संस्कार नावाची जी काही भानगड आहे, तिच्याशी वैर न घेता मुकाट्यानं जमवून घेतलं, तर आयुष्य खूप सोपं होऊन जातं. आई-बापानं म्हटलं, अमक्याला वाकून नमस्कार कर; नमस्कार करायचा. शेजाऱ्यानं म्हटलं, अमका बाबा-बुवा आलाय, त्याचे आशीर्वाद घ्यायला जायचंय; चला म्हणायचं. अडचणीचा प्रश्न विचारण्यावरून वर्गात टिचरने दम दिला, की तडक गप्प बसायचं. हे करायचं नाही, ते करायचं नाही, असं कुणी आवाज चढवून सुनावलं तर गपगुमान होऊन जायचं. अन्याय झाल्याची भावना जराही बोलून दाखवायची नाही.
भेदभाव झाल्याचे दु:ख चुकूनही व्यक्त करायचे नाही. तुला जराही अक्कल नाही, आम्ही सांगू त्याच्याशी लग्न करायचं, असं कुणी म्हटल्यावर जराही आकांडतांडव करायचं नाही. धुसफूस करायची नाही. मुळूमुळू रडायचं नाही. जे आहे ते सरळ मान्य करायचं. समोरच्याने घेतलेल्या कोणत्याही निर्णयावर तर जराही प्रश्न करायचा नाही, संशय तर कधीही बोलून दाखवायचा नाही.
सण-वार, व्रत- वैकल्य, रीतीभाती, आहेर-हुंडा, वाण-सामान, मानपान जे पिढ्यानं पिढ्या चालत आलंय, ते कितीही फसवणूक, लुबाडणूक झाली तरीही मनोभावे स्वीकारत जायचं, की आयुष्य कसं सोपं होत जातं. आणि जन्माला येऊन रूढी-परंपरा जपल्याचं पुण्यही पदरात पडतं. शेवटी, पुण्य पदरात पडणं महत्त्वाचं. कौल हृदयाचा की बुद्धीचा, विचार महत्त्वाचा की भावना, हा गुंता इममटेरिअल.

पुरुष काय नि बाई काय, शंभरातले नव्याण्णव असं सुख पदरात पाडून घेतात. अशा सुखासाठी आसुसतात. जो कुणी असं सुख मिळवून देण्याची लालूच दाखवील, त्याच्या नादाला लागतात. पण शिंगं फुटली तेव्हापासून असं समाजमान्य सुख तिला कधीच मान्य नव्हतं. आपण त्या नव्याण्णवातले नाही, हेही ती पक्की जाणून होती. म्हणूनच मुलगी असूनही परंपरेने घालून दिलेली चौकट तोडण्याची, आशा-आकांक्षांना गाडू पाहणाऱ्यांच्या पेकाटात लाथ हाणत पुढे जाण्याची तिडीक तिने कायम डोक्यात ठेवली.
ती जेवढी रागीट होती, तेवढीच अहंकारी होती आणि ओव्हर सेन्सिटिव्हही. टोकाचा हट्ट हा तिचा दुर्गुण होता. तिचं चित्त स्थिर नव्हतं. संयम तिला ठाऊक नव्हता. म्हणजेच, कुटुंबीय-नातेवाईक आणि समाजाचं शत्रूत्व तिनं स्वत:च्या मर्जीने ओढवून घेतलं होतं. पण याची तिने कधी फिकिरही केली नव्हती म्हणा. वेळ आली तेव्हा तिने जन्मदात्या बापालाही जुमानलं नाही. आगलाऊ नातेवाइकांना सहन करण्याचा तर प्रश्नच नव्हता. अगदी लहानपणापासूनच जे मनात येईल तेच तिने केलं. तसं करताना अनेकदा भरकटली.
लाज-शरम सोडून वागली. स्वार्थी नि संधीसाधू बनली. महत्त्वाकांक्षेपायी बेबंद झाली. शरीर-मनानं ओरबाडली गेली. रक्तबंबाळ झाली. निराशेच्या गर्तेत कोसळली. जिवाच्या आकांताने रडली. पण हार नाही मानली. स्वत:चं जे काही बरं-वाईट केलं, ते स्वत:च्या हिमतीवर. रुपेरी पडद्यावर दिसलं, ते खूप नंतर.
भावाला खेळण्यातली बंदूक दिल्यावर ती पिसाळायची…
डोंगर-दरीतला हिमाचल प्रदेश. त्यातलं मनाली आणि मनाली जवळचं सुरजपूर गाव. मनाली काय नि सुरजपूर काय, दुनियेसाठी या हनिमून डेस्टिनेशन्स जागा. लोकं तिथं जाऊन रोमँटिक-बिमँटिक होतात. पण कर्मठ अप्पर मिडलक्लास कुटुंबात वाढलेल्या कंगना रणौतच्या जगात काडीचाही रोमँटिसिझम नव्हता. होतं ते मुलीच्या जातीसाठी समाजाने आखून दिलेलं बंदिस्त जगणं. होतं ते रणौत कुटुंबाच्या प्रतिष्ठेचं दडपण. होता तो नोकरीपेशाने आयएएस असलेल्या पण पंधरा वर्षं मंत्री असलेल्या सरजूसिंग रणौत नावाच्या आजोबांचा धाक आणि कन्स्ट्रक्शन बिझनेसमध्ये रेप्युटेशन असलेल्या बापाची आणि शिक्षिका असलेल्या आईची अदृश्य दहशत.
तरीही भावाला खेळण्यातली बंदुक दिली जाते आणि आपली फालतू गुड्डा-गुड्डीवर बोळवण केली जातेय, म्हटल्यावर ती पिसाटून उठायची. मुलगी म्हणून दुय्यम वागणूक मिळाली, की तिच्या मस्तकावरची नस तडतडायची. थोड्याशाही अपमानाने ती चवताळून उठायची. क्षणात भावूक होत डोळ्यांतून पाणी काढायची. तिचा रूढीप्रिय आई-बापाशी, त्यातही बापाशी पंगा अगदी तेव्हापासूनचा. अवघं लहानपण पुरुषी वर्चस्वाचा जाच सहन करण्यात गेलं म्हणूनही असेल; पण पुरुष जातीबद्दल तिच्या मनात असलेला रागही तेव्हापासूनचाच.

