शेखर पाटील
महान शायर बशीर बद्र गेले, काळजात कळ उठली. पिकलं पान गळून पडलं. खरं तर ते गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनीक जीवनापासून दूर असले तरी त्यांचे काव्य हे असंख्य रसिकांच्या मनाला कायम भुरळ घालत राहिले आहे. बशीरजींच्या गेल्यानंतर त्यांच्या कार्याला प्रचंड प्रमाणात दिला जाणारा उजाळा हा त्यांच्या महत्तेची ग्वाही देणारा ठरला आहे.
कविची महानता मोजण्याचा सर्वात बिनचूक मापदंड म्हणजे जनमानसातील त्याच्या काव्यपंक्तींची लोकप्रियता होय. याचा विचार करता, रावापासून ते रंकापर्यंत आणि संसदेपासून ते गल्लीबोळापर्यंत ज्यांच्या शायरीने असंख्य हृदयांना आंदोलीत केले ते नाव म्हणजे बशीर बद्र ! उर्दू काव्यातल्या तेजस्वी परंपरेतील एक उत्तुंग व्यक्तीमत्व म्हणजे बशीर बद्र होत. खरं तर विसाव्या शतकातील काही मान्यवरांनी शायरीला ईश्क आणि मुश्क यांच्यातून मुक्त केले. बशीरजी हे त्याच परंपरेतील दिग्गज नाव !
अत्यंत साध्यासोप्या शब्दात जीवनातील विविध भावनांना त्यांनी समर्थपणे अभिव्यक्त केले. त्यांनी अरबी आणि फारसी शब्दांपेक्षा दैनंदिन वापरातील हिंदुस्थानी शब्दांना प्राधान्य दिले. याचमुळे त्यांची शायरी ही फक्त अभिजनांपर्यंत न राहता सर्वसामान्यांपर्यंत पोहचली. त्यांच्या अनेक काव्यपंक्ती या आपल्या जीवनाच्या अविभाज्य घटक बनल्या. यातीलच-
उजाले अपनी यादो के हमारे साथ रहने दो ।
न जाने किस गली मे जिंदगी की शाम हो जाय ।
या आयकॉनीक ओळी तर आपण अनेक जणांनी बऱ्याचदा वापरल्या असतील. अनेकांच्या आयुष्यातील कातर क्षणांना या काव्यपक्तींनी जीवंत केले आहे. याला मान्यवरांसह सर्वसामान्यांनी असंख्य वेळेस वापरले असून सोशल मीडियात देखील आपण याचा अनेकदा उल्लेख बघतो.
दुश्मनी जम कर करो लेकिन ये गुंजाइश रहे
जब कभी हम दोस्त हो जाएं तो शर्मिंदा न हों।

या ओळी तर राजकारणात अनेकदा उद्धृत करण्यात येतात. बशीरजींनी फाळणीच्या भयंकर कालखंडात लिहलेल्या या ओळी सिमला कराराच्या वेळेस जुल्फीकार अली भुट्टो यांनी इंदिरा गांधी यांना ऐकवल्या होत्या ही बाब विशेष. हा शेर जागतिक स्तरावर कूटनीती आणि मैत्रीचे सूत्र म्हणून ओळखला जातो. विरोधाभासातही माणुसकी आणि मर्यादा राखण्याचा संदेश ते देतात. जीवनातील मैत्री व वैमनस्याचे सार अवघ्या काही शब्दांमध्ये मांडण्याचे त्यांचे सामर्थ्य हेच बशीर बद्र यांना दुसऱ्यांपासून वेगळेपण देणारे ठरले.
बशीर बद्र यांनी कवी म्हणून त्यांनी प्रेम, मानवी नातेसंबंध आणि सामाजिक प्रश्नांना आपल्या शायरीतून अजरामर केले आहे. त्यांनी गझलला राजवाड्यांच्या बंदिस्त दिवाणखान्यांतून आणि क्लिष्टतेच्या जंजाळातून बाहेर काढत सामान्य माणसापर्यंत आणून सोडले. ही एक शांत पण प्रभावी क्रांती होती. त्यांनी गझलची अभिजातता न घालवता तिला लोकभाषा दिली.
यापेक्षा देखील त्यांची सर्वात मोठी देणगी म्हणजे त्यांनी गझलमध्ये केलेली भाषिक क्रांती. त्यांनी पारंपारिक, कठीण आणि बोजड शब्दावली नाकारून 'हिंदुस्तानी' भाषेचा अंगीकार केला. त्यांनी 'स्वेटर', 'डायरी', 'ट्रेनची खिडकी', 'छत्री', 'लिफाफा' यांसारख्या रोजच्या वापरातील शब्दांना आपल्या काव्यात सन्मानाचे स्थान दिले. ही केवळ शब्द बदलाची प्रक्रिया नव्हती, तर ती गझलला एकविसाव्या शतकातील सामान्य माणसाशी जोडण्याची धडपड होती. त्यांनी उर्दू आणि हिंदी या दोन्ही भाषांना 'संस्कृतची अपत्ये' मानले. किंबहुना या दोन्ही भाषा म्हणजे संस्कृतच्याच 'लेटेस्ट आवृत्त्या' असल्याची संकल्पना मांडली. गझल जर काळासोबत धावायची असेल, तर तिने आधुनिक संवेदनांना आपल्यात सामावून घेतले पाहिजे, हा त्यांचा आग्रह त्यांनी आयुष्यभर पाळला.
