रितेश शिसोदे
- पेपरफुटीविरोधात रस्त्यावर उतरण्यापूर्वी हजारो विद्यार्थ्यांना सर्वप्रथम स्वतःच्या घरात आंदोलन करावं लागलं. एका बाजूला अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचा निर्धार होता, तर दुसऱ्या बाजूला लाठीचार्ज, अश्रुधूर आणि अटकेच्या भीतीने अस्वस्थ झालेले आई-वडील.
- जंतर-मंतरवरील आंदोलनाने केवळ शिक्षण व्यवस्थेतील प्रश्नच उघडे केले नाहीत, तर भारतीय कुटुंबांतील दोन पिढ्यांमधील संवाद, मतभेद आणि काळजी यांचंही एक हळवं वास्तव समोर आणलं.
- ज्या मोबाईलच्या पडद्यांमध्ये ही पिढी हरवत चालली आहे, अशी भीती आपण वर्षानुवर्षे व्यक्त करत आलो, त्याच पडद्यांवर ही पिढी प्रत्यक्षात स्वतःला घडवत होती.
इंटरनेट, मोबाइल, समाजमाध्यमे यांच्याबरोबर हातात हात घालून वाढलेल्या या Gen Z च्या आत्ममग्न पिढीचे कसे होणार, अशी चिंता अगदी कालपरवापर्यंत व्यक्त केली जात होती. पण आपल्या काळाची हाक ऐकून घराबाहेर पडणार्या या पिढीने तिच्याबद्दलच्या सगळ्या प्रश्नांना सणसणीत उत्तर दिले आहे. ‘आम्ही काही बोलत नाही असे तुम्हाला वाटते ना, हे घ्या आमचे म्हणणे, ऐका आता’, या तिच्या पवित्र्याने राजकारण, समाजकारण कोळून प्यायलेले सगळे तथाकथित पंडित चाट पडले आहेत. आपण ज्यांना येडेबागडे जेनझी समजत होतो, त्याच तरुण मुलांनी दिलेला धडा इतिहासाच्या आजवरच्या कोणत्याही पुस्तकात नाही. या पिढीने दाखवून दिलं की, " तुम्ही आमच्या पिढीला Troll केलं... आम्ही System ला Call Out केलं!" या जेनझीने सिद्ध केलं की "ही पिढी 'डिलुलू' नाही... 'डेड सीरियस' आहे!"
२० जुलैला देशभरातून हजारो विद्यार्थी जंतर-मंतरकडे आणि विविध शहरांमधील आंदोलनांकडे निघाले. टीव्हीच्या पडद्यावर जे दिसलं, ते पोलिसांचे बॅरिकेड्स, लाठीचार्ज, अश्रुधुराचे ढग आणि घोषणांनी दणाणलेले रस्ते. पण त्या दृश्यांच्या आधी देशभरात आणखी एक आंदोलन शांतपणे सुरू होतं. त्याला कोणतंही व्यासपीठ नव्हतं, घोषणा नव्हत्या, पोस्टर्स नव्हते आणि माध्यमांचे कॅमेरेही नव्हते. ते आंदोलन प्रत्येक घरात सुरू होतं. एका बाजूला अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचा निर्धार केलेली Gen Z मुलं होती, तर दुसऱ्या बाजूला त्याच मुलांनी सुखरूप परत यावं, यासाठी जीव टांगणीला लागलेले आई-वडील होते. जंतर-मंतरवर पोहोचण्यापूर्वी अनेक विद्यार्थ्यांना सर्वात कठीण लढाई पोलिसांशी नव्हे, तर स्वतःच्या घरात लढावी लागली.
पेपरफुटीच्या निषेधार्थ आणि शिक्षण व्यवस्थेत व्यापक सुधारणांच्या मागणीसाठी 'कॉक्रोच जनता पक्ष' (CJP)ने दिल्लीत 'संसद चलो' मोर्चाचं आयोजन केलं होतं. देशभरातून हजारो विद्यार्थी या आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीत पोहोचले. मात्र संसदेपासून काही अंतरावरच पोलिसांनी त्यांना रोखलं. त्यानंतर परिस्थिती चिघळली. लाठीचार्ज झाला, अश्रुधुराचे गोळे उडाले, अनेक आंदोलक जखमी झाले. ही दृश्यं संपूर्ण देशाने पाहिली. पण त्या लाठीचार्जच्या आधी प्रत्येक घरात भीतीचा एक वेगळाच मारा सुरू झाला होता.
