जळत्या निखाऱ्यावरून चालणे दैवी शक्तीचे असते.. असे मानणारा समाज हा भारतात आजही अस्तित्वात आहे! गेल्या आठवड्यात ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात एका वृद्ध माणसाला ‘भुताळ्या’ ठरवून मांत्रिकाच्या भक्तांनी त्याला जळत्या निखाऱ्यावरून चालायची शिक्षा दिली. अक्षरशः सर्वांनी धरून त्याला लालबुंद निखाऱ्यावर जबरदस्तीने उभे केले! त्याचे विव्हळणे, याचना करणे, ही इथल्या संस्कृतीची देणगी आहे! मठ्ठ बुद्धीच्या संस्कृतीच्या रक्षकांना हा धर्माचा गौरव वाटतो. आणि संविधानाऐवजी धर्म-संस्कृतीचा फतवा दैवी वाटून थापला जातो…
हा नवा भारत जुन्या बाटलीतलाच आहे! निखाऱ्यावरून चालणे हे दैवी नसते हे समजायला इथल्या समाजाने स्वतःची दारे सतत बंद करून ठेवली आहेत. कारण ‘विज्ञानाऐवजी धर्माचा शब्द अंतिम माना’ असे सांगणाऱ्या पुरोहित-मांत्रिक-मुल्ला वर्गाचे नियंत्रण आणि धाक.
जळत्या निखाऱ्यावरून चालणे हे विज्ञान आहे…
जळत्या निखाऱ्यावरून चालणे दैवी वगैरे काही नाहीये. जळत्या निखाऱ्यावरून चालणे हे सर्व धर्मात आहे. मुसलमानांमध्ये जळत्या निखाऱ्यांना ‘अलावा’ तर हिंदुमध्ये ‘किच’ म्हणतात. भारतात फकीर बनलेल्यांनी ही प्रथा निर्माण केलीय. त्यांचे म्हणणे असते की दैवी शक्तीमुळे पाय भाजत नाहीत. हा अडाणी युक्तिवाद आहे. यात दैवी वगैरे काहीही नाही. यामागे आहे विज्ञान. फिजिक्स व बायाॅलाॅजी. भौतिक शास्त्र आणि जीवशास्त्र.
बर्नार्ड लिकंद आणि विल्यियम मॅकार्थी यांनी यावर सखोल संशोधन केले. जळता कोळसा जो वापरला जातो त्यामध्ये उष्णता ही इतर ठिकाणी व इतर पदार्थांमध्ये असलेल्या उष्णतेपेक्षा खूपच कमी असते हे एक कारण आहे आणि दुसरे कारण म्हणजे जेव्हा आपण जळत्या कोळशाच्या निखाऱ्यावर पाय ठेवतो तेव्हा तो अर्ध्या सेकंदापेक्षा कमी ठेवला तर भाजणारी संवेदना ही मेंदूपर्यंत पोहोचत नाही आणि चटका बसत नाही.

