भागा वरखडे
- आपण आपत्तीनंतर पुनर्वसनावर आणि मदतीवर जेवढा खर्च करतो, त्याच्या केवळ दहा टक्के खर्च जर आधीच भूकंपरोधक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी केला, तर अब्जावधी डॉलर्स आणि लाखो लोकांचे प्राण वाचू शकतात.
- व्हेनेझुएलातील दुहेरी भूकंप हे मानवी प्रगतीच्या अहंकारावर निसर्गाने मारलेली चापट आहे. आपण मंगळावर जाण्याची स्वप्ने पाहत आहोत; पण ज्या पृथ्वीवर आपण राहतो, तिच्या पोटातील हालचालींपासून स्वतःचा बचाव करण्याचे साधे तंत्रज्ञान आपण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवू शकलेलो नाही.
व्हेनेझुएलात २४ जून २०२६ च्या संध्याकाळी निसर्गाने जे तांडव घडवले, त्याने केवळ दक्षिण अमेरिकाच नव्हे, तर संपूर्ण जग हादरले आहे. अवघ्या ३९ सेकंदांच्या अंतराने झालेल्या ७.२ आणि ७.५ रिश्टर स्केलच्या दोन लागोपाठ भूकंपांनी व्हेनेझुएलाची राजधानी काराकाससह अनेक शहरांना पत्त्याच्या बंगल्यासारखे जमीनदोस्त केले. गजबजलेल्या संध्याकाळच्या वेळी आलेल्या या आपत्तीने क्षणार्धात हजारो कुटुंबांचे हसतेखेळते आयुष्य ढिगाऱ्याखाली गाडले. व्हेनेझुएलाच्या हंगामी अध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी देशात आणीबाणी घोषित केली आहे. मुख्य विमानतळ उद्ध्वस्त झाले आहेत आणि अजूनही ढिगाऱ्याखालून किंकाळ्या ऐकू येत आहेत.
हा भूकंप केवळ एका देशाची आपत्ती नाही, तर तो संपूर्ण मानवजातीला निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा आहे. दरवेळी असा एखादा मोठा भूकंप होतो, हजारो निष्पाप जीव जातात, अब्जावधी रुपयांचे आर्थिक नुकसान होते आणि काही दिवसांच्या शोकविधीनंतर जग पुन्हा पूर्वपदावर येते, पुढच्या मोठ्या विनाशाची वाट पाहत! जपानसारख्या देशाने भूकंपासोबत जगण्याचे जे तंत्र विकसित केले आहे, त्यातून धडा घेण्यास जग अजूनही तयार नाही, हेच यातून सिद्ध होते.

१,७०० किमी दूर असलेल्या ॲमेझॉन जंगलापर्यंत भूकंपाची तीव्रता जाणवली
व्हेनेझुएलाच्या काराकास आणि मोरोन शहरांमध्ये झालेल्या या भूकंपाची तीव्रता एवढी भीषण होती, की त्याचे धक्के १,७०० किलोमीटर दूर असलेल्या ब्राझीलच्या ॲमेझॉन जंगलापर्यंत जाणवले. काराकासमधील अल्तामिरा भागात असलेली २२ मजली इमारत काही सेकंदांत मातीला मिळाली. सायंकाळची वेळ असल्याने रेस्टॉरंट्स, बाजारपेठा आणि रस्ते गजबजलेले होते. कोसळणाऱ्या भिंती, विजेचे खांब आणि धुळीचे साम्राज्य यांमुळे शहरात युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली.
प्राथमिक अंदाजानुसार, मृतकांचा आकडा दहा हजारांच्या घरात जाण्याची भीती अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षण संस्थेने वर्तवली आहे. ‘सायमन बोलिव्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ’ पूर्णपणे बंद करावे लागले आहे. मेट्रो सेवा ठप्प झाली असून अनेक शहरांमधील वीज आणि संपर्क यंत्रणा कोलमडली आहे. आर्थिक संकटाशी झगडणाऱ्या व्हेनेझुएलासाठी हा आर्थिक आणि मानवी धक्का न पेलवणारा आहे. व्हेनेझुएलातील भूकंपाने अनेक शहरांतील दैनंदिन जीवन विस्कळीत केले.
