ब्रिटीश-भारतीय चित्रपट दिग्दर्शक संध्या सुरी या तरुण दिग्दर्शिकेने ‘संतोष’नावाचा सिनेमा तयार केला… या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि पटकथा स्वत: संध्या सूरी यांनी लिहिली आहे. भारतीय जाती व्यवस्थेवर भाष्य करणारा हा सिनेमा… पोलिस अधिकाऱ्यांकडून केला जाणारा अमानुष छळ यावर भास्य करणारा हा सिनेमा… दलित महिलेला सहन करावा लागलेला लैंगिक हिंसाचार आणि भेदभाव याची कहाणी सांगणारा हा सिनेमा… ऑस्कर 2025 साठी शॉर्टलिस्ट झालेला हा सिनेमा… आशियाई फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘संतोष'च्या अभिनेत्रीला म्हणजे बॉलीवूड अभिनेत्री शहाना गोस्वामी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेला हा सिनेमा...आणि प्रतिष्ठेच्या ब्रिटिश अकैडमी फिल्म अवॉर्ड्स (BAFTA) आणि कान फेस्टिव्हलमध्ये अत्यंत गाजलेला हा सिनेमा…
इतकी सगळी ‘संतोष’ या सिनेमाची जमेची बाजू जरी असली तरी भारतात मात्र हा सिनेमा प्रदर्शित होऊ शकणार नाही, कारण या सिनेमावर भारतात बंदी घालण्यात आली आहे. संध्या सुरी यांच्या या चित्रपटाला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC)कडून सिनेमा प्रदर्शित करण्याची परवानगी नाकारली आहे. पोलिसांची नकारात्मक प्रतिमा यामधून दाखवली जात असल्याने सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला प्रदर्शित करण्यास परवानगी नाकारली आहे.
इस्लामोफोबिया आणि पोलिसांविरुद्ध हिंसाचार यामुळे भारतात सिनेमावर बंदी
‘संतोष’ या चित्रपटात स्त्रीयांशी संबंधित गंभीर मुद्दे, इस्लामोफोबिया आणि पोलिसांविरुद्ध हिंसाचार असे बरेच विषय हाताळण्यात आले आहेत. आणि याट कारणांमुळे CBFC ला चित्रपटातील काही दृश्यं आणि संवाद खटकले आहेत.
यासंदर्भात अभिनेत्री शहाना गोस्वामीने सांगितले की, “चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी त्यामध्ये बदल करण्याची मोठी यादी सेन्सॉरने दिली आहे. सेन्सॉरने सांगितलेले बदल आम्हाला मान्य नाहीत, कारण त्यामुळे चित्रपटातील बहुंताश भाग हा काढून टाकण्यात येईल, त्यामुळे चित्रपटात खूप बदल होतील, म्हणूनच हा चित्रपट भारतात थिएटरमध्ये प्रदर्शित होणार नाही अशी स्थिती आहे.”
‘’इतके ‘कट’ सुचवल्यानंतर सिनेमाला काही अर्थच उरत नाही’’
चित्रपटाला पटकथेच्या पातळीवर मान्यता मिळाली असताना सिनेमा प्रदर्शित करण्यावेळी अडचणींचा सामना करत असल्याची खंत शहाना गोस्वामीने व्यक्त केली. शहाना गोस्वामी म्हणाली, “ज्या चित्रपटाला पटकथेच्या पातळीवर सेन्सॉरची मंजुरी मिळाली आहे, त्याला भारतात प्रदर्शित करण्यासाठी इतके बदल करावे लागतील हे दुःखद आहे.”
संध्या सुरी यांनी सेन्सॉरच्या या निर्णयामुळे अपेक्षाभंग झाल्याचे म्हटले आहे. तसेच सेन्सॉर जे बदल करण्यास सांगत आहे, ते करणे अशक्य असल्याचेही त्यांनी मत व्यक्त केले. पुढे त्या म्हणाल्या, “हा चित्रपट भारतात प्रदर्शित व्हावा असे मला वाटते, त्यामुळे यातून काही मार्ग निघत असेल तर मी प्रयत्न करणार आहे.”