"तुलाच का जायचं आहे?"
"इतर जाऊ देत ना..."
"तुझ्या परीक्षा जवळ आल्या आहेत..."
"काही झालं तर?"

"या गर्दीत आपलं मूल सुरक्षित परत येईल ना?"
हे प्रश्न त्या दिवशी देशभरातील असंख्य घरांमध्ये सारख्याच स्वरात विचारले जात होते. हे प्रश्न आंदोलनाच्या विरोधात नव्हते, ते आई-वडिलांच्या भीतीचे होते. त्यांच्या डोळ्यांसमोर टीव्हीवर दिसणारी आंदोलने होती, पोलिसांचा बळाचा वापर होता आणि प्रत्येक बातमीसोबत वाढत जाणारी एकच काळजी होती, "या गर्दीत आपलं मूल सुरक्षित परत येईल ना?"
दक्षिण दिल्लीतील ग्रेटर कैलाश-१ येथे राहणारी १९ वर्षांची महाविद्यालयीन विद्यार्थिनी अनिका राव सांगते की, आंदोलनात जाण्यासाठी तिला जवळपास दोन तास आई-वडिलांशी वाद घालावा लागला. "ते सतत म्हणत होते, 'तुलाच का जायचं? काही झालं तर? तुझ्या परीक्षांचं काय?' मी त्यांना फक्त एवढंच सांगितलं, 'आपल्यासारखे लोकच जर पुढे आले नाहीत, तर मग कोण येणार?'"
दिल्ली विद्यापीठात शिकणारा रोहन कपूरही जवळपास तासभर वडिलांना आंदोलनाचं कारण समजावून सांगत होता. कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या त्याच्या वडिलांचं मत होतं की, आंदोलनं हा शेवटचा पर्याय असतो. पण रोहनच्या पिढीला वाटत होतं की, अन्यायासमोर गप्प राहणं हाच सर्वात धोकादायक पर्याय आहे. ‘’मी जवळपास तासभर त्यांना या आंदोलनाचं कारण समजावून सांगितलं. शेवटी त्यांनी परवानगी दिली, पण एका अटीवर, अंधार पडण्यापूर्वी घरी परत यायचं आणि मित्रांच्या गटापासून वेगळं व्हायचं नाही."
या विद्यार्थ्यांसाठी सर्वात पहिला अडथळा पोलिसांचे बॅरिकेड्स नव्हते. तो होता, स्वतःच्या घरातील चिंताग्रस्त आई-वडिलांचा विरोध. आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना आधी आपल्या पालकांची समजूत काढावी लागली. काहींना अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी आईला पटवावं लागलं, तर काहींना वडिलांसमोर आपण का रस्त्यावर उतरत आहोत, याचं स्पष्टीकरण द्यावं लागलं. जंतर-मंतरवर पोहोचण्यापूर्वीच या तरुणांनी आपल्या घरात भावनिक संघर्षाचा एक वेगळाच टप्पा पार केला होता.
'आपल्यासारखे लोकच जर पुढे आले नाहीत, तर मग कोण येणार?'"
नोएडामधील २७ वर्षीय वंश रायसाठीही ही लढाई वेगळी नव्हती. पादत्राणे डिझाइनचा अभ्यास करणाऱ्या वंशने जंतर-मंतरवर जाणार असल्याचं आईला सांगितलं आणि घरात काही क्षणांसाठी शांतता पसरली. त्यानंतर आईच्या डोळ्यांत पाणी आलं. "का जातोयस?", "माझी शपथ घे, जाऊ नकोस", "एखादी लाठी डोक्यावर बसली तर आयुष्यभरासाठी काही गंभीर दुखापत झाली तर?" अशा भीतीने भरलेल्या तिच्या प्रश्नांचा मारा सुरू झाला. त्या प्रश्नांमध्ये राजकारण नव्हतं, होती ती फक्त एका आईची असहायता. मुलाला थांबवायचं होतं, पण त्याचं कारणही तिला समजत होतं.