इमारतींना तडे गेले, रस्ते उखडले, वीज आणि दूरसंचार सेवा खंडित झाल्या. काही भागांत नागरिकांना घराबाहेर पडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला. प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले असले, तरी नैसर्गिक आपत्तीच्या पहिल्या काही तासांत होणारी जीवितहानी रोखणे हे कोणत्याही यंत्रणेसाठी मोठे आव्हान असते. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली असला, तरी त्याचे सर्वाधिक परिणाम मानवी निष्काळजीपणावर उमटतात. कमकुवत बांधकामे, निकृष्ट दर्जाचे साहित्य, नियोजनशून्य शहरीकरण आणि आपत्ती व्यवस्थापनाचा अभाव यामुळे नैसर्गिक धक्का मानवनिर्मित शोकांतिकेत परिवर्तित होतो.
किल्लारी भूकंप, जेव्हा दहा हजार लोक ढिगाऱ्याखाली मरण पावली
व्हेनेझुएलाची ही घटना नवीन नाही. पृथ्वीच्या पोटातील हालचालींनी यापूर्वीही मानवी संस्कृतींना अनेकदा थडग्यात बदलले आहे. जगातील काही सर्वात भीषण भूकंपांवर नजर टाकल्यास मानवी लाचारी स्पष्टपणे दिसून येते. भूकंपाच्या या जागतिक संदर्भात आपल्याला महाराष्ट्रातील ३० सप्टेंबर १९९३ रोजी झालेल्या किल्लारी (लातूर) भूकंपाची आठवण येणे स्वाभाविक आहे. तो दिवस गणेश विसर्जनाचा होता. पहाटे ३.५६ मिनिटांनी जेव्हा संपूर्ण गाव गाढ झोपेत होते, तेव्हा ६.२ रिश्टर स्केलच्या भूकंपाने लातूर आणि उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्यांतील ५२ गावे उद्ध्वस्त केली.

सुमारे दहा हजार लोकांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला. किल्लारी-लातूर परिसरात झालेला भूकंप महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भीषण नैसर्गिक आपत्तींमध्ये गणला जातो. पहाटेच्या सुमारास आलेल्या या भूकंपाने काही सेकंदांत संपूर्ण गावे उद्ध्वस्त केली. हजारो नागरिकांचा मृत्यू झाला, अनेक जण कायमचे अपंग झाले, तर लाखो लोक बेघर झाले. किल्लारी, सास्तूर, उमरगा आणि आसपासच्या गावांतील दृश्ये आजही अंगावर काटा आणणारी आहेत. दगड-मातीच्या जड भिंतींची घरे एका क्षणात कोसळली. अनेक कुटुंबे झोपेतच गाडली गेली.
त्या घटनेने भारताला भूकंपप्रतिरोधक बांधकामाचे महत्त्व शिकवले, परंतु आजही देशातील अनेक भागांत त्या धड्याची पूर्ण अंमलबजावणी झालेली दिसत नाही. २००१ मधील गुजरातमधील भुज भूकंपानेही भारताला मोठा धक्का दिला. हजारो लोक मृत्युमुखी पडले, लाखो घरे उद्ध्वस्त झाली आणि प्रचंड आर्थिक नुकसान झाले. त्यानंतर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना, भूकंपप्रतिरोधक बांधकाम नियम आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या धोरणांवर भर देण्यात आला; मात्र धोरणे आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यांतील दरी आजही कायम आहे. महानगरांपासून छोट्या शहरांपर्यंत अनेक इमारती बांधकाम नियमांचे उल्लंघन करून उभ्या राहत आहेत. भूकंपाचा धक्का बसल्यानंतरच त्यांच्या कमकुवतपणाची जाणीव होते.
