शंतनू खुजे
- तमाशा सम्राज्ञी विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांच्या जीवनपटावर आधारित 'ईठा' या चित्रपटाची सध्या सर्वत्र मोठी चर्चा आहे.
- चित्रपटात मात्र विठाबाईंचे तमासगिर वडील म्हणजेच भाऊ मांग नारायणगावकर यांच्या ‘मांग’ या जातीचा आणि ‘नारायणगाव’ या गावाचा उल्लेखच काढून टाकण्यात आलाय.
- ‘ईठा’चा नुकताच प्रदर्शित झालेला ट्रेलर पाहिल्यानंतर चित्रपट क्षेत्रातील प्रस्थापित सांस्कृतिक राजकारणाने पुन्हा एकदा आपला डाव तर साधला नाही ना, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित केला जातोय.
‘तमाशासम्राज्ञी’ विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांच्या जीवनपटावर आधारित 'ईठा' या चित्रपटाची सध्या सर्वत्र मोठी चर्चा आहे. मात्र, या चित्रपटाचा नुकताच प्रदर्शित झालेला ट्रेलर पाहिल्यानंतर, साहित्य, नाटक आणि चित्रपट क्षेत्रातील प्रस्थापित सांस्कृतिक राजकारणाने पुन्हा एकदा आपला डाव तर साधला नाही ना, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
ज्या विठाबाईंनी आयुष्यभर तमाशाचा फड गाजवताना आपलं नाव कधीही लपवलं नाही. उलट, विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर हे नाव त्यांनी अत्यंत अभिमानानं मिरवलं. आता त्यांच्याच जीवनपटावर आधारित असलेल्या या चित्रपटात मात्र विठाबाईंचे तमासगिर वडील म्हणजेच भाऊ मांग नारायणगावकर यांच्या ‘मांग’ या जातीचा आणि ‘नारायणगाव’ या गावाचा उल्लेखच काढून टाकण्यात आलाय. तसेच या चित्रपटाच्या ट्रेलरमधील दोन दृश्यांमध्ये ‘भाऊ गावकर तमाशा मंडळ’ असा बोर्ड दिसतो.
पण ही पहिलीच वेळ नाही की, कुठल्या चित्रपटात विठाबाईंच्या जातीचा उल्लेख जाणीवपूर्वक वगळला गेलाय, यापूर्वी ‘चंद्रमुखी’ या लावणीप्रधान चित्रपटात शेवटी जेव्हा विठाबाईंचा उल्लेख येतो तिथेही ‘भाऊ मांग’ हे नाव वगळण्यात आलं होतं.
लोककलांच्या परंपरेत महार, मातंग समाजाचा वाटा महत्वाचा
चित्रपट, नाट्य क्षेत्रात जात लपवून ठेवणारे अनेक कलाकार दिसतात. कलावंताने जात सांगितली की कलेला मार बसतो असं म्हंटल जातं. पण लोककलेत मात्र नेमकं याच्या उलट आहे. विशेषत: तमाशामध्ये तर जात आणि गाव सांगितल्याशिवाय टाळ्या-शिट्या मिळत नाहीत हा या मराठी मातीचा इतिहास आहे. भाऊ मांग नारायणगावकर, विठाबाई मांग नारायणगावकर, दत्ताबा साळी शिरोलीकर, रंगनाथ बंडू लव्हार शिंगवेकर, भाऊ गोंधळी टाकळीकर ही आणि अशी अनेक तमाशा पार्टींची उदाहरणे आहेत. विठाबाई तर अगदी जाणीवपूर्वक 'विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर' असं नाव लावायची. पण आता मात्र हाच उल्लेख या चित्रपटातून वगळला गेलाय.
'ईठा चित्रपटात ईठाबाई नारायणगावकर यांची भूमिका श्रद्धा कपूरने साकारली आहे'...
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत आणि विशेषतः तमाशा, लावणी यांसारख्या लोककलांच्या विकासात पूर्वाश्रमीचे महार, मातंग आणि कोल्हाटी यांसारख्या उपेक्षित समाजाचे योगदान महत्वाचे आहे. या लोककलांचा उगम आणि सादरीकरण या समाजांच्या ऐतिहासिक, सामाजिक व आर्थिक परिस्थितीशी थेट जोडलेले आहे.
