रोग बरा होत नाही म्हणून सामान्य माणूस ‘आशावादी’ बनतो की, कुणीतरी रोग बरा करणारा भेटावा…..
आणि जर एखादा जादूगार भेटला आणि त्याने जादू दाखविली आणि वर सांगितले की, या जादूने मी रोग बरा करेन तर सामान्य माणसांची झुंड तिकडे दौडू लागते. पुण्याजवळील टोमॅटो महाराज याचे उत्तम उदाहरण आहे. याहूनही उत्तम उदाहरण आता संपूर्ण भारतात धुमाकूळ घालते आहे. त्याचे नाव आहे.
“मिडब्रेन ॲक्टीव्हेशन” किंवा एम.बी.ए.
टोमॅटो बाबा उघडा पाडणे सोपे आहे. पण विज्ञानाची परिभाषा वापरून समाजात सुटा-बुटातल्या बुवांच्या झुंडीच्या झुंडी जर घुसल्या तर त्याचे काय परिणाम होतात ते मिडब्रेन ॲक्टीव्हेशनच्या बुवाबाजीने दाखवून द्यायला सुरवात केली आहे. आणि विज्ञानाची झुल पांघरून ही बुवाबाजी व्यापारी पद्धतीने पसरू लागल्याने ती धोकादायक बनली आहे.

एमबीए काय प्रकार आहे?
वय वर्षे 5 ते 12 वयोगटांतील मुले या एमबीएची सावज आहेत. आणि या मुलांच्या पालकांची शिकार केली जात आहे. या वयोगटातील मुलांच्या डोक्यातील मध्यमेंदूस वेगवान चालना देतो असे सांगायचे. यासाठी दोन दिवसांचे ट्रेनिंग प्रोग्रॅम आम्ही घेतो असे जाहीर करायचे. आणि मग तुमचा मुलगा तिसऱ्या दिवसापासून ‘सुपर जिनियस’ ‘महाबुद्धिमान’ होतो असे सांगायचे. यासाठी पालकांच्या मनातील इच्छांचा खुबीने वापर करून घेतला जातो.
प्रत्येक आई-बाबास आपले पोर हुशार निपजावे आणि जगात चमकदार कामगिरी करून दाखवावे असे मनोमन वाटत असते. मुलाने हुशारी दाखवावी, आजच्या स्पर्धेच्या जगात पाय रोवून टिकावे आणि यशस्वी व्हावे यासाठी आपण इच्छा बाळगणे गैर नाही. पण ही इच्छा जर आपण एखाद्या अवैज्ञानिक आणि निव्वळ भ्रामक कल्पनांच्या नादी लागून पुरी करण्यास जाऊ लागलो तर मात्र आपण कधी फसलो गेलो हे देखील ध्यानात येणार नाही. भारतभर आणि जगभर देखील अशीच एमबीएची सेंटर्स चालू झाली आहेत.
जाहिरातबाजी सुरू आहे की,
“एमबीए म्हणजे उजव्या व डाव्या मेंदूच्यामधील मेंदू. म्हणजे दोन्हीच्या मधला पूल. या पुलाला धडधाकट केले की, दोन्ही बाजूचे मेंदू एकत्रितरित्या उत्तम कार्य करतात. म्हणजे माहिती सहज गोळा होते. शिकणे वेगाने घडते. आणि मुले एका बाजूचाच ब्रेन वापरतात त्याऐवजी संपूर्ण मेंदू वापरू लागतात. त्यामुळे मुलांमध्ये नवनवीन संकल्पना निर्माण करण्याची क्षमता अवतरते. अभ्यासाचे सारे काही सहज लक्षात ठेवता येते, स्मृती वाढते. कसे, कुठे, काय, करायचे त्याचे कौशल्य वाढते. आत्मविश्वास जबरदस्त होतो. कोणत्याही कार्यात एकाग्रता वाढविता येते. एमबीएमुळे आपल्याला प्रत्येक मुलाच्या मेंदूत जे दडलेले असते ते बाहेर काढता येते.”
