शोनाली समर्थ
- क्विअर व्यक्तींना पार्टनर किंवा मित्र शोधण्यासाठी घ्यावा लागतो डेटिंग अॅप्सचा आधार
- मात्र अशा अॅप्सच्या सहाय्याने लैंगिक शोषण, ब्लॅकमेलिंग, फसवणूक, लूट अशा घटना समोर आल्या आहेत.
- क्वियर डेटींग अॅप, ग्रिंडरचा बेकायदेशीर उपयोग आणि त्यातली आव्हाने काय आहेत?
असं म्हणतात प्रेमाची भावना ही सजीवांना मिळालेली निसर्गाची मोठी देणगी आहे. प्रेम माणसाचं आयुष्य खोलवर बदलून टाकतं. प्रेमामुळे मन निरोगी राहायला मदत होते. माणसांमधलं नातं अधिक घट्ट होतात. आपलं कुणी ऐकून घेणारं आहे, समजून घेणारं आहे, ही भावना आपल्याला आतून बळ देते. कठीण काळातही व्यक्तीला तग धरायची ताकद मिळते, कारण प्रेम आपल्याला सावरून धरतं आणि ह्याने आयुष्य अधिक अर्थपूर्ण वाटू लागतं. मग हेच प्रेम धर्म, रंग, जात, वंश आणि “लिंग” ह्याची तमा न बाळगता प्रत्येकालाच भेटावं असं तुम्हाला नाही वाटत का?
२०१८ मधील एका सर्वेक्षणानुसार, १६–२४ वयोगटातील ४०% तरुण स्वतःला एकटं असल्याचे मानतात. ज्यांच्याशी त्यांची “वाइब” जुळत नाही म्हणजेच विचार, आवड-निवड जुळत नाही अशा लोकांपासून ते अंतर राखतात. जवळजवळ सर्वच क्विअर (LGBTQIA समुदायातले व्यक्ती) असं सांगतात की, कॉलेज किंवा कामाच्या ठिकाणी त्यांना स्वीकारणारे, समजून घेणारे लोक मिळणं फारच कठीण बाब आहे. त्यामुळे त्यांना इतरांमध्ये सहज मिसळण्यास भीती वाटते. म्हणूनच आपल्या वाइबचे लोक शोधण्यासाठी इंटरनेट आणि सोशल मीडिया हेच त्यांना सर्वात योग्य माध्यम वाटतं.
लोकांना आपल्या पसंतीचे व्यक्ती शोधता यावेत यासाठी इंटरनेटवर अनेक अॅप्स आणि वेबसाइट्स तयार करण्यात आल्या आहेत, ज्यांना डेटिंग अॅप्स असं म्हणतात. या अॅप्सवर आपण रोमँटिक पार्टनर, जीवनसाथी किंवा मित्रही शोधू शकतो.

तिरस्कार आणि अवहेलनेच्या भीतीमुळे अनेक क्विअर व्यक्ती आपली ओळख समाजासमोर स्वीकारू शकत नाहीत. सामाजिक भेदभावाच्या भीतीने ते आपली ओळखच नव्हे तर भावना देखील लपवून ठेवतात. कॉलेज किंवा कार्यस्थळी असताना क्विअर व्यक्तींना पार्टनर मिळणं फारच कठीण जातं. समोरचा व्यक्ती अनेकदा क्विअर व्यक्तींमध्ये आकर्षित नसतो, आणि जरी असला तरी समाजासमोर ते आकर्षण स्वीकारण्यास तो असमर्थ असतो. अशा परिस्थितीत क्विअर व्यक्तींना पार्टनर किंवा मित्र शोधण्यासाठी डेटिंग अॅप्सचाच आधार घ्यावा लागतो. अनेक डेटिंग अॅप्स खास क्विअर व्यक्तींसाठी तयार करण्यात आले आहेत, जेणेकरून आपल्यासारख्या लोकांना शोधणे सोपे जावे.