तमाशा आणि लोककलेला गती देणारी ढोलकी, हलगी, डफ आणि तुणतुणे यांसारखी प्रमुख वाद्ये प्रामुख्याने दलित समाजाने हाताळली आणि तमाशाचा मूळ ठेका व संगीताचा पाया रचला. यासोबतच शाहिरी, गण-गवळण आणि बतावणीसारख्या अंगांमधून तत्कालीन सामाजिक वास्तवावर भाष्य करण्याची परंपरा याच समाजाने निर्माण केली.
विठाबाईंचे कुटुंबीय म्हणतात, लक्ष्मण उतेकरांची भेट घेऊन चर्चा करणार
चित्रपटाच्या ट्रेलरमधून जातीच्या आणि गावाच्या वगळलेल्या या उल्लेखाबद्दल ‘बाईमाणूस’ने विठाबाईंच्या कुटुंबियांशी संपर्क साधला.
ह्या प्रकाराबाबत आपण स्वतः ‘ईठा’ चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचं विठाबाईंचे नातू मोहित नारायणगावकर यांनी सांगितलं. त्यांची भेट घेतल्यानंतरच आपण यावर भाष्य करू असंही ते म्हणाले. तर विठाबाईंच्या कन्या आणि तमाशा कलावंत मंगला बनसोडे म्हणाल्या की, मी अद्याप या चित्रपटाचा ट्रेलर बघितलेला नाही त्यामुळे मला या प्रकाराबद्दल काही माहिती नाही. ट्रेलर मध्ये काही आक्षेपार्ह गोष्टी आढळल्यास त्यावर नक्कीच आवाज उठवू असही त्या म्हणाल्या.
'ईठा च्या ट्रेलर मधून मांग नारायणगावकर हा उल्लेख वगळण्यात आला आहे'..
जातीचा उल्लेख वगळणे हा प्रकार कलेवर अन्याय करणारा
“विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर हे तमाशा क्षेत्रातील अत्यंत प्रस्थापित आणि सन्माननीय नाव आहे. तमाशा क्षेत्रात स्वतःच्या गावाचे नाव अभिमानाने लावण्याची एक मोठी परंपरा आहे. नारायणगावने या लोककलेला मोठे योगदान दिले असून, विठाबाईंच्या वडिलांनी तिथे 'तमाशा पंढरी' म्हणून जो नावलौकिक मिळवला, तो या नावातूनच अधोरेखित होतो. त्यामुळे नावातून गाव आणि जात वगळणे, हा या ऐतिहासिक वारशावर आणि त्यांच्या कलेवर अन्याय करणारा प्रकार असल्याचं मत प्रा.डॉ. मिलिंद कसबे यांनी व्यक्त केलं. ते लोककलेचे अभ्यासक असून नारायणगांवच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात मराठी विषयाचे विभागप्रमुख आहेत.”
डॉ. मिलिंद कसबे पुढे म्हणाले, तमाशाच्या फडात स्वतःच्या जातीचा अभिमान बाळगून नावात 'मांग' या शब्दाचा ठळक उल्लेख करणारे भाऊ मांग नारायणगावकर हे एकमेव कलावंत होते. "महार घरी गाणं आणि मांगा घरी वाजवणं" या परंपरेतील आपले वाजवण्याचे कौशल्य त्यांनी जाणीवपूर्वक आपल्या नावाशी जोडले. त्यामुळे ही ओळख पुसून टाकणे, म्हणजे इथल्या उपेक्षित कलावंताचे सांस्कृतिक संचित डॅमेज करण्यासारखे आहे.
‘ईठा’ चित्रपटातून थेट नारायणगावचा उल्लेख वगळणे अत्यंत खेदजनक असल्याचं मत पत्रकार आणि लोककला अभ्यासक खंडूराज गायकवाड यांनी व्यक्त केलं. ते विठाबाई नारायणगांवकर स्मारक समितीचे पदाधिकारी आहेत.
