संजना खंडारे
- सहा महिन्यांपूर्वी नांदेडमध्ये घडलेल्या सक्षम ताटेच्या ऑनर किलिंगने संपूर्ण देश हादरला होता. आंतरजातीय प्रेम केल्यामुळे सक्षम ताटेची त्याच्या प्रेयसीच्या वडिलांनी हत्या केली होती.
- त्यानंतर प्रेयसी आंचल मामीडवार हिने सक्षमच्या मृतदेहाशी विवाह केला आणि सासरीच थांबायचा निर्णय घेतला होता.
- मात्र आता आंचलने सासरचे घर सोडल्यामुळे तिच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
- आचंलवर होत असलेल्या सार्वजनिक न्यायनिवाड्यामागे पितृसत्ताक मानसिकता, स्त्रियांकडून असलेल्या सामाजिक अपेक्षा आणि माध्यमांच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्न उभे राहतात. आंचलच्या प्रकरणाकडे याच दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न ‘बाईमाणूस’च्या या विशेष रिपोर्टमधून करण्यात आलाय.
२७ नोव्हेंबर २०२५ रोजी नांदेडमध्ये घडलेल्या सक्षम ताटेच्या ऑनर किलिंगने संपूर्ण देश हादरला होता. आंतरजातीय प्रेम केल्यामुळे सक्षम ताटेची त्याच्या प्रेयसीच्या वडिलांनी हत्या केली होती. त्यानंतर प्रेयसी आंचल मामीडवार हिने सक्षमच्या मृतदेहाशी विवाह करत समाजासमोर प्रेम, वेदना आणि प्रतिकाराचं एक उदाहरण उभं केलं.
त्या एका निर्णयाने आंचल देशभर चर्चेत आली. तिच्या अश्रूंना, तिच्या प्रेमाला आणि तिच्या संघर्षाला समाजाने सलाम केला. पण काही महिन्यांनी आंचल सक्षमच्या घरातून निघून गेली आणि तिच्या आयुष्याविषयीचा सार्वजनिक न्यायनिवाडा सुरू झाला.
एकेकाळी आंचलच्या धाडसाचं कौतुक करणारी माध्यमं आणि समाजातील अनेकजण आता तिलाच प्रश्न विचारू लागले. "घर सोडायचंच होतं तर वचन का दिलं?", "सक्षमची विधवा म्हणून राहता आलं नसतं का?", "ती निघून गेली म्हणजे प्रेम खोटं होतं का?" अशा आशयाच्या बातम्या, हेडलाईन्स आणि सोशल मीडियावरील प्रतिक्रिया झळकू लागल्या.

ज्या मुलीच्या प्रियकराची तिच्याच कुटुंबीयांनी हत्या केली, जिचे आई-वडील, भाऊ आणि नातेवाईक या प्रकरणात आरोपी आहेत, जी स्वतः अजूनही अवघ्या १९ वर्षांची आहे, त्या मुलीला पुन्हा एकदा समाजाने आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं.
या सगळ्या चर्चेत मात्र काही मूलभूत प्रश्न हरवलेत. आंचलला स्वतःच्या आयुष्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार नाही का? दुःख, प्रेम, शोक किंवा परिस्थिती बदलल्यानंतर एखाद्या व्यक्तीला आपला निर्णय बदलण्याचं स्वातंत्र्य नसावं का? सक्षमच्या मृत्यूनंतर तिच्या आयुष्याचं भविष्य काय असावं, हे ठरवण्याचा अधिकार समाजाला कोणी दिला? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, एका मुलीच्या वैयक्तिक आयुष्यावर न्यायनिवाडा करणारा समाज आजही स्त्रीकडे स्वतंत्र व्यक्ती म्हणून नव्हे, तर त्याग, समर्पण आणि कायमस्वरूपी निष्ठेचं प्रतीक म्हणूनच पाहतोय का?
आंचलच्या निर्णयाचं समर्थन किंवा विरोध करण्यापलीकडे जाऊन, तिच्याकडे एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून पाहण्याची गरज आहे. तिच्यावर होत असलेल्या सार्वजनिक न्यायनिवाड्यामागे पितृसत्ताक मानसिकता, स्त्रियांकडून असलेल्या सामाजिक अपेक्षा आणि माध्यमांच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्न उभे राहतात.