यापुढे मारलंत तर मीसुद्धा तुम्हाला मारेन, असं ती बापाला म्हणाली!
कशीबशी शाळा संपली, तशी बापाची ऑर्डर निघाली. पोरीनं डॉक्टर झालंच पाहिजे, त्यासाठी सायन्स घेतलंच पाहिजे. का कोण जाणे, पण प्रत्येक निर्णयावर बंड करून उठणारी ती आज्ञा पाळायला तयार झाली. कदाचित हाच आपला ‘एस्केप रुट’ असल्याची चाहूल तिला लागली असावी. तसं हिमाचलातली पोरं-पोरी शाळा संपली की, दिल्ली-चंडिगढमध्ये शिकायला जाणं रुटीन होतं. त्यामुळे आई-बापाला तिच्या छुप्या योजनांचा सुगावा लागला नाही. ती सायन्स घेऊन चंडिगढच्या होस्टेलमध्ये राहू लागली आणि तिथंच, तिच्या बंडखोर मनाची मशागत व्हावी आणि ते पेटून उठावं, असा माहोल मिळत गेला.
सायन्स गेलं उडत, आपल्याला आर्टमध्ये, नाच-गाण्यामध्ये इंस्टरेस्ट आहे, स्कल्पटिंगमध्ये इंटरेस्ट आहे, हे आधी तिनं स्वत:ला मोठ्यानं सांगितलं आणि मग जवळच्या इतरांना. बंधन कसलंच नव्हतं. धाक असण्याचाही तसा प्रश्न नव्हता. मनालीमध्ये जे जगता आलं नाही ते ती चंडिगढमध्ये बेधडक जगू लागली. मित्र-मैत्रिणी, पार्ट्या, अधेमधे दारू, जमलंच तर सिगरेटचे झुरके. फाटकं तोंड तर पहिल्यापासूनच होतं. चंडिगढच्या पंजाबी रासवट वातावरणात आल्यावर मुलीच्या जातीला न शोभणारा शिवराळपणाही वाढला होता. तसंही सायन्समध्ये तिचं मन लागत नव्हतं.
झुलॉजीच्या पिरियडमध्ये बेडका-झुरळाचं डिसेक्शन करताना तिला सरसरून शिसारी येत होती. एक दिवस तिच्या डोक्यात काय सणक आली, शिक्षण सोडण्याचा निर्णय तिने परस्पर घेऊन टाकला. पण हा निर्णय आई-बापाला कळवणं भाग होतं. नाइलाज म्हणून ती घरी गेली. बापापुढे हिमतीने तोंड उघडलं. मुझे पढना नही आगे…एवढं म्हणून ती थांबली असती तर कदाचित तो शांतही झाला असता लगेचच. पण तिने ॲक्टिंग-मॉडेलिंग करण्याचा इरादा बोलून दाखवला.
तसं त्याचं पित्त खवळलं. वादावादी सुरू झाली. बाप त्याच्या म्हणण्यावर अडून राहिला. तिने तिचा हेका सोडला नाही. परिस्थिती इतकी चिघळली की, रागाच्या भरात एका क्षणी त्याने तिच्यावर हात उगारला. या एका थपडेनं तिचा इगो दुखावला. ती अपमानाने लालबुंद झाली. बेफिकिरीत बापावरच बरसली, खबरदार, यापुढे मारलंत तर मीसुद्धा तुम्हाला मारेन! तिचं ते रूप पाहून बाप अधिकच सटपटला. आई-धाकटी बहीण-भाऊ-आजी-आजोबा सगळे गर्भगळित झाले.
राणावत खानदानात सात पिढ्या कुणा बाईनं पुरुषाला मारण्याची धमकी सोडा, डोळ्याला डोळा भिडवून कधी उलट उत्तरही दिलं नव्हतं. वातावरण तप्त झालं असताना, तुझी थेरं सांभाळायला पैसे वर आलेले नाही, म्हणत आताच्या आता घरातून चालती हो, म्हणून बाप आवाज चढवता झाला. गरम डोक्याच्या अवघ्या 15 वर्षं वय असलेल्या तिने सगळ्यांदेखत घर सोडलं. घर सोडून नेमकं काय करायचं, ते ठाऊक नव्हतं. कुठे राहायचं, हे तरी कुठे ठरवलं होतं.
पण, हा वेडेपणा ती का करत होती? वेडेपणा करण्याचं बळ तिच्यात कुठून येतं होतं? जगाच्या दृष्टीने आत्मनाशाची ओढ तिला का लागली होती? यापैकी एकाही प्रश्नाचं उत्तर त्या वेळी तिच्यापाशी नव्हतं. त्या क्षणी आई-बाप तिचे सगळ्यात मोठे दुश्मन बनले होते आणि त्यांच्या नजरेआड होणं ही त्या क्षणाची तिची पहिली गरज बनली होती. मुलीची जात, रूढी-परंपरा, संस्कार, समाज, सुरक्षितता सगळं गेलं खड्ड्यात, अशी त्या वेळची तिची मानसिकता होती.

