पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार तिसऱ्यांदा सत्तेवर आले आहे. त्यांचे मंत्रिमंडळही तयार झाले आहे; परंतु या वेळी देशभरातील भाजपचा वारू रोखण्याचे काम अखिलेश यादव-राहुल गांधी या जोडीने केले आहे. त्यातही उत्तर प्रदेशची सर्वाधिक चर्चा झाली आहे. समाजवादी पक्षाने त्याच्या इतिहासात कधी नव्हे, एवढी चांगली कामगिरी केली आहे. त्याच वेळी देशातील प्रमुख राष्ट्रीय पक्ष असलेल्या बहुजन समाज पक्षाने त्याच्या इतिहासात कधी नव्हे, एवढी सुमार कामगिरी केली आहे. सुमार कामगिरीच नव्हे, तर मायावती यांनी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. त्यांच्या आत्मघाती निर्णयामुळे पक्षाचे अस्तित्व पणाला लागले आहे.
देशाने दिलेल्या जनादेशात उत्तर प्रदेशची सर्वाधिक चर्चा होत आहे. तिथे अखिलेश यांनी आश्चर्यकारक कामगिरी केली आहे आणि वडील मुलायमसिंह यादव यांच्यापेक्षाही मोठा विजय मिळवला आहे. त्याचवेळी बसप आणि भगिनी मायावती यांचीही चर्चा होत आहे. बसपने देशात दुसऱ्या क्रमांकाच्या 425 जागा लढवूनही एकही जागा या पक्षाला मिळाली नाही. उत्तर प्रदेशात तर या पक्षाचा मतांचा आलेख थेट निम्म्यावर आला आहे. 19 टक्क्यांवरून मतांची टक्केवारी नऊ टक्क्यांवर आली आहे. गेल्यावेळी उत्तर प्रदेशात लोकसभेच्या दहा जागा मिळाल्या होत्या. समाजवादी पक्षाबरोबर युती करून मायावती यांना फायदा झाला होता. एकेकाळी ‘सोशल इंजिनिअरींग’ करून उत्तर प्रदेशची सत्ता मिळवलेल्या मायावती त्यांच्या काळातील कथित गैरव्यवहारामुळे इतक्या अडचणीत आल्या, की त्यांनी भाजपला पूरक भूमिका घेतल्याने त्यांना त्यांचा आणि पक्षाचा आत्मघात करून घ्यावा लागला.

मायावती यांचा पक्ष दलितांचा पक्ष म्हणून उदयाला आला होता. आता मात्र त्याच दलितांनी मायावती यांची साथ सोडली. मायावती यांच्या पक्षाकडील मतपेढी त्यांच्याच आत्मघातकी निर्णयामुळे समाजवादी पक्ष आणि काँग्रेसकडे सरकली. उत्तर प्रदेशातील दलितांच्या राजकारणात मायावती या मसिहा होत्या. त्यांच्या निर्णयामुळे आता दलित त्यांना नेता मानायला तयार नाहीत. उत्तर प्रदेशात आता दलितांच्या राजकारणात एक पोकळी तयार झाली आहे. त्यांचे राजकीय अवकाश आता चंद्रशेखर यांना मिळायला लागले आहे. स्वतःच्या चुकीमुळे मायावती यांनी आपले राजकीय अवकाश इतरांना उपलब्ध करून दिले आहे.
