्यंत पोहोचतात.
महिला एकट्यानेच घरी जन्म देतात. गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या ८०% महिला कुपोषित आहेत. त्यांना ॲनिमिया, जीवनसत्त्वांची कमतरता आणि कमी रक्तदाब आहे.
तालिबानच्या सत्तेखाली अफगाणस्तानातील महिला रोज जगत नाहीत, त्या रोज जगण्यासाठी लढतात. त्यांच्या अंगातील प्रत्येक हाड, प्रत्येक श्वास, प्रत्येक गर्भ, प्रत्येक मृत्यू, प्रत्येक पीडाहा एक असा इतिहास आहे, जो जगाने अजून नीट ऐकलेलाच नाही.
तालिबानचे महिलांवरचे निर्बंध
- शिक्षण: 12 वर्षांवरील मुलींना माध्यमिक आणि उच्च शिक्षण घेण्याची परवानगी नाही. अनेक प्रांतांमध्ये मुलींच्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत.
- नोकरी करणाऱ्या महिलांवर बंदी: अनेक सरकारी आणि खाजगी क्षेत्रांमध्ये महिला काम करू शकत नाहीत. डॉक्टर, नर्स, शिक्षिका यांसारख्या महिलांच्या नोकऱ्यांवर परिणाम झाला.
- एकट्याने ये-जा करणे: महिला पुरुष पालकाशिवाय घराबाहेर जाऊ शकत नाहीत. उघडा चेहरा: महिलांना पूर्ण हिजाब किंवा बुरखा घालणे बंधनकारक आहे. संगीत, खेळ आणि मनोरंजनात महिलांच्या सहभागावर बंदी आहे.2024 मध्ये सार्वजनिक ठिकाणी बोलण्यावर बंदी घालण्यात आली होती.
(संदर्भ - द गार्डियन)






