- संजना खंडारे
लव्ह जिहाद… हा शब्द प्रयोग हिंदुत्ववादी संघटना आणि भाजपकडून प्रामुख्याने वापरला जातो. 'हिंदू मुलींची फसवणूक करून मुस्लीम मुलं त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवतात आणि लग्न करून धर्मांतर करण्यास भाग पाडतात,' असा काही संघटना आणि भाजपचा दावा आहे. यालाच ते 'लव्ह-जिहाद' असं म्हणतात.
लव्ह-जिहादनंतर 'लँड-जिहाद' असा नवीन शब्दप्रयोग चर्चेत आहे. ज्या प्रमाणे हिंदू मुलींची फसवणूक करून लव्ह जिहादच्या माध्यमातून त्यांचं धर्मांतर केलं जातं. याच धर्तीवर सार्वजनिक आणि सरकारी जमिनींवरही आता मुस्लीम समाजातील लोकांकडून अतिक्रमण केलं जात असल्याचा दावा काही हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे.
लव्ह जिहाद आणि लँड जिहादनंतर आता आणखी एक नवा शब्दप्रयोग हिंदुत्ववादी संघटनांनी जन्माला घातला आहे, तो म्हणजे ‘किन्नर जिहाद’...किन्नर म्हणजे तृतीयपंथी (पारलिंगी) किंवा हिजडा समुदाय… आणि हिंदुत्ववादी संघटनांनी केलेल्या दाव्यानुसार ‘किन्नर जिहाद’ म्हणजे मुस्लिम किन्नरांकडून हिंदू किन्नरांचे जबरदस्तीने केले जाणारे धर्मांतरण… आता तर किन्नर जिहाद हा मुद्दा इतका तापलाय की त्याची दखल थेट पंतप्रधान कार्यालयाने घ्यायला सुरूवात केली आहे.
‘किन्नर जिहाद’ हा नेमका काय प्रकार आहे?
‘किन्नर जिहाद’ प्रकरण चर्चेला येण्यामागे मध्यप्रदेशच्या इंदूर शहरात नुकतीच घडलेली एक घटना कारणीभूत ठरली. दोन दिवसांपूर्वी इंदूर शहरात तृतीयपंथीयांच्या दोन गटांमध्ये वाद झाल्याची घटना घडली. एका हिंदू तृतीयपंथीय समूहाने मु्स्लिम तृतीयपंथीयांवर धर्मांतर आणि एचआयव्ही संक्रमण पसरवल्याचा आरोप केला आहे.
या प्रकरणात ‘सपना गुरु’ नावाच्या एका हिंदू तृतीयपंथीयाने पोलीस तक्रार दाखल केली असून आपल्या तक्रारीत सपनाने मालेगावहून आलेल्या मुस्लिम तृतीयपंथीयांनी जवळपास 60 हिंदू तृतीयपंथीयांना एचआयव्ही बाधित केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची तक्रार पोलीस आयुक्त आणि पंतप्रधान कार्यालयापर्यंत गेली आहे.
भितीमुळे अनेक तृतीयपंथीयांनी त्यांचा ठावठिकाणा बदलल्याचे सपना गुरुने सांगितले. काही तृतीयपंथीय दबावाखाली येऊन भीतीपोटी आरोपींच्या गटात सहभागी झाले. जवळपास 12 एचआयव्ही बाधित तृतीयपंथीयांवर एमवाय रुग्णालयातील एआरटी सेंटरमध्ये उपचार सुरु असल्याची माहिती सपनाने दिली.
या प्रकरणाची तक्रार सरन्यायाधीश, पंतप्रधान कार्यालय मुख्यमंत्री कार्यालय, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांकडे देण्यात आल्याचे सपना गुरुचे वकील सचिन सोनकर यांनी सांगितले. सोनकर यांनी या प्रकरणातील पुरावे म्हणून व्हिडीओ सुपूर्द केले आहेत. ‘किन्नर जिहाद’च्या अंतर्गत जवळपास 100 मुस्लिम तृतीयपंथीय इंदूरमध्ये फिरत असल्याचा दावा त्यांनी केला.
