स्वातंत्र्याच्या 76 वर्षानंतर माध्यमांमध्ये सर्व समाजघटक म्हणजे भारतासारख्या विविधता असलेल्या देशामध्ये मग त्यात दलित, ग्रामीण, आदिवासी, भटके, महिला, शेतकरी, ट्रान्सजेंडर, वेश्या या सगळ्यांना प्रतिनिधित्व मिळतयं का? प्रतिनिधित्व म्हणजे बातमी होण्यापासून बातमी लिहिण्यापर्यंत. त्यांच्याबद्दलचा आशय आणि त्यांनी निर्माण केलेला आशय (कॉन्टेट) याचे इथल्या माध्यमांमध्ये प्रतिबिंब उमटतयं का?
मुख्य प्रवाहाची ही अवस्था पाहून अनेक पत्रकारांनी माध्यमांमध्ये समांतर प्रयोग यशस्वीपणे उभे केले आहेत. हे समांतर प्रयोग उच्च दर्जाची पत्रकारिता उभी करत आहेत. गेल्या दहा वर्षांत दलित, बहुजन, आदिवासी, मुस्लिम, काश्मिरी आणि उत्तर पूर्वीसमुदायाकडून चालवला जाणारा पर्यायी मीडिया मोठ्या संख्येने वाचक आपल्याकडे खेचतआहे. यामुळे कथित मेनस्ट्रीम मीडियाला आपला पारंपरिक मार्ग बदलावा लागला आहे. ज्या वेबसाइटला पूर्वी क्षुल्लक म्हणून सोडून देण्यात आले होते, आज या वेबसाईट ‘न्यूजकिंग’ आहेत. पर्यायी माध्यमांच्या याच श्रुंखलेतील एकनाव म्हणजे ‘जुगनू’… देहविक्री करणाऱ्या महिलांनी आणि त्यांच्या मुलांनी सुरू केलेलं एक मासिक…

‘‘आओ कर लो नंबर याद, जब करे कोई महिलाओं पर अत्याचार, तब लगाओ 1090 मेरे यार।’’
या ओळी एखाद्या सरकारी अथवा गैरसरकारी संघटनेच्या कोणत्या अभियानाच्या स्लोगनमधील नाहीत. त्या ‘हिफाजत के नंबर’ या कवितेच्या आहेत. ज्या हस्तलिखित असलेल्या ‘जुगनू’ या मासिकासाठी शाइस्ता परवीन यांनी लिहिल्या आहेत. शाइस्ता बिहारच्या मुझफ्फरपूर शहरातील रेड लाईट एरियात, चतुर्भूज इथं राहतात. ही वेश्यांची वस्ती आहे. इथल्या बदनाम, अंधारलेल्या गल्लींमधून काही मुलींनी स्वातंत्र्याचे दिवे उजळवण्याचं ठरवलं आहे. यात एक आहेत, नसीमा खातून, ज्या निःसंकोचपणे आपली ओळख, ‘एका सेक्सवर्करची मुलगी’ असं सांगतात. ‘परचम’ या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी जागतिक स्तरावर आपला आवाज पोहचवला आहे. सेक्सवर्कर्सच्या हितांविषयी वारंवार मांडणी करणाऱ्या नसीमा यांना राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या सल्लागार समितीवर सदस्य म्हणून घेण्यात आलं आहे. नसीमासोबतच शाइस्तासारख्या डझनभर मुली आज या परिसरात काही बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
सेक्सवर्कर्सच्या वंचित, शोषित जगण्याला लोकांसमोर आणण्याचा ‘जुगनू’चा प्रयत्न
शाइस्ता यांनी 2008 पासून ‘जुगनू’ मासिकातून आपल्या भवतालाविषयी लिहायला सुरूवात केली होती. त्या तेव्हा पदवी शिक्षण घेत होत्या आणि जुगनूच्या पत्रकार म्हणून त्यात लेख आणि कविता लिहित होत्या. दहावीत शिकणारी नंदिनी याच पत्रिकेत आपल्या लोकांविषयी लिखाण करत असते. 17 वर्षीय आरिफ़ लेख गोळा करून मासिकाचं प्रकाशन करण्याचं काम बघतो या सर्वांसोबत आणखी डझनभर मुलंमुली सेक्सवर्कर्सच्या वंचित, शोषित जगण्याला लोकांसमोर आणत आहेत. त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडत आहेत.
शाइस्ता सांगतात की, “या हस्तलिखित मासिकाची सुरूवात नसीमा यांच्या मार्गदर्शनाखाली 2004 मध्ये झाली होती. सुरूवातीला याच्या झेरॉक्स काढून वाटल्या जायच्या. है त्रैमासिक आहे आणि सुरूवातीला फक्त चारच पानं यात असायची. पण आता लोकांच्या आर्थिक मदतीमुळे 36 पानांचा मजकूर यात प्रकाशित होत आहे. ते छापिलही झालं आहे.”
