आपले नाव ही आपली ओळख असते; परंतु पूर्ण नावात वडील आणि आडनाव येते. आई ही जीवनात कितीही महत्त्वाची असली, तरी तिला नावात स्थान नसते. तेच स्थान देण्याचा प्रयत्न बऱ्याच वर्षांपासून होतो आहे. आज समाज माध्यमांवर दिसणारी वडिलांबरोबर आईचेही नाव असलेली नावे पाहिल्यानंतर ही गोष्ट हळूहळू मान्य होते आहे, हे जाणवते. आईचे असणे खूप काही असले, तरी ती अनेक ठिकाणी दृष्य स्वरूपात नसते. व्यक्तीच्या जडणघडणीत आईचा सहभाग सर्वांत महत्त्वाचा असतो; पण तरीही तिला ‘नाव’ या व्यवस्थेत स्थान नाही. म्हणजे अपत्याला वाढविण्यात आईचा वाटा अधिक.
नाव मात्र वडिलांचे, अशी परंपरा घेऊन माणूस वर्षानुवर्षे जगत आहे. माणसाच्या आयुष्यात आईचे स्थान अढळ आहे; पण रोजच्या सार्वजनिक जगण्यात किंवा व्यवहारात ती नसते. थोडक्यात आईचे नाते खासगी आणि वडिलांचे सार्वजनिक, अशी स्पष्ट विभागणी भारतात झालेली दिसते. ही पद्धत काही जण मोडू इच्छितात. जात नावाच्या व्यवस्थेला हादरे देणे आणि नावात आईला सन्मानाने स्थान देणे, अशी ही दुहेरी साध्य होणारी पुरोगामी कृती आहे. नाव बदलण्याचा प्रयत्न अद्यापही व्यक्तीकेंद्री असला, तरी हे बिंदू जोडल्यास त्यातून निर्माण होणारा अवकाश नक्कीच मोठा असेल.
वैयक्तिक पातळीवरच्या छोट्या बदलाची कृती हीच मोठ्या सामाजिक परिवर्तनाची नांदी असते. म्हणूनच लोकापवाद बाजूला सारून बदलाचं पाऊल उचलणाऱ्यांच्या धाडसाचं कौतुक करायला हवं आणि समजून घ्यायला हवा त्यांच्या कृतीमागचा अर्थ. आज ‘बाईमाणूस’मध्ये लिंगभेदासारख्या विषमतेला विरोध करून स्त्री-पुरुष समानता अंगीकारणाऱ्या, आपल्या नावात आईलाही समान स्थान देणाऱ्या काही पुरोगामी मंडळींना आपण भेटणार आहोत. स्वत:ची अशी वेगळी ओळख अभिमानानं मिरवणाऱ्यांची आणि स्त्रीत्वालाही मोठं करण्याचा आग्रह धरणाऱ्यांची संख्या जेव्हा वाढेल, तेव्हा महिला दिन मुद्दाम वेगळा साजरा करण्याची गरज उरणार नाही…

मी संजय ‘लीला’ भन्साली…
आपल्या देशात स्त्रीला एकतर देवी म्हणून पुजले जाते किंवा तिला अबला मानून केवळ भोगवस्तू म्हणून तिच्याकडे तुच्छतेने पाहिले जाते. स्त्रीशक्तीचा आदरपूर्वक उल्लेख औपचारिकपणे क्वचितच केला जातो. स्त्री म्हणजे मातृसत्ता. ती केवळ अपत्याला जन्म देत नाही, तर आयुष्यात खंबीरपणे उभे राहण्यासाठी, काहीतरी सकारात्मक कार्य करण्यासाठी त्याला सक्षम बनवते. आज स्त्रियांसाठी शिक्षणाची कवाडे उघडल्यामुळे ती उंबरठ्याबाहेर पडून सक्षमपणे पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटवत आहे. शहरांमधील हे आधुनिकतेचे वारे ग्रामीण भागातील, तळागाळातील स्त्रीपर्यंत पोहोचेल, तेव्हाच ती आपल्या अधिकारांप्रती जागृत होईल. आणि स्त्रियांची सर्वांगीण प्रगती होईल.