मात्र काही लोक याचा आपल्या स्वार्थासाठी दुरूपयोग करत आहेत. अॅप्सच्या सहाय्याने लैंगिक शोषण, ब्लॅकमेलिंग, फसवणूक, लूट अशा घटना समोर आल्या आहेत. अॅप्सवर खोटी प्रोफाईल्स तयार करून लोकांची खासगी माहिती गोळा करून त्यांना ब्लॅकमेल करणं ही गंभीर समस्या आहे. अनेकदा हे लोक भावनिक आणि आर्थिक शोषण करतात. काही वेळेस पुरुषांकडून क्वियर लोकांवर हल्ले झाल्याच्या घटनाही आहेत. त्यामुळे या समुदायाला दुहेरी आव्हानांचा सामना करावा लागतो आहे. एकीकडे सामाजिक भेदभावाचा दबाव की त्यांची ओळख सार्वजनिक तर होणार नाही. आणि दुसरं म्हणजे अशा घटना ज्यात ते कायद्याचा आधार घ्यायलाही कचरतात.
अॅब्यूज आणि बुलिंग करून क्विअर प्रोफाइल्स रिपोर्ट करणे
‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या एका सर्वेक्षण अहवालानुसार, सर्वेक्षणाला उत्तर देणाऱ्या एकूण 133 क्विअर लोकांपैकी 94 जणांनी क्विअर डेटिंग अॅप्सवर मानसिक आणि शारीरिक हिंसा होत असल्याचे सांगितले. यापैकी 64 जणांनी डेटिंग अॅप्स वापरत असताना किमान एकदा तरी अशा हिंसेचा अनुभव घेतला आहे. यातील निम्म्याहून अधिक लोकांनी ही गोष्ट कोणाशीही शेअर करण्याची हिंमत केली नाही.
22 वर्षांची रेशम (गोपनीयतेसाठी नाव बदलले आहे) ही एक ट्रान्स मुलगी आहे, जी एका विद्यापीठातून उच्च शिक्षण घेत आहे. कॉलेजच्या तीन वर्षांत रेशमला तिच्या लैंगिक ओळखीमुळे कायम एकटे वाटत होते. ट्रान्स महिला असल्यामुळे तिचे फारसे मित्र नव्हते, जे होते ते ही फक्त नावापुरते. त्यामुळे कॉलेजमध्ये एखादा मुलगा तिच्यावर प्रेम करेल, ही अपेक्षाही तिच्या मनातून निघून गेली होती. आपल्या वयाच्या मित्र-मैत्रीणींना त्यांच्या प्रिय व्यक्तीं सोबत पाहून रेशमनेही डेटिंग अॅप्सवर आपल्यासाठी ही कोणीतरी असेलच हया आशेने, साथीदार शोधण्यास सुरुवात केली.
संबंधित लेख वाचा:
‘’तुम्ही दबाव टाकता म्हणून आम्ही आमची लैंगिक ओळख का उघड करायची? तसं केलं तर आमचं जगणंच मुश्कील होईल…’’
रेशमला अनेक मुलांचे मेसेज येऊ लागले, त्यामुळे ती आनंदी होती. पण जवळजवळ सर्वच मुलांना ती ट्रान्स महिला आहे, हे कळल्यानंतर त्यांनी तिला अॅब्यूज करायला सुरुवात केली. तिच्या लैंगिक ओळखीवर विचित्र आणि असहिष्णू प्रश्न विचारले गेले. घाणेरड्या शिव्या आणि कमेंट्स करून तिला ब्लॉक केले गेले. अवघ्या पाच दिवसांतच टिंडरने तिचे प्रोफाइल कायमचे बॅन केले. कारण ती ट्रान्स महिला असल्यामुळे अनेक मुलांनी तिचे प्रोफाइल जाणीवपूर्वक ‘फॉल्स आयडेंटिटी’ म्हणून रिपोर्ट केले होते. टिंडरच्या कडक पॉलिसी आणि सिक्युरिटीमुळे तिचे प्रोफाइल कायमचे बंद करण्यात आले. आता हे अॅप्स ती पुन्हा वापरू शकत नाही.
