सुशोभित
उत्तरप्रदेशच्या कन्नौजचे ट्रॅफिक सब-इन्स्पेक्टर आफाक खान सातत्याने प्रचंड लोकप्रिय होत चालले होते. वाहतूक नियम वेगळ्याच, रंजक शैलीत समजावून सांगत ते त्यांनी बनवलेले व्हिडिओ सोशल मीडियावर टाकत असत. फेसबुकवर त्यांच्या फॉलोअर्सची संख्या 2.3 दशलक्षांपलीकडे गेली होती, जी सहसा सेलिब्रिटींच्याच वाट्याला येते. इन्स्टाग्रामवरही ते लवकरच एक दशलक्ष फॉलोअर्सचा टप्पा गाठणार होते.
त्यांचे व्हिडिओ पाहताना मला नेहमीच आनंद मिळायचा. त्यांच्या वागण्यातून नेकी, प्रामाणिकपणा, स्पष्टवक्तेपणा आणि साधेपणा सहज दिसून यायचा. लोकांमध्ये वाहतूक-जागरूकता निर्माण करण्यासाठी ते मनापासून झटत होते. यासाठी ते स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून हेल्मेट, स्टिकर्स वगैरेही वाटत. कोणी नियम तोडताना सापडले, तर ते कडक कारवाई न करता गोड शब्दांत समज देऊन सोडून देत असत; पण त्या समजावणीचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर लाखो लोकांपर्यंत पोहोचवून जनजागृती करत असत. तरुण-तरुणी त्यांच्या सोबत सेल्फी काढू लागले होते. लोक खास त्यांना भेटण्यासाठी कन्नौजला येत. कुणी त्यांच्या पायांवर डोकेही टेकवत. एकदा तर एक हिंदू साधूदेखील त्यांना भेटायला आला आणि मनापासून त्यांची प्रशंसा करून गेला.
खान साहेबांचे व्हिडिओ पाहताना माझ्या चेहऱ्यावर हसू उमटायचे; पण मनात कुठेतरी एक धास्तीही होती की कुठे त्यांना वाईट नजर लागू नये. कारण एक तर भारतासारख्या कुटील कारस्थानांनी आणि भ्रष्टाचाराने ग्रासलेल्या देशात ते प्रामाणिकपणे चांगले काम करत होते आणि वर लोकप्रियही होत होते. आणि दुसरे म्हणजे, त्यांच्या नावाला ‘खान’ जोडलेले होते. शेवटी ती वाईट नजर लागलीच.
खान साहेबांविरोधात तक्रारी करण्यात आल्या. कन्नौजचे एसपी यांनी त्यांना लाईन हजर राहायला सांगितले. लाईन हजर म्हणजे एखाद्या पोलीस कर्मचाऱ्याला त्याच्या मूळ कामाच्या ठिकाणाहून हटवून थेट पोलीस मुख्यालयात (पुलिस लाइन) पाठवणे, जी सामान्यतः शिस्तभंगाची कारवाई, चौकशी किंवा गैरवर्तनासाठी दिली जाणारी शिक्षा असते. खान साहेबांविरुद्ध विरुद्ध तक्रार काय होती? तर त्यांनी काहीतरी भ्रष्टाचार केला होता किंवा गैरव्यवहार केला होता, असे नव्हे. तर एका शाळेच्या कार्यक्रमात भाषण करताना त्यांनी पैगंबर मोहम्मद साहेबांच्या एका शिकवणीचा संदर्भ दिला होता. त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला की ते पोलिसांच्या गणवेशात इस्लामचा प्रचार करत आहेत! काही हिंदू संघटनांची दडपलेली कुंडलिनी अचानकच जागी झाली.
कारवाईची मागणी होऊ लागली. दबावाखाली येऊन पोलीस अधीक्षकांनी त्यांना लाईन अटॅच केले. परिणामी, कन्नौजच्या रस्त्यांना सुरक्षित करण्यासाठी चळवळ उभी करणारा एक चांगला सरकारी अधिकारी आज फिल्डवरच्या कामातून बाजूला पडून पोलीस लाईनवर हजेरी लावत आहे.