वंश मात्र निर्णय बदलायला तयार नव्हता. घराबाहेर पडताच आईने तिचं 'अखेरचं अस्त्र' वापरलं. तिने वडिलांना फोन केला. आंदोलनाच्या ठिकाणी जात असतानाच वडिलांचा फोन आला. त्यांनी रागाने परत फिरण्यास सांगितलं. पण वंशच्या मते, "देशात जे काही घडत आहे, त्याविरोधात उभं राहणं मला आवश्यक वाटलं. सोशल मीडियावर सुरू झालेलं आंदोलन जेव्हा प्रत्यक्ष रस्त्यावर उतरलं, तेव्हा बदल घडवण्याच्या त्या प्रयत्नाचा भाग होण्याची संधी मी गमावू इच्छित नव्हतो."
ही केवळ एका मुलाची गोष्ट नव्हती. देशभरातील हजारो घरांमध्ये याच आशयाचे संवाद सुरू होते. एका बाजूला आपल्या आयुष्याची सर्वात महत्त्वाची परीक्षा देणारी मुलं होती आणि दुसऱ्या बाजूला त्यांचं आयुष्य सुरक्षित राहावं, एवढीच इच्छा असलेले पालक. या दोन्ही भूमिका चुकीच्या नव्हत्या. संघर्ष होता तो मूल्यांचा नव्हे, तर भीती आणि जबाबदारीचा.

"पोलीसांनी ताब्यात घेतलं तर? कोर्ट-कचेऱ्यांत अडकावं लागलं तर?
दिल्लीतील २२ वर्षीय गुणीत शर्माच्या घरी ही चिंता आणखी एका पातळीवर पोहोचली होती. त्याच्या आईला लाठीमार किंवा अश्रुधुरापेक्षा पोलिसी कारवाईची अधिक भीती वाटत होती. "पोलीसांनी ताब्यात घेतलं तर? कोर्ट-कचेऱ्यांत अडकावं लागलं तर? आयुष्यभर त्याचे परिणाम भोगावे लागले तर?" असे प्रश्न ती त्याला वारंवार विचारत होती. आंदोलन हा तिच्यासाठी केवळ रस्त्यावरचा कार्यक्रम नव्हता, तो मुलाच्या भविष्यासमोर उभा राहू शकणारा धोका होता.
गुणीतने मात्र आईला एकच उत्तर दिलं , "जे होईल, ते सगळ्यांसोबत होईल. आपण सगळे मिळून त्याला सामोरं जाऊ."
अनेकदा 'मोबाईलमध्ये हरवलेली', 'स्वतःपुरती जगणारी' किंवा 'फक्त सोशल मीडियावर सक्रिय' अशी टीका सहन करणाऱ्या 'जनरेशन झेड'ने या आंदोलनातून स्वतःचं एक वेगळं रूप दाखवलं. त्यांच्यासाठी इन्स्टाग्राम, रील्स किंवा हॅशटॅग हे शेवटचं ठिकाण नव्हतं, ते प्रत्यक्ष रस्त्यावर उतरण्याची सुरुवात ठरलं.
‘’मला आता वाटतं... आपली मुलं ठीक आहेत.’’
नेमक्या याच मुद्द्यावर मुंबईच्या सविता प्रशांत बोट ठेवतात. सध्या सुरू असलेल्या Gen Z आदंलोनाबद्दल बोलताना त्या म्हणतात, ‘’'जनरेशन झेड'मधल्या एका मुलeची आई म्हणून, माझ्या मुलeला सतत मोबाईलमध्ये गढून गेल्याबद्दल ओरडण्यात मी आयुष्यातले कितीतरी तास घालवले आहेत. बहुतेक प्रत्येक पालक असंच करतो आणि त्यामागचं कारण पुन्हा सांगण्याची गरज नाही. त्यामागचं एक मोठं कारण म्हणजे त्यांच्या त्या वेगळ्याच डिजिटल विश्वात आपल्याला प्रवेश नसतो. रील्स, मीम्स, विनोद, नवी स्लँग, नवनवीन संदर्भ... या सगळ्यांनी बनलेल्या त्या जगात आपण बाहेरचेच असतो. आणि ते जग आपल्याला सतत आठवण करून देत राहतं की, आपण आता 'कूल' राहिलो नाही. पण सध्या सुरू असलेलं हे आंदोलन पाहिल्यानंतर मात्र आता मला तसं वाटेनासं झालं आहे. मला आता वाटतं... आपली मुलं ठीक आहेत.’’
