- पूजा राठी
सकाळी सहा वाजता डेअरीतून दूध आणणे ही सरोज यांची कित्येक वर्षांची दिनचर्या आहे. पाऊस असो, तुफान असो, त्यांच्यासाठी यातून सुट्टी नसते. अनेकदा आमच्या समाजात बायकांना विनासुट्टी घरकामं करावी लागतात. अगदी त्या बाहेर नोकरी करत असल्या तरीही. त्यांच्या कामाची कोणती मर्यादा नसते. सुट्टी न घेता त्या विनामोबदला खपत राहतात. ज्यामुळे आमचं घर चालू राहतं. अलिकडेच एल अँड टी चेअरमॅन एस. एन. सुब्रह्मण्यन यांनी खेद व्यक्त केला की ते त्यांच्या लोकांकडून रविवारी काम करून घेऊ शकत नाहीत.
यशासाठी आठवड्याला 90 तास कामावर त्यांनी जोर दिला. आपल्या या विधानात त्यांनी असेही म्हटले की एखादा माणूस घरी बसून आपल्या बायकोकडे किती वेळ बघत राहणार आहे. त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना रविवारीही काम करण्याचा सल्ला दिला. या विधानावर मोठा गदारोळ उठला. पण यातून एक वेगळे सत्यही बाहेर पडले. ज्या बायकांना बघण्यावरून ते टिंगल करतात त्या बायकांना कधीच सुट्टी मिळत नसते. भारताची अर्धी लोकसंख्या म्हणजेच स्त्रिया आधीच आठवड्यातील कित्येक तास विनावेतन काम करत आहेत. काम आणि जगणे यांतील समतोलावर बायकांविषयी फारशी चर्चा केली जात नाही. 
सोमवार ते शनिवार पहाटे पाचच्या ठोक्याला तिचा दिवस सुरू होतो. पण किमान रविवारी तरी तास-दोन तास घड्याळ का बंद पडू नये? रोज घरकामाच्या रहाटगाड्यात जुंपणाऱ्या गृहिणींना, ऑफिस टेबलवरच्या फायलींमध्ये गुंतणा-या जिवाने किमान एक दिवस तरी पूर्णपणे स्वत:साठी का खर्ची घालू नये किंवा माऊस हाताळून थकलेल्या तिच्या बोटांनी सुटीच्या दिवशी तरी टीव्ही रिमोटवर का हक्क गाजवू नये? असे काहीसे अवघड प्रश्न हल्लीच्या नोकरदार महिलांना पडू लागले आहेत. परंतु दुर्दैवाने हे प्रश्नही मनातच राहतात आणि आठवड्याच्या सुटीचा परू्ण दिवस घरातली बाकीची कामे निपटण्यात खर्ची पडतो.
जगभर रविवारी अनेक लोक काम करत नाहीत. तो आराम करण्याचा दिवस असतो. पण हे पुरुषांसाठीच, बायकांसाठी नाही. त्यांना रविवारीही काम करावं लागतंच. मुलांना सांभाळावं लागतं. पुढच्या आठवड्याचं नियोजन करावं लागतं. पितृसत्ताक समाजात बायकांच्या नशिबी घरकामं आलं आहे. पण त्याला ना दर्जा आहे ना मान्यता ना आदर. सुब्रह्मण्यन 90 तास पगारी कामाची गोष्ट करतात पण बायका बिनपगारी खपत असतात.
जगभरात पुरुषांच्या तुलनेत बायका तिप्पट घरगुती कामं करतात. गरीब देशांमध्ये बायकांना आपल्या घरात जास्त काम करावं लागतं. अनेकदा नोकरदार बायकांकडूनही ही अपेक्षा केली जाते की त्यांनी नोकरीसोबतच घरची कामंही करावीत. बायका पुरुषांच्या तुलनेत जास्त विनापगारी कामात गुंतलेल्या असतात ज्यात घरगुती कामं जास्त असतात.
पितृसत्ताक समाजात घरच्या कामांची जबाबदारी बायकांवर टाकली गेली आहे. रविवार जो आरामाचा दिवस समजला जातो, तेव्हाही बायकांवर जास्त भार पडतो. घरात सारे लोक असल्यामुळे काम वाढते. सरोज सांगतात, “आमच्यासाठी सुट्टीचा कोणताच दिवस नसतो. रविवारी तर जास्तच काम निघतं. सर्वांना सुट्टी असल्यामुळे अनेक कामं पुढे येतात. रविवारी सर्वांना वेगवेगळं खायचं असतं त्यामुळे बराच वेळ स्वयंपाक घरातच जातो. नोकरीवाले लोक आराम करतात पण आम्हाला आराम नसतो. गृहीणीसाठी सुट्टी नसते, संडे असो वा मंडे, तिला सारखेच असतात.”
