आशा भोसले
त्या गळ्याला गाता येत नाही असे कुठलेच गाणे नाही, तो आवाज चैतन्य निर्माण करू शकत नाही अशी कुठलीच मैफल नाही, त्या गळ्याला त्याज्य आहे असा कुठलाच संगीतप्रकार नाही... असा अद्वितीय आवाज म्हणजेच आशाताईंचा आवाज… अर्थप्रवाही आणि भाषेचं भान असणाऱ्या गीतांचा काळ मागे सरायला लागला आणि गाणे गुणगुणण्याऐवजी ओरडण्याच्या पट्टीतले तयार व्हायला लागले. मात्र जुन्या, अर्थयुक्त गीते गाण्याच्या काळापासून आजपर्यंत श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या ‘आशा भोसले’ या नावाचं गारूड मात्र आजही कायम आहे. गाणं बदलण्याच्या प्रवासाचा आशाताईंनी घेतलेला वेध...
अलीकडेच चित्रपटाला शंभर वर्षे पूर्ण झालीत. या शंभर वर्षांमधील सत्तर वर्षे मी पाहिली आहेत. प्रेक्षक म्हणून आणि नंतर गायिका म्हणून हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीत झालेले वेगवेगळे बदल मी बघत आले आहे. काळ जसा तटस्थासारखा माणसाच्या आयुष्याला बघतो ना, तसंच मी इथलं संगीतविश्व कसं वेगवेगळ्या हिंदोळ्यांवर झुलत गेलं ते बघत आलेय. हिंदी गाण्यांचा नॉस्टेल्जियाच कमी होत चालला आहे. गाणं स्मरणात राहण्याचा अवधीच अगदी आठवड्यावर येऊन ठेपला आहे. याचं कारण म्हणजे, अर्थयुक्ततेकडून अर्थहीनतेकडे होत गेलेला उलटसुलट प्रवास. गाण्याची भाषा बिघडत गेली, संगीत बिघडलं, गायकांचा सूर लागला; पण त्यातील सजीवता राहिली नाही, परिणामी गाणं बेजान झालं. बेजान गाणी जास्त दिवस लक्षात राहतील का?
1970मध्ये आपल्याकडे सगळी चांगली गाणी रचली जायची, हेही तितकंच खरं आहे. म्हणून गाणी लक्षात असायची. पण 80 नंतर पडझड सुरू झाली. साहिरसारखे अनेक गीतकार कमी होत गेले. उर्दूचीही गच्छन्ती होत गेली, पोरकट हिंदीने गाण्याच्या भाषेची जागा घेतली. चांगले हिंदी लिहिणारे गीतकार, उर्दूची उमज असणारे कमी होत गेले. आमच्या काळी संगीताच्या दृष्टीने भारत-पाकिस्तान अखंड होता, त्यामुळे उर्दूमिश्रित हिंदीचा गोडवा गाण्यांमध्ये होता. तो गोडवा आता राहिलेला नाही. चित्रपटांच्या गीतांमधली कविता आज हरवत चालली आहे. चांगले लिहिलेले गीतकार राहिले नाहीत. त्या वेळी संगीत दिग्दर्शकांनाही भाषेचे ज्ञान होते. गाण्याचा प्राण शब्द आहे, ही जाणीव त्या वेळी असायची. आज चांगले गाणारे अजूनही आहेत, पण त्यांना चांगले शब्द असणारी गाणी मिळत नाहीत. पण गाण्याच्या बाबतीतही रिहर्सल हा घटक कमी होत गेला. आम्ही ज्या वेळी रिहर्सल करायचो, त्या वेळी प्रचंड मेहनत घेऊन एक टेक द्यायचो, ज्यात सात मिनिटांचं गाणं सलग म्हटलं जायचं. आता गाण्याचे म्हणताना, रेकॉर्ड करताना शंभर तुकडे होतात, त्यातून त्या गाण्याची मजा निघून जाते.