जाहिरात पुढे असाही दावा करते…..
‘खालील गोष्टी एमबीए वाढवते : ‘स्मृती, एकाग्रता, आत्मविश्वास, चित्रमय स्मृती, भावना, चटकन ओळखण्याची क्षमता, सर्जनशीलता, क्रिडा कौशल्ये व क्षमता, सहावे इंद्रिय (?), शहाणा विचार करण्याची क्षमता, भावनिक बुद्ध्यांक, उजवा व डावा मेंदू यांचा समतोल साधणे, अजागृतावस्थेतील मनःशक्ती, मुले पूर्ण स्वावलंबी होणे.
पुढील गोष्टी एमबीए कमी करते : टी.व्ही. बघणे, मोबाईलवर गेम्स खेळणे, इंटरनेटवर गेम्स खेळणे.
डोळे बंद करून आपली मुले पुढील गोष्टी करू लागतात: रंग ओळखतात, नंबर वाचतात, आकार सांगतात. वृत्तपत्रे वाचतात, 7 मिनिटांत पुस्तके वाचतात. नोटेवरील नंबर वाचतात, गणिते सोडवितात, चित्रे काढतात, सायकल चालवितात, चालतात, अडथळ्याची शर्यत पार पाडतात. “
हे सर्व जाहिरातीत आलेच. पण त्याचबरोबर लोकांना पटावे म्हणून ‘मार्केटिंगचा’ नेहमीचा फंडा वापरला आहे. मोठ-मोठ्या वैज्ञानिकांचे, सायकॉलॉजिस्टचे विचार या जाहिरातीत पेरले आहेत. चक्क आईन्स्टाईनचाही फोटो लावला आहे. आईन्स्टाईनचा खरे तर मिडब्रेन ॲक्टीव्हेशनशी काही संबंध नाही.
जॉन हॅजेलीन या अमेरिकन वैज्ञानिकाचे मत मांडले आहे की, “मेंदूचा फक्त 5% वापर होतो.” हे जॉन हॅजेलीन महर्षी महेश योगी या बुवाचे भक्त आहेत. आणि त्यांचे 5% वगैरे सारे झूट आहे. थॉमस् बुडझिनस्की या बायोफिडबॅक तंत्राचा शोध लावलेल्या अमेरिकन सायकॉलॉजिस्टचे विचार मांडले आहेत. वास्तविक बायोफिडबॅक आणि एमबीएचा थेट संबंध काहीच नाही. आणि बायोफिडबॅक हे मानसिक रोगावर उपचार करण्याचे एक तंत्र आहे ज्याविषयी मतभिन्नता आहे. याचा अर्थ ते जे वैज्ञानिकांचे पुरावे देतात त्यांना आधार नाही.
विशेष असे की, या वैज्ञानिकांचे सोडाच, साधी मेंदूची रचना याविषयी संयोजकांना विचारले तर त्याची उत्तरे त्यांना देता येत नाहीत. असे एमबीएचे प्रकार करणाऱ्या प्रतिनिधींवर जेव्हा मेंदूच्या रचनेविषयीचा मारा केला तेव्हा त्यांना काहीही माहीती नाही हे आढळले आहे.
मिडब्रेन किंवा मध्यमेंदू हा मेंदूतील अतिशय छोटा भाग आहे. जवळपास दीड सेंटीमिटर. याला वैद्यकीय भाषेत म्हणतात मेसेनसेफेलाॅन. डोळ्याच्या हालचाली व ऐकण्याची संस्था यांच्यावर नियंत्रण ठेवणे हे एक कार्य ते करते. या मध्यमेंदूत लाल केंद्रक नावाचा भाग असतो जो शरीराच्या हालचालीवर नियंत्रण ठेवतो. दुसरा एक भाग जो आहे तो खराब झाला तर पार्कीनसन्स नावाचा रोग होतो व काही सिंड्रोम होतात. जागृत अवस्था निर्माण करण्यात, झोपेच्या चक्रात तो मदत करतो. याशिवाय मध्यमेंदूचे अन्य कार्य कोणते नसते. म्हणजे मुलांमध्ये ‘जीनियसपणा’ निर्माण करण्याजोगे काही नसते.

