Skip to main content

शाहू महाराजांचे नाव घेतले की…?

समीर गायकवाड
26 Jun 2024
5 min read
5 views
शाहू महाराजांचे नाव घेतले की…?

शाहू महाराजांचे नाव घेतले की दुर्दैवाने आजही काही लोकांच्या कपाळाला आठ्या पडतात. तर काही लोकांना शाहूंच्या विचाराशी काही देणेघेणे नसते पण उठता बसता शाहूंचे नाव घ्यायला आवडते. तर काहींना शाहूंचे विचार केवळ आरक्षणाच्या अनुषंगाने महान वाटतात, त्या लोकांना शाहू म्हणजे केवळ आरक्षणाचे उद्गाते वाटतात. काही लोकांना शाहू फक्त आपल्या जातीच्या भूषणापायी प्रिय वाटतात! तर काही लोकांना राजकीय सोयीपोटी शाहू जवळचे वाटतात. संपूर्ण शाहू महाराज खूप कमी लोकांच्या पचनी पडतात! शाहूंची पूर्ण माहिती नसतानाही त्यांची भलावण करणारे आणि खाजगीत त्यांच्या नावे बोटे मोडणारे असे दोन्ही प्रकारचे लोक समाजात मोठ्या प्रमाणात आढळतात. कोणत्याही अभिनिवेशाशिवाय मनापासून संपूर्ण शाहू ज्यांच्या मनाला पटले आहेत असे लोक मात्र खूप कमी आढळतात!

आज शाहूंच्या नावाने आपली दुकानदारी चालवणाऱ्या मंडळींना त्यांचा इतिहास आणि त्यांची विचारधारा कितपत माहित असेल हा संशोधनाचा विषय व्हावा अशी परिस्थिती आहे. तरीदेखील आजही अनेकांच्या सामाजिक जाणिवांचे बावनकशी प्रेरणास्त्रोत अशीच शाहूंची आजची ओळख आहे. समतेचे अन बंधुतेचे कागदी गोडवे आजही सर्वत्र गायिले जातात परंतु खरे कार्य करताना नाके मुरडली जातात हा अनुभव आहे, त्यामुळेच शाहूंच्या जन्माला आता दीडशे वर्षे उलटूनही त्यांच्या विचारानुसार समग्र आयुष्यभर तंतोतंत वाटचाल करणारा नेता आजच्या घडीला अस्तित्वात नाही.

आज शाहूंची जयंती! स्वातंत्र्यापूर्वी कैक वर्षे आधी समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, सर्व घटकांना विकासाची समान संधी ही तत्त्वे राजर्षी शाहू महाराजांनी करवीर संस्थानात अमलात आणली. म्हणूनच त्यांचा देशभरात “महाराजांचे महाराज‘ असा गौरव होतो. शाहू महाराजांना “राजर्षी” ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली.राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव असे होते. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यातला. महाराजांनी सुमारे 28 वर्षे राज्यकारभार केला. राजर्षी शाहू राजांना बहुजनांच्या शिक्षणाविषयी फार तळमळ होती. कारण माणसाला पशुत्वापासून मुक्त करत मनुष्यत्व मिळवून देणारे एक प्रभावी अस्त्र म्हणजे शिक्षण होय. त्यामुळे शिक्षणाशिवाय आपला उध्दार होणार नाही असे ते म्हणत. म्हणूनच त्यांनी कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केला. एवढेच नव्हे तर पाचशे ते हजार लोकवस्तीच्या गावांमध्ये शाळांची निर्मित केली. आणि एवढ्यावरही महाराज थांबले नाहीत तर जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्या पालकांना प्रतिमहिना 1 रू. दंड आकरण्याची कायदेशीर तरतूद केली. त्यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले.

अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची दुष्ट पद्धत 1919 मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणार्‍या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणार्‍या, तंत्रे व कौशल्ये शिकवणार्‍या शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले. शाहूराजे हे त्यांच्या कर्तृत्वामुळे नावाप्रमाणेच यशवंत राहिले. छत्रपती शिवरायांच्या विचारांचा व कार्याचा वारसा मोठ्या समर्थपणे घेऊन जाण्याचे कार्य करणारा एक महान मानवतावादी राजा म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी आपली ओळख निर्माण केली. या व्यापक दूरदृष्टीच्या राजाने त्याकाळी राजेशाही असतांनासुध्दा सामाजिक बंधूभाव, समता, दलित व उपेक्षित बांधवांचा उध्दार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला, क्रिडा व आरोग्य इत्यादी महत्वपूर्ण क्षेत्रामध्ये आजच्या लोकशाहीतील शासनालाही करणे शक्य होत नाही. असे अद्वितीय स्वरुपाचे कार्य केले.