रंजिता या नोकरदार आहेत. सरकारी विभागात काम करतात. त्या म्हणतात, “रविवारी नोकरदार बायकांना जास्तीची कामं पूर्ण करावी लागतात. जी आठवड्यात आधी पूर्ण झालेली नसतात. रविवारी ऑफिस नसतं पण किचनमध्ये बराच वेळ जातो. साफसफाई असते. कपडे धुवायचे असतात. माझा सारा वेळ तर यातच जातो. घरातली कामं आटोपली तर बाजारात जावं लागतं. असं असलं तरीही रविवारची वाट बघतेच मी.” निलिमा एक गृहिणी आहेत, त्या म्हणतात, “रविवार म्हणजे डबल काम.
एरव्ही सकाळची कामं आणि दुपारच्या जेवणानंतर थोडा आराम करायला मिळतो. पण रविवारी सारा वेळ कामातच निघून जातो. स्वयंपाकात जास्त वेळ जातो. मुलं उशीरा उठतात. त्यामुळे सर्व गोष्टींना उशीर होतो. नवऱ्याची वेगळी कामं असतात. रोज संध्याकाळी काही वेळ आराम करता येतो पण रविवारी तो मिळत नाही आणि गृहिणीला तर सुट्टी नसतेच. नेहमी एक धावपळ सुरू असते.” 
आपण पैसा कमावतो आणि आपल्या दंडात थोडं अधिक बळ आहे, या भांडवलावर शतकानुशतके त्यांनी वर्चस्व गाजवलं. पण आता बायकांनी ही 'हम भी कुछ कम नही' हे सिद्ध केलंय. शिक्षण घेतल्यामुळे आता स्त्री कुठल्याही क्षेत्रात लीलया संचार करायला लागली आहे. त्यामुळे 'आम्हीच पैसे कमावतो, तेव्हा आमचंच ऐका' हा हेका पुरुषांना करायला जरा जडंच जातंय. अर्थात पारंपरिक सवयीमुळे ही वर्चस्व गाजवायची उमीर् एकदम कमी होणार नाहीच, पण तिला हादरे बसायला लागलेत हे नक्की. याचा अर्थ सगळं आलबेल आहे आणि स्त्रीला सगळीकडे, अगदी सन्मानाने वागवलं जातंय, असा नाही. कारण अजूनही बहुसंख्य स्त्रिया चूल आणि मूल या परिघातच बंदिस्त आहेत.
ज्या काहीजणी पैसा कमावतात, त्यांचा त्यांच्या मिळकतीवर किती अधिकार असतो, हा वेगळाच प्रश्न.शिक्षण घेतल्यामुळे, स्त्रिया उंबरठ्याबाहेर पडल्या, नवीन जग बघू शकल्या आणि महत्त्वाचं म्हणजे पैसा कमावू लागल्या. पण तरीही,'चूल आणि मूल' हे पारंपरिक काम काही त्यांना चुकत नाही. म्हणजेच नोकरी करणाऱ्या बाईला, थोडं स्वातंत्र्य किंवा प्रतिष्ठा मिळाली असली तरी, तिच्या कामाचा बोजा दुप्पट झालाय.
एकीकडे पुरुषांसाठी रविवार म्हणजे आराम, बाहेर फिरणं, बाजारात जाणं, चित्रपट बघणं असतं, बायकांसाठी तोच दिवस सर्वांधीक कामाचा असतो. घरातील कामात त्यांचा सारा वेळ जातो ज्यात स्वतःसाठी त्यांना वेळ देता येत नाही. याचा त्यांच्या शरीरावर तसेच मनावरही प्रभाव पडतो. आराम न करता लगातार अशा कामात असलेल्या बायकांना शारिरीक दुखणी लवकर जडतात तसेच त्यांचं मानसिक स्वास्थ्यही लवकर खराब होतं.
रविवारचा दिवस सर्वांसाठीच, विशेषतः बायकांसाठी सुट्टीचा दिवस नसतो. लैंगिक विषमतेमुळे त्यांना विनापगारी घरकामं करावी लागतात. लैंगिक समानतेसाठी विनापगारी कामाला मान्यता मिळणे गरजेचे आहे. घरातील प्रत्येकाला घरकामात मदत करायला पाहिजे. समान कार्मिक वातावरणासाठी प्रयत्न करायला पाहिजेत. पितृसत्ताक रचनेतील लैंगिक विषमतेला आव्हान देत लैंगिक समानता आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.