आजच्या गायकांना गाण्यामधली भावनाच कळायला वेळ नाही
मी ‘निगाहे मिलाने को’ ही कव्वाली ज्या वेळी गायली त्या वेळी मशीन बंद पडलेले. मी एक महिनाभर मुलांना घेऊन ट्रीपला निघून गेले. संगीत दिग्दर्शक महिनाभर माझी वाट बघत होते. हे वाट बघणे आता राहिलेले नाही. आज मेहनत करण्याची ताकदच मुळात कमी झाली आहे. मग सांगा, कशी गाण्यामध्ये ताकद येणार? आज तांत्रिकपणा आला आहे गाण्यामध्ये. ‘जिवलगा राहिले दूर घर माझे’ यांसारख्या सात मिनिटांच्या गाण्यातील शंभर-दीडशे मूड्स स्वरांमधून उभे करताना त्या गाण्यातले बारकावे, सखोलता समजून घ्यावी लागली होती. आजच्या गायकांना गाण्यामधली भावनाच कळायला त्यांच्या धावत्या जीवनशैलीमुळे वेळ नाही. आयुष्य उमजून जगणाऱ्यांना भावना समजू शकते, तिची उकल होऊ शकते. गाण्यातली भावना कमी होत गेली. सुरेश भटांच्या ‘तरुण आहे रात्र अजूनी’ या गझलेमध्ये जी भावना होती, ती भावनाच आज कुठल्या गायकीत दिसत नाही. फक्त सूर उरतात. सूर, ताल, नाद सगळं आहे; पण गाण्यात जीवच नाही. गाणं स्वत:चं करून गाणाऱ्या रफींसारख्या गायकांची उणीव त्यामुळेच आज जाणवते.
‘आयेला है... जायेला है’ ही हल्लीची भाषा?
हिंग्लिश भाषा रुजायला लागली आणि चित्रपटाने लोकांची भाषा बिघडवायला सुरुवात केली. ‘आयेला है... जायेला है’ ही हल्लीची भाषा? माझा ड्रायव्हर जेव्हा अशी भाषा बोलतो, तेव्हा त्याला एक थप्पड ठेवून द्यावीशी वाटते. तर सांगायची गोष्ट म्हणजे, भाषेची पार वाट लागली आहे. गाणं लिहायचा दर्जा कमी झाला. एकदा मझरु सुलतानपुरी माझ्याकडे रडले. त्यांनी ‘जानम समझा करो’ हे गाणे 70-80मध्ये लिहिले होते. एका तरुण दिग्दर्शकाचा अनुभव सांगितला. त्या दिग्दर्शकाने ‘उर्दू वगैरा छोड दो, सीधा सीधा लिखो.’ सुलतान त्यांच्याशी भांडले. माझ्याशी बोलताना ते म्हणत होते, ‘अब कुछ जीने जैसा रहा नहीं’. ही आजच्या काळाची खंत आहे.
हल्ली निर्माते सांगतात त्याप्रमाणे गाणी लिहिली जातात आणि म्हणूनच ‘लुंगी’सारखी गाणी येऊ शकतात. आज डान्समुळे गाणे लोकप्रिय होते. पूर्वी लोक या बाबतीत दबलेले असायचे. आता नृत्यातली अभिव्यक्ती मोकळी झाली आहे. लग्नामध्ये असो वा कुठल्याही समारंभात, कुठल्याही वयाच्या बायका नाचतात. मी व दीदी (लतादीदी) एका लग्नात गेलो होतो. ‘हाय राम कुडियों का...’ या गाण्यावर अगदी वयस्क महिलाही नाचत होत्या आणि आम्हाला हसावे का काय करावे, कळेना. कोणत्या प्रसंगी वा कोणत्या गाण्यावर नाचायचे, हे न कळणारा हा काळ आहे. लावणी लोकांना आवडते ना, परंतु त्याच्यात डान्स असतो म्हणून ती अधिक हिट होते.
लतादीदींनी लोकांचे कान बिघडवून टाकलेयत...
याचे आणखी एक कारण म्हणजे, लतादीदींनी लोकांचे कान बिघडवून टाकलेयत. नवीन गायिका कितीही चांगल्या गायल्या तरी लतादीदींसारखा आवाज नाही, असे म्हटले जाते. ही टिप्पणी म्हणजे लतादीदींनी आपल्या आवाजाची छाप अजूनही सोडलेली आहे. कितीही कर्कश्श गाणी ऐकली तरी लतादीदींचे एक गाणे शांत करते, हे मी आजही बघते आहे. ही एक गोष्ट मात्र अजूनही बदललेली नाही. उदाहरणच द्यायचे झाले तर सध्याच्या रिअॅलिटी शोंचे देता येईल. आजही गाण्यांच्या शोमध्ये मुलं कोणती गाणी गातात तर 1980च्या पूर्वीचीच. अवघडातली अवघड आणि सुंदर गाणी या शोमध्ये निवडली जातात. मात्र ही गाणी त्यांच्यावर लादली जातात. गाणी लादतात, कपडे लादतात. याच संदर्भात एक किस्सा आठवला... एका शोमध्ये स्पर्धक मुलीला साडी घालायला लावली. त्या दिवशी ती खूप वाईट गायली. मला म्हणाली, ‘ताई साडी सावरताना इतकी त्रैधातिरपिट झाली की गाण्यावरून लक्षच उडाले.’