ज्या जाती मागासलेल्या समजल्या जात त्यातील लोकांना सकलांच्या विकास प्रवाहात आणावयाचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे. हा व्यापक दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून या निधड्या छातीच्या समाजसुधारकाने 6 जुलै 1902 रोजी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना 50 टक्के जागा राखीव राहतील अशी घोषणा केली. नुसती घोषणा करुन थांबणारे ते राजे नव्हते तर त्वरीत अंमलबजावणी करुन संबंधीत अधिकाऱ्याकडून अहवाल मागविले. शाहूंच्या या निर्णयाला तेंव्हा सामाजिक कार्यकर्ते म्हणवणाऱ्या अनेक उच्चवर्णीय पुढाऱ्यांनी विरोध केला. राजर्षीवर अनेक प्रकारचे आरोप केले. त्यांनी अस्पृश्यांना (त्या काळात अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीच्या) राखीव जागांची तरतूद करून सरकारी नोकर्‍या मिळवून दिल्या. शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी (तत्कालीन) अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला. 1917 साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली.. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी इ.स. 1916 साली निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली.

शाहू महाराज - baimanus

त्यावेळेस धर्मव्यवस्थेने स्त्रियांना अतिशय उपेक्षित ठेवले. त्यांचे हक्क, अधिकार, नाकारले, स्त्री म्हणजे केवळ चूल व मूल या पुरतीच मर्यादित ठेवली त्याकाळी धर्माच्या नावाखाली देवांना मुले-मुली वाहण्याची अतिशय विचित्र पध्दत आपल्या देशात चालू होती. परंतु राजांनी आपल्या संस्थानात जोगत्या-मुरळी प्रतिबंधक कायदा करुन ही पध्दत बंद पाडली. जातीभेदाचे प्रस्थ नष्ट व्हावे म्हणून आपल्या संस्थानात आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहास कायदेशर मान्यता दिली. तसा कायदा पारित केला आणि याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना आपल्या चुलत बहीणीचे लग्न मराठा समाजातील यशवंतराव होळकर यांच्याशी लावून दिले. एवढेच नव्हे तर संस्थानात जवळजवळ शंभर मराठा धनगर विवाह घडवून आणले. अशा अनेक कार्याच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांना सन्मानाची वागणूक व दर्जा मिळवून दिला. या उलट आज एकविसाव्या शतकात आणि लोकशाही शासनव्यवस्थेतही स्त्रीभ्रूणहत्या, हूंडाबळी सारख्या अनेक माध्यमातून स्त्रियांचा मोठ्या प्रमाणात बळी दिला जात आहे. आज स्त्रियांना या संकटातून बाहेर काढावयाचे असेल तर राजर्षी शाहूंचा स्त्रीविषयक व्यापक दृष्टीकोनच आपण स्विकारणे ही काळाची गरज आहे.

तत्कालीन परिस्थितीमध्ये जातीव्यवस्थेची शिकार झालेल्या अनेक जमाती त्या काळात चोऱ्या, दरोडे अशा चुकीच्या मार्गांचा अवलंब करत होत्या. सनातनी वर्णव्यवस्थेने त्यांना उपेक्षित ठेवून शिक्षण, सत्ता व संपत्तीचा अधिकार नाकारला, त्यामुळे त्यांचे जीवन नैराश्यमय झाले. त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी चोऱ्या, दरोड्यांचा मार्ग अवलंबला. त्यामुळे ब्रिटीश सरकारने या जमातीवर गुन्हेगारीचा शिक्का मारला. त्यांना रोज गावकामगाराकडे हजेरी लावावी लागत असे. शाहू राजांना या लोकांविषयी कणव होती. कारण ते खऱ्या अर्थाने वंचितांचे राजे होते. त्यामुळे शाहूंनी हजेरी पध्दत बंद केली. या जाती जमातींच्या लोकांना एकत्रित करुन गुन्हेगारीपासून त्यांना परावृत्त केले. त्यांना संस्थानात नोकऱ्या दिल्या. त्यांच्यातून पहारेकरी, रखवालदार, रथाचे सारथी निर्माण केले. त्यांना घरे बांधून दिली. वनवन भटकणाऱ्या लोकांना राहण्याची सोय झाली. पोटापाण्याची सोय झाली. त्यामुळे गुन्हेगार म्हणून शिक्का बसलेल्या लोकांना माणूस म्हणून समाजात सन्मानाने वावरता येऊ लागले.

शाहू महाराज - baimanus

गुन्हेगारांना शासन करणारा सत्ताधीश सर्वत्र पहायला मिळेल. मात्र त्यांना प्रेमाने, मायेने आपलेसे करुन समाजात सामाजिक दर्जा देणारा व त्यांच्यात स्वाभिमान निर्माण करणारा राजा विरळाच.

वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षी शाहूंच्याच काळात झाला. हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होते. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रेरित झाली. बहुजन, अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. त्यांनी सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले.

‘शाहू छत्रपती स्पिनिंग अँड विव्हिंग मिल’ची स्थापना, शाहुपुरी व्यापारपेठेची स्थापना, गुळाच्या बाजारपेठेची निर्मिती, शेतकर्‍यांच्या सहकारी संस्थांची स्थापना, राधानगरी धरणाची उभारणी, शेतकर्‍यांना कर्जे उपलब्ध करून देणे असे उपक्रम त्यांनी आपल्या संस्थानात राबविले, कमालीचे यशस्वी केले. शेती, उद्योग, सहकार या क्षेत्रांत राजर्षींनी नवनवे प्रयोग केले. शेतीच्या आधुनिकीकरणासाठी त्यांनी संशोधनाला पाठिंबा दिला, नगदी पिके व तंत्रज्ञानाचा वापर वाढण्यासाठी त्यांनी ‘किंग एडवर्ड ॲग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ स्थापन केली.

शाहूराजांनी त्याकाळी पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन राधानगरी नावाचा प्रकल्प उभा केला. जेणेकरून भविष्यात रयतेला दुष्काळाला सामोरे जावे लागणार नाही ही दूरदृष्टी ठेवून राधानगरी धरणाची निर्मिती केली. राजर्षी शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्कार्य केले.

शाहू महाराज - baimanus

महाराजांनी कोल्हापूर, बेळगाव या भागातील स्वातंत्र्यवीरांना वेळोवेळी आर्थिक व इतर मदत केली. शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध सर्वश्रृत आहेत. डॉ. बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ हे साप्ताहिक 31 जानेवारी 1920 ला प्रथम प्रकाशित केले. परंतु आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद पडले. परंतु हे राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ आर्थिक मदत केली.

आज शाहू राजांच्या जयंत्या-पुण्यतिथ्या सर्वत्र साजऱ्या केल्या जातात. परंतु केवळ एवढ्याने त्यांच्या विचार व कार्याचे चिज होणार नाही. शाहूंचा लढा हा समतेसाठी हेाता. आत्मसन्मासाठी होता. वर्णवर्चस्वाच्या अहंकारी प्रवृत्ती विरुध्द होता. आज शाहू राजांच्या नंतर मात्र त्यांचाच जयजयकार करणारे त्यांच्या नावाने सत्ता भोगणारे राज्यकर्ते गरीब प्रजेला छळत आहेत. तर एक वर्ग आजही त्यांच्यावर मनोमन चडफडत असतो. आजघडीला भ्रष्टाचार, गुंडगिरी ह्या प्रवृत्ती फोफावल्या आहेत. शाहू राजेंना फक्त जयंती व पुण्यतिथी पुरते मर्यादित केले गेलेय. त्यांचा वारसा, विचार, कार्य आपण विसरलो आहोत. राजर्षी शाहूंनी प्रतिकूल परिस्थितीत आपल्या संस्थानात जनहितार्थ अनेक कायदे केले. प्रसंगी टीका, अपमान, बदनामी यांची पर्वा केली नाही. आजचे राज्यकर्ते शाहूंच्या नावाने राजकारण करतात. मात्र त्यांचा विचार जपतांना घाबरतात. ही दुर्दैवी बाब आहे….

या महान लोकराजाला जयंतीदिनी अभिवादन…

Share this article
कधीकाळी खेळाडूंच्या कौशल्याचा उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विश्वचषक स्पर्धेचा आर्थिक भूगोल आता बदलतोय
कॉलम

कधीकाळी खेळाडूंच्या कौशल्याचा उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विश्वचषक स्पर्धेचा आर्थिक भूगोल आता बदलतोय

फुटबॉल हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ मानला जातो आणि विश्वचषक ही त्याची सर्वोच्च स्पर्धा. चार वर्षांनी येणारा हा महोत्सव आज केवळ क्रीडा स्पर्धा राहिलेला नाही. एकेकाळी खेळाडूंच्या कौशल्याचा आणि राष्ट्रीय अभिमानाचा उत्सव म्हणून ओळखली जाणारी विश्वचषक स्पर्धा आज अब्जावधी डॉलरची उलाढाल करणारा जागतिक उद्योग बनली आहे. नव्या खेळाडूंचा उदय आणि तंत्रज्ञानाच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे स्पर्धेचे स्वरूपही झपाट्याने बदलत आहे. या बदलांचा विचार करताना विश्वचषकाच्या यशाबरोबरच त्याच्या आव्हानांचाही परामर्श घेणे आवश्यक ठरते.