मला स्त्रियांविषयी प्रचंड आदर वाटतो आणि तो व्यक्त करण्यासाठी केवळ महिला दिनाचे औचित्य मला मान्य नाही. आपण आपल्या वागण्यातून, कामातून तो व्यक्त केला पाहिजे. सिनेसृष्टीशी निगडित असल्याने स्त्रियांप्रती माझ्या भावना मी माझ्या चित्रपटांमधून सहजपणे व्यक्त करू शकतो आणि तसा प्रयत्न मी निश्चितच करत आहे. ‘ब्लॅक’, ‘गुजारिश’ या माझ्या चित्रपटांमधील नायिका म्हणूनच वेगळ्या आहेत. ‘बाजीराव मस्तानी’मध्येही मी स्त्री व्यक्तिरेखा अतिशय आदरपूर्वक पेश केल्या आहेत.
‘राम-लीला’ हा चित्रपट मी माझ्या आईसाठी बनवला आहे, हे मी अभिमानाने सांगतो. माझ्या आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच मी माझ्या नावासोबत तिचे (लीला) नाव लावतो. त्यामुळे मी स्वत:ला खूप नशीबवान समजतो. आता सर्व सरकारी कागदपत्रांमध्ये आईचे नाव लावणे अनिवार्य आहे; परंतु मी गेल्या 22-23 वर्षांपासून आईचे नाव लावतोय, याचा माझ्या आईलाही अभिमान आहे. मी पहिली टीव्ही मालिका बनवली, तिचे कथानकही आईवर नितांत प्रेम करणाऱ्या मुलाचे होतेे. तोसुद्धा आपल्या नावासोबत आईचे नाव लावतो- ‘सरस्वती चंद्र’.
खरं तर अगदी प्राचीन काळापासून आपण पाहिलं तर प्रत्येक कालखंडात स्त्रियांनी नवनिर्माणात सक्रिय योगदान दिलेलं आहे. वैदिक काळात आर्यावर्तसारख्या महान राष्ट्राच्या निर्माणात गार्गी, मैत्रेयी, अरुंधती यांसारख्या दूरदर्शी स्त्रियांनी निश्चितच महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. पौराणिक कथांमध्येही स्त्रियांच्या गौरवगाथा येतात. उदा. दशरथ राजा जेव्हा युद्धभूमीवर निघाला तेव्हा कैकयीने त्याचे सारथ्य केले होते. युद्ध सुरू असताना रथाचे चाक निखळले तेव्हा आपल्या हाताच्या बोटावर तिने चाक ताेलून धरले व दशरथाला युद्धात विजयी केले.
मध्ययुगीन काळातील रजिया सुलतान, अहिल्याबाई, चांद बीबी, झाशीची राणी लक्ष्मीबाई, सरोजिनी नायडू, अरुणा असफ अली, विजया लक्ष्मी पंडित अशा कितीतरी स्त्रियांची नावे घेता येतील… ‘आझाद हिंद फौजे’मध्ये स्त्रियांच्या पलटणीचे नेतृत्व करणाऱ्या कॅप्टन लक्ष्मी सहगल यांच्यासारख्या क्रांतिकारकांना मदत करणाऱ्या स्त्रियांची लांबलचक यादी होईल. त्यांनी स्वत:चे जीवन राष्ट्र आणि मानवतेसाठी वाहून घेतलेच, शिवाय स्वतंत्र भारताच्या निर्माणासाठी आपले सर्वस्व समर्पित केले.
भारताच्या प्रगतीमध्ये पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबरोबरच पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील आणि पहिल्या महिला आयपीएस किरण बेदी यांचे याेगदानही संस्मरणीय आहे. देशाच्या सर्वांगीण विकासात महत्त्वपूर्ण भागीदारी नोंदवणाऱ्या या ज्ञात-अज्ञात स्त्रियांविषयी कृतज्ञता व्यक्त करताना आजच्या स्त्रियांची स्थिती समाधानकारक आहे का? असा प्रश्न मनात येतो. स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनंतरही एकविसाव्या शतकातील स्त्रियांप्रती समाजाची वर्तणूक फारशी बदललेली दिसत नाही, असेच खेदाने म्हणावे लागते. सकारात्मक बदल निश्चितच होताहेत, पण ते सर्वदूर नाहीत. पुरुषांच्या इतक्याच सक्षम असलेल्या स्त्रियांना आजही खऱ्या अर्थाने आर्थिक व सामाजिक स्वातंत्र्य मिळालेले नाही, असे मला वाटते!

