‘स्टारलाइनर स्पेसक्राफ्ट इंटरनॅशनल स्पेस स्टेशन’ (आयएसएस) वर पाठवण्यात आले आहे. भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुश विल्मोर यांना अंतराळात जाऊन एक महिना होत आला आहे. ‘नासा’ आणि ‘बोईंग’चे स्टारलाइनर अवकाशयान कधी परतणार हा प्रश्न अजूनही कायम आहे. प्रत्यक्षात हे मिशन केवळ आठ दिवसांचे असल्याचे सांगण्यात आले होते. 14 जूनला ते परत येणे अपेक्षित होते. अंतराळयान स्पेस स्टेशनवर नेत असताना हेलियम वायूची गळती झाली आणि ‘थ्रस्टर्स’मध्ये काही बिघाड झाला;परंतु अंतराळ संस्थेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, की हे यान पूर्णपणे सुरक्षित असून अंतराळवीरांना परत आणण्यात कोणतीही अडचण नाही.
यान सुरक्षित आहे, अंतराळवीरांना परत आणण्यात काहीच अडचण नाही असे सांगितले जात असले, तरी त्यांना परत आणले का जात नाही, हा प्रश्नच आहे. यापूर्वी रशियाचे अंतराळवीरही अवकाशात अडकले होते; परंतु रशियाने वेळ न दवडता दुसरे यान पाठवून अंतराळवीरांना परत आणले होते. सुनीता आणि विल्मोर यांच्या परतण्याचे वायदे करूनही त्यांना परत आणता आलेले नाही. 
सुनीता यांच्या नावावर सर्वाधिक काळ अंतराळात राहण्याचा विक्रम आहे; परंतु आता या अंतराळवीरांची सुटका करणे आवश्यक आहे. सुनीता आणि बुश यांना परत आणण्यासाठी कोणतीही तारीख निश्चित केलेली नाही. ‘स्टारलाइनर क्रू फ्लाइट टेस्ट स्पेसक्राफ्ट’ हे ‘स्पेस कॅप्सूल’ आहे. हे बोईंग कंपनीने बनवले असून हे कॅप्सूल प्रवाशांना लो-अर्थ ऑर्बिटमध्ये नेण्यासाठी डिझाइन केलेले आहे. निम्न-पृथ्वी कक्षाची श्रेणी पृथ्वीपासून सुमारे दोन हजार किलोमीटर आहे. ‘नासा’च्या म्हणण्यानुसार, ही इतकी कमी उंची आहे, की इथून पृथ्वीशी सहज संपर्क साधता येतो, पृथ्वी पाहता येते आणि आवश्यक वस्तूही पाठवता येतात.
अमेरिकन कंपनी बोईंगने ‘नासा’च्या कमर्शियल क्रू प्रोग्रामच्या सहकार्याने हे स्टारलाइनर बनवले आहे. हे वाहन एकावेळी सात जणांना घेऊन जाऊ शकते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही कॅप्सूल दहा वेळा वापरली जाऊ शकते आणि प्रत्येक वापरानंतर, ते पुन्हा तयार करण्यासाठी फक्त सहा महिने लागतात. स्टारलाइनर अंतराळयान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाठवण्यात आले आहे. ते आठ दिवस तिथे राहील अशी योजना होती. या काळात अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुश विल्मोर हेदेखील अंतराळ स्थानकावर राहतील, अशी योजना होती. अनेक देशांतील शास्त्रज्ञ ‘स्पेस स्टेशन’वर संशोधनासाठी एकत्र काम करतात.
