अप्सरा आगा
- महाराष्ट्रात सध्या एक शांत पण प्रभावी चळवळ सुरू आहे. मातीच्या मैदानावर 'कबड्डी…कबड्डी…' म्हणत झुंजार चढाया करणाऱ्या महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय.
- इथे वयाचं बंधन नाही, पेहरावाचं बंधन नाही. घरकाम करणारी महिला असो, शेतात काम करणारी असो किंवा तरुण मुलगी कोणालाही मैदानावर उतरून खेळता येतं.
- महिलांना मुक्तपणे वावरण्याचा, आत्मविश्वासाने आणि स्वातंत्र्याने जगण्याचा हक्क मिळावा, या उद्देशाने कोरो इंडियाच्या वतीने महाराष्ट्रभर महिला, ट्रान्स महिला आणि युवतींसाठी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असते.
'मी यापूर्वी कधीच मैदानावर पायही ठेवला नव्हता, पण आज कबड्डीमुळे माझा स्वतःवरचा विश्वास वाढला. आता घरात बसणारी ‘ती’ राहिले नाही, तर मी स्वतःची ओळख बनवतेय,' असं पहिल्यांदा मैदानात उतरून कबड्डी खेळणाऱ्या रेहाना शेख हसत-हसत सांगतात. त्यांच्या या साध्या वाक्यातूनच महाराष्ट्रातील गावागावात घडणाऱ्या मोठ्या बदलाची जाणीव होते.
महाराष्ट्रात सध्या एक शांत पण प्रभावी चळवळ सुरू आहे. सकाळच्या धुक्यात किंवा संध्याकाळच्या मावळत्या उन्हात मातीच्या मैदानावर 'कबड्डी…कबड्डी…' म्हणत झुंजार चढाया करणाऱ्या महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. काही वर्षांपूर्वीपर्यंत जिथे कबड्डी हा ‘पुरुषांचा खेळ’ मानला जायचा, तिथे आज तोच खेळ सर्वसामान्य घरातल्या महिलांसाठी आत्मविश्वास, स्वातंत्र्य आणि स्वतःची ओळख निर्माण करण्याचं माध्यम ठरतोय. हा बदल सहज घडलेला नाही; त्यामागे संघर्ष, विरोध आणि सातत्याने केलेली झुंज आहे.
वयाचं बंधन नाही, पेहरावाचं बंधन नाही
या उपक्रमाची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, इथे कोणतंच बंधन नाही. वयाचं बंधन नाही, पेहरावाचं बंधन नाही, आणि 'तू कोण आहेस' याचंही बंधन नाही. घरकाम करणारी महिला असो, शेतात काम करणारी असो किंवा तरुण मुलगी कोणालाही मैदानावर उतरून खेळता येतं. त्यामुळे अनेक महिलांना पहिल्यांदाच 'आपणही काहीतरी करू शकतो' हा आत्मविश्वास मिळाला. पहिल्याच वर्षी सुमारे ६०० महिलांनी या स्पर्धांमध्ये भाग घेतला. हा आकडा आयोजकांसाठीही आश्चर्याचा होता. पण त्यानंतर दरवर्षी हा प्रतिसाद वाढत गेला. गावोगावी महिलांनी स्वतःहून टीम तयार केल्या, सराव सुरू केला आणि स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी पुढाकार घेतला.

आज परिस्थिती अशी आहे की, या स्पर्धा म्हणजे फक्त सामने नाहीत, तर महिलांसाठी एक उत्सव बनला आहे. मैदानावर खेळताना त्या फक्त गुण मिळवत नाहीत, तर आपला आवाज, आपली ओळख आणि आपलं अस्तित्वही ठामपणे मांडत आहेत. त्यामुळेच हा उपक्रम आता एक मजबूत सामाजिक चळवळ बनत चालली आहे.
कोरो इंडिया अन् एकल महिला संघटना
गेल्या तीन वर्षांपासून कोरो इंडिया आणि एकल महिला संघटना मिळून महाराष्ट्रात एक वेगळीच चळवळ उभी करत आहेत. त्यांनी महिला, पारलिंगी महिला आणि युवतींसाठी कबड्डी स्पर्धा सुरू केल्या, पण हा उपक्रम फक्त खेळापुरता मर्यादित राहिलेला नाही. उलट, अनेक महिलांच्या आयुष्यात मोठा बदल घडवणारे सामाजिक आंदोलनच बनलं आहे. २०२३ पासून या स्पर्धांची सुरुवात झाली. सुरुवातीला अनेक महिलांसाठी हा अनुभव अगदी नवीन होता. घराच्या चौकटीत अडकलेल्या, कधीच मैदानावर न उतरलेल्या महिलांना पहिल्यांदाच बाहेर येऊन धावण्याची, खेळण्याची आणि स्वतःला मोकळेपणाने व्यक्त करण्याची संधी मिळाली. अनेक जणींनी लहानपणी खेळायचं स्वप्न पाहिलं होतं, पण परिस्थितीमुळे ते कधीच पूर्ण झालं नव्हतं. या स्पर्धांमुळे त्यांना पुन्हा एकदा ते स्वप्न जगता आलं.