‘’ज्या मोबाईलच्या पडद्यांमध्ये ही पिढी हरवत चालली आहे, अशी भीती आपण वर्षानुवर्षे व्यक्त करत आलो, त्याच पडद्यांवर ही पिढी प्रत्यक्षात स्वतःला घडवत होती. आज आपण त्यांच्या आवाजाकडे नीट कान देऊन ऐकलं, तर लक्षात येतं की आपल्याला जो केवळ गोंधळ वाटत होता, तो प्रत्यक्षात एका नव्या पिढीच्या स्वतःचा आवाज शोधण्याचा, स्वतःला ओळख देण्याचा प्रवास होता’’ असे सविता प्रशांत सांगतात.
मात्र प्रत्येक घरात या संघर्षाचा शेवट मुलांच्या बाजूने झाला नाही. काही घरांत आई-वडिलांचा "नाही" हा शब्द अंतिम ठरला. दिल्लीजवळ राहणारी वित्त क्षेत्रातील तरुण व्यावसायिक श्रेया भौमिक आंदोलनात सहभागी होऊ शकली नाही. चेंगराचेंगरी होईल, लाठीमार होईल, काही अनर्थ घडेल या भीतीने तिच्या आई-वडिलांनी तिला घराबाहेर पडू दिलं नाही. योगायोग असा की, आंदोलनाच्या दिवशी नेमकं तेच घडलं. लाठीचार्ज झाला, अनेक विद्यार्थी आणि पोलीस कर्मचारी जखमी झाले. त्यामुळे श्रेयाच्या आई-वडिलांची भीती निराधार नव्हती; पण श्रेयासाठी ती आयुष्यभर राहणारी खंत ठरली.
पालकांसोबत वाद घालणारे, विनवण्या करणारे असंख्य व्हिडियो व्हायरल
या आंदोलनाची आणखी एक बाजू सोशल मीडियावर समोर आली आहे. आंदोलनाच्या दिवशीचे व्हिडिओ जितके व्हायरल झाले, तितकेच आंदोलनाला जाण्यापूर्वी घरात घडलेले प्रसंगही चर्चेचा विषय ठरले. परवानगी मिळावी म्हणून आई-वडिलांसोबत वाद घालणारे, त्यांची समजूत काढणारे, विनवण्या करणारे तरुण-तरुणींचे असंख्य व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत. एका व्हिडिओमध्ये मुलगी आंदोलनाला जाण्याचा आग्रह धरत असताना वडील तिला रागाने म्हणतात, "नाही जायचं म्हणजे नाही जायचं." त्यावर आईचा प्रश्न असतो, "तू एकटी नाही गेलीस तर काय एवढा फरक पडणार आहे?" काही सेकंदांचा हा संवाद लाखो लोकांनी पाहिला. कारण तो एका घराचा नव्हता; त्या दिवशी हजारो भारतीय घरांमध्ये घडलेल्या भावनिक संघर्षाचं तो प्रतीक बनला होता.

या काही सेकंदांच्या व्हिडिओमध्ये केवळ एका कुटुंबातील संवाद नाही, तर देशभरातील हजारो घरांमध्ये त्या दिवशी घडलेला भावनिक संघर्ष प्रतिबिंबित झाल्याचं अनेकांना जाणवलं.
इन्स्टाग्रामवर @cigarette_ki.dabbi या नावाने ओळखली जाणारी लावण्या अखेर आंदोलनात सहभागी होऊ शकली नाही. नंतर तिने स्पष्ट केलं की, तिच्या आई-वडिलांनी तिला रोखण्यामागचं एकमेव कारण तिच्या सुरक्षिततेची चिंता होती. लावण्याप्रमाणेच अनेक तरुण-तरुणींसाठी हे 'आंदोलनापूर्वीचं आंदोलन' घरातच हरलं.