या उलट पूर्वीची गाणी अशी नव्हती. ‘दादीअम्मा दादीअम्मा मान जाओ’ हे गाणं त्या काळी लोकांना आवडलं होतं, कारण त्या वेळी घरात आजी असायची. त्यामुळे ते गाणं प्रत्येक जण स्वत:शी रिलेट करू शकायचा. आता काळ बदलला आहे. नातीगोती बदललीयत. आताच्या पिढीला इंग्रजी गाणी आवडतात. अगदी अकरा वर्षांच्या मुलाला शब्द कळत नसताना इंग्रजी गाणी पाठ असतात. अलीकडच्या गाण्यांचं आयुष्य चित्रपट थिएटरमध्ये असूस्तोवरच असतं. त्यानंतर ती गाणी कुणी साधी गुणगुणतही नाही. दुसरीकडे मात्र सर्वसामान्य घरामध्येही इंग्रजी गाणी लहान लहान मुलांना पाठ असतात, हे चित्र आपल्याला दिसते. आयफोन, आयपॅड यायच्याही आधी इंग्रजी संगीत सुरू झाले.

हा काळ साधारण 80च्या दशकातला असेल, जेव्हा हिंदी चित्रपट संगीताची स्मरणीयता कमी होत चालली होती. माझे वडील गात होते. नाटक कंपनी सोडून त्यांनी गाण्याची वाट धरली. कोलकात्यात मन्ना डे यांचे काका गात असत. या सगळ्यांनी चित्रपटसृष्टीतल्या संगीताची पायाभरणी केली. त्यानंतर मग मला सैगल, नूर जहॉँगीर अशी नावे आठवतात. संगीताचा रंग बदलून टाकणारे शंकर-जयकिशन यांनी ‘बरसात’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत अनेक चांगली गाणी घडवलीत. कल्याण-आनंदजी यांचेही संगीत वेगळा स्पर्श देणारे ठरले. सचिन देव बर्मन यांनी हा सुवर्णकाळ लोकसंगीताची भर घालून समृद्ध केला आणि पुढे साठच्या दशकाअखेर आर.डी.बर्मन यांनी बदलाचे एक पर्वच आणले.
मदनमोहन यांची ठुमरी, जयदेवजी यांचे वेगळ्या धाटणीचे संगीत यामुळे चित्रपटसृष्टी वेगवेगळे बदल चोखाळत आली. या बदलांमध्ये पाश्चात्त्य संगीताकडे तरुण पिढीचा वाढता ओढा सुरू झाला. आम्ही लहान असताना म्हणजे 55-56चा काळ असेल. मी जेव्हा गायला लागले तेव्हा प्रिस्ले, बिटल्स यांची गाणी ऐकायचो. त्यांची गाणी ऐकून आम्ही त्या वेळी हिंदी गाणी गायचो. त्यांची शैली उचलण्याचा प्रयत्न केला होता. आम्हालाही सगळी इंग्रजी गाणी त्या वेळी ठाऊक असायची, पण हिंदीही आवडायची. आता मला याबाबत वाटतं, सगळेच कमी पडताहेत. गीतकार, गायक कमी पडतात.
ए. आर. रेहमानसारखे काही अपवाद आहेत. पंधरा वर्षांपूर्वीसुद्धा ‘रंगीला’सारख्या चित्रपटासाठी मी सलग गाणी गायलीयत. रेहमानने आजही सलग गाणी गाऊन घेऊन नंतर त्याने त्यात हवे तसे बदल केले आहेत. त्यानेच लोकसंगीत थोडे पाश्चात्त्य स्वरूपात आणले. अलीकडची लोकसंगीत म्हणून आलेली गाणी परत जातात. पूर्वी तसं नव्हतं. सगळ्या प्रदेशांतली गाणी बॉलीवूडमध्ये आलीत, पण प्रत्येक संगीताची गाणी आपलं आयुष्य आज कमी करत आली आहेत.