‘बाईमाणूस’शी बोलताना ती पुढे सांगते की, हे फक्त तिच्याच बाबतीत झालेले नसून इतर क्विअर लोकांशी बोलताना त्यांनाही हाच अनुभव आल्याचे तिने सांगितले. त्यांच्या क्विअर असण्यामुळे अनेकांनी त्यांच्या टिंडर आयडीज रिपोर्ट केल्या आणि त्या कायमच्या बॅन झाल्या. क्विअर समुदायासाठी आधीच आजूबाजूला, कॉलेज आणि ऑफिसमध्ये साथी शोधणे कठीण असते. त्यामुळे डेटिंग अॅप्स हा त्यांच्यासाठी एकमेव आधार उरतो. पण समाजातील काही लोक आपल्या अंतर्गत बायसेसमुळे त्यांच्या प्रोफाईल्स रिपोर्ट करून बॅन करून टाकतात. क्विअर व्यक्तींना आयुष्यात साथी मिळायचा की नाही, हा निर्णयही आता समाजच घेणार का?
ट्रान्स महिलांच्या माध्यमातून ‘सिसजेंडर’ महिलांचा शोध
रविना ही एक ट्रान्स महिला आहे. अलीकडेच ती काही कामानिमित्त पुण्यात आपल्या मैत्रिणीकडे राहायला आली होती. पुणे फिरण्यासाठी तिने ‘बंबल’ अॅपवर एखाद्या साथीचा शोध घेतला. तिला एक मॅच मिळाला. काही दिवस गप्पा झाल्यानंतर त्यांनी एका सार्वजनिक ठिकाणी भेटायचे ठरवले. रविनाने त्या मुलाला आधीच आपण ट्रान्स महिला असल्याची माहिती दिली होती. त्याच्याशी बोलताना तिने सांगितले की ती पुण्याची नसून कामानिमित्त इथे आली असून मैत्रिणीकडे राहते आहे.

जेव्हा रविना त्या मुलाला भेटली, तेव्हा तो फारच गप्प होता आणि स्पष्टपणे त्याला रविनामध्ये कोणताही रस नसल्याचे दिसत होते. तिच्याशी फारसे न बोलता त्याने थेट तिच्या सिसजेंडर(फिमेल) मैत्रिणींना भेटवण्याची मागणी केली. हे ऐकून रविना चकित झाली. तिने त्यामागचे कारण विचारले असता तो म्हणाला,
“तुझ्या नॉर्मल मैत्रिणी असतीलच ना पुण्यात?, त्यांच्याशी भेट घडवून दे. किमान त्यांचे चेहरे तरी पाहायला मिळतील.”
रविनाने नकार दिल्यावर काही वेळातच तो मुलगा काहीतरी कारण सांगून तिथून “नौ दो ग्यारह” झाला.
इतर क्विअर लोकांशी या विषयावर बोलताना त्यांनी सांगितले की, बंबल-टिंडर सारख्या अॅप्सवर जिथे क्वियर नसलेल्या लोकांची संख्या जास्त आहे, तिथे अशा घटना सामान्य आहेत. तसेच आता क्विअर डेटिंग अॅप्सवरही या घटना वाढत आहेत.
क्विअर डेटिंग अॅप्सवर ब्लॅकमेलिंग आणि गँगरेपच्या धमक्या
ग्राइंडर, ब्लूड आणि प्लॅनेट-रोमियो ही LGBTQI डेटिंग अॅप्स आहेत, जी मुख्यतः समलैंगिक “पुरुषांसाठी” तयार करण्यात आली आहेत. मात्र ट्रान्स व्यक्तींसाठी स्वतंत्र डेटिंग अॅप्स नसल्यामुळे त्या देखील पार्टनर शोधण्यासाठी हीच अॅप्स वापरतात. कदाचित तुम्हाला वाटेल की, ही अॅप्स क्विअर लोकांसाठी ‘सेफ स्पेस’ असतील, जिथे प्रत्येकजण मोकळेपणाने आपल्या लैंगिकतेचा स्वीकार करत असेल, पण वास्तव मात्र याच्या अगदी उलट आहे.