खरंतर, ग्रामीण भागात अजूनही 'मुलींनी घरातच राहावं' ही मानसिकता अनेक ठिकाणी टिकून आहे. त्यात कबड्डीसारखा शारीरिक खेळ म्हणजे जणू काही मर्यादा ओलांडणं, असा समज होता. कपड्यांवरून होणारी टीका, लोक काय म्हणतील? याची भीती, आणि लवकर लग्नाच्या अपेक्षा या सगळ्यामुळे अनेक महिलांना खेळापासून दूर राहावं लागलं. त्यामुळे त्यांच्या मनात खेळाची आवड असूनही ती कधीच मैदानावर येऊ शकली नाही.
‘मी कबड्डी खेळणारच आणि तेही बुरख्याशिवाय…’
रेहाना शेख यांची कहाणी ही याच वास्तवाचं प्रतिबिंब आहे. त्या सांगतात, 'आमच्या भागात काम करणाऱ्या कोरो संस्थेच्या अंजुमने आम्हाला सांगितलं की आपण कबड्डी खेळायचं. ते ऐकल्यावर दोन मिनिटं खरंच वाटलं, आपण बायका आहोत, घर सांभाळतो, आपण कबड्डी कशी खेळणार? पण लगेच असंही वाटलं की जणू आपलं लहानपण परत आलंय. संधी मिळतेय तर एकदा खेळून तरी बघू. पण घरी हे सगळं मान्य नव्हतं. माझ्या नवऱ्याने सरळ नकार दिला. तो म्हणाला, ‘बायका कबड्डी खेळायला जाणार? लोक बघतील…बुरखा घालून जा.’ तेव्हा मी ठामपणे सांगितलं, ‘मी कबड्डी खेळणार तर बुरखा घालून नाही खेळणार.’

कबड्डी खेळण्यासाठी मला खूप संघर्ष करावा लागला. शेवटपर्यंत त्यांचा विरोधच होता. खूप समजावून सांगावं लागलं. प्रॅक्टिसला जायचं म्हणून मी घरातून खोटं बोलून जायचे. मी त्यांना सांगायचे, ‘मी कबड्डी खेळणाऱ्यांना शिकवायला जाते, मी स्वतः खेळत नाही, फक्त शिकवते.’ तरीही त्यांना विश्वास बसत नव्हता. ते सतत प्रश्न विचारायचे. रोज खोटं बोलून मीच थकून जायचे. शेवटी मी त्यांना स्पष्ट सांगितलं, ‘मी खेळले तर इतर बायका पण मैदानावर येतील. मी खेळणार म्हणजे घरात बसलेल्या महिलांनाही बाहेर आणायचं आहे.'
...अन् बायकोनं मला ‘थँक यू' म्हटलं
महिलांना कबड्डी शिकवणारे मनोज सांगतात, 'माझ्याकडे महिलांच्या तीन टीम होत्या. आमच्या परिसरात रोज मैदानावर कबड्डीचा सराव चालायचा. मला मनापासून वाटायचं की माझ्या बायकोनेही कबड्डी खेळावं. पण सुरुवातीला ती पूर्णपणे नकार द्यायची. ती म्हणायची, ‘मी कशी खेळणार? मला दोन मुलं आहेत, घर सांभाळायचं आहे.’ मी तिला खूप समजावलं, प्रोत्साहन दिलं आणि शेवटी तिला मैदानावर आणलंच. पण पहिल्याच दिवशी ती इतकी दमली की दुसऱ्या दिवशी आलीच नाही. मग मी तिला म्हणालो, ‘बघ, मी इतर तीन टीममधल्या महिलांना कबड्डी शिकवतोय, त्यांना प्रोत्साहन देतोय, आणि माझी स्वतःची बायकोच घरात बसली तर लोक माझ्याकडे कसं पाहतील?’ हे असं बोलत-बोलत मी तिला हळूहळू तयार केलं.
मग ती रोज सरावाला येऊ लागली. पुढे जेव्हा तिला स्टेजवर मेडल आणि सर्टिफिकेट मिळालं, तेव्हा ती इतकी आनंदी झाली की खाली उतरून थेट माझ्याकडे आली आणि म्हणाली, ‘थँक यू!’ खरं सांगायचं तर, सुरुवातीला मलाही वाटायचं, महिलांनी कबड्डी खेळायची काय गरज आहे? त्यांचं काम म्हणजे घर सांभाळणं एवढंच. पण आता मला कळलंय, महिला कबड्डी खेळू शकतात, आणि त्यांनी नक्की खेळलं पाहिजे.'