याच व्हिडियोमुळे आफाक खान यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली…
Farhan Yahiya on Instagram: "हिन्दु पुलिस वालों के लिए अलग मुस्लिम पुलिस वालों के लिए अलग क़ानूनी प्रावधान ? वर्दी में खेलो होली, निकालो शोभा यात्रा तो कुछ नहीं बेटियों को पैग़म्बर मोहम्मद की बात बताई तो duty पर बन आई ? दुनीयाँ कर रही है थू थू @afaqkhan_tsi_kannauj @afaqkhan_tsi_kannauj.74 @uppolice @spkannauj @myogi_adityanath" A Traffic Sub-Inspector in UP's Kanpur sparks controversy for speaking about the importance of girl child empowerment in uniform, while Hindu nationalist groups protest, questioning if there's a different set of rules for Muslim police officers. Instagram प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांची भारतात हीच गत आहे का? ज्या देशात गल्लोगल्ली भ्रष्टाचार आणि चोरी आहे, तिथे मेहनती लोकांना अशा प्रकारे छळले जाणार का? आणि भारतात एखाद्या अधिकाऱ्याने पैगंबर मोहम्मद यांचे नाव घेणे गुन्हा ठरतो का? रामाचे, महादेवाचे नाव घेतले असते, तर हाच निकष लावला गेला असता का? जर गणवेशात असताना कोणत्याही धर्माचा उल्लेख करणे चूक असेल, तर तो नियम सर्वांवर समानपणे का लागू होत नाही? कारण आपल्या देशात टिळेधारी, भगवाधारी अधिकाऱ्यांची काही कमी नाही, जे उघडपणे धर्मप्रचार करतात. पोलीस ठाण्यांच्या आवारातच मंदिरे उभी आहेत. कुंभमेळ्यापासून राममंदिर आणि कावड यात्रेपर्यंत हिंदू धार्मिक कार्यक्रमांसाठी सरकारी यंत्रणा धन-काया-वाचा-मनाने झटते. तेव्हा प्रशासनाच्या धर्मनिरपेक्षतेचा भंग होत नाही; पण पैगंबरांचे नाव घेतले की होतो?
जर भारत खरोखरच धर्मनिरपेक्ष देश असेल, तर असा नियम करता येईल की कोणताही शासकीय किंवा घटनात्मक पदाधिकारी सार्वजनिकरीत्या आपल्या धर्माचे पालन करणार नाही. पण तसे असले तरी, टीएसआय आफाक खान वर्दीत नमाज पढत नव्हते. त्यांनी केवळ एका भाषणात पैगंबरांच्या एका सद्गुणी शिकवणीचा उल्लेख केला होता. हेही धर्मप्रचार ठरते का? बुद्ध किंवा गुरु नानक यांच्या उपदेशांचा सार्वजनिक उल्लेख करणाऱ्या अधिकाऱ्यांवर असा नियम लावण्याचे धाडस केले जाईल का? आता सऊदी अरेबिया, जॉर्डन, ओमानसारख्या देशांत फिरणाऱ्या आपल्या पंतप्रधानांना परदेशात कोणी विचारले की “तुमच्या देशातील एका ‘डबल इंजिन’ राज्यात एका पोलीस अधिकाऱ्याला पैगंबरांचे नाव घेतल्याबद्दल शिक्षा का करण्यात आली?”, तर ते काय उत्तर देतील?
आज परिस्थिती अशी आहे की देशाच्या सत्तेच्या सर्वोच्च पातळीवर बसलेले लोक कामापेक्षा पूजा-पाठात अधिक गुंतलेले दिसतात, किंवा पूजा-पाठाचा देखावाच करत आहेत. कारण देवाचा खरा भक्त कोण असा असेल, जो कॅमेरा घेऊन मंदिरात जाईल आणि निरनिराळ्या पोझमध्ये आपले भेसूर फोटो काढून घेईल? ही भक्ती आहे की ढोंग? आज धर्माला दुभती गाय समजून निर्लज्जपणे मतांच्या राजकारणासाठी त्याचा वापर केला जात आहे; जिथे गरज नाही तिथेही धार्मिक प्रतीकांचा बेधडक वापर केला जातो (चंद्रयानच्या लँडिंग स्थळाचे नाव ‘शिवशक्ती’, मनरेगाचे ‘जी राम जी’ असे नामकरण). अशा वातावरणात ‘खान’ आडनाव असलेला एखादा अधिकारी आपल्या भाषणात पैगंबरांचे नावसुद्धा घेऊ शकत नाही?
हे कोणत्या प्रकारचे राष्ट्र घडवले जात आहे? हिंदू धर्मानेच भेदभाव शिकवला आहे का? आणि हिंदू धर्म असेच शिकवतो का की कितीही खोटे बोला, बेइमानी करा आणि भ्रष्टाचार करा; पण सार्वजनिकरीत्या रामनामाचा जप करा, पूजा-पाठाचा देखावा करा, म्हणजे सगळी पापे धुतली जातील, सगळे कुकर्म संपून जाईल?
आता मला समजते आहे की पूर्वी जेव्हा धर्मनिरपेक्ष पक्ष एकत्र येऊन सांप्रदायिक शक्तींना सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असत, त्यामागचे कारण काय होते. ते योग्यच होते. चूक झाली ती भारताच्या मतदारांकडून!
(सुशोभित हे लोकप्रिय लेखक आणि ब्लॉगर आहेत.)
(साभार - जन-गण-मंगलदायक फेसबुक पेज)






