टीम बाईमाणूस
- महायुती सरकारने राज्यात इतर मागासवर्गीय- मराठा, धनगर-अनुसूचित जमाती असे वाद निर्माण केले असून आता अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरणाच्या निमित्ताने संघर्ष पेटवण्याचा डाव आहे, असा आरोप बौद्ध आणि चर्मकार समाजाच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत केला.
- सरकारच्या या प्रयत्नांना विरोध करण्यासाठी ३० जून रोजी आझाद मैदानात मोर्चा काढण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
महायुती सरकारने राज्यात इतर मागासवर्गीय- मराठा, धनगर-अनुसूचित जमाती असे वाद निर्माण केले असून आता अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरणाच्या निमित्ताने संघर्ष पेटवण्याचा डाव आहे, असा आरोप बौद्ध आणि चर्मकार समाजाच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत केला. सरकारच्या या प्रयत्नांना विरोध करण्यासाठी ३० जून रोजी आझाद मैदानात मोर्चा काढण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीच्या (महाराष्ट्र) नेत्यांची सोमवारी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्याला रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे डॉ. भीमराव आंबेडकर, माजी सामाजिक न्याय मंत्री व राष्ट्रवादीचे आमदार राजकुमार बडोले, माजी सामाजिक न्याय मंत्री व भाजप नेते बबनराव घोलप तसेच माजी आमदार बाबुराव माने उपस्थित होते.
न्या. बदर समितीने उपवर्गीकरणासाठी वापरलेले सर्वेक्षण अहवाल, निकष आणि कार्यपद्धती सार्वजनिक करण्यात आलेली नाही. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पारदर्शकतेचा अभाव आहे, असा आरोप आनंदराज आंबेडकर यांनी केला. अनुसूचित जातींच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण वाढविण्याचा विचार न करता विद्यमान आरक्षणाचे विभाजन करण्याचा हा प्रयत्न असल्याचे भीमराव आंबेडकर म्हणाले.
संविधानाने अनुसूचित जातींना एकसंध घटनात्मक वर्गाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे १३ टक्के आरक्षणामध्ये विभागणी करणे संविधानाच्या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात असल्याचा दावा बीआएसपीचे ॲड. सुरेश माने यांनी केला. २०२७ च्या जनगणनेची आकडेवारी समोर येईपर्यंत उपवर्गीकरणाची प्रक्रिया स्थगित ठेवावी, अशी मागणी राजकुमार बडोले यांनी केली. न्या. बदर समितीचा अहवाल सार्वजनिक करावा आणि यासंदर्भात अनुसूचित जातींच्या सर्व घटकांशी सल्लामसलत करावी, अशी मागणी बबनराव घोलप यांनी केली.
अनुसूचित जात प्रवर्गामध्ये विविध ५९ जाती असून बौद्ध (६२ टक्के ), मातंग (१९ टक्के ) आणि चर्मकार (१० टक्के ) या तीन मोठ्या लोकसंख्येच्या जाती आहेत. त्यापैकी बौद्ध आणि चर्मकार जातींनी उपवर्गीकरणाला विरोध केला असून मातंग समाज एकटा पडला आहे. गेली ३० वर्षे उपवर्गीकरणाची मातंग समाजाची मागणी आहे.
महामोर्चाचे आयोजन
उपवर्गीकरणाच्या विरोधात राज्यातील ६२ टक्के असलेल्या बौद्ध समाजाची आणि १० टक्के असलेल्या चर्मकार समाजाची युती झाली आहे. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ३० जून रोजी आझाद मैदानात महामोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चामध्ये बौद्ध आणि चर्मकार तसेच अनुसूचित जात प्रवर्गातील उपवर्गीकरणाला विरोध असणाऱ्या अनेक जातींच्या संघटनाचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.