स्टारलाइनर लॉन्च झाल्यापासून अनेक समस्या
स्टारलाइनर अंतराळयान अंतराळवीरांना घेऊन जाण्यास आणि त्यांना परत आणण्यास सक्षम आहे हे सिद्ध करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता; पण स्टारलाइनर लॉन्च झाल्यापासून अनेक समस्या समोर आल्या आहेत. ही मोहीम अनेकवेळा पुढे ढकलण्यात आली. सुरुवातीला ते सहा मे रोजी प्रक्षेपित होणार होते; मात्र प्रक्षेपणाच्या अवघ्या दोन तास आधी उलटी गणती अचानक थांबवावी लागली. ‘ॲटलस व्ही’ च्या वरच्या भागात बसवलेल्या प्रेशर व्हॉल्व्हमध्ये काही बिघाड होता. त्यानंतर अनेक तांत्रिक अडचणींमुळे हे प्रक्षेपण आठवडाभर लांबणीवर पडले. अखेर पाच जून रोजी हे यान प्रक्षेपित करण्यात आले.
स्टारलाइनर अंतराळयान ॲटलस व्ही रॉकेटमधून सोडण्यात आले तेव्हा एक समस्या निर्माण झाली. प्रक्षेपणापूर्वीच मिशन टीमने हेलियम वायूची गळती झाल्याचे शोधून काढले होते; पण त्या वेळी ही एवढी मोठी अडचण मानली जात नव्हती, की लाँच थांबवावी लागली. विशेष बाब म्हणजे मिशन टीमला याबद्दल कोणताही पश्चाताप नाही, कारण नासा आणि बोईंगसाठी हे फक्त चाचणी उड्डाण आहे. त्यांचा उद्देश डेटा संकलित करणे हा आहे, जेणेकरून स्टारलाइनरला भविष्यातील मोहिमांसाठी पूर्वीपेक्षा चांगले बनवता येईल; मात्र प्रक्षेपणानंतरही हेलियम वायूची गळती थांबलेली नाही. अंतराळ स्थानकाच्या दिशेने जाताना यानात आणखी जास्त हेलियम वायूची गळती दिसली. काही ‘थ्रस्टर्स’मध्येही समस्या होत्या. या सर्व समस्या स्टारलाइनरच्या सर्व्हिस मॉड्युलमध्ये आल्या होत्या.
‘स्पेस एजन्सी’ला अजूनही समस्या कुठे आहे हे समजून घ्यायचे आहे
सुनीता विल्यम्स आणि बुश विल्मोर यांना परत आणण्यास विलंब झाला. कारण बोईंग आणि नासा यांना न्यू मेक्सिकोमध्ये काही ग्राउंड चाचण्या घ्यायच्या आहेत. स्टारलाइनरचे काही थ्रस्टर्स (रॉकेटला मार्गदर्शन करणारे उपकरण) अंतराळ प्रवासादरम्यान अचानक का खराब झाले. तथापि, पाच पैकी चार थ्रस्टरची दुरुस्ती करण्यात आली आहे; परंतु एक अद्याप नादुरुस्त आहे. ते संपूर्ण मिशनमध्ये कार्य करणार नाही. ‘नासा’च्या ‘कमर्शियल क्रू प्रोग्राम’चे व्यवस्थापक स्टीव्ह स्टिच म्हणाले, की अंतराळवीर कधी परत येतील हे सांगता ही. ‘बोईंग’च्या कमर्शियल क्रू प्रोग्रामचे उपाध्यक्ष आणि प्रोग्राम मॅनेजर मार्क नप्पी यांच्या म्हणण्यानुसार, या समयेत नाही.
स्टारलाइनर परत आणण्यास उशीर होण्याचे आणखी एक कारण म्हणजे समस्या कोठे आहे हे पूर्णपणे ज्ञात नास्येचे खरे कारण काय आहे हे अभियंत्यांना अद्याप माहीत नाही. आता सुनीता विल्यम्स आणि बुश विल्मोर यांचे पुढे काय होणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे; मात्र त्यांना सध्या कोणताही धोका नाही. अंतराळ स्थानकावर इतकी सामग्री आणि आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत, की ते अनेक महिने राहू शकतात.. जर एखादी मोठी समस्या असेल तर आणीबाणीच्या परिस्थितीत त्यांना परत आणले जाऊ शकते; परंतु ‘स्पेस एजन्सी’ला अजूनही समस्या कुठे आहे हे समजून घ्यायचे आहे.
