टीम बाईमाणूस
- छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यात कौटुंबिक हिंसेची अत्यंत संतापजनक घटना समोर आली असून, चारित्र्याच्या संशयावरून एका पतीने आपल्या पत्नीवर अमानुष अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
- पीडित महिलेचे हात-पाय बांधून तिला बेदम मारहाण करण्यात आली. तसेच तिचे मुंडण करून चेहऱ्यावर इंजिन ऑइल फासण्यात आले आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा तिने केला आहे.
- या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने आपल्या लहान मुलांसमोरच पत्नीचा अपमान केल्याचा आरोप आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.
छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यातून कौटुंबिक हिंसेची अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आलीये. चारित्र्याच्या संशयावरून एका पतीने आपल्या पत्नीवर अमानुष अत्याचार केल्याचा आरोप असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळलीये. विशेष म्हणजे, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.
पीडित महिला तारा हिने सुमारे १५ वर्षांपूर्वी जितेंद्र धासिया याच्याशी प्रेमविवाह केला होता. या दाम्पत्याला चार मुले आहेत. सुरुवातीला त्यांचा संसार सुखाने सुरू होता. मात्र, कालांतराने पती-पत्नीमध्ये वाद वाढू लागले. ताराच्या म्हणण्यानुसार, तिचा पती सतत तिच्या चारित्र्यावर संशय घेत असे. याशिवाय हुंड्यासाठी छळ, मारहाण आणि मानसिक त्रास देण्याचे प्रकारही सुरू होते. या सततच्या त्रासाला कंटाळून तारा काही काळापूर्वी पतीपासून वेगळी राहू लागली होती. स्वतःचा आणि चार मुलांचा उदरनिर्वाह करण्यासाठी ती घरकाम आणि मजुरी करून जीवन जगत होती.
हात-पाय बांधून बेदम मारहाण; डोक्याचे मुंडण करून काळे फासले
मिळालेल्या माहितीनुसार, १४ जून रोजी आरोपी जितेंद्रने ताराचा ठावठिकाणा शोधून काढला. ती एका ओळखीच्या व्यक्तीच्या घरी राहत असल्याचे त्याला समजले. त्यानंतर तो तेथे पोहोचला आणि ताराला घराबाहेर बोलावले. सुरुवातीला त्याने तिच्याशी वाद घालत शिवीगाळ केली. त्यानंतर परिस्थिती अधिकच गंभीर झाली. पीडितेच्या तक्रारीनुसार, जितेंद्रने तिचे हात-पाय दोरीने बांधले आणि तिला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
ताराने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, आरोपीने तिच्या डोक्याचे मुंडण केले. एवढ्यावरच न थांबता तिच्या चेहऱ्यावर इंजिन ऑइल फासून तिची सार्वजनिकरित्या अवहेलना करण्याचा प्रयत्न केला. तसेच जबरदस्तीने लघवी ही प्यायला लावली. आणि तिला जिवंत जाळून मारण्याची धमकीही दिली. या संपूर्ण प्रकारामुळे ती प्रचंड घाबरली होती आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी विनवण्या करत होती.
या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने आपल्या लहान मुलांनाही या क्रूर प्रकारात ओढल्याचा आरोप आहे. पीडितेच्या म्हणण्यानुसार, जितेंद्रने मुलांना त्यांच्या आईला मारण्यास भाग पाडले. भीतीमुळे मुले त्याच्या दबावाखाली होती. यानंतर त्याने एका मुलाला आईला लघवी पाजण्यास सांगितले. नंतर स्वतःच जबरदस्तीने तिला लघवी पिण्यास भाग पाडल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे मानवी संवेदनशीलतेलाही धक्का बसला आहे.

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये आरोपी पत्नीविरोधात आरोप करताना दिसत आहे. त्याचा दावा होता की, पत्नीने कुटुंब सोडले असून ती दुसऱ्या पुरुषासोबत राहत होती. मात्र, पीडित महिलेने हे सर्व आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत. तिने सांगितले की, पतीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून ती वेगळी राहत होती. तसेच चार मुलांना जन्म दिल्यानंतर तिने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रियाही करून घेतली होती. त्यामुळे तिच्यावर केलेले आरोप निराधार असल्याचे तिने म्हटले आहे.
पीडितेने प्रशासन आणि न्यायव्यवस्थेकडे न्यायाची मागणी केली आहे. “माझ्यावर अनेक वर्षांपासून अन्याय होत आहे. मला आता फक्त न्याय हवा आहे आणि आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे,” अशी आर्त विनंती तिने केली आहे. तिच्या या मागणीला महिला संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही पाठिंबा दर्शविला आहे.
व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांची कडक कारवाई
सुरुवातीला पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ८५ (पतीकडून क्रूरता), ११५(२) (इच्छापूर्वक दुखापत करणे), २९६ (अश्लील कृत्य आणि शिवीगाळ) तसेच ३५१(२) (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. मात्र, व्हायरल व्हिडिओ आणि नव्याने समोर आलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणात आणखी गंभीर कलमे जोडण्याचा निर्णय घेतला.
कोरिया जिल्ह्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुरेश चौबे यांनी सांगितले की, या प्रकरणातील पुरावे आणि व्हिडिओ पाहता गुन्ह्याचे स्वरूप अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे आरोपीविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. त्याला न्यायालयात हजर करून न्यायालयीन कोठडीची मागणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा आणि कौटुंबिक हिंसेच्या वाढत्या घटनांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वैवाहिक नात्यातील संशय, मानसिक छळ आणि हिंसाचार किती भयानक स्वरूप धारण करू शकतो, याचे हे उदाहरण मानले जात आहे. समाजातील विविध स्तरांतून या घटनेचा निषेध व्यक्त केला जात असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. तसेच अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी महिलांना कायदेशीर संरक्षण, समुपदेशन आणि तातडीची मदत उपलब्ध करून देण्याची गरजही अधोरेखित होत आहे.