एमबीएने मात्र अत्यंत हुशारीने या मध्यमेंदू आणि उजव्या बाजूचा मेंदू यांची सांगड घालून स्वतचे विज्ञान तयार केले आहे.
महत्त्वाचे हे की मिडब्रेन वाल्यांचा मिडब्रेन म्हणजे उजव्या आणि डाव्या मेंदूच्या अर्ध्या भागाच्या मध्ये असलेला भाग आहे. पण विज्ञानानुसार मिड ब्रेन किंवा मध्यमेंदू हा मेंदूच्या देठांमध्ये असतो. या देठामध्ये हा एक छोटासा भाग असतो.
उजवा आणि डावा मेंदू यामध्ये जोडलेला जो भाग असतो त्याला काॅर्पस कॅलोजम म्हणतात. म्हणजे नेमका कोणता भाग ते उद्दीपित करतात हे त्यांचे त्यांनाच कळत नाही. म्हणजे तो सांगतात तो मिड ब्रेन अवैज्ञानिक आहे. किंवा त्यांनी “काॅर्पस कॅलोजम ॲक्टीव्हेशन” असे नाव वापरायला हवे! विज्ञानात त्याला थारा नाही. त्यामुळे तुमची मुले हुशार वगैरे होण्याचा प्रश्नच नाही.
सामान्य लोकांना हेच विज्ञान खरे वाटते आणि फ्रँचाईजी घेतलेले हजारो एमबीएचे दलाल हेच विज्ञान पोपटासारखे बडबडत फिरत असतात. या एमबीएच्या तथाकथित ब्रेन विज्ञानाची मुळे सापडतात ती डॉ.माकोटो शिचिदा नावाच्या जपानमधील एका व्यक्तीच्या भंपक विज्ञानात. त्याची बिनबुडाची विज्ञानकाव्ये पुढीलप्रमाणे-
- जगातील 80% लोकांचा डावा मेंदू जास्त विकसित झाला आहे. उजवा नाही.
- उजवा मेंदू हाच जास्त महत्वाचा मानावा.
- डाव्या प्रमाणेच उजव्या बाजूच्या मेंदूत 5 इंद्रिये असतात.
- उजव्या मेंदूतून निर्माण होणाऱ्या लहरी प्रतिमा तयार करते.
- अतिंद्रिय संवेदन हे उजव्या मेंदूतून येते. म्हणजे आपल्या इंद्रियापलिकडे असलेल्या गोष्टीचे जाणणे. इंग्रजीत त्याला एक्स्ट्रा सेंसरी परसेप्शन म्हणतात.
- ‘शिचिदाची अवस्था’ नावाची एक अवस्था मेंदूत असते. विश्वातील सर्व अणूरेणूत एक नाद असतो. हा नाद डाव्या मेंदूस कळतच नाही. मात्र उजव्या मेंदूस कळतो. म्हणून उजवा मेंदू जर प्रशिक्षण देऊन आणि ध्यानधारणा करून ‘प्रज्वलित’ केला तर तो या नादमय अणूरेणूंशी तादात्म्य पावतो. (ट्यून होतो). आणि हे टेलिपथी (दूरचे संवेदन) किंवा अतिंद्रिय ज्ञानप्राप्ती (क्लेरव्हाॅयन्स) ने कळते.
- वयाच्या 6 व्या वर्षापर्यंत मुलांचा उजवा मेंदू प्रभावी असतो. त्यानंतर डावा प्रभावी होतो. हेच मुलांना घातक ठरते (!) म्हणूनच उजवा मेंदू सतत उद्दिपीत करत राहिल्यास मुलांची प्रगती होते. त्यासाठी 50 चित्रे असलेले मोठे पेपरशीट मुलांना दाखवायचे. ही पद्धत शिचिरा ॲकॅडेमिक सेंटरमध्ये वापरतात. यामुळे प्रत्यक्ष पाहून अनेक गोष्टी जास्त काळ लक्षात ठेवता येतात ज्यास फोटोग्राफिक मेमरी म्हणतात.