उडत्या चालीची गाणी त्या वेळीही होती. ‘तिसरी मंजिल’सारख्या चित्रपटात शम्मी कपूर अवाढव्य असूनही अशा गाण्यांवर नाचताना चांगला दिसत होता. आज उडत्या चालींच्या गाण्यांची अवस्था फार वाईट आहे. ‘पिया तू...’सारखी आजच्या भाषेत आयटम सॉँग म्हणवली जाणारी गाणीही म्हणताना अश्लीलता वाटत नाही, जी आज आली आहे. यामुळे आज पार्श्वगायक कोण हे सामान्य माणसांना ठाऊक नसण्याची परिस्थिती निर्माण झाली, असं मला वाटतं. गाण्यातला सूर हरवणे, लयीशी सुरांची फारकत होेणे, भावना नसणे यास कारणीभूत आहे. आजही वडलांकडून शिकलेल्या शास्त्रीय संगीताचा ठेवा घेऊन मी रोज रियाझ करत असते. अगदी रेकॉर्डिंग असायचं त्या दिवशीही. हा रियाझ आता फार कमी झालाय.
जेव्हा मी काहीच करत नसते, तेव्हा मी किशोरी आमोणकर ऐकते…
मी एकाच दिवसात सात गाणी दिली होती. ‘बुगडी माझी सांडली गं’ हे त्यातलंच एक गाणं. सकाळपासून रात्री अगदी साडेतीन-चार वाजेपर्यंत मी गात होते. साठ वर्षांपर्यंत गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड केलं. ग्रॅमी त्यानंतर मला मिळाला. त्या वेळी मी प्रचंड मेहनत घ्यायचे. मी थकत कशी नाही, हा प्रश्न अजूनही सगळ्यांना या बाबतीत पडतो.
जेव्हा मी काहीच करत नसते, तेव्हा मी किशोरी आमोणकर ऐकते. त्यांच्या आवाजातील सखोलता, त्यांचं ज्ञान आवडतं. पलुस्करजींची गाणी आवडतात. लतादीदींची गाणी आवडतात. पलुस्करांची गाणी, काही पाकिस्तानी गायकांची गाणी मी ऐकते. इंग्रजी मी आता फारसं ऐकत नाही. पूर्वी ऐकायचो, कारण त्या वेळी आमच्या गाण्याच्या घडणीसाठी त्यांचा उपयोग व्हायचा. पलुस्कर जयंतीसारख्या महोत्सवांमध्ये एके काळी रात्ररात्र मैफली चालायच्या. अमजद अली खान, अली अकबर खान यांसारखे दिग्गज तिथे हजेरी द्यायचे. ऐकून कान तयार व्हायचे, गाणं कळायचं. एकदा माझ्या गुरुंनी ‘आये ना बालम’ हे गाणं गायला सांगितलं. मी गायले, छान गायले. त्यांनी मला विचारलं, की आठ तास रियाझ करून तू क्लासिकल गाणार की लाईट गाणार...? मी हळूच विचारलं, पैसे कशात जास्त मिळतात? लाईट म्युझिकमध्ये ना, मग मी चित्रपटातच गाणार! मात्र हळूहळू फिल्मी गाणं लोकप्रिय व्हायला लागलं आणि मी चित्रपटक्षेत्रात शिरले. शंकरराव व्यास यांनी माझा आवाज गाण्याची परीक्षा देताना ओळखला आणि त्यांनी फिल्मचं गाणं गाण्यासाठी मला वाव दिला. मग शास्त्रीय संगीताचा रियाझ थोडा कमी होत गेला. खरे तर बालगंधर्वांपेक्षा माझ्यावर माझ्या वडलांचा जास्त प्रभाव होता, आहे. मला त्यांचा सणसणीत आवाज आवडायचा, कारण माझाही स्वभाव तोच आहे. यातूनच वडलांचं गाणं मी माझ्या गळ्यात उतरवत गेले.

माझ्या गाण्यावर बाबांची छाप आहे…
माझ्या गाण्यावर बाबांची छाप आहे, असं सगळे जण म्हणतात. याला माझा स्वभाव कारणीभूत असावा. माझे बाबा सणसणीत गायचे. माझाही तसाच स्वभाव असल्याने कदाचित हाच सणसणीतपणा माझ्या गाण्यात उतरला असावा. मला खड्ग उगारून गायला अधिक आवडतं. बाबांचे जीवन, त्रास, हालअपेष्टा हे जवळून अनुभवल्यामुळे माझ्या खूपशा गाण्यांमध्ये त्यांचा भास होत असतो. बाबांची गाणी गाणं ही साधी गोष्ट नाही. त्यांची फिरत इतकी कठीण होती, की त्याचा सराव केल्यानंतर साधी गाणी गाणं मग खूपच सोपं होऊन जातं. मी त्यांच्यासारखं गाण्यांचा प्रयत्न केला आणि त्यासाठी जी मेहनत केली त्याचा उपयोग माझ्या व्हर्सेटाईल गाण्यांसाठी झाला.
