- टीम बाईमाणूस
- श्रद्धा कपूर आणि लक्ष्मण उत्तेकर यांच्या 'ईठा' चित्रपटाच्या टीझरनंतर नवा वाद उफाळून आलाय.
- तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांनी चित्रपटाच्या नावासह कथानकावर आक्षेप घेत दोन महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत.
- ३ जुलैपर्यंत निर्मात्यांकडून प्रतिसाद न मिळाल्यास न्यायालयीन कारवाई करण्याचा इशारा कुटुंबीयांनी दिला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांच्या आगामी 'ईठा' या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या आयुष्यावर आधारित असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला.
मात्र, टीझर समोर आल्यानंतर चित्रपट नव्या वादात अडकला असून विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांनी चित्रपटाच्या निर्मात्यांवर गंभीर आक्षेप घेत दोन महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. तसेच ३ जुलैपर्यंत सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास न्यायालयीन लढाईचा मार्ग स्वीकारण्याचा इशाराही त्यांनी दिलाय.
"आमच्याशी चर्चा केली असती तर चित्रपट अधिक वास्तववादी झाला असता"
विठाबाई नारायणगावकर यांचे सुपुत्र कैलास नारायणगावकर यांनी 'बाईमाणूस'शी बोलताना चित्रपटाबाबतची नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, 'ईठा' या चित्रपटाची माहिती त्यांना टीझर प्रदर्शित झाल्यानंतरच मिळाली.
चित्रपटाची निर्मिती सुरू असताना किंवा चित्रीकरणाच्या काळात निर्मात्यांकडून किंवा दिग्दर्शकांकडून कोणत्याही प्रकारचा संपर्क साधण्यात आला नव्हता. त्यामुळे टीझर पाहिल्यानंतरच हा चित्रपट विठाबाई नारायणगावकर यांच्या आयुष्यावर आधारित असल्याचे समजल्याचे त्यांनी सांगितले.
टीझरमध्ये दाखवण्यात आलेल्या काही प्रसंगांवर त्यांनी आक्षेप घेतला. विशेषतः त्यांच्या जन्माचा प्रसंग रंगमंचामागे झाल्याचे चित्रित करण्यात आल्याचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, अशा संवेदनशील घटना पडद्यावर मांडण्यापूर्वी कुटुंबीयांशी चर्चा होणे गरजेचे होते. असेही त्यांनी नमूद केले.
कैलास नारायणगावकर यांनी पुढे सांगितले की,
"तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांचा संघर्ष, त्यांचे योगदान आणि त्यांचे आयुष्य मोठ्या पडद्यावर येत आहे, ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. मात्र, चित्रपटाच्या निर्मितीपूर्वी कुटुंबीयांशी संवाद साधला असता, तर विठाबाईंच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक सत्य घटना, आठवणी आणि ऐतिहासिक संदर्भ निर्मात्यांना उपलब्ध झाले असते. त्यामुळे चित्रपट अधिक वास्तववादी आणि प्रेक्षकांपर्यंत योग्य इतिहास पोहोचवणारा ठरला असता."
'ईठा' नव्हे, 'विठाबाई नारायणगावकर' नाव द्या; कुटुंबीयांच्या दोन प्रमुख मागण्या...
दरम्यान, चित्रपटाच्या नावावरही कुटुंबीयांनी आक्षेप घेतला आहे. विठाबाईंचे नातू मोहित नारायणगावकर यांनी सांगितले की, ग्रामीण भागात 'विठा'चा उच्चार 'ईठा' असा केला जात असला तरी अधिकृत आणि ऐतिहासिकदृष्ट्या त्यांचे नाव विठाबाई नारायणगावकर असेच आहे. त्यामुळे नव्या पिढीला त्यांच्या खऱ्या नावाची ओळख व्हावी यासाठी चित्रपटाचे नाव बदलण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले.
कुटुंबीयांनी निर्मात्यांकडे दोन प्रमुख मागण्या केल्या आहेत. पहिली म्हणजे 'ईठा' हे नाव बदलून 'विठा' किंवा 'विठाबाई नारायणगावकर' असे करण्यात यावे. तसेच चित्रपटाच्या शीर्षकात किंवा सबटायटलमध्ये 'नारायणगावकर' हे पूर्ण आडनाव समाविष्ट करण्यात यावे.
दुसरी महत्त्वाची मागणी म्हणजे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तो संपूर्ण चित्रपट कुटुंबीयांना दाखवण्यात यावा. जर त्यामध्ये कोणतेही चुकीचे, दिशाभूल करणारे किंवा आक्षेपार्ह चित्रण आढळले, तर ते प्रदर्शित होण्यापूर्वी दुरुस्त करण्याची संधी मिळावी, अशी त्यांची भूमिका आहे.
मोहित नारायणगावकर यांनी आणखी एक गंभीर आरोप करत सांगितले की, विठाबाईंच्या जीवनावर आधारित प्रकाशित झालेल्या एका पुस्तकातील अनेक माहिती चुकीची असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यांच्या मते, त्या पुस्तकात ऐकीव माहितीच्या आधारे अनेक प्रसंग लिहिण्यात आले असून त्यातील जवळपास ५० टक्के माहिती वस्तुस्थितीशी जुळत नाही. जर चित्रपटाची कथा त्याच पुस्तकावर आधारित असेल, तर त्यामध्येही ऐतिहासिक चुका असण्याची शक्यता असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
याशिवाय चित्रपटात विठाबाईंच्या तमाशा फडाचे नावही अपूर्ण दाखवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्या काळातील प्रसिद्ध फडाचे नाव 'भाऊ बापू मांग नारायणगावकर' असे होते. मात्र चित्रपटात केवळ 'भाऊ गावकर' असा उल्लेख करण्यात आला असून त्यामुळे मूळ इतिहासाशी विसंगती निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
कुटुंबीयांनी सांगितले की, त्यांनी आपल्या मागण्या ई-मेलद्वारे चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. मात्र अद्याप निर्मात्यांकडून किंवा दिग्दर्शकांकडून कोणताही संपर्क साधण्यात आलेला नाही. त्यामुळे त्यांनी २ ते ३ जुलैपर्यंत उत्तराची प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला आहे.
जर या कालावधीत निर्मात्यांनी संपर्क साधला नाही किंवा कुटुंबीयांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तर उच्च न्यायालयातील वकिलांच्या सल्ल्याने पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मोहित नारायणगावकर यांनी दिला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, चित्रपट वास्तव आणि सन्मानपूर्वक तयार झाला असेल तर त्याचे स्वागतच केले जाईल.
मात्र विठाबाई नारायणगावकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा किंवा इतिहासाचा विपर्यास करण्यात आला असेल, तर त्याविरोधात न्यायालयात लढा दिला जाईल, अशी ठाम भूमिका कुटुंबीयांनी मांडली आहे.






