हिना सोनकर
‘असली मजा तो सब के साथ आता है’ अशी टॅगलाईन घेऊन एकदोन नव्हे तर गेली 17 वर्षे सुरू असलेली, जवळपास 4500 पेक्षा अधिक एपिसोड झालेली आणि टीआरपीच्या या शर्यतीत कित्येक वर्षांपासून टॉप 5 मध्ये असणारी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका एकामागोमाग एक असे विक्रम मोडीत काढत आहे. मालिकेतील गोकुळधाम सोसायटीत राहणारे जेठालाल, भिडे आणि माधुरी, रोशन सिंग आणि रोशन, बबिता आणि अय्यर, डॉ. हाथी आणि कोमल, तारक आणि अंजली, पत्रकार पोपटलाल आणि अब्दुल भाई आणि चंपक चाचा आणि टप्पू सेना तसेच जेठालालचे कर्मचारी नट्टू काका आणि बागा… या सगळ्या व्यक्तिरेखांवर कोट्यवधी रसिकांनी अतोनात प्रेम केलं. या सगळ्यांवर मिम्स तयार होतात, यांच्या लकबी, डायलॉग सगळ्यांना पाठ आहेत, इतकेच काय तर गोकुळधाम सोसायटीत घर विकत घेण्यासाठीही अनेकांनी मुंबई्च्या गोरेगावमध्ये या सोसायटीचा शोध घेतल्याचे किस्से आहेत. एकंदरीतच टेलिव्हिजनच्या दुनियेत 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका एक अजुबा ठरली आहे हे निश्चित.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही विनोदी दैनंदिन मालिका प्रक्षेपित होऊ लागली सब टीव्ही या वाहिनीवर. ती तारीख होती २८ जुलै २००८… विशेष म्हणजे आजवर या मालिकेतील विनोद ना कधी शिळा झाला, ना ही मालिका बघणारा रसिकवर्ग आटला. मालिका आहे हिंदीमध्ये. त्यात गुजराती कुटुंब मध्यवर्ती भूमिकेत असले तरी त्याच्या सोबतीला मराठी, शीख, दाक्षिणात्य अशी अठरापगड कुटुंबे आहेत.
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका ज्यावर आधारलेली आहे ती गोष्ट म्हणजे, तारक मेहता यांचा एक स्तंभ. १९७२ मध्ये ‘चित्रलेखा’ या गुजराती साप्ताहिकात तारक मेहता यांचा ‘दुनियाने उंधा चश्मा’ हा विनोदी स्तंभ सुरू झाला. रोजच्या जगण्यात आपल्या आजूबाजूला जी माणसे दिसतात, त्यांचे बारकाईने निरीक्षण करून ती माणसे आपल्या या स्तंभातून तारक यांनी पुन्हा एकदा चितारली. त्यांच्या वागण्यातले ताणेबाणे अचूक टिपताना त्यातून निर्माण होणाऱ्या विनोदाचा सुखद शिडकावाही या स्तंभातून वाचकांवर होत असे. त्यामुळे आपल्याच गोष्टी जरा उपरोधिक नजरेने मेहता जेव्हा सांगतात, तेव्हा त्या भलत्याच रोचक होतात, असा विश्वास वाचकांच्या मनातही जागा झाला.
कोण होते तारक मेहता?