6 min read
B
Bhaga Warkhade
 पंतप्रधानांच्या ‘राष्ट्रीय त्यागा’ची भाषा आणि धोरणांची गप्पी…
कॉलम

पंतप्रधानांच्या ‘राष्ट्रीय त्यागा’ची भाषा आणि धोरणांची गप्पी…

पंतप्रधानांच्या ‘राष्ट्रीय त्यागा’च्या आवाहनात एक महत्त्वाचा प्रश्न गायब आहे तो म्हणजे भारत दरवर्षी अब्जावधी डॉलर्स खाद्यतेल आयातीवर का खर्च करतो? १९९० नंतरच्या धोरणांनी भारताची स्वयंपूर्ण तेलबिया अर्थव्यवस्था कशी मोडली आणि त्याची किंमत आज महाराष्ट्रातील शेतकरी कशी मोजतो आहे? सोयाबीनच्या पडत्या भावापासून ते हवामान बदलामुळे वाढलेल्या रोगराईपर्यंत, ग्रामीण भारत एका दुहेरी संकटात अडकला आहे. ‘त्याग’ नागरिकांनी करायचा, पण धोरणात्मक ‘खोडा’कडे पाहायचं नाही, हीच आजच्या अर्थव्यवस्थेची मोठी शोकांतिका आहे.

4 min read
G
Girish Patil
सलग 11 दिवस अन् न थांबता 13 हजार मैल उडणारा गॉडविट पक्षी…
कॉलम

सलग 11 दिवस अन् न थांबता 13 हजार मैल उडणारा गॉडविट पक्षी…

गॉडविट पक्षी, वजन किती? फार तर सहाशे ग्रॅम… ऑक्टोबर महिन्याच्या १३ तारखेला पहाटे पाच वाजून १० मिनिटांनी अलास्कावरून निघतो. १३ हजार किलोमीटर कुठंही न थांबता उडतो उडतो उडतो आणि २४ ऑक्टोबरला पहाटे चार वाजून ५५ मिनिटांनी टास्मानियात पोचतो.

4 min read
N
Nilu Damle
Why Climate Action in India Needs Culture to Succeed
Column

Why Climate Action in India Needs Culture to Succeed

While scientific reports and finance frameworks drive formal climate policy, they often fail to connect with the lived realities of local communities. From stand-up comedy about Mumbai’s air pollution to multilingual rap and local folk traditions, culture is emerging as the "behavioral public infrastructure" needed to translate complex data into emotional engagement and collective action.

6 min read
S
Sanjiv Gopal and Brikesh Singh
 एखाद्या देशात चक्क उंदराचा पुतळा का उभारण्यात येतो…?
कॉलम

एखाद्या देशात चक्क उंदराचा पुतळा का उभारण्यात येतो…?

सुरुंग आणि स्फोटकं शोधून हजारो लोकांचे प्राण वाचवणाऱ्या 'मागवा' नावाच्या उंदराचा आता कंबोडियामध्ये पुतळा बसवण्यात येणार आहे. मागवा उंदीर स्फोटकांचा वास सव्वीस पटीने अधिक वेगाने घेऊ शकत होता. त्याला तसे खास प्रशिक्षण देण्यात आले होते. पाच वर्षांपूवी त्याचे निधन झाले. या कामगिरीसाठी मागावाला कंबोडिया सरकारने सुवर्ण पदकही दिले होते.

5 min read
N
Nilu Damle
प्रगतीच्या शिखरावर पोहोचलेलं अमेरिका, पण शस्त्रांच्या सावलीत जगणारं असुरक्षित समाजजीवन
कॉलम

प्रगतीच्या शिखरावर पोहोचलेलं अमेरिका, पण शस्त्रांच्या सावलीत जगणारं असुरक्षित समाजजीवन

- अमेरिका हे जगातील सर्वात शक्तिशाली आणि समृद्ध राष्ट्रांपैकी एक असून, आर्थिक प्रगती, तंत्रज्ञान आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यासाठी ओळखले जाते. - मात्र या तेजस्वी प्रतिमेमागे व्यक्तिगत शस्त्रास्त्रांचा वाढता वापर आणि त्यातून होणाऱ्या हत्या हे एक गंभीर वास्तव दडलेले आहे. - ही समस्या केवळ अमेरिकेपुरती मर्यादित नसून, जागतिक चिंतेचा विषय बनली असून भारतासह इतर देशांसाठीही अभ्यासाचा मुद्दा ठरत आहे.

4 min read
B
Bhaga Warkhade

Comments

Comments are currently disabled or loading...