तृतीयपंथीयांच्या गटांमधील वाद पोलीस ठाण्यात पोहोचला. तेव्हा पोलिसांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. आपल्याला धमकावून धर्मांतर करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप सपनाने केला. '2000 साली पायल नावाचा तृतीयपंथीय मालेगावहून पळून इंदूरला आला. मालेगावात त्याची पत्नी आणि मुलं आहेत. तो इथे आल्यावर इंदूरमधील हिंदू तृतीयपंथीयांचे धर्मांतर सुरु झालं. सीमा हाजीने जबरदस्तीनं त्याला हजला पाठवलं,' असा दावा सपनाने केला.
(इंदूर शहरात मुस्लिम किन्नरांनी हिंदू किन्नरांचे जबरदस्ती धर्मांतरण केल्याने पोलीस तक्रार करण्यात आली.)
|
|
मुस्लिम किन्नर विरुद्ध हिंदू किन्नर असा वाद का वाढतोय?
मुस्लिम किन्नर विरुद्ध हिंदू किन्नर हा वाद प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळ्यापासून सुरू झाला आहे. या वादाला खतपाणी घालण्याचे काम पहिली किन्नर जगद्गुरु हिमांगी सखी करत आहे. या प्रकरणारवर तृतीयपंथी समाजाच्या कार्यकर्त्या आणि कवी दिशा पिंकी शेख यांच्याशी ‘बाईमाणूस’ने संपर्क साधला. त्या म्हणाल्या की,
"आपण सगळ्यांनीच लहानपणी दोन मांजरीची गोष्ट ऐकली आहे. त्या आपापसात भांडत असतात आणि माकड येऊन म्हणतो की मी तुम्हाला दोन वाटा करून देतो. मालेगाव प्रकरण त्याच पद्धतीचं आहे. जर 60 लोकांना एचआयव्ही होतो.. तर ज्यांना झाला आहे त्यातील कोणीच काही आतापर्यंत का बोलले नाही? किमान त्या त्यांच्या काऊन्सलरशी तरी बोलल्या असत्या, मेडिकल चेकअपसाठी गेल्या तेव्हा काही बोलल्या असत्या.. मात्र हे प्रकरण आता का वर येतंय? याला हिंदू-मुस्लिमची किनार का आहे?
मला असं वाटतं की, या दृष्टीकोनातून विचार केला पाहिजे. कारण, सगळ्यांना माहित आहे आज देशभरात सध्या काय वातावरण सुरू आहे. त्या वातावरणाचा फायदा घेत वैयक्तिक वैर, हेवे-दावे चव्हाट्यावर मांडले जात आहे. मी म्हणत नाही कुणीतरी बरोबर आहे किंवा कोणीतरी चुकीचा आहे. त्यांच्यात वाद असू शकतात. वाद कुठल्याही व्यक्तीमध्ये असू शकतात.
उद्या माझं मैत्रिणीशी भांडण झालं त्या व्यक्तीचं आडनाव पाटील माझं आडनाव शेख… मग मी आमच्या वैयक्तिक भांडणाचे रुपांदर हिंदू-मुस्लिममध्ये करायचं का? देशात एकंदर जे राजकारण पेटले त्याच्यामुळे प्रत्येक वैयक्तिक वादाला सुद्धा धार्मिक अँगलने बघितलं जात आहे, असे दिशा पिंकी शेख म्हणाल्या.