तारक मेहता हे नुसतेच विनोदी लेखक नव्हते, तर बुद्धिचातुर्याची झालर त्यांच्या लिखाणाला होती. त्यांचा विनोद ‘इंटेलिजण्ट ह्युमर’ या वर्गात मोडणारा होता. त्याची जातकुळी चार्ली चॅप्लीनच्या कारुण्याची झालर असलेल्या विनोदासमान होती. किंबहुना एकाकी बालपणात चॅप्लिन हाच त्यांचा सखासोबती आणि आदर्श होता. म्हणूनही समाजाच्या भाव-भावनांचा आदर राखण्याचा संस्कार त्यांच्या लेखणीवर होता. २०१५मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. २०११मध्ये गुजराती साहित्य अकादमीचा साहित्य गौरव पुरस्कार, तसेच रमणलाल नीलकंठ हास्य पारितोषिक प्रदान करून मेहतांना गौरवण्यात आले. चित्रलेखातील त्यांच्या स्तंभावर बेतलेली हिंदी मालिका निर्मिली गेली, तिचे एक खास वैशिष्ट्य आहे. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही टेलिव्हिजनच्या इतिहासातील एकमेव अशी मालिका, जिच्या शीर्षकात लेखकाचे नाव आहे. तब्बल ४५ वर्षे मेहतांनी ‘दुनियाने उंधा चश्मा’ हा स्तंभ लिहिला. आता त्यावरची मालिका कदाचित त्याहून अधिक वर्षे लोकप्रियता टिकवून ठेवेल!’

निर्माते आसितकुमार मोदी यांनी लेखक तारक मेहता यांना भेटून सीरियलसाठी राइट्स घेतले. प्रत्येक चॅनलमध्ये जाऊन मालिकेची संकल्पना सादर केली. परंतु ‘सोशल’और ‘सास-बहू’ के अलावा और किसीको टीआरपी मिलता नहीं, असे सांगून त्यांना नकार मिळत गेला. मात्र ‘सोनी’ टीव्हीने ‘सब टीव्ही’ टेकओव्हर केल्यानंतर ‘सोनी’चे ओ. पी. सिंग यांनी स्वत: फोन करून त्यांना ‘तारक मेहता’ सुरू करण्याचे निमंत्रण दिले.
तारक मेहता यांच्या ‘दुनियाने उंधा चश्मा’ या स्तंभामध्ये विविध पठडीची पात्रे होतीच. या स्तंभावर आधारित ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका सुरू झाली तेव्हा तिच्यात आणखी पात्रांची भर पडली. त्यात मूळ रत्नागिरीचा पण मुंबईत स्थायिक झालेला आत्माराम तुकाराम भिडे व त्याची बायको, त्याशिवाय बिहारचा डॉ. हंसराज हाथी, जालंदरचा सरदार रोशनसिंग हरजितसिंग सोधी, चेन्नईचा कृष्णन सुब्रमणियम अय्यर व त्यांची बंगाली पत्नी बबिता, भोपाळचा अविवाहित पत्रकार पोपटलाल अशी विविध पात्रे जन्माला आली. सुंदरलाल, अब्दुल, रिपोर्टर रिटा श्रीवास्तव, नटवरलाल प्रभाशंकर उधईवाला, बागेश्वर दधुख उधईवाला, बावरी धोंडुलाल कानपुरिया अशी अजून काही पात्रे. या साऱ्या पात्रांच्या परस्पर वर्तन व व्यवहारातून जी धमाल उडते, आयुष्याची मौज होते, कधी करुणामय प्रसंग येतात, ते सारे या मालिकेत चितारण्यात आले आहेत.
‘तारक मेहता’ खरोखर ‘मिनी हिंदुस्थान’ आहे?
सगळ्या जाती-धर्माचे लोकं आपापसात भाईचारा दाखवत अतिशय गुण्यागोविंदाने राहणारी गोकुळधाम सोसायटी म्हणजे मिनी इंडिया असल्याचे या मालिकेतून वेळोवेळी मांडण्यात आले आहे आणि प्रेक्षकांचाही तसा समज झाला आहे. मात्र 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मध्ये मिनी इंडिया आणि सर्वधर्मसमभाव असल्याचा जो दावा करण्यात येतो किंवा तसे दाखविण्याचा जो प्रयत्न केला जातो तो खरोखर आपल्या भूमिकेशी प्रामाणिक आहे का? खरंच या मालिकेत आर्थिक-सामाजिक-सांस्कृतिक-लैंगिक-धार्मिक समानता आहे का? खरंच या मालिकेत समाजातील सर्व घटकांचे प्रतिनिधित्व आहे का?