याचा पहिला अंक या वस्तीतल्या एका लहान खोलीतून निघाला होता ज्याच्या पार्श्वभूमीला पेटीचे सूर, तबल्याची थाप आणि घुंगुरांचा छुनछुन आवाज होता. या अशा वातावरणातच काही मुलींनी आपल्या लेखणीतून विद्रोहाचे सूर काढायला सुरूवात केली. शाइस्ता सांगतात त्याप्रमाणे, या पत्रिकेत इथल्या मुलींचं जगणं, त्यांच्या भवतालातील कथाप्रसंग असतात. या मुलींना नीट लिहिता येत नाही त्यामुळे व्याकरणाची कायम बोंबच असते. पण आपल्या शब्दांपेक्षाही त्यांचे भाव तीव्रपणे आणि सच्चेपणाने त्यातून प्रगट होत असतात. त्यामुळेच त्यांनी लिहिणं सुरू ठेवलं, आपल्या जगण्याला त्या शब्दांकित करत राहिल्या. 2012 पर्यंत हे काम सुरू होतं. पण त्यानंतर जुगनूचा प्रकाश मंदावला. “कोणाचीही आर्थिक व इतर मदत नसल्यामुळे आमचं मासिक बंद पडलं. त्याचवेळी नसीमाचं लग्न झालं आणि ती राजस्थानला आपल्या सासरी निघून गेली. पण ‘जुगनू’ तिच्या मनातून गेलं नाही. आठ वर्षांनी ती आपल्या आजारी आजीला भेटायला परत मुझफ्फरपूरला आली तर तिला ‘जुगनू’ पुन्हा सुरू करण्याचा विचार आला. तिनं जुन्या सदस्यांची भेट घेतली. सोबत नव्या मुलींना घेतलं आणि 2021 मध्ये हे काम पुन्हा सुरू झालं. आपल्या ओळखीतून तिनं बाहेरही मासिकाचा विस्तार केला आहे,” शाइस्ता सांगते.

बिहार, राजस्थान, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील वेश्यांसाठी एक व्यासपीठ
बिहारच्या मुझफ्फरपूरातूनच नाही तर राजस्थान, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या मुख्य प्रवाहातून सामिल नसलेल्या मुलामुलींसाठी ‘जुगनू’ एक असं व्यासपीठ आहे जिथं त्यांना व्यक्त होण्याची संधी मिळत आहे. यात लिहून काम करून ही मुलं त्यांच्या कुटुंबाच्या समस्या मांडत आहेत, प्रश्न सांगत आहेत, सर्वांना एकत्र येण्याचं आवाहनही करत आहेत. मानवाधिकार व कायद्यासारख्या क्लिष्ट गोष्टींवरही ते आपल्या समजेनुसार लिहित असतात. ‘हमारी पहचान’, ‘बिटीया की चिठ्ठीयाँ’, ‘हमारी पहल’, ‘अनुभव’, ‘सपने’ इत्यादी सदरं ‘जुगनू’त नियमितपणे सुरु आहेत.
हे मासिक सुरू करण्यामागे एक वेदना होती, जी त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहातील मीडियात येण्यापासून थोपवत होती. असं एखादं मासिक असावं अशी कल्पना करून प्रत्यक्षात ती पूर्ण करणारी नसीमा सांगतात, “आम्हाला बाहेरच्या समाजविषयी तक्रार होती की त्यांनी या परिसरातील मुलींच्या गुणांकडे दुर्लक्ष केलं, त्यांच्या कलेला नाकारलं. या मुलींना समाजात आपल्या योग्यतेच्या बळावर एक ओळख बनवायची होती. यातूनच त्यांना मासिकासाठी लिहिण्याची प्रेरणा मिळाली. त्यातूनच ‘जुगनू’चा जन्म झाला. ‘जुगनू’ची टॅग लाईन आहे – ‘परीघावरील वंचितांचा आवाज.’ यात तरुणांचा आवाज जास्त प्रमाणात दिसून येतो. जे आपल्या समाजाचे प्रश्न मांडतात, देहविक्री व्यवसायात असलेल्या महिलांच्या मुलांच्या वेदना, त्यांच्या अडचणी, त्यांची स्वप्नं, आकांक्षा यांनाही ते शब्दांमधून व्यक्त करतात.”
राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील प्रेमनाथ कालबेलिया जुगनूसाठी लिखाण करतो. प्रेमनाथ सांगतो, “या समाजातील लोक कोणत्या परिस्थितीत जगत आहेत? त्यांचे प्रश्न काय आहेत? हे त्यांनाच समजू शकतं जे त्यांच्यासोबतच राहत आहेत. मीडिया किंवा प्रशासनालाही या समाजाच्या लोकांचे खरे प्रश्न काय आहेत याची माहिती नसते. मी ‘जुगनू’त जे काही लिहितो त्या सर्व खऱ्या गोष्टी असतात, यांच्या वेदना असतात.”