आंचलच्या प्रकरणाकडे याच दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न ‘बाईमाणूस’च्या या विशेष रिपोर्टमधून करण्यात आलाय.
आंचल घर सोडून गेल्यानंतर सक्षमच्या कुटुंबाची प्रतिक्रिया काय?
आंचल मामीडवारने सक्षम ताटेचं घर सोडल्याची बातमी समोर आल्यानंतर या प्रकरणाने पुन्हा एकदा चर्चेचं वळण घेतलं. सक्षमच्या हत्येनंतर आधीच उद्ध्वस्त झालेल्या ताटे कुटुंबावर या घटनेचा आणखी एक भावनिक आघात झाल्याचं बोललं जातंय.
मुलाच्या हत्येचा धक्का सहन करत न्यायासाठी लढणाऱ्या कुटुंबाला काही महिन्यांतच आणखी एक दुःख पचवावं लागलं. दरम्यान, मुलाच्या मृत्यूच्या धक्क्यातून बाहेर न पडलेल्या सक्षमच्या वडिलांचंही काही महिन् यांपूर्वी निधन झालं.
त्यामुळे आता सक्षमची आई एकटीच न्यायासाठी लढत असल्याचं चित्र आहे. विविध माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमध्ये त्यांनी आंचलच्या जाण्याबद्दल दुःख व्यक्त केलं असून, तिने दिलेल्या वचनांची आठवण करून दिलीये. आपल्या मुलासाठी न्याय मिळवण्याच्या लढ्यात आंचल सोबत राहील, अशी अपेक्षा असल्याचंही त्यांनी सांगितलं.

एका बाजूला सक्षमच्या आईचं दुःख आणि एकाकीपण आहे, तर दुसऱ्या बाजूला आंचलच्या निर्णयावर सुरू झालेला सार्वजनिक न्यायनिवाडा. याच ठिकाणी हा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा बनतो. एखाद्या दुःखी आईच्या वेदना समजून घेतानाच, आंचलच्या स्वतंत्र निर्णय घेण्याच्या अधिकाराकडेही आपण तितक्याच संवेदनशीलतेने पाहू शकतो का?
नेमकं काय घडलं आहे…?
नांदेडच्या इतवारा परिसरात सहा महिन्यांपूर्वी सक्षम ताटे या तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. सक्षमचे आचल मामीडवार या तरुणीशी प्रेमसंबंध होते. मात्र, जात वेगळी असल्यामुळे मामीडवार कुटुंबीयांना आचल आणि सक्षम ताटेचे प्रेमसंबंध मान्य नव्हते.
त्यामुळे आचलचे वडील आणि भावांनी सक्षम ताटे याची गोळ्या घालून आणि डोक्यात फरशी घालून हत्या केली होती. यानंतर आंचल मामीडवार हिने आपल्या प्रियकराच्या मृतदेहाशी लग्न केले होते. त्याचे व्हिडीओ देशभरात व्हायरल झाले होते आणि हे प्रकरण राष्ट्रीय पातळीवर गाजले होते.
त्याच प्रकरणात आता एक नवीन माहिती समोर आली आहे. सक्षमची आई संगीता ताटे यांनी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत या सगळ्याबद्दल सविस्तर माहिती दिली. सक्षमची हत्या झाली होती, तेव्हा आंचल म्हणाली होती, ‘मम्मी, सक्षमच्या जागी आता मी तुमचा मुलगा आहे. तुमच्यासोबतच राहीन. तुमची काळजी घेईन. ती साडेतीन महिने सोबत राहिली.
एक दिवस अचानक म्हणाली- ‘आजीची तब्येत खूप खराब झाली आहे. मला त्यांना भेटायला जायचे आहे’. इथून काही अंतरावर तिचं घर आहे. मी तिला पोहोचवून आले. त्यानंतर ती कधीच परत आली नाही. आजीकडे जाण्यापूर्वी आंचल सोशल मीडियावर आपल्या काकांच्या संपर्कात होती.