मनातला उद्रेक थंडावल्यावर ज्या चंडिगढने चस्का लावला होता, तिथे उधारउसनवारी करून ती परतली. कुणी जसप्रित नावाची मैत्रीण होती. तिच्यासोबत रुम शेअर करायचं ठरलं. तिच्याच ओळखीने अमक्या ॲड एजन्सीमध्ये जा, तमक्या डायरेक्टरला भेट, असं हातपाय मारणंही सुरू झालं. घरात मॉडेलिंगचं बॅकग्राऊण्ड नाही, ॲक्टिंगचं रीतसर ट्रेनिंग नाही. वर हे सगळं विनासायास मिळवून देणारा मसीहा नाही, पण तरीही ‘दुनिया गई भाड में’ हा तिचा ॲटिट्यूट होता. एक जसप्रित सोडली तर बाकीचे सगळे “किस अँगल से यह ॲक्ट्रेस लगती है? पागल है लडकी’, म्हणत तिला वेड्यात काढत होते.
तशातच एक दिवस खुद्द बाप तिला दारात उभा दिसला. भांडून घराबाहेर पडलेल्या पोरीला त्याला डोळे भरून बघायचं होतं, की रणौत खानदानची इभ्रत आणखी जाऊ नये म्हणून तिला समजावून परत घरी घेऊन जायचं होतं, हे त्याचं त्यालाच ठाऊक; पण तो आला. पन्नास हजार रुपये घेऊन. पोरीची अवस्था पाहून त्याने ते पैसे तिला देऊ केले. म्हणाला, आत्ता एवढेच आहेत.
जेवढे शक्य झाले तेवढे घेऊन आलोय, आणखी लागले तर पाठवून देईन. तशी तिची तार सटकली. मागचा-पुढचा विचार न करता, कोई जरुरत नही है मुझे… म्हणत तिने बापाला अपमान करून आल्यापावली परत धाडलं. तो खाली मानेनं घराबाहेर पडल्यानंतरच संतापामुळे फुरफुरणाऱ्या तिच्या नाकपुड्या जागेवर आल्या. बापाकडून मिळणारे पैसे नाकारले. चुकलं की योग्य केलं, तिला फैसला करता येत नव्हता. धक्के खाणं काही थांबलेलं नव्हतं.
पण नशीब थोर म्हणून काही दिवसांनी दिल्लीच्या अस्मिता थिएटरचा पत्ता तिला मिळाला. तिथं अरविंद गौड नावाचा पहिला माणूस भेटला ज्यानं तुम ॲक्टिंग कर सकती हो… असा दिलासा तिला दिला. या पाच शब्दांनी तिच्यामध्ये शंभर हत्तींचं बळ आलं. गौड जणू तिचा देव बनला. पण त्यानं ताळ्यावर आणणारा इशाराही दिला, ‘आयुष्यभर थिएटर करत बसलीस तर नुसता खादीचा कुर्ता घालून मिरवशील, स्वत:ला शहाणी समजत फिल्मस्टार्सची खिल्ली उडवत राहशील; पण जेव्हा आजारी पडशील तेव्हा इलाज करण्यापुरतेही पैसे तुझ्याजवळ नसतील…’
भट्ट प्रॉडक्शन्सममधून फोन आला, कम डाऊन टु मुंबई.
आयुष्यात पहिल्यांदा तिला जबाबदारीचं भान आलं होतं आणि करत असलेल्या धाडसाची भीतीही वाटली होती. कारण, खूप पायपीट केल्यानंतर मॉडेलिंग आणि थिएटरमध्ये फुटकळ कामं मिळत होती. बऱ्याच वेळा ब्रेड आणि लोणचं खाऊन दिवस ढकलण्याची वेळ येत होती. पुढे सगळाच अंधार दिसत होता. म्हणून मग, भंजाळलेल्या अवस्थेत तिच्या वयाची मुलगी स्वत:चं अस्तित्व टिकवण्यासाठी संधीसाधूपणा करत जे काही उलटेपुलटे धंदे करेल, ते सगळे तिने करून बघितले होते. त्यातून दिवसाचा खर्च तेवढा निघत होता. सणकून तोंडावर आपटतेय की काय, असं वाटत असताना, ज्या ॲड एजन्सीमध्ये मॉडेलिंगची कामं मिळावी म्हणून फोटो पाठवले होते, त्या एजन्सीमधून फोन आला.
मुंबईत भट्ट प्रॉडक्शनमध्ये ऑडिशन्स सुरू आहेत, इच्छा असेल तर ट्राय कर. तसं हातात काहीच नव्हतं, त्यामुळे नाही म्हणायचं तरी कशाला? प्रश्न पैशांचा होता. पण मित्र-मैत्रिणींनी मिळून तो बऱ्यापैकी सोडवला आणि बॉलीवूड हिरॉईन होण्यात आवश्यक शारीरिक भांडवल नसलेली, शिडशिडीत बांधा आणि कुरळ्या केसांची, आई-बापाने अव्हेरलेली, शिक्षण अर्धवट सोडलेली, एखाद्यात चटकन इमोशनली इनव्हॉल्व्ह होणारी आणि तितक्याच वेगाने त्याच्याशी संबंध तोडणारी, ज्याला ‘सहज सावज’ म्हणता येईल, अशी परिस्थितीने घेरलेली गरम डोक्याची ती मुंबईला निघाली. निघण्यापूर्वी स्वत:ला कसं पेश करायचं, याचे सल्ले मिळाले असले तरीही प्रत्यक्षातला फिल्मी माहोल बघून ती गांगरून गेली.

बाचकत-बिचकत तिने ऑडिशन दिली. महेश भट्ट ‘गँगस्टर’ बनवणार होते. चित्रांगदा सिंगने ऐन वेळी टांग दिल्याने त्यांना नवा चेहरा हवा होता. बारगर्लचा रोल होता. तिने ऑडिशन दिली. पण भट्ट म्हणाले, ठीक है, पर लडकी बहुत छोटी है… तरीही तिला अंधुकशी आशा होती. त्या आशेवर ती मुंबईत स्वत:ला रिझवत राहिली. कुणी तरी तिला आशाचंद्रा ॲक्टिंग स्कूलचा रेफरन्स आधीच दिला होता. ॲडमिशन घेण्याची ऐपत तर नव्हती, मग तिने इकडची-तिकडची ओळख काढत तिथे ॲक्टिंग शिकायला आलेल्या पोरा-पोरींमध्ये शिरकाव केला. असं केल्यानं आपण कुणाच्या तरी नजरेत येऊ, कुणीतरी आपल्याला हेरतील आणि आपण एका रात्रीत स्टार होऊन जाऊ, असं स्वप्न ती रंगवत राहिली. साधारण दोन महिन्यांनी तिचं अवसान गळालं, तशी ती दिल्लीला परतली. दिल्लीत गेल्यावर पुन्हा दिवस खायला उठणार, अशी भीती वाटत असतानाच भट्ट प्रॉडक्शन्सममधून फोन आला, कम डाऊन टु मुंबई.