( किन्नर आखाड्याचे नेतृत्व करणारी लक्ष्मीनारायण त्रिपाठी )
किन्नराची ही धर्माच्या आड वर्चस्वाची लढाई आहे - दिशा पिंकी शेख
कोणत्याही गोष्टीच्या पुढे ‘जिहाद’ लावलं तर मुख्य समस्यापासून दूर होऊन आपण एका धार्मिक वादात अडकतो. त्यामागे शोषण, रोजगार, हिजड्यांची एकूण भारतातील परिस्थिती हे सगळं लपवण्यासाठी जिहाद हा शब्दप्रयोग करण्यात येत आहे. यामुळे हिजड्यांचे सगळे प्रश्न यामुळे बाजूला पडतील आणि धर्माचा मुद्दा वर येईल.
आज एकही ट्रान्स एज्युकेशनसाठी आंदोलन सुरु नाहीये, ट्रान्स पॉलिसी साठी आंदोलन सुरु नाही, किंवा आताच वाद हा ट्रान्सजेंडरच्या डेव्हलपमेंट साठीचा नाहीये तर, भीक मागण्याच्या ज्या आपल्या पारंपरिक जागा आहेत त्यावर कोणाचा हक्क आहे हे सिद्ध करण्यासाठी आहे आणि एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी धर्माचं माध्यम वापरलं गेलंय. त्यांना माहित आहे की, हे माध्यम वापरलं तर समाजामधून पाठिंबा मिळेल.
धार्मिक द्वेषाचा सद्यस्थितीचा फायदा घेत अनेक लोक याचा स्वहितासाठी वापर करतात. त्यातून स्वतःला लोकप्रिय बनवण्यासाठी आणि स्वतःचा हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करताहेत एवढंच त्या मागचं कारण आहे. ही धार्मिक लढाई नाही तर धर्माच्या आड वर्चस्वाची लढाई आहे, असे मत दिशा पिंकी शेख यांनी मांडले.
अलीकडच्या काळात किन्नर समाज जुनेच रीतीरिवाज व प्रथापरंपरा स्वीकारताना दिसत आहे. किंबहुना त्यासाठी तो थोडा आक्रमकही होताना दिसत आहे. किन्नरांचं नेतृत्व करणाऱ्या लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांच्यापासून हा पायंडा पुन्हा सुरू झाला आहे. आधी त्यांनी कुंभमेळ्यात तृतीयपंथीयांचा वेगळा आखाडा हवा, म्हणून वेगवेगळ्या संतमहंताना वेठीस धरलं आणि त्यांच्याशी तार्किक कसोटीवर वाद घालून अखेर उज्जैनच्या कुंभमेळ्यात किन्नरांसाठीचा वेगळा आखाडा निर्माण केला.
एवढंच नाही, तर शिष्यांसह शाहीस्नानही केलं. त्यानंतर पितृपक्षाला सुरुवात होताच, किन्नरांचा एक मोठा समूह काशीला पोचला आणि ज्ञात इतिहासात पहिल्यांदाच त्यांनी मंदिरप्रवेश केला. तोही काशी विश्वनाथाच्या मंदिरात! या दोन्ही घटना पुरेशा बोलक्या आहेत. आम्हाला केवळ सामाजिक स्थान नकोय, तर आमचं हरवलेलं धार्मिक-सांस्कृतिक स्थानही परत हवंय; हेच या दोन्ही घटना जणू सुचवत आहेत.
( पारलिंगी समाजाची कार्यकर्ती दिशा पिंकी शेख )
भारतीय पुराणग्रंथात किन्नरांचा उल्लेख कसा सापडतो?
भारतीय संस्कृतीचे अभ्यासक आणि पत्रकार मुकुंद कुळे यासंबंधी मुद्देसूद मांडणी करतात. ते म्हणतात की, भारतीय उपखंडातील संस्कृतीचा मागोवा घेतला, तर आज तृतीयपंथी म्हणून समाजात ओळख असलेला हा समाज हजारो वर्षांपूर्वी किन्नर म्हणून प्रसिद्ध होता. भारतीय पुराणग्रंथात, तसंच बौद्धग्रंथांतही या समाजाचे उल्लेख सापडतात.