महाराष्ट्रातून स्नेहा ठाकूर, मध्यप्रदेशातून मेघा छारी, भूमिका ठाकूर तसेच बिहारचे आरिफ़ आणि अंबर नटराजन् आज जुगनूत पत्रकारीतेचे धडे गिरवत आहेत. या सर्वांना अनेक अडचणी आहेत, ज्यात आर्थिक जास्त आहेत, तरीही ते या कामावर ठाम आहेत. आरिफ़चं ग्रॅज्युएशन सुरू आहे. चतुर्भूज परिसरातच त्याच्या वडीलांचं टेलरिंगचं दुकान आहे. यात फारशी कमाई होत नाही. घरातल्या आर्थिक समस्या सोडवतानाही आरिफ़ला जुगनूसाठी लिहावसं वाटत राहतं. तो म्हणतो, “जेव्हा नसीमाजींनी आम्हा सर्वांना सोबत घेऊन मुझफ्फरपूरच्या तत्कालिन जिल्हाधिकारी प्रणव कुमार यांना जुगनूचा अंक भेट दिला तेव्हा त्यांनी आमच्या कामाचं खूप कौतुक केलं. त्यांनी आमचं काम आणि उत्साह बघून आम्हाला मदत करण्याचं आश्वासनही दिलं होतं. जुगनूमुळेच आम्हाला कुशल युवा कार्यक्रम तसेच स्टुडेंट क्रेडीट अशा अनेक योजनांची माहिती मिळाली.” आज इथल्या पाच जणांनी कॉम्प्टुटर कोर्स केला आहे. ते आता इतरांनाही अशी प्रशिक्षणं घेऊन व्यवसायाचे नवे मार्ग शोधण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. राजस्थानमध्ये जेव्हा प्रेमनाथ आणि सविता कालबेलिया यांनी बाडमेरच्या तत्कालिन कलेक्टर आणि एसपींना जुगनूचा अंक भेट दिला तेव्हा तेही चकीत झाले. त्यांनीही या मुलांचं खूप कौतुक केलं. त्यापासूनच आम्हाला प्रेरणा मिळते असं प्रेमनाथ सांगतो.
सबीना सांगते, “मासिकामुळे आमच्याच व्यक्तिगत आयुष्यात बदल होत आहे असं नाही. इथल्या बाकीच्या लोकांनाही, विशेषतः महिलांना याचा फायदा होत आहे. जेव्हा आम्ही मासिकाचा एक अंक मुझफ्फरपूरच्या कलेक्टरांना भेट म्हणून द्यायला गेलो तेव्हा त्यांनी आमचं खूप कौतुक केलं. आमचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांनी आम्ही चालवत असलेल्या, ‘जोहरा सिलाई सेंटर’ आणि ‘जीविका बचत समूह’ यांना लघु उद्योगाचा दर्जा देण्यासाठी मदत केली. जुगनू गारमेंट्सला शॉपिंग लायसन्स मिळवून दिलं. त्यामुळे इथल्या अनेक बायकांना घरबसल्या रोजगाराची सोय झाली आहे. ‘जुगनू’मुळे हे शक्य झालं आहे. इतकंच नाही तर जुगनूच्या टीमने पोलिसांसोबत ‘पुलिस पाठशाला’ काढली आहे. चतुर्भूज पोलिस चौकीतच ती आहे. तिथं सध्या 50 मुलं शिकत आहेत. त्यांना शिकवण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांपासून शिपायापर्यंत अनेकजण येत असतात. त्या मुलांनी काढलेली चित्रं आम्ही मासिकात प्रसिद्ध करत असतो.”

सध्या मासिकाच्या 300 प्रती काढल्या जातात. त्यांची संख्या वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. टीमचे सदस्य आपापल्या राज्यातील बातम्या, लेख, कथा, कविता मुझफ्फरपूरच्या कार्यालयात पाठवतात. तिथं मग डिझाइन, प्रिंटींग केलं जातं. याचं डिझाइन मुलीच करतात. एमजे चॅरीटेबल ट्रस्टकडून आता जुगनूला प्रिंटींगसाठी आर्थिक सहायता मिळत आहे. चार राज्यांत प्रत्येक सदस्याला प्रत्येकी 20 प्रती पाठवल्या जातात. ज्यांना ते स्वतःच वितरीत करतात. जुगनूचा विस्तार करण्यासाठी आता बाहेरच्या लोकांकडूनही साहित्य मागवण्यात येत आहे. अनेक विचारवंत, लेखक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते हस्तलिखित साहित्य पाठवत असतात. ‘जुगनू’ व नसीमाच्या टीमची एक मुलाखत बीबीसीवरही आली होती. २००४ मध्ये ‘दुसरी दुनिया मुमकिन’च्या घोषणा देत पहिल्यांदाच मुंबईतील
‘वर्ल्ड सोशल फोरम’मध्ये ‘जुगनू’ला सार्वजनिक व्यासपीठावर येण्याची संधी लाभली होती. सध्या ही मुलं सेक्सवर्कर्ससाठी आणि स्वतःसाठीही जे काम करत आहेत तो एक महत्त्वाचा दस्तावेज आहे. इतिहासात त्याची नोंद नक्कीच घेतली जाईल.
अनुवाद – प्रतिक पुरी
(साभार – जनचौक)