मी रवींद्र ‘रुक्मिणी’ पंढरीनाथ …
चळवळीच्या सुरुवातीच्या दिवसांविषयी रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ सांगतात, ‘प्रा. वसंत राधा हरी यांनी आडनावांवर पीएच.डी. करून आडनाव ही कालबाह्य बाब असल्याचे सप्रमाण सिद्ध केले. तेव्हा आडनाव काढायचे आणि आईचे नाव लावायचे, हा विचार मोहन हिराबाई हिरालाल यांनी रुजवला. आडनाव जात दाखवते आणि स्त्री-पुरुष समानतेच्या आड येते, असे आमचे स्पष्ट मत होते. आमचे नाव ऐकून लोकांना गंमत वाटायची. अशाने जात जाईल का, असा प्रश्न विचारला जायचा. आमचे म्हणणे स्पष्ट होते, ते असं की समाजात प्रतीकांना जेवढे महत्त्व असते, त्याच दृष्टीने आम्ही या बदलाकडे पाहतो.’
‘सुरुवातीच्या दिवसांत आम्हाला विरोध झाला. पासपोर्ट काढताना अडचणी आल्या. मतदार ओळखपत्र आजही धड छापले जात नाही. सरकारी कर्मचारी लोकांचे नाव स्वत:हून बदलतात. नाव बदलण्याचा विचार लोकांना पटला नाही. आता अनेक नावे बदललेली जाणवतात. मनस्विनीचे नाव मनस्विनी लता रवींद्र असे ठेवले. सज्ञान झाल्यानंतर तिला आवडेल ते नाव लावण्याचे स्वातंत्र्य आम्ही मनोमन मानले होते. मुली हल्ली माहेरचे आणि सासरचे आडनाव लावतात; पण यामुळे अनेक गुंते निर्माण झाल्याचे दिसते.
पूर्वी वडिलांचे नाव लावण्याची पद्धत होती. आडनाव लावण्याची पद्धत ब्रिटिशांनी रुजवली. मी नाव बदलून चाळीस वर्षे झाली, तरी अडचणी संपलेल्या नाहीत. न्यायालयाच्या आदेशामुळे दहावी व बारावीच्या प्रमाणपत्रावर आईचे नाव प्रसिद्ध केले जाते; पण शाळेच्या दाखल्यावर किंवा इतरत्र कोठेही आईच्या नावाला सन्मान मिळण्यासाठी न्यायालयीन लढ्याशिवाय पर्याय नाही,’ असे मत रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ व्यक्त करतात.

मी मनस्विनी ‘लता’ रवींद्र…
‘आई-बाबा स्त्री चळवळीशी जोडलेले होते. मराठी शाळेत शिकताना मनस्विनी लता रवींद्र या नावाने वावरणे अवघड होते. तुझे नाव असे का, असे विचारले जायचे किंवा आडनाव शोधून काढले जायचे. नाव बदलणे तेव्हा अधिक प्रतिमादर्शक होते. या कृतीमुळे स्त्री-पुरुष समानता येणार किंवा जात जाणार हे आदर्शवत वाटावे, असे विचार जागृत व्हायचे. प्रत्यक्षात बदल किती झाला किंवा किती होतो, हा भाग निराळा असला, तरी लहानात लहान कृती म्हणून या विचाराचे महत्त्व आहेच,’ याकडे तरुण लेखिका मनस्विनीने लक्ष वेधले. ‘अपत्याला आई-वडील दोघेही वाढवतात. मग नावात दोघांचा उल्लेख असायला काय हरकत आहे,’ असा प्रश्न तिने केला.’आपल्याला मित्र-मैत्रिणींचे बाबा माहीत असतात; पण आईचे नाव माहीत नसते. अपत्याला वाढविताना आई महत्त्वाची असते; पण तिला तिचे सामाजिक स्थान मिळत नाही. आई अमुक अशीच हवी, अशा प्रतिमेमध्ये आपण ‘आई’ या व्यक्तीला बसवले आहे. ती नेहमी शांत, पाठिशी उभी राहणारी, खायला घालणारी वगैरे अशी असते. हक्कासाठी भांडणारी आई वास्तवात असते; पण ती प्रतिमेत नको असते,’ असे निरीक्षण मनस्विनी नोंदवते.