‘गँगस्टर’मधील किसिंग सीन बघून बाप म्हणाला, पुन्हा फोन करू नकोस!
काय करावं नि काय नाही, अशा अवस्थेत असताना उत्साहाने तिनं घरी फोन लावला. तिला वाटलं, बातमी ऐकल्यानंतर झालं गेलं विसरून आई-बाप खुश होतील. पण जेव्हा तिने डायरेक्टर-ॲक्टरचा तपशील देताना मर्डर, अनुराग बसू, इमरान हाश्मी ही नावं घेतली, तेव्हा बाप अक्षरश: पिसाटला. आईने गोंधळ घातला. म्हणाली, हे लोक पोरीचं शोषण करून तिची ब्लू फिल्म बनवतील… कुठून फोन केला नि नस्ती आफत ओढवून घेतली, असं तिला झालं. आई-बापानं केलेला आकांत विसरून ती मुंबईला परतली. प्रॉडक्शनवाल्याने तिचा पासपोर्ट मागितला.
तिच्याकडे पासपोर्ट कुठून असायला? अडचण. राहायचं कुठे, खायचं कुठे? पुन्हा अडचण. इमरान हाश्मी, शायनी आहुजा यांच्याशी कसं नि किती मर्यादेत वागायचं-बोलायचं? इथेही अडचण. थोडं सैल झालं तरीही लोक गैरअर्थ काढणार, रिझर्व्ह राहिलं तरी कंड्या पिकवणार. या सगळ्या गुंत्यातून मार्ग काढत तिनं शूटिंग पूर्ण केलं. सुरजपूर, मनाली इथल्या राणावत कुटुंबाचं नाव लावणाऱ्या तिचा पहिलावहिला सिनेमा “गँगस्टर’ सगळीकडे रिलीज झाला. कौतुकाने की चिडण्याचं आणखी एक निमित्त मिळावं म्हणून पण बापानं ‘गँगस्टर’ बघितला. त्यातला तिच्यावर शूट झालेला किसिंग सीन पाहून त्याची तळपायाची आग मस्तकाला गेली. पुन्हा फोन करू नकोस, असा सरळ दम त्यानं दिला. तिच्या आजोबानं ‘रणौत’ आडनाव लावू नकोस, असा नातेवाइकाकरवी सज्जड निरोप धाडला.
फिल्मी मसाला ठासून भरल्यामुळे ‘गँगस्टर’ हीट झाला, पण त्यानं तिच्या जगण्यात काडीचाही फरक पडला नाही. पुढची दीड-दोन वर्षं तिला एकही लायकीचा माणूस भेटला नाही. स्टोरी सिटिंगच्या नावाखाली जे कुणी लाळघोटे, लोचट आले ते सगळे तिला सुपरस्टार बनवून दाखवण्याचं खोटंनाटं प्रॉमिस करणारे होते. तिला गृहीत धरत तिच्याकडे भोगवस्तू म्हणून पाहणारे होते. ‘गँगस्टर’मधल्या बारगर्लच्या रोलच्या बी-ग्रेड, सी-ग्रेड आवृत्त्या त्यांना हव्या होत्या.
लचके तोडणाऱ्या जंगली श्वापदांमध्ये आपण नकळत फसत चालल्याचं तिला जाणवू लागलं होतं. पण म्हटलं तर चूक तिचीही होती. समोरच्याला इम्प्रेस करण्यासाठी छाती आणि मांड्या उघड्या टाकत तोकड्या कपड्यांमध्ये वावरण्यात, जुजबी ओळख असलेल्यांच्या गळ्यात पडण्यात आणि स्वत:चा फायदा दिसताच सर्रास खोटेपणा करण्यात तिला गैर वाटत नव्हतं. हेच फिल्मी दुनियेचे एटिकेट्स आहेत, असा समज तिने करून घेतला होता. ‘गँगस्टर’मुळे मिळालेली ओळख टिकवण्यासाठी काय करायचं नि कुठवर थांबायचं, हेही तिला ठरवत येत नव्हतं.

भानगडबाज आदित्य पंचोलीच्या तावडीत सापडली
हिंदी फिल्म इंडस्ट्रीची एक खासियत आहे. तुम्ही फिल्मी बॅकग्राऊण्डमधून आलात, तर इंडस्ट्री प्रत्येक टप्प्यावर तुमच्या स्वागताला तयार असते. पण जर येणारा आऊटसायडर असेल, तर प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला नागवणारे बोलघेवडे बदमाश दबा धरून बसलेले असतात. अशा दबा धरून बसलेल्यांमध्ये उंचपुरा, घाऱ्यानिळ्या डोळ्यांचा, समोरच्याला झटकन इम्प्रेस करणारा, नट म्हणून कधीच बाराच्या भावात गेलेला राडेबाज आदित्य पंचोलीही होता. पडद्यावरच्या अभिनयापेक्षा त्याची ख्याती सार्वजिनक ठिकाणी दारू पिऊन धिंगाणा घालण्याची, शेजार-पाजाऱ्याशी एवढ्या-तेवढ्यावरून हाणामारी करण्याची, अंडरवर्ल्डमधल्या भाई लोकांशी कॉन्टॅक्ट आहे सांगून लोकांना धमकावण्याची.