असं काय आहे ‘संतोष’ सिनेमामध्ये?
सरकारी नोकरीमध्ये कोणाचा नवरा मरण पावला तर त्याच्या बायकोला अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळते. संतोष म्हणजेच शहाना गोस्वामीचा नवरा दंगल नियंत्रण करत असताना दगडफेकीत मरण पावतो आणि त्याच्या जागेवर संतोषला कॉन्स्टेबलची नोकरी मिळते. ‘चिराग प्रदेश’ अश्या अर्थपूर्ण नावाच्या उत्तरप्रदेशच्या राज्यात एका गावात संतोष कॉन्स्टेबल म्हणून नोकरीवर रुजू होते. लगेचच तिला तिथे लैंगिक भेदभाव जाणवतो, पण तिला प्रामाणिकपणे नोकरी करायची असते. काही दिवसात एक दलित व्यक्ती त्याची मुलगी हरवली आहे म्हणून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करायला येतो, पण त्याची तक्रार कोणीच दाखल करून घेत नाही. दुसऱ्याच दिवशी त्या मुलीचं प्रेत विहिरीत सापडतं… मुलीवर बलात्कार झालेला असतो.
बातमी पसरताच गावातले सगळे दलित पोलीस स्टेशनवर जमतात आणि जोपर्यंत तिच्या मृत्यूची चौकशी होत नाही तोपर्यंत ते प्रेत हलवणार नाहीत, अशी भूमिका घेतात. मग मीडियात बातम्या प्रसिद्ध होतात, राजकारणी आपली पोळी भाजून घ्यायला येतात. तिथल्या स्टेशन इन्स्पेक्टरची उचलबांगडी होते आणि प्रमुख म्हणून गीता शर्मा (सुनीता राजवार) यांची नेमणूक होते आणि इथून कथा वेग घ्यायला लागते…
पोलीस प्रमुख गीता शर्मा सोबत मग संतोष देखील मुलीच्या खुनाच्या तपासणीमध्ये सहभागी होते. सगळ्यात अगोदर संतोष मोबाईल फोन तपासते, त्यात तिला सलीम नावाच्या मुलाचे काही खटकणारे मेसेजेस मिळतात. मग सलीमचाा मागोवा काढला जातो. तो वेगळ्याच शहरात असतो. संतोष अतिशय धाडस दाखवून सलीमला पकडते.
पुढे सलीम खरोखरच खूनी असतो का? त्याचं पुढे काय होत? गावाच्या प्रधानांचा यात काही संबंध असतो का? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिग्दर्शिका संध्या सुरी सरधोपट पद्धतीने देत नाही तर संतोषच्या वेगवेगळ्या प्रवासाबरोबरच ही सगळी उत्तरे मिळतात. ‘संतोष’मध्ये कुठेही नायिकेचं उदात्तीकरण नाही की, व्यवस्थेविरुद्ध बंड नाही, उलट एक सामान्य विधवा गृहिणी ते प्रगल्भ झालेली संतोष शेवटपर्यंत सिनेमात दिसते.
चित्रपटात अभिनेत्री शाहाना गोस्वामीची प्रमुख भूमिका असून आंतरराष्ट्रीय स्तरावर तिच्या अभिनयातून प्रचंड कौतुक झालं आहे. एकीकडे परदेशात हा चित्रपट प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद आणि कौतुक मिळवत असताना आपल्याच भारत देशात भारतीय चित्रपटावर अशी बंदी घालणं प्रेक्षकांमध्ये नाराजी पसरवत आहे. काहींच्या मते, हा निर्णय अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारा आहे, तर काही जणं सेन्सॉर बोर्डाच्या संवेदनशीलतेचे समर्थन करत आहेत.