- एकदम चमकणारी चित्रे (flash Images) दाखविली तर ती उजव्या मेंदूस चटकन पकडता येतात. हाही एक व्यायाम आहे. चित्रांची कार्डे दाखविणे, ध्यानधारणा करणे आणि श्वासोच्छवासावर नियंत्रण ठेवण्यास शिकणे या पद्धती देखील शिचिदा सांगतात.
माकौटो शिचिदा हा माणूस स्वतःस घोषित वैज्ञानिक समजत असला तरी वरील दावे (व असेच अनेक त्याचे दावे आहेत ते) सारे फसव्या विज्ञानात मोडतात. मानसविज्ञान (Psychology), मेंदू विज्ञान (न्यूरोलॉजी) या विज्ञानांचा कोणताही आधार माकोटो शिचिदाच्या दाव्यांना नाही. त्याचबरोबर त्यांनी केलेल्या दाव्यांचे कोणतेही संशोधन, प्रयोग व सिद्धता त्यांनी दिलेली नाही. याच माकोटो शिचिदांनी स्वतः पुस्तके लिहिली आहेत. त्यापैकी ‘उजवा मेंदू विकसित करणारी शिचिदा पद्धत’ आणि ‘शिचिदाच्या 36 पद्धती’ ही दोन पुस्तके. जपानमध्ये जास्त गाजली.
याच माकोटो शिचिदांनी फसव्या विज्ञानाचा दिवा पेटवला आणि भारतात आता सर्वत्र दिवे पेटू लागले आहेत! हे दिवे अंधश्रद्धांचा प्रकाश पाडून भारतास उजळावयास निघाले आहेत. त्यापैकी व्यापारात अग्रेसर असलेल्या गुजरातमध्ये मोठमोठी नावे घेऊन डॉ. माकाटो शिचिदांच्या मिडब्रेन ॲक्टीव्हेशन तंत्राचा व्यापार अनेकांनी सुरू केला आहे. हा व्यापार मिडब्रेनच्या नावाखाली कसा केला जातो त्याची एक झलक बघू या.
- शिचिदा पद्धत ज्यांना हवी आहे त्यांच्यासाठी डॉ.मोकोटो शिचिदांकडून लायसन घ्यावे लागेल.
- आमची उत्पादने दोन आहेत – ‘तुमचे बुद्धिमान बाळ’, ‘तुमची बुद्धिमान मुले’
- धंदा करण्याची उत्तम संधी. फ्रँचाइजी घ्या. भरपूर कमवा.
- स्पर्धा नसलेल्या धंद्यात आत्ताच उतरण्याची उत्तम संधी.
- कधीही मंदी न येणारा हा धंदा.
- फक्त 200 ते 300 स्क्वेअर फूटच्या जागेत धंदा चालू करा. विद्यार्थ्यांना गिऱ्हाईके बनवा. कंपनीकडून सर्व प्रकारचे प्रशिक्षण मिळेल.
- प्रत्येक व्यक्ती तुमची गिऱ्हाईक आहे आणि प्रत्येक घर तुमच्या व्यवसायाचा केंद्रबिंदू आहे.

फ्रँचायजीसाठी वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळे दर आहेत. 5 लाखांपासून 75 लाखांपर्यंत गुंतवणूक केल्यास हमखास पैसा मिळेल अशी खात्री दिली जाते. यात मल्टीलेव्हल मार्केटिंग तंत्र वापरणारेही बरेच जण आहेत. त्याचबरोबर 25-35% प्रत्येक गिन्हाईकामागे (म्हणजे मुलामागे) कट प्रॅक्टीस पण आहे. म्हणजे तेवढे टक्के रक्कम मूळ कंपनीस वळती करावी लागते. धंदा करणाऱ्यांना या मिडब्रेनची भुरळ पडते आहे. त्यामुळे दे दणादण शाखा सर्व देशभर चालू झाल्या आहेत. यावर ‘ना सरकारचे नियंत्रण आहे ना लक्ष’!