ती काय बोलायची? कुणाशी बोलायची? यावर आम्ही काहीही बंधनं ठेवली नव्हती. पण त्यानंतर ती घरी निघून गेली आणि परत आली नाही. यानंतर सक्षमच्या वडिलांची देखील प्रकृती ढासळत गेली. त्यांना बीपीचा त्रास होत होता. तीन महिन्यांपूर्वी त्यांचं निधन झालं. सध्या आंचलसोबत आपला कसलाही संपर्क नाही, असंही संगिता ताटे यांनी सांगितले.
सक्षम ताटे याच्या निधनानंतर त्याला न्याय मिळून देण्याकरिता अनेकदा आंदोलन करताना आंचल मामीडवार ही दिसली. सक्षमच्या कुटुंबियांसोबत ती राहत होती. मात्र, आता आंचल मामीडवार नक्की कुठे आहे, असा सवाल विचारला जात आहे. सक्षमचे घर सोडून ती पुन्हा आपल्या घरच्यांकडे राहिला गेली का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
याबद्दल ‘बाईमाणूस’ने काही सामाजिक कार्यकर्ता, स्त्री-लिंग अभ्यास विभागाच्या प्राध्यापिका आणि एकल महिलांसाठी काम करणाऱ्या काही महिलांशी संवाद साधल्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या.
"आंचलच्या वैयक्तिक आयुष्याचा न्याय करण्याचा अधिकार समाजाला नाही"
आंचल मामीडवारने सक्षम ताटेच्या मृत्यूनंतर त्याच्या मृतदेहाशी विवाह केला, त्यावेळची ती तिची भावनिक प्रतिक्रिया होती. मात्र त्यानंतर तिने आपलं आयुष्य वेगळ्या पद्धतीने जगण्याचा निर्णय घेतला असेल, तर तो तिचा पूर्णपणे वैयक्तिक अधिकार आहे, असे मत सामाजिक कार्यकर्त्या प्रा.डॉ. स्मिता अवचार यांनी व्यक्त केले.
त्या ‘बाईमाणूस’शी बोलतांना म्हणाल्या,
"आपला कायदा शरीरविक्री करणाऱ्या महिलेलाही नकाराचा अधिकार देतो, मग आंचलला एखाद्या नात्यातून किंवा बंधनातून बाहेर पडण्याचं स्वातंत्र्य का नसावं? तिने त्या काळात जे निर्णय घेतले, ते तिच्या त्या वेळच्या भावना आणि परिस्थितीतून घेतलेले होते. त्यानंतर तिच्या आयुष्यात काय घडलं, तिने कोणते अनुभव घेतले, हे तिचं वैयक्तिक आयुष्य आहे. त्यावर समाजाने किंवा माध्यमांनी न्यायाधीशाची भूमिका घेऊन निर्णय देण्याचं काहीच कारण नाही,"
माध्यमांनी आंचलची बाजू न ऐकता तिला दोषीच्या पिंजऱ्यात उभं केल्याची टीका करत डॉ. स्मिता अवचार म्हणाल्या,
"दिवसेंदिवस माध्यमं न्यायालयाची भूमिका बजावू लागली आहेत. एखाद्या व्यक्तीचं मत, तिची परिस्थिती किंवा तिची बाजू न जाणूनच तिचं चुकलं असा निकाल दिला जातो. आंचल अवघ्या १९ वर्षांची होती. त्या वयात तिने घेतलेल्या निर्णयाचं कौतुक करण्यात आलं, पण आज ती तिचा निर्णय बदलत असेल तर त्याचाही अधिकार तिला आहे. समाज अजूनही स्त्रीकडून त्याग, समर्पण आणि आयुष्यभराची निष्ठा अपेक्षित धरतो. मात्र आंचलला 'सक्षमची विधवा' म्हणून आयुष्यभर जगण्याची सक्ती कोणीच करू शकत नाही. तिचं आयुष्य कसं जगायचं, हे ठरवण्याचा अधिकार फक्त तिचाच आहे."