मी उत्पल व. बा….
‘मूल ही स्त्री व पुरुष यांची एकत्रित निर्मिती आहे, हे सत्य जगताना का नाकारायचे? आईला तिचे स्थान असलेच पाहिजे; पण आपल्याकडे तसे होताना दिसत नाही. आईचे नाव लावतो, तेव्हा दोन गोष्टी साध्य झाल्याचे मी तरी सांगू शकतो. एकतर आईच्या उल्लेखामुळे मला कमालीचे समाधान मिळते आणि चांगला विचार पुढे येतो, याचा आनंद होतो. सार्वजनिक जीवनात वडिलांचेच नाव झळकत असते. आईचे माहात्म्य मान्य असते; पण मान्यता नसते. त्यात पुन्हा आडनाव काढले, की लोक गोंधळतात. आडनाव काढणे जातीला आव्हान दिल्यासारखे आहे,’ असा विचार लेखक उत्पल वनिता बाबुराव यांनी मांडला.

आईचे नाव सहजपणे पुढे येत नाही, म्हणून ‘आई’ या प्रतिमेला इतर माध्यमातून अधिक रंगवले जाते का,’ या प्रश्नावर ते म्हणतात, ‘आईचे नाव वापरण्यात सहजता नसल्यामुळे अधिक उदात्तीकरण होते का, हे तपासून पाहिले पाहिजे. आईशी नाते हळवे असते हे खरे आहे; पण हेच नाते सार्वजनिक ठिकाणी नाकारले जाते; म्हणून ते इतर माध्यमांतून व्यक्त होते, असे म्हणायला निश्चितच जागा आहे. प्रत्येकजण आईचे नाव लावू लागल्यास ‘आई’ या प्रतिमेची धार कमी होईल. वेगळे स्थान अधोरेखित करण्याची गरज वाटणार नाही. आई म्हटले की लगेच हात जोडणे, डोळ्यातून पाणी काढणे, असे प्रकार कदाचित कमी होतील. स्त्री-पुरुष समतेचा विचार करताना कोणा एकाचे उदात्तीकरण अपेक्षित नाही. पुरुष कर्ता, तर स्त्री दुय्यम हे टाळण्यासाठी समतेची चळवळ आहे. कुणा एकाला मोठे करण्यासाठी नाही.’
मी वैभव छाया…
व्यक्तीला नाव मिळणं, हा अपघातच असतो. जन्मदाते किंवा पालक आपल्या मुलाचं-पाल्याचं नाव ठरवतात. त्या अपत्याची ओळख अन् अस्तित्व ठरवण्याची पहिली पायरीसुद्धा त्यांच्याच निर्णयप्रक्रियेचा भाग असतो. नाव लावणं, नाव काढणं, नाव राखणं हा मुद्दा भारतासारख्या पुरुषप्रधान व्यवस्था जोपासणाऱ्या देशात मात्र प्रतिष्ठेचा, सरंजामी वागण्याचे प्रतीक बनून आहे. अशा स्थितीत आईचं नाव लावणं, त्यातही फक्त आईचंच नाव लावून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न दिसतो तितका निश्चितच सोपा नसतो. माझ्यासाठीही हे सोपं नव्हतं.