या धंद्यास ते ‘एज्युकेशन एनरिचमेंट इंडस्ट्री’ म्हणतात. याचाच अर्थ शैक्षणिक समृद्धी उद्योग या गोंडस नावाखाली लुटालूट राजरोसपणे चालू आहे. आणि यासाठी बिझनेस मॅनेजमेंटची सर्व तंत्रे वापरली जात आहेत. म्हणजे ‘प्रोफेशनल टीम’, ‘काऊंसेलर्स’, ‘आर अँड डी डिपार्टमेंट’, ‘ॲडव्हर्टायझिंग ब्युरो’ या साऱ्या तंत्रांची मस्त रेलचेल या एमबीए धंद्यात आहे. ‘फ्रँचायझी किंवा शाखा कुणीही काढू शकतो’ हा आणखी एक मोठा विनोद आहे.
विद्यार्थ्यांच्या मानसिकतेशी खेळणाऱ्या या बिनडोकांना हे एक्सपर्ट सरकार उघड्या डोळ्यांनी कसे काय पहात बसले आहे? हा मानसिक आरोग्याशी चाललेला जीवघेणा खेळ आहे. तो रोखण्यासाठी सरकारने कायदेशीर कार्यवाही करायला नको काय?
भारतात अशा अनेक कंपन्या आघाडीवर आहेत. या सर्व कंपन्यांची एमबीएचा प्रचार करण्याची समान पद्धत आहे. ती अशी-
- एमबीएच्या जाहिराती वाटायच्या. त्यात ‘सुपरकीड’ बनविण्याचा दावा. त्यासाठी डोळ्यावर पट्टी बांधून देखील तुमची मुले काहीही करून दाखवतील अशी भुरळ.
- प्रत्येक शहरात एक दिवसाचे मोफत शिबीर. त्यात कंपनीचा प्रतिनिधी येऊन डोळ्यावर पट्टी बांधून सर्व ‘चमत्कार’ करून दाखवितो. मग आवाहन करतो की, मुलांना ट्रेनिंग देण्यासाठी आमची टीम येईल. त्यासाठी नाव नोंदवा.
कमीत कमी 20 जणांची नावे तरी नोंदविली जायला हवीत. प्रत्येकाकडून 5 हजार पासून 25 हजारपर्यंची फी आकारली जाते.
एमबीए शिकविणाऱ्या गुरूजींची टीम मग दोन दिवस येते. आणि डोळ्यावर पट्टी बांधून कसे बघायचे ही “जादू” शिकवून जाते. मोठमोठ्या टी.व्ही.चॅनेल्सवरून या एमबीएचा बिनदिक्कतपणे प्रचार केला जातो. हे वैज्ञानिक आहे असे आवर्जून खोटे सांगितले जाते. आणि तपासण्यास नकार दिला जातो. काही कार्यक्रमात तर जादूगार, कॉलेज- शाळांचे प्रिन्सिपॉल-हेडमास्तर, शिक्षणतज्ञ यांना बसवून त्यांच्याकडूनही ‘वाह व्वा’ मिळविण्याचे ढोंग केले जाते.
मुलांचा आयक्यू आणि ईक्यू म्हणजे बुद्ध्यांक आणि भावनांक दोन्हीही वाढतो असे मिड ब्रेन वाल्यांचे दावे हे बिनबुडाचे आहेत. कारण बुद्धीमत्ता आणि भावना या दोन्ही गोष्टी निर्माण होणे, टिकणे आणि वाढणे या प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीच्या आणि मुलांच्या वाढीच्या काळात होणाऱ्या विविध परिणामांचे घटक असतात. डोळे बांधले आणि वाचायला शिकले म्हणजे बुद्ध्यांक वाढतो ही भोळसट कल्पना आहे.