अतिशय बारकाईने या मालिकेचा जर अभ्यास केला तर या सगळ्या प्रश्नांचे उत्तर ‘नाही’ असेच येईल. जर 'तारक मेहता का उल्टा चष्मा' बद्दल बोलायचं झालं तर हा चष्मा समाजाच्या चष्म्यासारखाच उलटा आहे… असा समाज ज्यात प्रत्येक वर्ग आणि जातीला स्थान नाही. तुम्ही म्हणाल की कसे काय? गोकुळधाम सोसायटीतर छोटा हिंदुस्तान आहे, मग कसे काय त्यात सगळ्यांना स्थान नाही… मात्र एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या छोट्या हिंदुस्थानात असे अनेक घटक आहेत, अशा अनेक कहाण्या आहेत ज्याकडे ही सोसायटी ढुंकूनही पाहात नाही. जसे की या मिनी इंडियामध्येएकही मुस्लिम कुटुंब राहात नाही. हो, अब्दुल नावाची एक व्यक्तिरेखा आहे खरी, परंतू अब्दुल सोसायटीत राहात नाही तो सोसायटीची कामं करतो आणि त्याचे दुकानही सोसायटीच्या बाहेर आहे. या मालिकेत जितक्या व्यक्तिरेखा आहेत त्या सगळ्या तथाकथित उच्च जातीय आणि मध्यमवर्गीय आहेत. गरीब कुटुंब, कामगार वर्ग, दलित-बहुजन समाज या समाजातील मोठ्या घटकाला मालिकेत काहीएक स्थान नाही आणि त्यांना या सगळ्यांशी घेणेदेणेही नाही.
‘तारक मेहता’ पितृसत्ताक व्यवस्थेला प्रोत्साहन देतयं का?
ही अशी कोणती विविधता आहे जिथे या देशाचा फक्त अर्धाच चेहरा दाखवला जातो. फक्त समाजातील विशिष्ट वर्गाचे प्रतिनिधित्व करून त्याला भारताची एकता आणि विविधता असे लेबल का लावण्यात येतयं? हा तर दुटप्पीपणा झाला जो इथला जातीयवादी समाज अनेक शतकांपासून करत आला आहे. परिघाच्या बाहेर असलेल्या लोकांना नजरअंदाज करणे हाच तर सगळा खेळ आहे. इतकेच नाही तर मालिकेतील नट्टूकाका, बागा असो किंवा भाजी विकणारी महिला आणि घरात काम करणारी महिला असो या सगळ्या दुय्यम व्यक्तिरेखांनाही वेगळ्या चष्म्यातून दाखवले जाते.
उदाहरणार्थ, भाजी विकणाऱ्या महिलेला नेहमी ‘ तु खुप चलाख आहेस, नेहमी महाग भाजी विकतेस’ असे वारंवार सांगणे…नट्टूकाका आणि बागाच्या पगारवाढी बद्दल मालक जेठालालकडून कुचेष्टेने बोलणे, त्यांचा अपमान करणे… क्वचित प्रसंगी एखाद्या गरीब मुलाचा वाढदिवस साजरा करणे किंवा त्याची मदत करणे इतकीच या सोसायटीची सहानभुती आणि या किरकोळ सहानभुतीच्या जोरावरच ही सगळी मंडळी सच्चे नागरिक असल्याचा दावा करताना मग मालिकेत दिसतात. गरीब किंवा गरजू व्यक्तींची मदत केलीच पाहिजे जशी मालिकेत करताना दाखवतात, मात्र हेच गरीब किंवा गरजू आणि त्यांचे पात्र,त्यांच्या कहाण्या या मुख्य प्रवाहाचा भाग बनताना मालिकेत का दिसत नाही? जर समाजातील दुर्बल घटकांचाही मालिकेत समावेश झाला तर मग त्यांचे आयुष्य कसे असेल, ते काय काम करतात, त्यांचा व्यवहार कसा असेल आणि समाजाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन कसा असेल, या गोष्टीही मालिकेत पाहता आल्या असत्या.

सगळे शाकाहारी… मुस्लिम आणि शिखही!