अशी असते ‘ट्रिक’ जळत्या निखाऱ्यावरून चालण्याची…
फार पूर्वीपासून चटका बसू नये म्हणून लोखंडाला सुके लाकूड जोडून त्या सुक्या लाकडाला धरून लोखंड उचलले जायचे. याचा अर्थ उष्णता प्रतिबंधक म्हणून लाकडाचा वापर केला जातो. कोळसा तर सुक्या लाकडापेक्षा चार पटीने जास्त उष्णता प्रतिबंधक असतो. मग चालताना जेव्हा जळत्या निखाऱ्यांचा चटका बसतो असे आपण म्हणतो तर तो चटका निखाऱ्यांचा नसतो तर निखार्यावर जमा झालेल्या पांढऱ्या राखेचा असतो. ही राख ही अतिशय भाजणारी असते.
म्हणूनच अलावा किंवा कीच याच्यावरून चालताना त्याच्यावर मीठ मारले जाते. मीठ म्हणजे सोडियम क्लोराईड आणि ते जळत्या निखाऱ्यांच्या राखेवर मारले तर राख बाजूला होते आणि लालबुंद निखारा दिसू लागतो. राख बाजूला झाली तर ती पायाला चिकटत नाही आणि जळत्या लालबुंद निखाऱ्यावरून चालताना चटका फारसा बसत नाही.
कोणत्याही वस्तूचे तापमान हे जेव्हा दुसऱ्या वस्तूमध्ये किंवा शरीरामध्ये जाते तेव्हा ते तीन प्रकारे जात असते. संवहन किंवा कनव्हेक्शन जे पाणी, द्रव वा हवा-वायू यातून होते, उत्सर्जन किंवा रेडिएशन जे विद्युतचुंबकीय रूपातले असते, उदाहरणार्थ सुर्याची उष्णता. आणि वहन किंवा कंडक्शन जे दोन वस्तू एकमेकांना स्पर्श केल्यावर घडते. या प्रकारामध्ये जेव्हा आपण जळत्या निखाऱ्यावर पाय ठेवतो तेव्हा जळत्या निखाऱ्याची उष्णता ही कणस्वरूपामध्ये असते आणि आपल्या पायाच्या तळव्यात जेव्हा तिचे वहन होते तेव्हा कोळशांची उष्णता कमी असल्याने फारसा चटका बसत नाही.
दुसरे म्हणजे संपूर्ण पायाचा तळवा हा कोळशाच्या वर ठेवला जात नाही. मुख्य भाग टाचेचा असतो आणि अंगठ्याकडील भाग हा कमी स्पर्शला जातो. बऱ्याच वेळा अलाव्याच्या जागेच्या शेवटी पाणी मारून ठेवलेले असते. किंवा पाण्याचे कापड ठेवलेले असते. या ठिकाणी पाणी हे चटका बसू नये म्हणून प्रतिबंधाचे काम करते. पण यातही काळजी घ्यावी लागते. कारण जर पायाचे तापमान हे विशिष्ट तापमानापेक्षा जास्त असेल तर त्याचा फारसा उपयोग होत नाही, ज्याला लेडनफ्रॉस्ट इफेक्ट असे म्हणतात.

जगभरात झालयं संशोधन…
डेव्हिड विले हा अवलिया माणूस सातत्याने अशा किचातून किंवा अलाव्यातून शेकडो वेळा चाललेला आहे. त्याने याच्यावर संशोधन देखील केले आहे. तो आणि त्याच्या बायकोने मिळून 18 ऑक्टोबर 1997 मध्ये सर्वात जास्त लांबीच्या म्हणजे 6 फुटापेक्षा जास्त कोळशाच्या निखाऱ्याच्या खड्ड्यातून आणि 1800 डिग्री फॅर्हेनाईट या उष्णतेतून चालण्याचा जागतिक विक्रम केला आहे.
1930 मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ लंडन कौन्सिल फॉर सायकिकल रिसर्च या संस्थेने पहिल्यांदा जाहीर अभ्यास केला. भारतातील खुदाबक्ष नावाच्या व्यक्तीला घेऊन तेथील वैज्ञानिक सुमारे 12 फूट जळत्या ओक झाडाच्या निखाऱ्याच्या खड्ड्यातून चालले होते. ज्याचे तापमान त्यावेळी सुमारे 800 डिग्री होते व त्याच्या नोंदी घेतल्या होत्या. यापैकी कोणालाही भाजले नव्हते.
अलीकडे ‘होली ग्रेल’ वाल्या टोनी रॉबिन्सनने आपल्या मानसिक शक्तीच्या कार्यक्रमाच्या प्रचारासाठी निखार्यावरून चालण्याचा प्रयोग केला होता. ‘द फायर वॉकिंग इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च अँड एज्युकेशन’ नावाची संस्था जागतिक पातळीवर यावर अनेक संशोधन व प्रबोधन करत असते.

याचा अर्थ जळत्या निखाऱ्यावरून चालणे दैवी वगैरे काही नसते. मी स्वतः आणि अंनिसचे शेकडो कार्यकर्ते आजही जाहीर कार्यक्रमातून अशा जळत्या निखाऱ्यावरून चालत आहोत. जळत्या निखाऱ्यावरून स्वेच्छेने चालणारे दैवी नसतात आणि जळत्या निखाऱ्यात ढकलून देणारे हे मानवतेचे गुन्हेगार असतात!
..आणि असे गुन्हे वारंवार घडू देण्याला जे वातावरण असते ते अतिशय धोकादायक असते हे मात्र खरे!
(लेखक हे अंनिसचे जेष्ठ कार्यकर्ते आहेत)