नेमकी याच भानगडबाज पंचोलीच्या तावडीत ती सापडली. त्याच्या देखणेपणाला भुलली. त्याच्या प्रेमळ शब्दांपुढे पाघळली. त्याने दिलेल्या उंची भेटवस्तूंनी हिप्नोटाइज होत गेली. मुंबईत कुणीही ओळखीचं नसताना त्याने देऊ केलेल्या मदतीमुळे त्याच्या कह्यात जाण्यावाचून तिच्याकडे पर्याय उरला नाही. जसजसे दिवस सरत गेले, त्याने तिचा ताबा घेतला. ती यातून आपल्या काय फायदा होईल, हे बघत गेली. काही शहाण्यासुरत्यांनी तिला अलर्ट करण्याचा प्रयत्न केला, पण महत्त्वाकांक्षेने पछाडलेल्या तिने कुणाचंही ऐकलं नाही. तो आता तिचा मेंटॉर बनला होता.
क्षणागणिक ती त्याला सरेंडर होत होती. स्वभाव एरवीसुद्धा जगाला फाट्यावर मारण्याचा होता. त्या रेप्युटेशनला जागत आपल्यापेक्षा वयानं 20 वर्षांनी मोठ्या पंचोलीसोबत ती पार्ट्यांना, अवॉर्ड फंक्शनला हातात हात घालून मिरवू लागली. पहाटे-पहाटेपर्यंत पब आणि डिस्कोथेकच्या नशिल्या जगात स्वत:ला बुडवू लागली. पंचोलीसारख्या ठग वृत्तीच्या नटासोबत राहून आपण स्वत:चं खूप मोठं नुकसान करतोय, याचं जराही भान तिला राहिलं नाही. का तर, तिला इंडस्ट्रीत टिकायचं होतं. मोठी स्टार व्हायचं होतं. सगळेच तर कॉम्प्रमाइज करतात; मी केलं तर असं काय मोठं आभाळ कोसळलं, अशा बेफिकीरीत आला दिवस ती साजरा करत होती.
याच दरम्यान, दोघेही पंचोलीच्या मित्राच्या फ्लॅटवर बिनलग्नाचे राहू लागले. पंचोलीने तिला बड्या बॅनर्सचे सिनेमे, नवं घर, असं बरंच काही देण्याचं प्रॉमिस केलं. एवढं करूनही तिच्या वाट्याला बड्या बॅनरच्या ऑफर्स आल्या नाहीत, की सेन्सिबल माणसांनी तिला हाक दिली नाही. त्या दीड-दोन वर्षांच्या काळात दोघांबद्दल काय काय ऐकायला येऊ लागलं. एकदा ती शूटिंगसाठी दक्षिण आफ्रिकेत गेली होती. पंचोली तिच्या सतत संपर्कात होता.
ती त्याच्यावर प्रेमसंदेशांची बरसात करत होती. पण जेव्हा ती घरी परतली, तेव्हा ती झोपेत असताना पंचोलीने तिचा मोबाइल तपासला, त्यात त्याला दुसऱ्या एका नटाला तिने आफ्रिकेतून पाठवलेले प्रेमाचे एसएमएस वाचायला मिळाले. तो चवताळला. त्याने तिला बेदम मारहाण केली. ही घटना फार काळ लपून राहिली नाहीच; पण तिला दारूचं व्यसन जडलंय. ती खूप विक्षिप्त नि व्हायोलंट झालीय. पंचोली तिच्याकडून नाही-नाही ते करवून घेतोय. तिला मारहाण करतोय. सिगरेटचे चटके देतोय. तिला रोल द्या, म्हणत प्रोड्युसरलोकांना दम देतोय.
असं काय काय नंतर तिच्याबद्दल ऐकायला येऊ लागलं. तिच्या आयुष्याने तळ गाठला होता. स्वत:चाच तिरस्कार करत, नशिबाला दोष देत जगण्याची भयंकर अवस्था ती अनुभवत होती. आपलं शरीर आणि मन आपल्या ताब्यात नसल्याची घृणास्पद जाणीव तिला होत होती. तिच्या वागण्या-बोलण्याला धरबंध राहिला नव्हता. पंचोलीसारख्या भंटोल प्रवृत्तीच्या माणसाची सोबत करत असल्यानेच इंडस्ट्रीतलं फारसं कुणी तिच्या संपर्कात येण्याची तसदी घेत नव्हतं.
हे सगळं कमी की काय म्हणून, त्याच काळात तिच्या बहिणीच्या म्हणजेच रंगोलीच्या चेहऱ्यावर कुणा सरफिऱ्याने अॅसिड फेकल्याची घटना घडली होती. आई-बापापासून स्वत:ला तोडलं असलं तरीही शेवटी रक्ताचं म्हणून काही तरी उरतंच. त्यात रंगोली ही धाकटी बहीण. तिच्याशी हिचे चांगले संबंध होते. रंगोली एक-दोनदा मुंबईला सोबत येऊन राहिली होती. तिचीही इच्छा हिच्यासारखं ग्लॅमरच्या दुनियेत नशीब आजमावण्याची.
बहिणीचं ते केविलवाणं रूप बघून ती छाती फुटेस्तोवर रडली. समस्त पुरुष जातीच्या नावाने आकांत करत राहिली. पण एका क्षणी स्वत:ला सावरत धाकट्या बहिणीच्या ट्रीटमेंटची सगळी जबाबदारी स्वत:च्या शिरावर घेण्याचा समजूतदारपणाही तिने दाखवला. जगात आपण एकटेच नाही आहोत, आपल्यापेक्षाही वाईट अवस्थेत जगणारी माणसं आपल्या आसपास आहेत, आपल्यापेक्षा त्यांचं दु:ख खूप मोठं आहे, याची जाणीव आयुष्यात पहिल्यांदा तिला झाली होती. पण पुन्हा एकदा पैशांच्या मदतीसाठी पंचोलीकडेच ती गेली.