रशिया मदत करू शकेल…
भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि तिचा साथीदार बुच विल्मोर हे पृथ्वीपासून 400 किलोमीटर उंचीवर असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात आहेत. ते आत्तापर्यंत परत यायला हवे होते; पण ज्या ‘बोईंग स्टारलाइनर’ने ते तिथे पोहोचले, त्यात तांत्रिक बिघाड झाला असून त्याची अद्याप दुरुस्ती झालेली नाही. या घटनेने ‘नासा’लाही प्रश्नांच्या वर्तुळात टाकले आहे. दोन अंतराळवीर पृथ्वीवर परत कसे येतील ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.
‘डायप्रॉक्स मीडिया रिपोर्ट्स’मध्ये असे म्हटले आहे, की स्पेसएक्स या दोन्ही अंतराळवीरांना वाचवण्यासाठी पुढे येऊ शकते. ‘स्पेस एक्स’ कडे अंतराळ मोहिमांमध्ये नैपुण्य आहे; मात्र त्याची मदत घ्यायची, की नाही याचा अंतिम निर्णय ‘नासा’ला घ्यावा लागणार आहे. रशियादेखील एक पर्याय आहे. जर रशियाशी चर्चा झाली, तर त्याचे सोयुझ अंतराळयान दोन्ही अंतराळवीरांना परत आणू शकेल. गेल्या वर्षी रशियानेही हे केले होते.
दोन्ही अंतराळवीरांना परत आणण्याची जबाबदारी‘स्पेस एक्स’ वर सोपवली गेली तर काय होईल हा प्रश्न आहे. ‘बोईंग’ आणि ‘स्पेस एक्स’ एकमेकांचे स्पर्धक आहेत. सुनीता आणि त्यांच्य सहकाऱ्यांच्या परतीला अनेकवेळा उशीर झाला असला, तरी ‘इस्रो’चे प्रमुख एस सोमनाथ यांनी सुनीता विल्यम्सचे पुनरागमन ही चिंतेची बाब नसल्याचे म्हटले आहे. अंतराळ स्थानक लोकांना दीर्घकाळ राहण्यासाठी सुरक्षित ठिकाण आहे. सुनीता अनेक महिने अंतराळात राहू शकतात.
अंतराळवीरांच्या पुनरागमनाची चिंता करण्याऐवजी नवीन क्रू मॉड्युल आणि अंतराळात प्रवास करण्याची क्षमता तपासण्यावर भर द्यावा, यावर ‘इस्रो’ प्रमुखांनी भर दिला. सुनीता यांच्या नावावर अनेक विक्रम आणि मिशन आहेत. नवीन अंतराळ यानाच्या पहिल्या उड्डाणात प्रवास करणे ही एक धाडसी गोष्ट आहे. ती स्वतः डिझाईन टीमचा एक भाग आहे आणि तिने तिच्या अनुभवातील इनपुट वापरले आहेत. ‘नासा’चे ‘कमर्शियल क्रू प्रोग्राम मॅनेजर’ स्टीव्ह स्टिच यांनी म्हटले आहे, की आम्हाला परतण्याची घाई नाही. ‘स्पेस एक्सने दोन्ही अंतराळवीरांना परत आणल्यास बोईंगच्या स्टारलाइनर प्रकल्पाला मोठा धक्का बसेल. या अंतराळयानाच्या विकासावर बोईंगने बराच वेळ आणि पैसा खर्च केला आहे.
गेल्या वर्षी दोन रशियन अंतराळवीरही ‘आयएसएस’वर अडकले होते. त्याच्या अंतराळयानातून कूलंट लीक झाले होते आणि ती समस्या दूर होऊ शकली नाही. त्यानंतर रशियाने आपले दुसरे अंतराळ यान पृथ्वीवरून पाठवले आणि अंतराळवीर परत केले. जर ते आता स्टारलाइनरवरून परत आणले गेले, तर समस्या नेमकी कोठे आली हे नंतर शोधणे कठीण होईल. कारण परत येताना सर्व्हिस मॉड्यूलचा काही भाग जळून नष्ट होईल.