अर्धदेवयोनी मानला जाणारा आणि अप्सरा-यक्ष-गंधर्वांप्रमाणेच कलावंत म्हणून प्रसिद्ध असलेला किन्नर समाज म्हणजे आजचे तृतीयपंथीच. अगदी महाभारतातील द्रुपदपुत्र शिखंडीलाही किन्नरच मानलं गेलंय. तसंच एक वर्षाच्या अज्ञातवासात अर्जुनाचं बृहन्नडेच्या रुपात झालेलं परिवर्तन ही त्याची किन्नरावस्थाच असल्याचं मानलं जातं.
मुख्य म्हणजे शिखंडी काय किंवा बृहन्नडा काय कुणाकडेही त्या काळात घृणेने पाहिलं गेलं नाही. किंवा त्यांना हीनही मानण्यात आलं नाही. उलट त्यांची जी मूळ प्रवृत्ती होती, तिचा गौरवच केला गेला.
पुराणकाळात कलावंत म्हणून नावारुपाला आलेल्या किन्नर समाजाने बुद्धकाळात मुत्सद्द्यांची भूमिकाही निभावली. संघराज्याच्या काळात सामंतराजे, जहागिरदार किन्नरांना आपले सल्लागार म्हणून नेमत असत. एखादी गणिका ज्याप्रमाणे राज्याची शोभा वाढवत असे त्याचप्रमाणे त्या काळात हुशार किन्नर बाळगणे प्रतिष्ठेचे मानले जाई. कारण गणिका व किन्नर केवळ कलानिपुण नाही, तर व्यवहारचतुरही असायचे. त्यामुळेच हा किन्नरसमाज मोठमोठ्या हवेल्या आणि कोठ्या बाळगून होता.
यापलीकडे जाऊन सांगायचं तर कामसूत्रकार वात्स्यायनाने किन्नरांना तृतीयप्रकृती नायिका म्हणून संबोधलं आहे. एखादा राजपुत्र किंवा श्रेणिक म्हणजेच धनिकपुत्र कामक्रीडेत निपुण नसेल, तर त्याला सुरतक्रीडा शिकवण्यासाठीही खास तृतीयप्रकृती नायिकेची म्हणजेच किन्नरांची नेमणूक केली जायची. वेद-पुराण आणि संघकाळापर्यंत ही प्रथा अशीच निमूट चालत आली. 
मुस्लिम राजवटीत किन्नरांना महत्व प्राप्त झाले होते…
मुस्लिम आक्रमकांनंतरही किन्नरांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठेला धक्का लागला नाही. उलट मुस्लिम शासकांनी प्रशासकीय कामगिरीपासून खाजगी कामगिरीपर्यंतच्या जबाबदाऱ्या किन्नरांवर सोपवल्या. मुस्लिम राजवटीतच किन्नरांना हिजरा हे नवं संबोधन मिळालं.
त्याचा अपभ्रंश म्हणजेच आजचं हिजडा हे संबोधन. पण संबोधन काहीही असलं, तरी या समाजाने आपली प्रतिष्ठा कधीच गमावली नव्हती. विशेष म्हणजे त्या-त्या काळातील सर्वसामान्य समाजानेही त्यांना स्वीकारलं होतं. जन्मविधी किंवा लग्नविधीसारख्या प्रसंगी नाचगाण्यासाठी आणि दुवा मागण्यासाठीही आवर्जून किन्नरांना निमंत्रण दिलं जायचं.
मात्र मुस्लिम शासकांच्या काळातच एकीकडे किन्नरांना आदराचं स्थान दिलं जात असतानाच दुसरीकडे त्यांना त्यागण्याचे प्रयत्न सुरू होते. मुख्यतः ना धड स्त्री ना धड पुरूष असलेल्या किन्नरांना आपल्या समाजचौकटीतूनच बाहेर फेकण्याचे उद्योग संस्कृतीरक्षकांनी सुरू केले होते. त्यातूनच किन्नरांकडे घृणेने-तिरस्काराने पाहणे सुरू झाले.