"स्त्रीने स्वतःचा निर्णय घेतला की समाज अस्वस्थ होतो"
आंचल मामीडवार सक्षम ताटेच्या घरातून निघून गेल्यानंतर तिच्यावर टीका करणं आणि तिला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं पूर्णपणे चुकीचं असल्याचं मत सामाजिक कार्यकर्ता रेणुका कड यांनी ‘बाईमाणूस’शी बोलताना व्यक्त केलं. त्या म्हणाल्या,
"आंचल सक्षमच्या घरातून का गेली, कुठे गेली, कोणत्या परिस्थितीत गेली, याची संपूर्ण माहिती कोणाकडेच नाही. ती तिच्या इच्छेने गेली असू शकते, एखाद्या नातेवाईकांकडे राहात असू शकते किंवा तिच्यावर काही दबावही असू शकतो. अशा वेळी केवळ ती सासर सोडून गेली या एका माहितीच्या आधारे तिच्यावर दोषारोप करणं हा मूर्खपणा आहे. प्रत्येक व्यक्तीला आपलं आयुष्य कसं जगायचं हे ठरवण्याचा अधिकार असतो आणि आंचलही त्याला अपवाद नाही."
रेणुका कड पुढे म्हणाल्या की,
"या संपूर्ण चर्चेत मूळ प्रश्नच बाजूला पडला आहे. या प्रकरणात खरा मुद्दा ऑनर किलिंगचा आहे. एका मुलीने स्वतःच्या पसंतीचा जोडीदार निवडला म्हणून त्याची हत्या करण्यात आली, हा मूळ गुन्हा आहे. पण त्याऐवजी चर्चा आंचल कुठे गेली, ती सक्षमची विधवा म्हणून का राहिली नाही, यावर केंद्रित झाली आहे. आपल्या समाजात एखादी विवाहित स्त्री माहेरी गेली तरी तिच्यावर प्रश्न उपस्थित होतात; ती किती दिवस राहिली, का राहिली, परत कधी जाणार, अशा चौकशा सुरू होतात. त्याच मानसिकतेतून आंचलकडेही पाहिलं जात आहे."
रेणुका कड यांच्या मते, आंचलच्या सुरक्षिततेचाही विचार होणं गरजेचं आहे. "ज्या समाजव्यवस्थेत प्रेमसंबंधांमुळे मुलीच्या जोडीदाराची हत्या केली जाते, त्या समाजव्यवस्थेत त्या मुलीच्या जीवाला देखील धोका असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ती नेमकी कुठे आहे, कोणत्या परिस्थितीत आहे, हे माहिती नसताना तिच्यावर न्यायनिवाडा करणं अयोग्य आहे. उलट तिच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न विचारले गेले पाहिजेत."
तसेच, जर याच प्रकरणात लिंग आणि जातीय समीकरण उलट असतं, तर समाजाची प्रतिक्रिया वेगळी असती, असं सांगताना त्या म्हणाल्या,
"आपली समाजव्यवस्था अजूनही जात आणि पितृसत्ताक मूल्यांनी प्रभावित आहे. स्त्रीला स्वतंत्र व्यक्ती म्हणून पाहण्याऐवजी तिच्याकडे कुणाच्या तरी नियंत्रणाखाली असणारी व्यक्ती म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे तिच्या निर्णयांवर सतत प्रश्न उपस्थित केले जातात. शेवटी हा प्रश्न केवळ आंचलचा नाही, तर स्त्रीच्या स्वातंत्र्याचा, तिच्या निवडीच्या अधिकाराचा आणि समाजातील खोलवर रुजलेल्या पूर्वग्रहांचा आहे."
मात्र या प्रकरणाकडे पाहण्याचा आणखी एक दृष्टिकोनही समोर येतो. आंचलला स्वतःचं आयुष्य जगण्याचा आणि स्वतःचे निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार असल्याचं मान्य करतानाच, काही सामाजिक कार्यकर्ते सक्षमला न्याय मिळवून देण्याच्या लढ्यात तिच्या भूमिकेचाही मुद्दा उपस्थित करतात.
त्यांच्या मते, प्रश्न आंचलने सासर सोडलं किंवा तिच्या आयुष्यात पुढे काय करण्याचा निर्णय घेतला याचा नाही. प्रश्न असा आहे की, ऑनर किलिंगसारख्या गंभीर प्रकरणात ती एक महत्त्वाची साक्षीदार आणि या संघर्षाचा महत्त्वाचा भाग होती. त्यामुळे तिच्या जाण्यामुळे न्यायासाठीच्या लढ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जातेय.