वास्तवात डोळ्यांना व्यवस्थित दिसून जर वाचता येत असेल तर डोळे बांधून वाचण्यात मेंदूची क्षमता कशी वाढेल? मुळात न पाहता वाचणे याला काही अर्थच नाही. मग डोळ्यांचा उपयोग काय? शिवाय डोळे बंद करून वाचले म्हणजे मेंदूची क्षमता वाढते असे म्हणणे म्हणजे रोग नाकाला आणि उपाय पायाला असा प्रकार आहे.
शिचिदा ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये “कॉग्नेटिव्ह ॲबिलिटी”, “न्युरोसायन्स” वगैरे शब्द वापरून असे सांगितले जाते की हे सर्व विज्ञानात सिद्ध झाले आहे. वास्तवात अशी सिद्धता विज्ञानात झालेली नाही. आपला मेंदू फक्त तीन टक्के एकूण मेंदूतील कौशल्यांचा वापर करतो असे अवैज्ञानिक तथ्यही सांगितले जाते. वास्तवात असे काही नाही.
काही वेळा उजवा ब्रेन किंवा मेंदूला ट्रेनिंग देऊन उजव्या बाजूची कौशल्ये वाढवता येतात असे बिनदिक्कतपणे सांगितले जाते. आणि नंतर होल ब्रेन किंवा सगळा ब्रेन सुद्धा ट्रेन करता येतो असेही ठोकून दिले जाते! असं उजवं किंवा डावं शिकवणं हे हास्यास्पद आहे.
भारतामध्ये या मिडब्रेनचा वापर हुशारीने इथले संस्कृती रक्षक करत आहेत. जसे की, जर तुम्ही देवावर विश्वास ठेवत नसाल तर तुमचा मिड ब्रेन हा जागा होत नाही असे सांगून ते स्वतःची चिकित्सा करण्यासाठी पुढे येत नाहीत. म्हणजे जर मिडब्रेनची पोलखोल सुरू केली की तुम्ही आस्तिक नाही व म्हणून तुम्हाला परिणाम दिसणार नाहीत असे लबाड तत्त्वज्ञान मांडले जाते. महत्त्वाचे हे की, योगा, नादयोगा, वगैरे नावे घेऊन मेडिटेटिव्ह स्टेट किंवा ध्यानमय अवस्थेमध्ये तुम्ही गेलात तरच मिड ब्रेन जागे होते असेही काही मिडब्रेन वाले सांगत सुटलेत.
ज्याला काही अर्थ नाही. मुळात कोणत्याही योगामध्ये मिडब्रेन जागे केले जाते असे सांगितलेले नाही. पण जेव्हा अशी काही फसव्या विज्ञानाची खूळं बाजारात आली आणि ती लोकप्रिय होऊ लागली की त्याचा संबंध भारतीय संस्कृतीशी जोडून ‘आमच्यात हे पूर्वीच होते’ असा सांगण्याचा सपाटा हे संस्कृती रक्षक लावतात आणि त्याच जोडीने भरपूर पैसाही उकळतात!

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मिड ब्रेन ॲक्टीव्हेशन सिद्ध करण्याचे आव्हान दिले आहे. ते आजतागायत सिद्ध करू शकलेले नाहीत. एमबीएवाले आमनेसामने येण्यास घाबरत आहेत असेच चित्र सध्या तरी दिसते आहे. डोळ्यावर पट्टी बांधून पुस्तके वाचणे, नोटांचा नंबर ओळखणे, कलर ओळखणे, वगैरे प्रकार लहान मुले करून दाखवतात तेव्हा सामान्य लोकांना आश्चर्य वाटते. पण ही एक साधी जादुगरी आहे! कोणताही जादूगार डोळ्यावर पट्टी बांधून गाडी सुद्धा भर गर्दीत चालवतो!! तिथे वाचणे-ओळखणे म्हणजे किस झाडकी पत्ती?