तिच्या पुढ्यात काहीही ऑप्शन नव्हता. पंचोलीलाही तिला उपकृत करण्याची म्हणजेच संबंधांत अडकून ठेवण्याची संधी सोडायची नव्हती. बहिणीच्या प्लास्टिक सर्जरीसाठी पंचोलीने लाखभर रुपये देऊ केले. त्या दरम्यान कधीतरी दोघांमध्ये कुठल्याशा कारणावरून खटका उडला. रागाच्या भरात तिने पंचोलीला शिव्यांची लाखोली वाहिली. त्याची औकात काढली. आत्ताच्या आता तुझा फैसला करतो, म्हणत तिला धडा शिकवायला म्हणून पंचोली तिच्या घराजवळ पोहोचला. त्याचा तो राक्षसी अवतार पाहून ती बावरली.
रिक्षातून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागली. तशी याने गेटवरच गाडी थांबावली आणि भर रस्त्यातच तिच्यावर हात उगारत तमाशा सुरू केला. पण, कशीबशी तिने त्यातून स्वत:ची सुटका करून घेतली. यात खरं खोटं तीच जाणे, पण एक मात्र नक्की; तिचा नर्व्हस ब्रेकडाऊन होण्याची वेळ आली होती.

आयुष्य बरबाद झालं, असं वाटत असतानाच ‘फॅशन’ सिनेमाने सावरलं
आयुष्य बरबाद झालं, असं वाटत असतानाच ‘चांदनीबार’वाल्या मधुर भांडारकरने ‘फॅशन’ सिनेमातल्या ड्रग्जच्या आहारी गेलेल्या मॉडेलच्या रोलची तिला ऑफर दिली. थिएटरवाल्या गौडनंतर तिला भेटलेला हा दुसरा भला माणूस. पण पझेसिव्ह पंचोलीनं डोळे वटारले. म्हणाला, वो हरामी है स्साला, माझ्या परवानगीशिवाय हो म्हणायचं नाही. त्या क्षणी तिला तिच्यावर हात उगारणारा बाप आठवला. जास्त नाटक करशील तर पस्तावशील, असं म्हणत ती पुन्हा एकदा चवताळून उठली.
पंचोलीच्या धमक्यांची पर्वा न करता मधुरला “हो’ म्हणाली. पंचोलीने दिलेली तुसडेपणाची वागणूक, सेटवर येऊन तमाशा करण्याची दिलेली धमकी असे सगळे मानसिक-भावनिक ताणतणाव सहन करत पुढे या रोलमध्ये तिने अशी काही जान ओतली की, तिला चक्क ॲक्टिंगचं नॅशनल अवॉर्ड जाहीर झालं. छान नटून-थटून राष्ट्रपतींच्या हस्ते तिने तो पुरस्कार स्वीकारला. कालपरवापर्यंत अंधारात गटांगळ्या खाणारी ती अचानक बऱ्या कारणांसाठी लाइमलाइटमध्ये आली.
काहींनी छद्मीपणानं, रोलसाठी फारशी मेहनत घ्यावी लागली नसणार तिला; ती आहेच ड्रग ॲडिक्ट, असे टोमणे हाणले. ती संतापाने फणफणली. न बोलता केवळ नजरेतून व्यक्त झाली. यू बिच…मी केवळ भूमिका जगलेय. पण समजा मी तशी असले तरीही तुमच्या बापाचं काय जातंय. ड्रग्ज घ्यायला तुमच्याकडे पैसे मागतेय का? मला उचलून घरी न्या म्हणतेय का?
‘फॅशन’ची उदंड चर्चा झाली. तिच्या कामाचं अमाप कौतुक झालं. त्यानंतर काही बड्या बॅनरचे पण कंटेण्टमध्ये यथातथा असलेले सिनेमे तिच्या वाट्याला आले. गाडी थोडीफार रुळावर येत गेली. मधल्या काळात पंचोलीसोबतचा भूतकाळ विसरण्यासाठीच जणू ‘राझ-2’ नावाचा सिनेमा करता करता अध्ययन सुमन नावाच्या वयानं लहान असलेल्या नवशिक्या नटाच्या ती प्रेमात पडली.
कुणी म्हणालं, पंचोलीचं लचांड सोडवण्यासाठी पर्पजफुली ती अध्ययनच्या गळ्यात पडली. नॅशनल अवॉर्ड मिळाल्यानंतर उंचावलेलं स्टेटस सोबत होतं. यशाची थोडी नशाही होती. पुरुषांच्या प्रेमात आजवर तिने अत्याचार-अधिकार सहन केले होते. चुकीचं असलं, तरीही आता ती प्रियकरावर अधिकार गाजवू लागली होती. ती त्याला नोकरासारखं वागवतेय. सगळ्यांसमोर अपमानित करतेय. वारेमाप पैसे उधळायला लावतेय. असं बरंच काही बाहेर येत होतं. इथेसुद्धा खरं-खोटं तीच जाणून होती. कालांतराने हेही प्रेमप्रकरण संपलं.
जी भावना आदित्य आणि तिच्यातल्या संबंधांनंतर तिने व्यक्त केली होती, तशीच भावना आता अध्ययनने बोलून दाखवली होती. तो म्हणाला होता, कंगना ओन्ली नोज हाऊ टु युज, अब्युज अँड थ्रो…या आरोपावर तिची काहीएक प्रतिक्रिया नव्हती… बहुधा ती निरुत्तर झाली होती. किंवा तिला जे खरं आहे ते, स्वत:पुरतंच ठेवायचं होतं.