त्याला भारतातील ब्रिटिश अंमलाने खतपाणी घातलं. किंबहुना भारतात ब्रिटिशांची सत्ता सुरू झाल्यावरच किन्नरांची मोठीच परवड सुरू झाली. कारण ब्रिटिशांनी भारतातील सर्व संस्थानं खालसा केल्यावर, त्या-त्या संस्थानिकांना ब्रिटिशांनी नेमून दिलेल्या तनख्यावरच गुजराण करावी लागायची. परिणामी राजे-रजवाडे आणि नवाबांच्या ऐषोआरामीला खीळ बसली.
करमणुकीसाठी पदरी नृत्यांगना किंवा किन्नरांना बाळगणं जड जाऊ लागलं. या स्थित्यंतरामुळे किन्नरांचा राजाश्रय संपला आणि हा समाज अक्षरशः रस्त्यावर आला. सुरुवातीच्या काळात परंपरेने चालत आलेल्या इस्टेटीवर या समाजाने गुजराण केली. 
किन्नर समाजाची सांस्कृतिक ओळख कशी पुसली गेली?
पुढे कालांतराने पोटासाठी त्यांच्यावर रस्त्यावर भीक मागण्याची पाळी आली. यामुळे हळूहळू या समाजाची सामाजिक पत तर गेलीच. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या समाजाची सांस्कृतिक ओळखही हरवली. किंबहुना हिरावून घेतली गेली. कारण जोपर्यंत पैसा होता, तोपर्यंत किन्नर समाजाने मंदिर-मशिदींना मोठमोठ्या देणग्या दिलेल्या होत्या. परंतु जेव्हा त्यांच्यावरच जगण्यासाठी दारोदार भटकण्याची पाळी आली, तेव्हा समाजाबरोबरच या सांस्कृतिक ठेकेदारांनीही त्यांना हुसकावून लावलं.
त्यानंतरचा आजवरचा कालखंड हा किन्नरांसाठी अंधकारमय कालखंडच होता. पन्नास-साठ वर्षांपूर्वी जगभरात जेव्हा तृतीयपंथीयांच्या हक्काचा लढा सुरू झाला, तेव्हा कुठे आपणही माणूस असल्याची जाणीव भारतातील किन्नर समाजालाही झाली. अर्थात त्यांना जाणीव झाली, तरी ती भारतीय समाजाला झालेली नव्हती. त्यामुळे आताआतापर्यंत किन्नर समाजाकडे घृणेनेच पाह्यलं जायचं.
अद्यापही या दृष्टिकोनात फार फरक पडलेला आहे, असं नाही. परंतु किमान आता कायद्याची तरी साथ आहे. मुख्य म्हणजे तृतीयपंथी असणं ही विकृती नसून प्रकृतीच आहे, हे आता विज्ञानाने सिद्ध झालं आहे. त्यामुळे हळूहळू का होईना आता किन्नर किंवा तृतीयपंथीयांना समाज स्वीकारू लागला आहे. त्यांना वेगवेगळ्या कामांत सामावून घेऊ लागला आहे. ही निश्चितच आनंदाची बाब आहे. यामुळे किन्नर समाजाच्या एकूणच सामाजिक स्थानातही निश्चितच फरक पडेल, असे मुकुंद कुळे स्पष्ट करतात.
गेल्या काही काळापासून किन्नर समाज त्यांचे सांस्कृतिक स्थान पुन्हा मिळवू पाहतोय आणि त्यांच्या प्रयत्नांना यशदेखील मिळतयं, परंतू या सांस्कृतिक वर्चस्वामागे जर हिंदू किन्नर विरुद्ध मुस्लिम किन्नर किंवा किन्नर जिहाद असा रंग येणार असेल तर मात्र ही धार्मिक लढाई नाही तर धर्माच्या आड वर्चस्वाची लढाई आहे असेच म्हणावे लागेल.