कंटेंट क्रिएटर पाविका पांडेने इन्स्टाग्रामवर लिहिलं, "दिल्लीच्या इतक्या जवळ राहूनही मी आंदोलनात सहभागी होऊ शकले नाही, याची मला प्रचंड लाज वाटते. आर्थिकदृष्ट्या मी अजूनही आई-वडिलांवर अवलंबून आहे, त्यामुळे त्यांच्या परवानगीशिवाय जाऊ शकत नव्हते. त्यांनी सुरक्षिततेच्या कारणामुळे परवानगी दिली नाही. ही खंत आणि अपराधीपणाची भावना कदाचित आयुष्यभर माझ्यासोबत राहील."
घरून विरोध होईल, याची कल्पना असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी आंदोलनात सहभागी होण्याची योजना आई-वडिलांपासून लपवून ठेवली होती. काही जण तर चेहरा पूर्णपणे झाकून आंदोलनात सहभागी झाले. त्यामागचं कारण केवळ पोलिसांच्या कॅमेऱ्यांपासून स्वतःची ओळख लपवणं नव्हतं, तर सोशल मीडियावरील फोटो, व्हिडिओ किंवा टीव्हीवरील बातम्यांमधून आई-वडिलांना आपण आंदोलनात असल्याचं कळू नये, हीदेखील त्यामागची मोठी चिंता होती. अनेक घरांमध्ये हा संघर्ष केवळ सुरक्षिततेपुरता मर्यादित नव्हता. काही ठिकाणी आई-वडील आणि मुलांमधील राजकीय विचारांमधील मतभेद हेही आंदोलनात जाण्याला विरोध होण्यामागचं महत्त्वाचं कारण ठरले. काही तरुणांनी हा अनुभव इन्स्टाग्राम रील्समधून मांडला, तर काहींनी रेडिटसारख्या सोशल मीडिया मंचांवर घरात सुरू असलेल्या या संघर्षाविषयी लिहिलं.
काही आई-वडील स्वतः आपल्या मुलांसोबत आंदोलनात सहभागी
r/IndianTeenagers या रेडिट समुदायातील एका वापरकर्त्याने लिहिलं, "२० जुलैच्या आंदोलनात जाणार असल्याचं बाबांना समजलं. त्यांनी मला सरळ धमकी दिली की, तू बाहेर पडलास तर दिवसभर खोलीत कुलूप लावून ठेवीन."
मात्र हा अनुभव केवळ 'जनरेशन झेड'पुरता मर्यादित नाही. आंदोलनात सहभागी होणाऱ्या मुलांच्या सुरक्षिततेची चिंता करणारे आई-वडील प्रत्येक पिढीत होते. आमच्या 'जनरेशन एक्स' आणि 'मिलेनियल' सहकाऱ्यांशी बोलल्यानंतरही हेच स्पष्ट झालं की, त्यांच्या तरुणपणातही मोर्चा, आंदोलन किंवा निदर्शनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला की, घरातून असाच विरोध व्हायचा.
काळ बदलला... आंदोलनांचे विषय बदलले... पण घरातले संवाद मात्र फारसे बदलले नाहीत. "सुरक्षित राहा", "जाण्याची गरज काय?", "काही झालं तर?" या काळजीतून जन्माला येणारे प्रश्न आजही तितकेच जिवंत आहेत आणि अनेकदा शेवटी ठाम "नाही" हेच उत्तर मिळतं.
तरीही आंदोलनाच्या ठिकाणी याचं एक वेगळं चित्रही पाहायला मिळालं. जिथे अनेक तरुण-तरुणी घरच्यांची परवानगी मिळवण्यासाठी झगडत होते, तिथे काही आई-वडील स्वतः आपल्या मुलांसोबत आंदोलनात सहभागी झाले होते. काहींनी तर मुलांचा हात धरून त्यांना आंदोलनस्थळी आणलं होतं. त्यामुळे या आंदोलनाने केवळ रस्त्यावरचीच नव्हे, तर भारतीय कुटुंबांमधील दोन पिढ्यांमधील संवाद, मतभेद आणि परस्पर काळजी यांचंही एक जिवंत चित्र समोर आणलं.