या फसव्या विज्ञानाचा पर्दाफाश नरेंद्र नायक यांनी केल्याचा व्हिडिओ कमेंटस् मध्ये दिला आहे.
एमबीए ही बुवाबाजी जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन कायदा 2013 च्या अनुसूची 2(1) (ख) मधील क्रमांक 2 कलमाप्रमाणे गुन्हा होऊ शकते. एखाद्या व्यक्तीने तथाकथित चमत्कारांचा प्रयोग प्रदर्शित करून, त्याद्वारे आर्थिक प्राप्ती करणे आणि अशा तथाकथित चमत्कारांचा प्रचार व प्रसार करून लोकांना फसविणे, ठकविणे आणि त्यांच्यावर दहशत बसविणे असे हे कलम सांगते. ही सरळसरळ फसवणूकच असल्याने ती भादंवि 420 कलमाखालीही आणता येते.
याबाबतीत आपण सर्वांनी मिळून जोरदार मोहीम चालू करणे अत्यावश्यक आहे. ‘मेंदूत एक ग्रंथी असते. वाटाण्याएवढी. ती म्हणजे मेंदूचा सेंटर. तिच्यात प्रचंड ऊर्जा असते आणि तिच्यात आध्यात्मिक शक्ती असते’ असा दावा हे मिडब्रेनवाले करतात. असाच दावा अनेक सायकीक किंवा तंत्र-मंत्र सांगणारेही करतात. तीच ही पिट्युटरी ग्रंथी असे सांगतात. पण ही ग्रंथी आणि मिडब्रेन यांचा शून्य संबंध आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे बालिश विज्ञान पसरवून समाजातील लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेणे घृणास्पद आहे.
विज्ञानाचा वापर करून जेव्हा या 21व्या शतकात एक नवी शोषण व्यवस्था उभी राहू पाहत आहे तेव्हा त्यास खंबीरपणे विरोध करणे खूप महत्वाचे आहे. ही व्यवस्था फक्त श्रीमंतांनांच लुटते असा भ्रम कुणी बाळगू नये. हातावर पोट असणारे पालक जेव्हा एमबीएच्या कोर्ससाठी कर्ज काढून पैसे देतात तेव्हा ही शोषण व्यवस्था गंभीर बनते. सामान्यांच्या अगतिकतेचा असा गैरफायदा घेणे ही नवीन कल्पना नाही. जुनीच आहे. पण ती जेव्हा फसव्या विज्ञानाचे रूप घेते तेव्हा ती लबाडी असते हेच सामान्यांना पटत नाही. एवढेच नव्हे तर त्यात फसवणूक अशी काय असते हेही ध्यानात येत नाही.
‘मुलांमध्ये खूपच फरक झाला’ असे संदिग्ध रिझल्टस् सांगणाऱ्या या पालकांना हेही कळत नाही की, मुलांची शैक्षणिक क्षमता व बुद्धिमत्ता ही दोन दिवसांत वाढविण्याची गोष्ट नव्हे. तसे असते तर एमबीएने आंधळ्यांचा मध्यमेंदू क्षमतावान बनवून त्यांना डोळस करून सोडले असते. मतिमंदत्व गायब करता आले असते. आणि वर्गात उभे राहून शिक्षण देण्याऐवजी सर्व मुलांना मध्यमेंदूच्या प्रयोगशाळेत दोन दिवस नेऊन ठेवल्यावर क्रांती घडविता आली असती.
एवढी सोपी उत्तरे जर स्वभाव-मानसिकता- क्षमता बदलविण्यासाठी अन् घडविण्यासाठी जर असती तर समाजाची विराट व्यवस्था प्रत्येकाच्या मुठीत सामावली असती. पण हे कळण्याइतपत इथल्या समाजाची मानसिक मुक्तता अजूनही झालेली नाही. आणि हेच तर खरे मोठे आव्हान आहे…मानसिक गुलामगिरीमुक्त समाज घडविण्याचे!