ग्राइंडर सारख्या अॅप्सवर “गर्लिश हेट” खूपच सामान्य झाली आहे. याचा अर्थ असा की गे व्यक्तींनी स्त्रीसदृश वागणूक दाखवल्यास त्यांना मर्दानी पुरुषांकडून तिरस्कार सहन करावा लागतो. जरी हे “मर्दानी” पुरुष एका गे अॅप्स वापरत असले तरीही... ह्यांच्या अनेक प्रोफाइल्सवर “No Girlish, No Feminine Allowed” असे ठळक अक्षरांत लिहिलेले दिसते.
महाराष्ट्रातील समलैंगिक पुरुष किरण आपल्या ग्राइंडरच्या अनुभवांबद्दल ‘बाईमाणूस’शी बोलताना सांगतात,
“या अॅपवर 90 टक्के लोक फक्त शारीरिक संबंधांमध्येच रस घेतात. इथे बहुतांश लोकांना मुली मिळत नाहीत म्हणून ते पुरुषांबरोबर शारीरिक संबंध ठेवण्यात रस दाखवतात. या अॅप्सवर डेट म्हणजे कुठेतरी जाऊन शारीरिक संबंध ठेवणे, इतकेच. क्वचितच लोक खऱ्या अर्थाने मैत्री किंवा नातेसंबंध ठेवू इच्छितात. मोठ्या शहरांमध्ये कदाचित या अॅप्सवरून मित्र मिळू शकतो, पण ग्रामीण किंवा लहान शहरांमध्ये हे अॅप्स फक्त शारीरिक संबंधांसाठीच वापरले जातात.”
एक ट्रान्स महिला आपल्या ग्राइंडरच्या अनुभवांबद्दल सांगते,
“मी एका लहान शहरात राहते, त्यामुळे प्रोफाइलच्या लोकेशनवरून घराचा पत्ता ओळखणे सोपे असते. ग्राइंडरवर एका व्यक्तीशी चॅट करताना आम्ही एकमेकांशी फोटो शेअर केले, पण काही कारणामुळे पुढे संवाद वाढला नाही. एक दिवस आम्ही सहज एकमेकांना कुठेतरी रस्त्यावर बघितलं. थोड्याच वेळात मला त्याचा ग्राइंडरवर मेसेज आला, ज्यात तो माझ्याकडे सेक्ससाठी मागणी करत होता. मी नकार दिल्यावर त्याने मला धमकी दिली की, जर मी त्याला स्वेच्छेने भेटले नाही तर तो माझ्यावर जबरदस्तीने शारीरिक अत्याचार करेल आणि त्यात तो आपल्या मित्रांनाही सामील करेल. या विचारानेच माझा थरकाप उडाला. तेव्हापासून मी ग्राइंडर किंवा कोणतेही इतर क्विअर डेटिंग अॅप वापरणे बंद केले आहे. या घटनेनंतर मी इतकी घाबरले होते की एकटीने घराबाहेर पडणेही कठीण झाले होते. सतत भीती वाटायची की तो कधीही अचानक समोर येईल आणि माझ्याशी काहीतरी चुकीचे करेल.हया भीतीतून बाहेर यायला मला अनेक वर्षे लागली.”
ती पुढे सांगते की, क्विअर डेटिंग अॅप्सवर समलैंगिक पुरुषांमध्ये मोठ्या प्रमाणावर ट्रान्सफोबिया आहे, ज्यामुळे ट्रान्स व्यक्तींना या अॅप्सवरही सकारात्मक मैत्री किंवा नात्याची अपेक्षा सोडावी लागते.