मधल्या काळात एक-दोन बरे सिनेमे तिच्या वाट्याला आले होते. त्यातल्या ‘तनू वेड्स मनू’ नावाच्या सिनेमाने तिच्यातल्या नटीला आव्हान दिलं होतं. तिनं ते समर्थपणे पेललंही होतं. पण पुन्हा ‘सिंगल’ झाल्यामुळे तिचा जगाकडे आणि जगाचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला होता. तिच्या विक्षिप्त वागण्याच्या कहाण्या पुन्हा बाहेर येऊ लागल्या होत्या. अजय देवगण आणि संजय दत्त यांचा ‘रास्कल्स’ नावाचा भयाण सिनेमा आला होता. या सिनेमात ती हिरॉईनच्या रोलमध्ये होती.
पण, सिनेमाच्या पोस्टरवरून तिला गायब करण्यात आलं होतं. प्रमोशनल इव्हेंट सुरू असताना सर्वांसमक्ष अपमानित करून तिला बाहेर निघून जाणं भाग पाडण्यात आलं होतं. कुणी म्हणालं, अजय देवगणबरोबर झालेला ब्रेकअप तिला महाग पडला होता. पण, यापूर्वीचे वाईट अनुभव गाठीशी असताना ती अजय देवगणच्या प्रेमात कशी पडली होती? अजय देवगणबरोबर अफेअर संपल्यानंतर पेशाने सायन्टिस्ट असलेल्या ब्रिटिश तरुणाच्याही प्रेमात पडल्याचं तिने एका टीव्ही शोमध्ये जाहीर केलं होतं.
सायन्टिस्ट प्रकृतीचा माणूस तिला भेटला कुठे? काय म्हणून तो तिच्या प्रेमात पडला? तिला ओळखणारे लोकही चक्रावून गेले होते यामुळे. बहुधा, सततच्या इनसिक्युरिटीमुळे पुरुषाच्या प्रेमात असणं ही तिची त्या वेळची निकड बनली होती. असं करूनच ती स्वत:ला सिक्युर करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होती.
अर्थात, अपमानाचे, नैराश्याचे अनेक प्रसंग येत असले तरीही याच काळात नॅशनल अवॉर्डमुळे आई-बापाशी असलेला तणाव थोडा निवळला होता. बहिणीच्या अपघातामुळे ती बऱ्यापैकी कुटुंबाजवळ आली होती. स्वत:च्या पलीकडे जाऊन इतरांचाही सहानुभूतीने विचार करू लागली होती. तिकडे मनालीत ‘ती आमची नातेवाईक आहे’ म्हणणाऱ्यांच्या सुरात तिरस्काराऐवजी किंचितसा अभिमान झळकू लागला होता.
भूतकाळात घडलेल्या घटनांबाबत तिच्या मनातली कटुता कमी होऊ लागली होती. तरीही सातत्यपूर्ण यशाची आणि स्वत:च्या क्षमतांची तिला अजूनही खात्री पटत नव्हती. ही खात्री तिला दिली, ‘क्वीन’ आणि ‘रिव्हॉलव्हर रानी’ या ॲक्टिंगच्या बाबतीत पॉवरपॅक्ट ठरलेल्या दोन सिनेमांनी.
स्त्री केंद्रित असलेले हे दोन्ही सिनेमे जणू तिच्यासाठीच लिहिले गेले होते. ज्या पुरुषप्रधान व्यवस्थेचा तिने तोवरच्या आयुष्यात तिरस्कार केला होता, त्या व्यवस्थेबद्दलच्या भिन्न पातळीवरच्या भावनाच नकळत तिच्या व्यक्तिरेखांत रिफ्लेक्ट झाल्या होत्या. रूढी-परंपराना लाथाडून स्वत:च्या शोधात निघालेल्या रानीचं लोभसवाणं रूप बघून तमाम बाया-बापड्या हरखून गेल्या होत्या.
रिव्हॉलव्हर रानीने तिच्यातल्या अभिनय क्षमतांचं प्रछन्न दर्शनच घडवलं होतं. दोन्ही भूमिकांची पट्टी निराळी असली तरीही, एखाद्या तप्त ज्वालामुखीसारखं फुटून तिनं स्वत:ला एक्स्प्रेस करणं लपून राहिलं नव्हतं. ‘क्वीन’मधल्या इंडस्ट्रीच्या भाषेत ‘माइंडब्लोइंग’ कामाचं कौतुक करताना तिला अभिनंदनपर भलामोठा बुके पाठवण्याचा मोह अमिताभ बच्चन नावाच्या महानायकालाही आवरला नव्हता. अमिताभपाठोपाठ ज्यांनी आजवर ती दिसताच रस्ता बदलला होता, नजर फिरवली होती, त्या इंडस्ट्रीतल्या बड्या-बड्या लोकांनी तिची तोंड फाटेस्तोवर स्तुती चालवली होती.
परफॉर्मर ऑफ दि इयर, स्टार ऑफ दि इयर अशा प्रकारे तिचं वर्णन होऊ लागलं होतं. ज्या इंडस्ट्रीने तिला कचऱ्यासारखं दूर लोटलं होतं, तीच इंडस्ट्री ‘क्वीन’मधल्या रानी या तिने केलेल्या कॅरेक्टरचे डायलॉग खुद्द तिनेच लिहिल्याचा शोध लागल्यानंतर तिला डोक्यावर घेऊन नाचू लागली होती. हाडतूड करत तिचा येता-जाता पाणउतारा करणारे येस मॅम… हॅलो मॅम…असे आदबीनं आणि अजिजीनं पेश होऊ लागले होते.

पुरुषप्रधान इंडस्ट्रीत स्वत:च्या हिमतीवर यश मिळवण्याची धमक
विशी-पंचविशीत फार थोड्याच मुलींच्या वाट्याला येणारं तुफान वादळी आयुष्य ती जगली. पण हे वादळ ओसरल्यानंतर एक प्रकारची टवटवीत शांतताही तिच्या वाट्याला आली. तिचं मन स्थिर होऊ लागलं. गतकाळात झालेल्या अक्षम्य चुकांची खंत तिच्या बोलण्यातून व्यक्त होऊ लागली. तिला स्वत:चाच बहुधा नव्याने शोध लागला. पैसा, प्रसिद्धी, लोकप्रियता, रिलेशनशिप यांचे अर्थ बहुधा तिला कणाकणाने उमगू लागले. म्हणूनच आताची ती आणि सात-आठ वर्षांपूर्वीची दिशाहीन फरपटत जाणारी ती, यात जमीन-आस्मानचा फरक दिसू लागला.