किल्लारीचा भूकंप हा भूगर्भशास्त्रज्ञांसाठी एक मोठा धक्का होता, कारण डेक्कन ट्रॅप (दख्खनचे पठार) हा भूकंपाच्या दृष्टीने सुरक्षित आणि ‘स्थिर’ मानला जात होता; पण निसर्गाच्या पोटात काय दडले आहे, याचा अंदाज मानवी विज्ञान लावू शकले नाही. किल्लारीमध्ये झालेल्या मृत्यूंचे मुख्य कारण म्हणजे तिथली माती आणि दगडांची जड घरे होती, जी भूकंपाचे धक्के सहन करू शकली नाहीत. किल्लारीने आपल्याला शिकवले, की भूकंप माणसांना मारत नाही, तर माणसांनी बांधलेली कमकुवत घरे माणसांचा जीव घेतात; पण आज ३३ वर्षांनंतरही आपण महाराष्ट्रात किंवा भारतात सुरक्षित बांधकामांचे नियम पाळतो का, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
भूकंपांमुळे जगभरात सात लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला
जगातील एकूण भूकंपांपैकी तब्बल २० टक्के मोठे भूकंप एकट्या जपानमध्ये किंवा त्याच्या आसपास होतात, तरीही जपान हा जगातील सर्वात प्रगत आणि सुरक्षित देशांपैकी एक आहे. याचे कारण म्हणजे जपानने आपत्ती व्यवस्थापनाचे केलेले ‘संस्थाकीकरण’. जपानमध्ये ८ रिश्टर स्केलचा भूकंप आला, तरी इमारती केवळ डोलतात, कोसळत नाहीत. याउलट, व्हेनेझुएला किंवा तुर्कीमध्ये ७ रिश्टर स्केलच्या भूकंपाने शहरांची स्मशाने होतात. जपानकडून हा धडा घेण्यास जग का अपयशी ठरत आहे? याचे उत्तर मानवी लोभ, प्रशासकीय अनास्था आणि ‘माझ्या काळात भूकंप येणार नाही’ या आत्मघातकी मानसिकतेत आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, गेल्या दोन दशकांत भूकंपांमुळे जगभरात सात लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. दरवर्षी सरासरी १० ते १५ अब्ज डॉलर्सचे थेट आर्थिक नुकसान भूकंपांमुळे जगाला सहन करावे लागते. या नुकसानीत केवळ इमारतींचा खर्च नसतो, तर मानवी संसाधनांची हानी, आरोग्यावरील खर्च, विस्थापन आणि उद्योगधंदे ठप्प झाल्यामुळे होणारे अप्रत्यक्ष नुकसान यांचा समावेश असतो. भारताचा विचार केल्यास, देशाचा ५९ टक्क्यांपेक्षा जास्त भूभाग भूकंपाच्या छायेत आहे.

हिमालयीन पट्ट्यापासून ते दिल्ली, मुंबईसारख्या महानगरांपर्यंत कधीही मोठा धक्का बसू शकतो. लातूर आणि भुजच्या भूकंपाचे चटके सोसूनही आपल्या शहरांमधील बेकायदेशीर आणि निकृष्ट बांधकामांची मालिका थांबलेली नाही. इमारतींना ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ सक्तीचे करणे, जुन्या इमारतींचे ‘रेट्रोफिटिंग’ (भूकंपरोधक मजबुतीकरण) करणे आणि आपत्ती व्यवस्थापनाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करणे आता ऐच्छिक राहिलेले नाही, तर ती काळाची गरज आहे.
व्हेनेझुएलाच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या किंकाळ्या उद्या आपल्या शहरात ऐकू येऊ नयेत, असे वाटत असेल तर जपानप्रमाणे भूकंपाशी जुळवून घेणारे शहर नियोजन आपल्याला स्वीकारावेच लागेल. अन्यथा, निसर्ग वेळोवेळी आपले रौद्ररूप दाखवून मानवाच्या या निष्काळजीपणाची किंमत रक्ताने वसूल करत राहील. निसर्ग आपले नियम कधीही बदलत नाही. बदलतो तो माणूस आणि त्याची स्मरणशक्ती.
एखादा महाभयंकर भूकंप होतो, हजारो लोक मृत्युमुखी पडतात, कोट्यवधी रुपयांची मालमत्ता उद्ध्वस्त होते, सरकारे मदतीच्या घोषणा करतात, तज्ज्ञ भविष्यातील उपाययोजनांवर चर्चा करतात आणि काही दिवसांनी सर्व काही पुन्हा पूर्ववत होते. पुढील भूकंप होईपर्यंत. व्हेनेझुएलामध्ये नुकत्याच झालेल्या भूकंपाने पुन्हा एकदा जगाला याच वास्तवाची जाणीव करून दिली आहे. जीवितहानी, वित्तहानी, उद्ध्वस्त घरे, कोसळलेल्या इमारती आणि हजारो नागरिकांचे विस्कळीत झालेले जीवन हे प्रत्येक मोठ्या भूकंपानंतरचे परिचित चित्र आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे अशा प्रत्येक आपत्तीनंतर जग शोक व्यक्त करते; पण त्यातून शिकत मात्र नाही.