आता या गोकुळधाम सोसायटीत राहणाऱ्यांच्या ताटात डोकावू या… या मालिकेतील प्रत्येक घरात नेहमी एकाच पद्धतीचे जेवण बनवले जाते आणि ते ही फक्त शाकाहारी. शोमध्ये कधीही मासांहारी पदार्थच काय तर त्याचे नावदेखील आजपर्यंत उच्चारताना कोणी दिसत नाही. गंमत म्हणजे अब्दुल जरी मुस्लीम असला तरी तोदेखील शाकाहारीच दाखवला आहे.
महिला फक्त जेवणचं बनवतात, कायम चार भिंतीच्या आड
एकीकडे गोकुळधामचे सगळे पुरुष हे नोकरी-धंद्यासाठी बाहेर काम करताना दिसतात तर दुसरीकडे त्यांच्या पत्नी फक्त घर सांभाळतानाच दिसतात. शोमध्ये महिला विकासाच्या मोठमोठ्या बाता मारल्या जातात. जसे की महिला ही आदिशक्ती आहे, अन्नपूर्णा आहे…सोसायटीमध्ये महिला मंडळ आहे मात्र त्या फक्त चार भिंतीच्या आड किटी पार्टी करताना दिसतात. गोकुळधामच्या सगळ्या महिला आपल्या नवऱ्याच्या परवानगीशिवाय काहीच करू शकत नाहीत. या सगळ्या व्यक्तिरेखा फक्त घरात जेवणं बनवणं, मुलांना सांभाळणं आणि कुटुंबाची काळजी घेणं हे जे इथल्या पितृसत्ताक व्यवस्थेने आखून दिलेल्या ‘आदर्श महिला’ नुसारच वागतात. माधुरी भीडे लोणचं-पापडाचा व्यवसाय करत असली तरी त्याची डिलिव्हरी करण्यासाठी तिचा नवराच बाहेर जात असतो. इतकेच काय जर एखाद्या घरातली महिला जर काही कारणानिमित्त घराबाहेर पडलीच तर तिच्या अनुपस्थितीत तिचे कुटुंब एकदम असहाय्य अवस्थेत दिसतात आणि शेजाऱ्या-पाजाऱ्यांकडे जेवायला जातात. एकही पुरुष व्यक्तिरेखा (पोपटलाल सोडून, कारण त्याचे लग्न झालेले नाही) स्वत:चे जेवण बनवू शकत नाही हे एक अजबच आहे. जेठालाल जेव्हा बबिताशी ‘फ्लर्ट’ करताना दिसतो तेव्हा त्यालाही कॉमेडीच्या अंगानेच घेतले जाते, बिचारा बबिताचा नवरा अय्यर घाबरट असल्याने काहीच करू शकत नाही.

तथाकथित उच्चजाती आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवरच मालिका का करावी? व्यवस्थेच्या परिघाबाहेर असणाऱ्या समाजाचे आणि त्यांच्या कुटुंबाचे काय? हल्लीचे सगळे शो हे एकच धर्म आणि लिंगावर आधारित का आहेत? कॉमेडीच्या नावाखाली आपण समाजातील विषमता आणि पारंपारिक रुढीवादीला खतपाणी घालत आहोत का?
‘तारक मेहता’ शोमध्ये अशा अनेक गोष्टींची चेष्टा करण्यात आली आहे. जसे की दयाला अशिक्षित दाखवणे, भिडेला कायम गरिब म्हणून प्रदर्शित करणे, डॉ. हाथी आणि त्याच्या मुलाच्या वजनावरून चेष्टा करणे, अय्यरच्या रंगावरून विनोद करणे… मात्र आजपर्यंत या मालिकेचा अशा मुद्द्यांच्या अनुषंगाने विचार झालेला नाही. आजवर या मुद्द्यांवर प्रश्न विचारले गेले नाहीत.ही विनोदी मालिका नसून समाजामध्ये विषमता पसरवणारी आणि याच विषमतेला भारतीय एकता आणि विविधता असे लेबल लावून दाखवली जात आहे.