ठाणे जिल्ह्यातलं विठ्ठलवाडी हे छोटंसं गाव, जिथं माझं बालपण गेलं. विठ्ठलवाडी नकाशावर शोधूनदेखील मिळणार नाही, असं होतं गेल्या दशकभरापर्यंत. अनेक छोटी गावं, गाववाले, दारूवाले, मुंबई-ठाणे-पुण्यातून तडीपार केलेल्या अनेक लोकांच्या बळकावलेल्या जमिनींतून बनलेलं हे छोटंसं नगर. तरी जिद्दीनं उभं राहिलेलं. बेडार, वडार, कैकाडींपासून अनेकविध जातसमूहांच्या अघोषित सेपरेट सेटलमेंटच्या वातावरणात, पाण्यासाठीची भांडणं, चांगल्या शाळांची वानवा, अपुऱ्या सोयीसुविधा, शासकीय अनास्था अन् दुर्लक्षित दृष्टिकोनातच एक प्रकारचं जगणं घडत गेलं. आजूबाजूला शिक्षणाचा वारसा दिसेल, असं वातावरण अभावानेच आढळून येई. कदाचित या वातावरणातूनच जाणिवा जागृत झाल्या अन् ओघानं त्याचा परिणाम नेणिवेत झाला.
आंबेडकरी विचारधारेचा मी केलेला स्वीकार, हा काही माझ्यावर कुणी केलेला अथवा वारसाहक्काने आलेला संस्कार नव्हता. लहानपणापासूनच आंबेडकरी साहित्य वाचनाची गोडी माझ्यात रुळू लागली होती. आंबेडकर नावाचं व्यक्तिमत्त्व, त्यांची विद्वत्ता, त्यांचं कार्य मला प्रचंड आकर्षित करत असे. समग्र आंबेडकर अभ्यासत असताना हिंदू कोड बिल वाचनात आलं. त्याच वेळेस बाबासाहेबांनी लिहिलेलं इतर स्त्री-विषयक साहित्यसुद्धा वाचलं आणि मनात काहूर सुरू झालं.
स्त्रियांच्या एकूण जगण्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन पार बदलून गेला. या संदर्भातील माझं पहिलं निरीक्षण होतं ते माझ्या आईवरचं. आजपर्यंत एका रोमँटिसिझमच्या अँगलमधून आईकडे पाहणारा मी आता आईकडे व्यक्ती म्हणून पाहू लागलो. परित्यक्ता गटात मोडणारी आई नेमकी कशी जगतेय, याचा विचार आता माझ्या मनात सतत घोळू लागला. यातूनच तिच्याबद्दलचं आणि पूर्ण स्त्री-वर्गाबद्दल असलेलं माझं मत क्रमाक्रमाने प्रगल्भ होत गेलं. माझ्या आजवरच्या जगण्यात, मला वाढवण्यात, माझं शिक्षण, करिअर घडण्यात केवळ आणि केवळ आईचाच सहभाग होता. त्यामुळे तिच्याबद्दल माझी असलेली कृतज्ञतेची भावना म्हणून मी माझं नाव बदलण्याचा निर्णय घेतला. यात कुणाचा दुस्वास करण्याचा हेतू नव्हता मुळीच कधी माझा. हा निर्णय घेतला 2010 मध्ये. मी पत्रकारितेच्या शेवटच्या वर्षाला शिकत होतो. आणि तेथूनच सुरू झाला आयडेंटिटी क्रायसिसचा इश्यू.

नाव बदलणं, बदललेलं नाव घरातल्या सदस्यांना सांगणं, आणि त्यानंतर ते जाहीर करणं हे फार जिकिरीचं होतं. सर्वात आधी आईला सांगितलं. आईनं जेव्हा पहिल्यांदा ऐकलं, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर असलेला आश्चर्याचा भाव हा मला मी कोणता तरी मोठा गुन्हाच केलाय, अशी भावना देऊन गेला. तरी मी माझ्या मतावर ठाम राहिलो. मी ज्या परिसरात वाढलो, ज्यांच्यासोबत वाढलो, त्यांनाही हे अनपेक्षित होतं. बापाचं नाव काढून फक्त आईचं नाव लावण्याच्या माझ्या कृतीवर अनेकांनी घाणेरडी शेरेबाजीही केली. मी शांत राहिलो. घरातल्या अनेकांनी या निर्णयावर ना नीट सहमती दर्शवली ना विरोध.