…पण सक्षमला न्याय मिळवून देण्याची तिची नैतिक जबाबदारीही होती"
आंचल मामीडवार हिने सक्षम ताटेच्या मृत्यूनंतर त्याच्या मृतदेहाशी विवाह केला म्हणून तिने आयुष्यभर त्याची विधवा म्हणूनच राहावं, अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं आयुष्य जगण्याचा आणि स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे, असं मत सामाजिक कार्यकर्ता आणि इतिहासाच्या प्राध्यापिका स्वर्णमाला म्हस्के यांनी व्यक्त केलं. मात्र, त्या पुढे म्हणाल्या की, प्रश्न आंचलने सासर सोडल्याचा नसून सक्षमला न्याय मिळवून देण्याच्या लढ्यातून ती दूर गेल्याचा आहे.
‘बाईमाणूस’शी बोलतांना त्या म्हणाल्या
"मी अजिबात असं म्हणत नाही की आंचलने विधवा म्हणून आयुष्य काढावं किंवा तिने दुसरं लग्न करू नये. तो तिचा पूर्णपणे वैयक्तिक निर्णय आहे. पण ऑनर किलिंगच्या या प्रकरणात ती अत्यंत महत्त्वाची साक्षीदार होती. सक्षमवर तिचं प्रेम होतं, तर त्याला न्याय मिळवून देण्यासाठी किमान या खटल्यात ती सक्षमच्या कुटुंबासोबत उभी राहणं गरजेचं होतं. तिच्या जाण्यामुळे आता प्रकरणाच्या तपासावर आणि न्यायप्रक्रियेवर परिणाम होण्याची भीती आहे,"
असं म्हस्के यांनी सांगितलं. त्यांच्या मते, आंचलच्या वैयक्तिक आयुष्यावर प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा ऑनर किलिंगमधील आरोपींना शिक्षा मिळणं आणि सक्षमच्या कुटुंबाला न्याय मिळणं हा अधिक महत्त्वाचा मुद्दा आहे.
आंचलची बाजू अजूनही समोर आलेली नाही...
आंचल मामीडवारच्या निर्णयाबद्दल आज अनेक मतं व्यक्त केली जात आहेत. तिच्या घर सोडण्यामागची कारणं, तिची भूमिका आणि तिच्या आयुष्यात नेमकं काय घडलं, याबाबत विविध दावे केले जात आहेत. मात्र या सगळ्या चर्चांमध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागेल.
आंचलची बाजू अद्याप सविस्तरपणे सार्वजनिकरीत्या समोर आलेली नाही. तिचं म्हणणं ऐकून न घेताच तिच्यावर निकाल देण्याची घाई समाज आणि माध्यमांकडून होताना दिसते. त्याचवेळी, या प्रकरणाने काही अस्वस्थ करणारे प्रश्नही समोर आणले आहेत.

एका १९ वर्षांच्या मुलीच्या आयुष्याबद्दल निर्णय देण्याचा अधिकार समाजाला कोणी दिला? प्रेमासाठी लढणाऱ्या मुलीचं कौतुक करणारा समाज, तीच मुलगी स्वतःच्या आयुष्याबद्दल वेगळा निर्णय घेते तेव्हा तिचा न्याय का करू लागतो? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, ज्या प्रकरणाची सुरुवात एका ऑनर किलिंगने झाली, त्या प्रकरणात आज चर्चा आरोपींच्या गुन्ह्यापेक्षा आंचलच्या वैयक्तिक आयुष्याभोवती का फिरत आहे?
या प्रश्नांची उत्तरं कदाचित प्रत्येकाकडे वेगवेगळी असतील. मात्र एक गोष्ट निश्चित आहे. आंचलच्या निर्णयाशी सहमत असो वा असहमत, तिच्याकडे एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून पाहण्याची आणि तिची बाजू ऐकून घेण्याची गरज आज अधिक आहे.