खंडूराज गायकवाड म्हणाले की ,"भाऊ नारायणगावकरांनी तमाशाचे नाव देशभरात मोठे केले. त्यांच्या पश्चात विठाबाई आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांनीही ही परंपरा समर्थपणे पुढे नेली. पण आता या चित्रपटातून थेट 'नारायणगाव'चा उल्लेख वगळणे अत्यंत खेदजनक आहे. निर्मात्यांनी आधीच 'विठा' ऐवजी 'ईठा' असे नाव बदलले होते, आणि आता नारायणगावचा उल्लेखही टाळला. मला वाटते, त्यांनी हा चित्रपट खूप घाईघाईत बनवला असून, मूळ इतिहासाशी अशी तडजोड करायला नको होती."
हा तर सिनेमॅटिक लिबर्टीचा गैरवापर…
चित्रपटाचे नाव 'इठा' ठेवणे, ही सिनेमॅटिक लिबर्टी असू शकते. परंतु, जगमान्य असलेल्या ऐतिहासिक पात्राची जात किंवा गावाचे मूळ नावच बदलून टाकणे, हा सिनेमॅटिक लिबर्टीचा स्पष्ट गैरवापर आहे. ज्या मूळ पुस्तकावर (तमाशा - विठाबाईंच्या आयुष्याचा) हा सिनेमा आधारित आहे, त्यात या सर्व ऐतिहासिक तथ्यांचा अगदी स्पष्ट उल्लेख आहे. असे असतानाही सिनेमातून हे संदर्भ वगळणे, हा एका विशिष्ट व्यवस्थेच्या दबावाचाच भाग असल्याचं मिलींद कसबे म्हणतात.
'तमाशा सम्राज्ञी विठाबाई भाऊमांग नारायणगावकर'
तर “तमाशा - विठाबाईंच्या आयुष्याचा” या पुस्तकाचे लेखक योगीराज बागूल यांचं याबाबत थोडं वेगळं मत आहे. ते म्हणतात की,
निर्मात्यांनी चित्रपट बनवताना कायदेशीर पळवाट आधीच शोधून ठेवलेली असते. हा चित्रपट पुस्तकावर जसाच्या तसा आधारित नसून, पुस्तकावरून प्रेरित आहे, असा लेखकासोबत त्यांचा करार आहे. यामुळे निर्मात्यांना हवे ते प्रसंग घेण्याची आणि सोयीस्कर बदल करण्याची पूर्ण मोकळीक मिळते.
मूळ नावे आणि गावांचे उल्लेख वगळणे हा केवळ योगायोग नाही
मिलिंद कसबे यांच्या मते, सिनेमातून मूळ नावे आणि गावांचे उल्लेख वगळणे हा केवळ योगायोग नाही. तर तो प्रस्थापित व्यवस्थेने उपेक्षित लोककलावंतांवर लादलेला सांस्कृतिक वर्चस्ववाद आहे. पिढ्यानपिढ्या या कलावंतांनी जे सांस्कृतिक संचित जपले, ते पुसून त्यावर आपली कुरघोडी करण्याचा आणि तो वारसा सोयीस्कररीत्या हायजॅक करण्याचा हा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न आहे.
तर याच्या अगदी उलट, योगीराज बागूल स्पष्ट करतात की, यामागे कोणतेही सांस्कृतिक राजकारण नाही. मुख्य प्रवाहातील व्यावसायिक लोक कायदेशीर आणि आर्थिक अडचणी टाळण्यासाठी लीगल लिबर्टीचा पुरेपूर वापर करतात. चित्रपट निर्धोकपणे चालावा आणि कोणताही वाद होऊ नये, म्हणूनच त्यांनी ही व्यावसायिक सुरक्षितता बाळगली आहे.
पुढे ते म्हणतात की, हा चित्रपट १०० कोटींहून अधिक बजेटचा एक मोठा प्रोजेक्ट आहे. जर एखाद्या याचिकेमुळे चित्रपटाला न्यायालयातून स्टे मिळाला, तर प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी लागते. चित्रपटाचे वेळापत्रक एका-एका दिवसावर ठरलेले असते, त्यामुळे केवळ दोन दिवस जरी प्रोजेक्ट थांबला, तरी निर्मात्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होऊ शकते. हा आर्थिक धोका टाळण्यासाठीच निर्मात्यांनी वादग्रस्त ठरू शकणारे उल्लेख टाळले असावेत.