लिंगभाव समानतेवर चर्चा करण्यापेक्षा हे अधिक महत्वाचे
कोरोमध्ये काम करणाऱ्या रोहिणी कदम सांगतात, 'कोरो महिलांसोबत सातत्याने काम करतं आणि त्यांच्यात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतं. हा बदल घडवण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने काम करतो, आणि कबड्डी हा त्याचाच एक भाग होता. लिंगभाव समानतेवर आपण कितीही सेशन्स घेऊन चर्चा केली, तरी ते ऐकायला लोकांना छान वाटतं; पण जेव्हा ते प्रत्यक्षात आणायचं असतं, तेव्हा नेमकं कसं करायचं हे समजत नाही. पण खेळाच्या माध्यमातून हे खूप सहज घडलं. ज्या महिलांना कबड्डीची आवड होती, काहींनी आधी खेळलेलं होतं, तर काही पहिल्यांदाच खेळायला येत होत्या, अशा सगळ्यांना आम्ही एकत्र येण्याची संधी दिली. तेव्हा महिलांमध्ये एक वेगळीच ऊर्जा दिसत होती. उत्साह, जिद्द आणि काहीतरी करून दाखवायची तयारी स्पष्ट जाणवत होती.'

जिथं राहत होत्या, तिथंच सराव केला
'कबड्डी म्हणजे एक दिवसाचा कार्यक्रम नव्हता. त्यासाठी महिलांनी आपल्या गावोगावी, वाड्यांवर, पाड्यांवर जिथे राहत होत्या, तिथं त्यांनी सराव केला. सुरुवातीला घरातील आणि गावातील पुरुषांकडून विरोध झाला. ‘बाहेर जाऊन खेळायचं?’ हा मोठा प्रश्न होता. पण महिलांनी हा विरोध मनावर घेतला नाही. त्यांनी सातत्य ठेवलं, सराव चालूच ठेवला. हळूहळू वातावरण बदलायला लागलं. जिथे आधी विरोध होता, तिथेच नंतर कौतुक सुरू झालं. लोक म्हणू लागले, ‘जा, खेळा…तुम्हाला जे काही लागेल, आम्ही मदत करतो.’ ग्रामपंचायतीनेही पाठिंबा दिला. स्थानिक शाळेतील शिक्षकांनी येऊन महिलांना प्रशिक्षण दिलं. एका खेळामुळे संपूर्ण गाव एकत्र आल्याचं चित्र दिसलं,' असं रोहिणी यांनी सांगितलं.
जिंकणं-हारणं हा मुद्दा गौण ठरला
त्या पुढे सांगतात, 'या सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिलांना स्वतःची वेगळी ओळख मिळाली. जिंकणं-हारणं हा मुद्दा गौण ठरला; महत्त्वाचं होतं ते त्यांनी मैदानावर उतरून खेळलं, हे. त्यासाठी त्यांचं खूप कौतुक झालं. आणखी एक मोठा बदल म्हणजे, महिलांच्या मनात आणि शरीरात असलेली जी लाज, भीती आणि बंधनं होती, ती मैदानावर उतरल्यावर हळूहळू नाहीशी झाली. त्यांना आत्मविश्वास मिळाला. जी महिला कालपर्यंत अगदी सामान्य होती, तीच आज आपल्या गावात ‘स्टार’ म्हणून ओळखली जाऊ लागली. एखाद्या खेळामुळे महिलांमध्ये असा आत्मविश्वास निर्माण होणं, हे खरंच खूप आशादायक आहे.'

आज महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये मातीच्या मैदानावर घुमणारा ‘कबड्डी…कबड्डी…’ हा आवाज केवळ खेळाचा नाही, तर बदलाचा, स्वातंत्र्याचा आणि नव्या ओळखीचा आवाज ठरतोय. या मैदानावर उतरणाऱ्या प्रत्येक महिलेमागे एक संघर्ष आहे, एक गोष्ट आहे आणि स्वतःला सिद्ध करण्याची एक जिद्द आहे. कबड्डीच्या माध्यमातून या महिलांनी फक्त खेळ जिंकले नाहीत, तर त्यांनी समाजाच्या मनातील भिंतीही हळूहळू मोडायला सुरुवात केली आहे. ‘महिला म्हणजे फक्त घरापुरती’ ही मर्यादा ओलांडून त्यांनी स्वतःसाठी एक नवीन जागा निर्माण केली आहे. आज त्या केवळ खेळाडू नाहीत, तर बदलाच्या प्रवासातील धडाडीच्या प्रतिनिधी बनल्या आहेत.
ही चळवळ अजून सुरुवातीच्या टप्प्यात असली, तरी तिचा प्रभाव दूरवर पोहोचतोय. उद्या या मैदानातूनच एखादी राष्ट्रीय खेळाडू घडेल, एखादी प्रशिक्षक तयार होईल किंवा एखादी महिला इतरांसाठी प्रेरणास्थान बनेल, यात शंका नाही. कारण, ही फक्त कबड्डी नाही…ही महिलांच्या आयुष्याला नवं वळण देणारी, त्यांना स्वतःची ओळख देणारी एक क्रांती आहे.