नेमकं हे काय होतंय, हे कुणालाही नीट कळलं नाही. परंतु तू असं बापाचं नाव काढायला नको, तेपण ठेव, असा अनाहूत सल्ला दिला गेला. एका नातेवाइकांकडे गेलो असता त्यांनी कपाळालाच हात लावला, ‘बापाचं नाव लावत नाहीस तू, तुझ्या आईकडे लोक संशयाने पाहतील ना.’ मी म्हणालो, ‘पाहू दे.’ त्यानंतर बरेच दिवस असले प्रश्न कानावर पडत होते. एका एनजीओधारी समाजसुधारकाने माझ्या नावावर मला प्रश्न विचारताना मी रेड लाइट एरियामधला तर नाही ना, याचीसुद्धा खातरजमा करून घेतली. त्यावर उत्तर देताना म्हटलं, बापाचं नाव न लावणारी सगळीच मुलं रेड लाइट एरियातली नसतात हो. जोपर्यंत मी पूर्णवेळ शिक्षण घेत होतो तोपर्यंत तर हे ठीक होतं. जसजसं माझा सामाजिक परिघातील राबता वाढायला लागला, तसतसं माझ्यावर मी जात लपवतो, म्हणून आरोप झाला. आरोप होण्याचं कारण माझं आडनाव न लावणं सांगितलं गेलं.
दलित पँथरच्या एका ज्येष्ठ नेत्यानं मी वॉरियर सरनेम काढून टाकलं, म्हणून मला बामणी म्हणून हिणवलं. मी वरील सर्व प्रसंगात अतिशय शांत राहिलो. सर्वांचा विरोध, आरोप शांतपणे ऐकून घेत राहिलो. कारण एकतर ती वेळ त्यांना उत्तरे देण्याची नव्हती आणि मी दिलेल्या उत्तराने त्यांचे समाधान होईल इतकी बौद्धिक कुवत तरी आरोपकर्त्यांकडे होती का, याबद्दल मी साशंक होतो. पण हळूहळू मी करत असलेल्या कामामुळे, लेखनामुळे हे आरोप मागे पडले. ‘वैभव छाया’ हे नाव लावून वावरताना, जगताना आता ते कोणत्याही फुकट आरोपांना बळी पडेनासे झाले आहे. मुळात आडनावांची गरजच काय असावी, हा माझा मला पडलेला मूलभूत प्रश्न होता. आडनावे जात अधोरेखित करतात.
मी आडनाव काढलं, आईचं नावं लावलं म्हणून मी माझी राजकीय मतं बदलली, असा अर्थ तर होत नाही. नाव बदलण्याआधीही आंबेडकरी विचारधारेचाच पाईक होतो आणि नंतरही. फक्त जन्मदात्या पुरुषाचं नाव मिरवणं, ही समाजात अतोनात खोलवर रुजलेली पितृसत्ताक पद्धती पुन्हा एकदा अधोरेखित करतात. मग या जात-वर्ग-लिंगाच्या चिलखतींना मुळापासून उखडून काढण्याचे प्रयत्न किमान आपण वैयक्तिक पातळीवर तरी सुरू करायला हवेत. या विचाराने माझ्या मेंदूत घोळ घालायला सुरुवात केली. आणि त्यातूनच नाव बदलण्याचा निर्णय अमलात आला.
बरं वाटतंय, माझी ओळख माझ्या आईच्या नावानं होतेय. माझ्यासाठी समानता हा केंद्रबिंदू आहे जगण्याचा. नाव बदलणं ही प्रक्रिया त्रासदायकच असते. कारण आपण नुसतं नाव बदलत नसतो तर आपली ओळख नव्याने लिहीत असतो. आपल्याला हवी तशी. आणि त्याच वेळेस दुसऱ्या बाजूला आपल्या आईसमोर जातीयवादी व्यवस्थेने उपस्थित केलेल्या प्रश्नांना सामोरे जाण्याची हिंमतसुद्धा बाळगायची असते. ऑल इन ऑल बरंच काही बदलता येतं. फक्त आपली बदलण्याची तयारी असायला हवी.