'योगीराज बागुल यांच्या तमाशा: विठाबाईच्या आयुष्याचा या पुस्तकावरून सिनेमा प्रेरित आहे'...
श्रद्धा कपूर दिसणार विठाबाईंच्या भूमिकेत
विठाबाईंना तमाशाच्या फडात काम करताना त्यांना आलेले अनुभव, कला टिकवण्यासाठी केलेला संघर्ष आणि त्यांची कलेप्रती असलेली निष्ठा ‘ईठा’ चित्रपटात मांडण्यात आली आहे. या चित्रपटाची निर्मिती 'मॅडॉक फिल्म्स'चे निर्माते दिनेश विजान यांनी केली आहे. 'लुका छुपी', 'मिमी' आणि 'छावा' यांसारख्या यशस्वी व्यावसायिक चित्रपटांमधून नावलौकिक मिळवणारे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे, यात विठाबाईंची मुख्य भूमिका बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर साकारत आहे. तिच्यासोबतच प्रसिद्ध अभिनेता रणदीप हुड्डा हा देखील एका महत्त्वाच्या भूमिकेत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार 'ईठा' हा चित्रपट २८ ऑगस्ट २०२६ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
पंढरपूरच्या विठोबाच्या छायेत मुलगी झाली म्हणून नाव ठेवलं ‘विठा’...
भाऊ बापू (मांग) नारायणगावकरांचा तमाशा एके काळी महाराष्ट्र गाजवत होता. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरातील मुक्कामात भाऊ खुडेंच्या पत्नी शांताबाई या तेंव्हा गरोदर अवस्थेत होत्या. ती आषाढी एकादशीची रात्र होती. रात्री भाऊंच्या तमाशाचा फड उभा राहिला आणि इकडे शांताबाईंच्या वेणा वाढू लागल्या. मध्यरात्रीच्या सुमारास शांताबाईंनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. पंढरपूरच्या विठोबाच्या छायेत मुलगी झाली म्हणून भाऊ आणि शांताबाईंनी तिचं नाव `विठा’ ठेवलं. तमाशाच्या फडाला आणि पहाटेच्या सूर्याला साक्षी ठेवून जन्माला येऊन `विठा’नं जणू नेमकी वेळ साधली. कारण `विठा’ नामक हे नक्षत्र पुढे तमाशा विश्वावर तेजाने तळपलं.
या `विठा’ने उभ्या महाराष्ट्राला आपल्या तालावर नाचवलं. विठाबाई भाऊ नारायणगावकर या नावाने तमाशाला दिल्लीच्या तख्तापर्यंत नेलं. असे म्हणतात, की विठाबाई गरोदर असताना नवव्या महिन्यात नाचण्यासाठी उठल्या होत्या आणि नाचता नाचता पोटात कळा येऊ लागल्याने रंगमंचामागे गेल्या. तिथेच बाळंत झाल्या आणि नाळ दगडाने ठेचून प्रेक्षकांच्या आग्रहास्तव पुन्हा स्टेजवर नाचण्यासाठी आल्या.
पुढे `विठा’ने उभ्या महाराष्ट्राला आपल्या तालावर नाचवलं. विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर या नावाने तमाशाला दिल्लीच्या तख्तापर्यंत नेलं. त्या नेमकं कसे जीवन जगल्या, त्यांची कला, निष्ठा बहराचा काळ, त्यांनी उपभोगलेले ऐश्वर्य आणि त्यांची झालेली फसवणूक या सर्वच गोष्टी मुलखावेगळ्या आहेत.
वयाच्या तेराव्या वर्षांपासूनच पायात चाळ बांधून फड गाजवायला सुरूवात
लहानपणापासूनच नृत्य आणि गायनाकडं विठाबाईंचा विशेष ओढा होता. घरी असताना तमाशातल्या लावण्या, गवळणी, भेदीक त्यांच्या कानावर आपसूक पडत होत्या. पण शाळेतही कवितेमध्ये विशेष रुची होती. त्यांचा हा कलेकडचा आत्यंतिक ओढा बघूनच वडिलांनी शिक्षणाची सक्ती केली नाही आणि वयाच्या चौथ्या – पाचव्या वर्षीच विठाबाईंची शाळा कायमची बंद झाली आणि आपल्या वडिलांच्या तमाशाबरोबर भटकंती सुरू झाली. भाऊ-बापूच्या तमाशात अधून-मधून विठाबाई आपल्या कलेची चुणूक दाखवित होत्या.