संसदीय व्यवस्थेत बसप शून्यावर येण्याची ही पहिलीच वेळ आहे. उत्तर प्रदेश विधानसभेत त्यांचे एकमेव आमदार उमाशंकर सिंह आहेत. सिंह हे ही बसपमुळे नव्हे, तर स्वबळावर जिंकतात. सुरुवातीपासूनच बहनजींचे संपूर्ण राजकारण काही वर्षे दबावाखाली सुरू असल्याचे दिसून आले. गेल्या वेळी उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्या कोणत्या ना कोणत्या राजकीय किंवा अन्य प्रकारच्या दबावाखाली असल्याचे दिसून आले होते. भाजपच्या हातातल्या कळसुत्री बाहुल्याप्रमाणे त्या राजकीय गेम खेळतात. त्याचा फायदा शेवटी भाजपला होत असल्याचा निष्कर्षही काढण्यात आला.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी ‘इंडिया’आघाडीच्या लोकांनी पुढे येऊन तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र बहेनजींनी एकट्याने लढण्याचा निर्णय घेतला. लोकसभा निवडणुकीच्या वेळी जेव्हा त्यांनी तिकीट वाटप सुरू केले, तेव्हा त्या दडपणातून बाहेर पडत असल्याचे दिसत होते; मात्र जेव्हा आकाश आनंद यांच्याकडे जबाबदारी दिली आणि ते धडाक्यात कामाला लागले, तर त्यांच्याविषयीच्या काही तक्रारीवरून मायावती यांनी अचानक आकाश आनंदला समन्वयकपदाच्या जबाबदारीतून मुक्त केले. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर मायावतींच्या प्रचाराची धार संपली आणि त्यांची विश्वासार्हताही संपली. विशेषत: त्यांचा मूळ मतदार असलेल्या समाजात ही विश्वासार्हता नष्ट झाली.
कोणत्याही परिस्थितीत मायावती यांच्या पाठीशी उभा राहणारा विचारवंतांचा मोठा वर्गही मायावतीवर टीका करू लागला. त्या विचारवंतांचे त्यांच्या क्षेत्रात वजन आहे. समाजातील लोकांनी त्यांच्या विचारवंतांना अधिक महत्त्व दिले आणि मायावती यांच्यापासून दूर गेले. मायावती यांनी ‘सोशल इंजिनीअरींग’च्या माध्यमातून जी 30-32 टक्के व्होटबँक निर्माण केली आणि सत्तेत आल्या. त्यात भाजपने सर्वप्रथम मायावती यांची गळचेपी केली आणि गैर-जाटव जातींना स्वतःकडे आकर्षित केले. पासी हा सर्वात मोठा जात समाज आहे, जो भाजपकडे आला आहे. 2022 च्या निवडणुकीत अखिलेश यादव यांना हे समजले होते. त्यांनी स्वत: पासी समाजावर काम केले. इंद्रजीत सरोज ते अवधेश प्रसाद यांसारख्या नेत्यांना बढती देण्यात आली आणि या वेळी त्यांचे पासी समाजातील चार खासदार विजयी झाले होते. दुसरीकडे, समाजवादी पक्षाबाबत जाटव यांच्या मनात कोणतेही प्रेम नव्हते; परंतु ‘इंडिया’आघाडीने त्यांना आश्वस्त केले.
ऐतिहासिकदृष्ट्या, त्यांचा काँग्रेसवर विश्वास राहिला आहे. उत्तर प्रदेशातील राखीव जागांपैकी ‘इंडिया’ आघाडीने सत्तर टक्के जागा जिंकल्या आहेत. मायावतींसाठी हे खेदजनक आहे. तिथे त्यांचे तिसऱ्या क्रमांकावर जाणे किंवा ‘इंडिया’आघाडीकडे मतांचे स्थलांतर होणे अत्यंत चिंताजनक आहे. आता मायावतींनी पूर्णपणे नवीन रणनीती आखली, तर कदाचित त्यांचे राजकारणात पुनरागमन शक्य आहे, अन्यथा त्या संपल्यात जमा आहे.