१९८७ मध्ये मेरठमध्ये झालेल्या भीषण जातीय दंगलीने बशीर बद्र यांच्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण केली. या विक्राळ आगीच्या भक्ष्यस्थानी केवळ त्यांचे घर पडले नाही, तर त्या आगीत मीर आणि गालिब यांच्या काळातील संदर्भ असलेली अत्यंत अमूल्य हस्तलिखिते जळून खाक झाली. त्यांच्या स्वतःच्या शेकडो अप्रकाशित गझलांचे संचित एका रात्रीत राख झाले. या आघातातून सावरणे त्यांना केवळ अशक्य वाटत होते. 'लोग टूट जाते हैं एक घर बनाने में, तुम तरस नहीं खाते बस्तियां जलाने में' या हृदयद्रावक शेराचा जन्म याच वेदनेतून झाला. बेख़बर कुर्सियां आँख मलती रहीं । बस्तियाँ बेगुनाहों की जलती रहीं ॥ या काव्यपंक्ती देखील यात व्यथेतून जन्मल्या. या आघाताने त्यांच्या लेखनाला एक 'तात्वीक खोली' दिली. ज्या हातांची हस्तलिखिते जळाली, त्याच हातांनी सूडाची भाषा न लिहिता प्रेमाचा संदेश दिला. या घटनेच्या पश्चातचे त्यांचे काव्य याच राखेतून जन्माला आलेल्या करुणेचा आविष्कार आहे.
बशीर बद्र हे केवळ प्रेमकवीच नव्हते, तर ते मानवी संबंधांचे सूक्ष्म मानसशास्त्र मांडणारे कवी होते. त्यांचे शेर माणसाच्या जटिल वर्तनावर भाष्य करतात. त्यांच्या गझलांमध्ये विरह आणि प्रेमाची ओढ तर आहेच, पण त्यासोबतच मानवी हतबलतेचे (मजबूरियां) एक वेगळेच दर्शन घडते. 'कोई काँटा चुभा नहीं होता दिल अगर फूल सा नहीं होता । कुछ तो मजबूरियां रही होंगी, यूं कोई बेवफ़ा नहीं होता॥' या ओळींमधून ते मानवी चुकांकडे पाहण्याचा एक सहानुभूतीपूर्ण आणि करुणामय दृष्टिकोन मांडतात.

तर, मिल भी जाते हैं तो कतरा के निकल जाते हैं । हाये मौसम की तरह दोस्त बदल जाते हैं । उम्र भर जिनकी वफ़ाओं पे भरोसा कीजे । वक़्त पड़ने पे वही लोग बदल जाते हैं || या ओळींची दाहकता प्रत्येकाने आयुष्यात कधी तर अनुभवलेली असतेच. ज़िन्दगी तूने मुझे कब्र से कम दी है ज़मीं । पाँव फैलाऊँ तो दीवार में सर लगता है । या ओळीत जीवनभराची व्यथा दडलेली आहे. अशाच प्रकारे एकापेक्षा एक सरस रचनांमुळे असंख्य रसिकांच्या हृदयाचा त्यांनी ठाव घेतला. त्यांच्या मुक्तछंदातील कविता तशा कमी लिहल्या असून छंदबध्द अशा गजल आणि यातील विविध अशआर हे त्यांचे खरे काव्यवैभव होय.
अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. वाजपेयी यांना त्यांनी आपले 'साहित्यिक पिता' मानले होते. एवढेच नव्हे तर त्यांच्यासाठी त्यांनी प्रचारही केला होता. यावरून त्यांच्यावर टिका देखील करण्यात आली असली तरी त्यांनी अटलजींसोबतचा स्नेह कायम ठेवला. नियतीचा क्रूर खेळ असा की, अटलजींप्रमाणेच बशीरजी यांना आयुष्यातील शेवटच्या टप्प्यात स्मृतीभ्रंशाची व्याधी जडली. असंख्य रसिकांच्या हृदयाला स्पर्श करणारे लिखाण करणाऱ्या या महान कविला शेवटच्या वर्षांमध्ये त्यांचा एक शेर देखील आठवू नये हा काळाचा क्रूर खेळच मानावा लागेल.
बशीर बद्र यांची लोकप्रियता केवळ भारतापुरती मर्यादित नव्हती; भारतीय उपखंडात बशीर बद्र' मोठ्या प्रमाणावर वाचले गेले. त्यांच्या साहित्याचा अनुवाद इंग्रजी आणि फ्रेंच भाषेत झाला असून, जगजित सिंह आणि हरिहरन यांच्यासारख्या दिग्गज गायकांनी त्यांच्या गझलांना दिलेल्या आवाजामुळे ते जगभरातील रसिकांच्या घराघरात पोहोचले. कधी काळी जगभरातील मुशायरे गाजविणारे बशीरजी हे आजच्या गतीमान सोशल मीडियाच्या युगात देखील तितकेच प्रासंगीक आणि लोकप्रिय असल्याचे आपण सर्वच जण अनुभवतोय.