ही कला मामा वरेरकरांनी नेमकी हेरली आणि विठाबाईंना आपल्या कलापथकात पाठवून द्यायची विनंती भाऊंना केली. भाऊंनी ती तात्काळ मान्य केली. आयुष्यात पहिल्यांदा विठाबाईंनी वडगाव कांदळी (ता. जुन्नर) येथे रॉकेलचे टेंभे लावून झालेल्या तमाशात लावणी सादर करून रसिकांची मने जिंकली आणि तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने विठाबाईंच्या तमाशामय आयुष्याला सुरुवात झाली.
विठाबाईंची उतारवयातील परवड… 'पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची!'
तमाशाच्या फडावरील सर्व अपरिहार्यतेचा स्वीकार करुन तमाशा कलावंताचं कलंदर जगणं काय असतं, ढोलकीच्या तालातून आणि घुंगराच्या बोलातून साकारणारी कलेची उर्जा कशी असते, हे विठाबाईंचा तमाशा पाहिलेल्या प्रत्येक रसिकाच्या आठवणीत आजही साठवलेले आहे. वयाच्या अकराव्या वर्षांपासून घुंगरांचे पाच किलोचे चाळ पायी बांधून त्याच्या तालावर नाचू लागलेल्या विठाबाई वयाच्या सत्तरीपर्यंत तमाशाफडात सम्राज्ञीच्या थाटात वावरल्या. तमाशा प्रकारात राष्ट्रपती पुरस्कार मिळालेल्या त्या पहिल्या स्त्री कलाकार होत्या. प्रचंड प्रसिध्दी, मानसन्मान आणि पैसा मिळूनही उतारवयात त्यांच्या आयुष्यात लाचारीच आली.
'आजही विठाबाई भाऊमांग नारायणगावकर तमाशा पार्टीला, हजारोंची रसिक गर्दी करतात'
तमाशाची कला जोपासत असताना विठाबाईंचे स्वत:चा संसार, मुलाबाळांकडे दुर्लक्ष झाले़,पर्यायाने कुटुंबाची वाताहात झाली़. मात्र, लोककलेवर त्यांनी निष्णात प्रेम केले. अनेक हिंदी-मराठी चित्रपटांच्या दिग्दर्शकांनी त्यांना चित्रपटांत काम करण्यासाठी स्वत:हून अनेक ऑफर दिल्या होत्या; मात्र तमाशावर मनापासून प्रेम करणाऱ्या विठाबाईंनी केवळ तमाशासाठी चित्रपटांमध्ये काम करण्याचे नाकारले. जिवंतपणी अनेक हालअपेष्टा सहन करत येणाऱ्या संकटांना खंबीरपणे तोंड देत महाराष्ट्राची लोककला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तमाशासाठी स्वत:ला झोकून देऊन स्वत:च्या आयुष्याचाच ‘तमाशा’करून घेणाऱ्या आणि 'पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची!' असं गाणाऱ्या विठाबाई यातनांचे अपार ओझे पेलत होत्या.
समाजात घडणाऱ्या ताज्या घडामोडी त्यांनी तमाशाच्या मंचावरून अत्यंत प्रभावी व सहजपणे मांडून विविध विषयांद्वारे त्यांनी समाजप्रबोधन केले. १९६२ च्या भारत-चीन युद्धादरम्यान विठाबाईंनी नेफा आघाडीवर जाऊन जवानांचे मनोरंजन केले होते. १९९० मध्ये तत्कालीन राष्ट्रपती आर. व्यंकटरमण यांच्या हस्ते विठाबाईंना सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले होते. १५ जानेवारी २००२ मध्ये विठाबाईंचा नारायणगावमध्ये निवासस्थानी मृत्यू झाला. एका लोककलेचा अस्त अशा शब्दांत अनेक मंत्र्यांनी व राजकारण्यांनी त्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला.