क्वियर डेटींग अॅप, ग्रिंडरचा बेकायदेशीर उपयोग आणि त्यातली आव्हाने
ग्रिंडर आणि यासारख्या अन्य डेटींग अॅपच्या दुरूपयोगावर काही उपाययोजना केल्या जाऊ शकतात. त्यासाठी एक सर्वसमावेशक दृष्टीकोन स्वीकारावा लागेल. आधी तर सरकारी आणि नियामक संस्थांकडून यासंदर्भात सविस्तर दिशानिर्देश तयार करावे लागतील. ठराविक कालावधीच्या आत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणं आणि आरोपींना शिक्षा देणं निश्चित करावं लागेल. दुसरं म्हणजे ग्रिंडरसहीत अन्य सर्वच डेटींग अॅप्सना आपल्या उपयोगकर्त्यांच्या खासगीपणाची आणि सुरक्षेची जबाबदारी घ्यावी लागेल. संशयीत लोकांना शोधणं, त्यांना थांबवणं यासाठी अॅप तांत्रिकदृष्ट्या अधिक सक्षम करणं गरजेचं आहे. अशी अॅप्स वापरताना काही काळजी घेतली तर पुढच्या अनेक गोष्टी टाळता येऊ शकतात. उदा. प्रत्येक प्रोफाईल काळजीपूर्वक तपासणं.
आपली खासगी माहिती, उदा. मोबाईल नंबर, बँक अकाऊंट नंबर, पत्ता न देणं. दिली तरी योग्य व्यक्तीलाच ती दिली आहे याची सावधगिरी बाळगणं. प्रत्यक्ष भेटीसाठी सार्वजनिक स्थळाची निवड करणं. ज्यामुळे संभाव्य धोका टाळता येईल. कोणताही वाईट अनुभव आल्यास त्याची पोलिसांना माहिती देणं गरजेचं आहे. ज्यामुळे वेळेत योग्य कारवाई होऊ शकेल. याशिवाय क्वियर समुदायाला सामाजिक मान्यता व स्वीकृती देण्याची गरज आहे ज्यामुळे त्यांना आपली ओळख लपवण्याची गरजच भासणार नाही. याशिवाय मोठ्या प्रमाणात जनजागृतीची गरज आहे. यासाठी मुलं, तरुण मंडळी, पालक, शिक्षक यांना डेटींग अॅपची माहिती आणि त्यातील संभाव्य धोके यांची माहिती देणं, तसेच वापरकर्त्यांना याविषयी बोलायला प्रोत्साहन देणं. एलजीबीटीक्यू समुदायाला फक्त ऑनलाईनच नाही तर समाजातही त्यांचे अधिकार आणि सुरक्षा मिळायला हवी आणि त्यासाठी समाज, तंत्रज्ञान, सरकार या सर्व स्तरांवर प्रामाणिक प्रयत्न होण्याची गरज आहे.
आपण अशा जगात राहतो जिथे बहुतेक लोक क्विअर व्यक्तींना आपल्यासारखे समजत नाहीत किंवा त्यांना अपेक्षित प्रेम आणि आपुलकी देत नाहीत. परिणामी, त्यांच्यासाठी ऑनलाइन डेटिंगच्या जगात येणे अधिक सोपे वाटते. प्रत्येकालाच वाटते की आयुष्यात आपलाही कुणीतरी असावा जो आपल्याला समजून घेईल, चांगल्या-वाईट काळात साथ देईल, ज्याच्यासमोर आपण जसे आहोत तसे राहू शकू, मोकळेपणाने जगू शकू, आणि जो आपला कधीच तिरस्कार करणार नाही. पण LGBTQIA समुदायातील व्यक्तींसाठी असे साथी शोधणे खरोखरच खूप कठीण असते. अशी आशा आहे की प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात आदर आणि प्रेम मिळो.