चंद्रशेखर यांच्या रुपाने दलित राजकारणाला नवा चेहरा मिळाला आहे. चंद्रशेखर आझाद आक्रमक आहेत. डॉ.आंबेडकर यांच्यासारखे पूर्वीचे दलित नेते पाहिले, तर त्यांनी संविधानाच्या माध्यमातून दलितांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये वाटा मिळवून दिला. कांशीरामांच्या काळात राजकीय सत्ता मिळाली; पण आक्रमकतेचा अभाव होता दलित आणि उच्चवर्णीय यांच्यात संघर्ष झाला, तेव्हा चंद्रशेखर आझाद यांचा उदय झाला. एक म्हणजे त्यांनी थोडी आक्रमकता दाखवली आणि दुसरे म्हणजे त्यांनी अनेक सामाजिक सुधारणेचे प्रकल्प सुरू केले. त्यामुळे साहजिकच त्यांना लोकप्रियता तर मिळाली; पण या विजयाने त्यांचा दर्जाही वाढला आहे आणि राजकीय क्षेत्रात मायावती यांचा दर्जाही घसरला आहे; मात्र चंद्रशेखर यांना अजून खूप मेहनत करावी लागेल. त्यांना पक्षाची संघटनात्मक बांधणी तयार करून पुढे जायचे असेल, तर त्यांना खूप मेहनत करावी लागेल.

अखिलेश यांचे मनोबल उंचावलेले आहे. समाजवादी पक्ष देशातील तिसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे आणि नुकत्याच लखनऊमध्ये झालेल्या बैठकीवरून त्यांचा दृष्टिकोन समजण्यासारखा आहे. उत्तर प्रदेशात विधानसभेच्या दहा जागांवर पोटनिवडणूक होत आहे. त्यापैकी पाच जागा समाजवादी पक्षाकडे आणि पाच जागा आणि मित्रपक्षांकडे आहेत. अखिलेश आक्रमक स्थितीत राहतील; पण योगी आदित्यनाथ यांचे सरकार किती सुधारात्मक उपाययोजना करू शकते, यावरही ते अवलंबून असेल. ही पोटनिवडणूक दोन्ही पक्षांसाठी लिटमस टेस्ट आहे. त्यानंतर 2027 च्या विधानसभा निवडणुका होणार आहेत.
तोपर्यंत परिस्थिती खूप बदलली असेल. लोकसभा निवडणुकीत बसप शून्यावर राहिला. त्याचे खातेही उघडले नाही. अनेक दशकांनंतर पक्षाची मतांची टक्केवारी एक अंकी खाली आली आहे. पक्षाचा जाटव मतांचा आधारही बदलू लागला आहे. समाजवादी पक्षाशी युती असूनही गेल्या वेळी त्यांची मते हस्तांतरित झाली नाहीत; मात्र या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालानंतर मायावतींसाठी धोक्याची घंटा वाजली आहे. त्यांचे कट्टर विरोधक अखिलेश यादव हे दलितांच्या पसंतीस उतरू लागले आहेत. या निवडणुकीत प्रथमच जाटव मतदारांनी समाजवादी पक्षाला मतदान केले आहे. यादव आणि जाटव कधीच एकत्र राहू शकत नाहीत, असे आतापर्यंत सांगितले जात होते; पण हा चमत्कारही या निवडणुकीत उत्तर प्रदेशच्या राजकारणात घडला.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत बसपला एकही जागा मिळाली नसली, तरी या वेळी पक्षाचा बँड वाजला. मायावतींनी एकट्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने पक्षाच्या गळ्यातला फास निर्माण झाला आहे. आकाश आनंदला निवडणूक प्रचारातून काढून टाकण्याचा निर्णय मायावतींसाठी चुकीचा ठरला. बसपतील सर्व बड्या नेत्यांनी पक्ष सोडला आहे. काही भाजपत गेले तर बाकीचे समाजवादी पक्षात. बसप केडर निराश आहे. दुसरीकडे, या वेळी खासदार झालेल्या चंद्रशेखर रावण यांचेही आव्हान आहे. पराभवानंतर मायावती यांनी संघटनेत बदल करण्यास सुरुवात केली आहे. बसप प्रमुख मायावती यांनी पक्षाची जुनी संघटना बदलली आहे. प्रथम मंडल व्यवस्था रद्द करण्यात आली आहे. आता पक्षातील गटपद्धती संपुष्टात येऊन सेक्टर पद्धत लागू करण्यात आली आहे. राज्याची एकूण सहा विभागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक सेक्टरमध्ये दोन ते चार विभागांचा समावेश करण्यात आला आहे. याचा किती उपयोग होतो, याबाबत साशंकता आहे.