बशीर बद्र हे केवळ एक व्यक्ती नव्हते, तर ते एका सर्वसमावेशक आणि प्रवाही विचारधारेचे नाव होते. त्यांनी गझलला अभिजन वर्गाच्या चौकटीतून मुक्त करून सर्वसामान्यांच्या काळजाची धडकन बनवले. आत्यंतीक द्वेषाच्या आणि विखारी कालखंडात प्रेमाची मुलायम भाषा कशी बोलावी, हे त्यांच्या साहित्यावरून कुणालाही शिकता येईल. त्यांचा वारसा केवळ शब्दांत नाही, तर त्यांनी जपलेल्या मानवी मूल्यांमध्ये आहे. त्यांच्या आयुष्याची सायंकाळ झाली असली तरी त्यांनी पेरलेले शब्द आता एका चिरंतन पहाटेच्या रूपात आपल्यासमोर उभे आहेत. आज ते आपल्यात नसले, तरी त्यांचे शब्द "उजाले अपनी यादों के..." या रूपात आपल्या सर्वांच्या सोबतीला कायम राहतील. येणाऱ्या पिढ्यांसाठी ते माणुसकी, प्रेम आणि संवेदनेचा प्रकाश बनून राहतील. उर्दू गझलेचा हा मखमली आवाज काळाच्या पडद्याआड गेला असला, तरी त्यांच्या शब्दांचे प्रतिध्वनी विश्वाच्या कानाकोपऱ्यात सदैव धडधडत राहील आणि मानवी मनाला साद घालत राहील. साहित्याच्या या महान उस्तादाला हीच खरी आणि अजरामर श्रद्धांजली आहे.
बशीर बद्र यांचे अनेक शेर मानवी संवेदनांनी ओतप्रोत भरलेले आहेत. यातील मला आवडलेले निवडक अशआर- त्यांनी मैत्रीवर देखील भेदक भाष्य केलेले आहे. याची प्रचिती खालील पंक्ती आपल्याला देतील.

मोहब्बतों में दिखावे की दोस्ती न मिला ।*
*अगर गले नहीं मिलता तो हाथ भी न मिला ॥
तसेच
कोई हाथ भी न मिलाएगा जो गले मिलोगे तपाक से
ये नए मिज़ाज का शहर है ज़रा फ़ासले से मिला करो ॥
या शब्दांमध्ये त्यांनी मैत्री, संधीसाधूपणा, शत्रूत्व यांची विलक्षण गुंफण केली आहे. तसेच गजल म्हणजे काय ? याचे उत्तर त्यांनी किती सारगर्भ दिलेय ते बघा-
पत्थर के जिगर वालों, ग़म में वो रवानी है
ख़ुद राह बना लेगा बहता हुआ पानी है ।
ये शबनमी लहजा है आहिस्ता ग़ज़ल पढ़ना
तितली की कहानी है फूलों की ज़बानी है ॥
जीवनातील व्यथा व्यक्त करतांना ते म्हणतात-
भूल शायद बहुत बड़ी कर ली
दिल ने दुनिया से दोस्ती कर ली ।
माझे जीवाभावाचे मित्र व मार्गदर्शक पीटर अंकल यांच्या अंत्ययात्रेत माझी भावविभोर दशा ही बशीरजींच्याच खालील चारोळीसारखी होती-
सब कुछ खाक हुआ है लेकिन चेहरा क्या नूरानी है
पत्थर नीचे बैठ गया है, ऊपर बहता पानी है ।
तेरे बदन पे मैं फ़ूलों से उस लम्हे का नाम लिखूं
जिस लम्हे का मैं अफ़साना, तू भी एक कहानी है ॥
असे असंख्य शेर, गजल आदींच्या माध्यमातून बशीर बद्र यांनी आपले जीवन समृध्द केले आहे. तर सर्वात शेवटी त्यांचा मी वर नमूद केलेला अजरामर शेर. या संपूर्ण गजलमधील मधल्या काव्यपंक्ती वगळून चारोळी तयार होते ती अशी-
कभी तो आसमाँ से चाँद उतरे जाम हो जाये, ।
तुम्हारे नाम की इक ख़ूबसूरत शाम हो जाये ॥
उजाले अपनी यादों के हमारे साथ रहने दो,
न जाने किस गली में ज़िन्दगी की शाम हो जाये ॥
आपल्या जीवनातील अनेक क्षणांच्या सोबतीला बशीर बद्र यांचा कलाम असतोच. अगदी समर्पक शब्दांत सांगावयाचे तर- 'जिथे आठवणी उजळतात, तिथे बशीर बद्र भेटतात !' यामुळे ते लौकीक अर्थाने गेले असले तरी त्यांच्या काव्याच्या माध्यमातून ते चिरंतन आपल्या सोबत राहणार आहेत.