पुरुषप्रधान इंडस्ट्रीत स्वत:च्या हिमतीवर यश मिळवण्याची धमक अंगी आल्यामुळे तिच्यातला आत्मविश्वासही थोडाफार वाढला. भूतकाळात घडलेल्या घटना-प्रसंगांकडे क्षमाशीलतेनं बघणं ती शिकली. अंगी क्षमाशीलता आली तशी मनातली असुरिक्षततेची भावनाही थोड्याफार प्रमाणात कमी झाल्याचं तिला वागण्या-बोलण्यावरून जाणवू लागलं. त्यातूनच सिनेमापलीकडचं जगणं समृद्ध करण्यासाठी ओढ म्हणून शूटिंगच्या निमित्ताने पॅरिसमध्ये असताना फावल्या वेळात कुकिंग कोर्स तिने केला होता. त्यानंतर कुणालाही न कळवता अचानक केनियात ट्रेकिंग करण्यासाठी निघून गेली होती.
दुसरी कुणी नटी असती, तर ‘क्वीन’च्या मोठ्या यशानंतर तिने जास्तीत जास्त सिनेमे-जाहिराती कसे मिळवता येतील, लाइमलाइटमध्ये कसं राहता येईल, यासाठी सगळी शक्ती पणाला लावली असती. पण ती हे नाकारून आपल्यातलं रायटिंग स्कील डेव्हलप व्हावं म्हणून तीन महिन्यांचा स्क्रिप्ट राइटिंगचा कोर्स करण्यासाठी थेट न्यूयॉर्कच्या ली स्ट्रसबर्ग फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाली.
खरं तर तोवरचं तिचं सगळं जगणंच अनाकलनीय होतं. ती अमुक प्रसंगी असंच वागेल, हे कुणालाही छातीठोकपणे सांगता येतं नव्हतं. तोच लौकिक तिने यश मिळवल्यानंतरही चांगल्या अर्थाने कायम राखला होता. समाज काय म्हणेल, याची तमा तिने तिच्या पडत्या काळातही केली नव्हती.
आता तर फिल्मी दुनिया तिच्या पुढ्यात नतमस्तक झाली होती. ज्या बँकांनी वाईट रेप्युटेशनमुळे तिला एकेकाळी कर्ज नाकारलं होतं, त्या तिच्या पुढ्यात पायघड्या घालून तयार झाल्या होत्या. पण सुदैव म्हणजे, पन्नास-शंभर गाड्या पदरी बाळगण्याची, जगातल्या प्रत्येक शहरात बंगले घेण्याची बीभत्स स्वप्नं तिला पडली नाहीत. माणसाला जनावराप्रमाणे वागणूक देणाऱ्या मुंबईसारख्या ‘फेक’ शहरांबद्दलचा तिचा दृष्टिकोन अजूनही बदललेला नाही.
इथे रस्त्यावर भिकारी दिसला तर लोक त्याला निर्जीव इमारतीसारखी ट्रीटमेंट देतात आणि इमारतींना माणसांसारखी, हे तिचं ऑब्झर्व्हेशन आहे. तिच्या वयाच्या आणि तिच्याइतकं यश मिळवलेल्या इंडस्ट्रीतल्या बहुसंख्य नट्या जास्तीत जास्त प्रॉपर्टी कशी मिळवता येईल, स्वत:ला लाइमलाइटमध्ये कसं ठेवता येईल, याच्या कॉर्पोरेट स्टाईल योजना आखत असताना ती मात्र मनानं निर्मळ, निरागस असलेल्या माणसांमध्ये म्हणजेच डोंगर-दरीतल्या मनालीत परत जाण्याचं स्वप्न रंगवत आहे. तिथे जाऊन तिला छानसं घर विकत घ्यायचंय. त्या घराला व्हिक्टोरिअन लूक तिला द्यायचाय.
मनसोक्त घोडेस्वारी करायचीय आणि स्किइंगचा मनमुराद आनंदही लुटायचाय. जमलंच तर ऑरगॅनिक शेतीसुद्धा करायचीय. तिला असलेली मुळांची ओढ अनिवार आहे. करिअर ऐन भरात असतानाच तिचं असं हे पैलतीरावर नजर लावणं अनेकांना तिच्या स्वभावाइतकंच अनाकलनीय वाटतंय. पण आता तिच्या प्रायोरिटी बदलल्यात, यात त्यांना शंका वाटत नाहीये.
आईवडलांबद्दल, बहीण-भावाबद्दल ती आताशा खूप भावूक होऊ लागली आहे. स्ट्रगल करताना वडलांनी देऊ केलेले 50 हजार रुपये नाकारून आपण यशात वाटेकरी होण्याचं सुख त्यांना मिळू दिलं नाही, याची बोच तिला सध्या खूप अस्वस्थ करतेय.
ती अंतर्बाह्य बदललीय, असं कुणी छातीठोकपणे म्हणत नसलं तरीही आयुष्याच्या एका टप्प्यावर परिस्थितीच्या रेट्यामुळे कटू-जहाल शब्दांचा मारा होत होता, त्या कोपऱ्यातून आता मवाळ हळवे सूर ऐकू येऊ लागले आहेत. ज्या डोळ्यांपुढे गडद काळोखाशिवाय दुसरं काहीही नव्हतं, त्या डोळ्यांमध्ये आता इतरांचं जगणं सुंदर करणारी चमक आली आहे…