गाण्याचे शब्द हातात आले की आम्ही कुणाचेही नसतो. घरातून फोन येणे नको, काहीच नको. एकदा गाण्यात शिरलं की घर वगैरे सगळं विसरून जायचं. माईकच आमचा देव. गाणं गायचं, कुठलंही असो, त्यात भावना ओतायच्या. ‘बाळा जो जो रे’ म्हणताना मूल डोळ्यासमोर आलं पाहिजे, लावणी गाताना घुंगरांचा नाद समोर आला पाहिजे. मी जे गातेय ते नाचणारीने केलं पाहिजे, हा आत्मविश्वास त्यात असतो. कुठल्या गाण्याला कुठलं वातावरण हवं, आवाज कसा हवा, हे समजून घेणं महत्त्वाचं. हेलनवर चित्रित झालेली गाणी गाताना हेलन हसताना सुंदर दिसायची, हे लक्षात घेऊन तसं गाणं गायचं.
जुन्या काळात शिकण्याची ओढ असायची. अगदी सी. रामचंद्र, मन्ना डे यांसारखे दिग्गज शिकण्यासाठी असिस्टंट म्हणून बर्मनजींसारख्या संगीतकारांकडे काम करायचे. जयदेव यांच्याबरोबर गाणं गाण्याचा एक वेगळाच अनुभव असायचा. त्यांचं ‘अभी ना जाओ छोडकर’ हे गाणं गातानाचा अनुभव माझ्या चांगलाच स्मरणात आहे. त्यांचं गाणं अवघड आहे, ते जमलं तर एक वेगळाच आनंद असायचा. सुधीर फडकेंकडे गाताना त्यांना हवं तसं गाणं जमेस्तोवर गात राहणं ही एक कसोटी असायची.

लोकांना वाटतं, मी फार सुखी आहे, पण या हसण्यामागे किती वेदना आहे
लोकांना वाटतं, मी फार सुखी आहे. माझं सुंदर दिसणं, राहणं, हसणं दिसतं; पण या हसण्यामागे किती वेदना आहे, हे लोकांना माहीत नसतं. त्यांना फक्त देखावा दिसतो. त्या देखाव्यामागचा काळा पडदा किती गडद आहे, भीषण आहे, हे लोकांच्या लक्षात येत नाही. माझी मुलगी गेली वर्षभरापूर्वी, त्या वेळी माझ्या भावाने ‘ओमकार’ लावून बस बाकी काही विचार करू नको, असं सांगितलं. प्रत्येक दु:खाला मागे टाकण्याची ताकद फक्त संगीतात आहे, ही जाणीव मला प्रत्येक वेदनेने दिली. गाण्याचा ‘सा’ हा सूर लागला, तो वाढवला, त्यात तल्लीन झालं, की दु:ख कुठल्या कुठे पळून जातं. देवाकडे मागून मिळणार नाही इतकं सगळं मिळून जातं. गाणं ही माझ्यासाठी सर्वात मोठी साधना आहे.
माझी आत्मचरित्र लिहिण्याची इच्छा होती. पण थोडं लिहून झाल्यावर मला वाटतं, की लिहू नये... आत्मचरित्र लिहिण्यातून अनेक जण दुखावले जातील. लोकांना वाटतं, त्यातून उत्साह मिळेल, त्यांना प्रेरणा मिळेल; पण आपलं दु:ख आपल्याजवळच ठेवावं, असं मला वाटतं. माझ्या दु:खाची गंभीरता स्टेजवरच्या माझ्या गाण्या-नाचण्यात लोकांना दिसत नाही. गाण्याशी तादात्म्यताच इतकी असते, की ते मी कुणाला जाणवूही देत नाही.
या जुन्या आठवणींच्या प्रदेशासह नव्या काळानुसार स्वत:ला सावरताना, पुढे जाताना आज वाटतं चांगले गायक आहेत, चांगले संगीतकार आहेत; पण चांगले गीतकार नाहीत. त्यामुळे संगीताची दिशा अनिश्चित मार्गाने प्रवास करतेय. एक गोंधळ चालू असतो त्याप्रमाणे गाणं स्क्रीनवर नुसतं धावतंय, त्याला कुठल्या समेवर थांबायचं, हेच ठाऊक नाही. अशा काळातून बाहेर पडण्यासाठी शब्दांचं, अर्थाचं भान आवश्यक आहे.
शब्दांकन - प्रशांत पवार






