साक्षी मेहरा
- दिग्दर्शक नीरज घेवान यांच्या ‘होमबाउंड’ने नेटफ्लिक्सपासून थेट ऑस्करपर्यंत मजल मारली आहे.
- पण ज्या अमृत आणि मोहम्मद सैयुब यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे त्यांच्या घरची परिस्थिती आज नेमकी कशी आहे?
- करोनामध्ये ज्या अमृतचं निधन झालं त्याच्या घरच्यांनी अद्याप हा चित्रपट का पाहिलेला नाही?
शेतमजूर असलेले राम चरण (५५) हे फार कमी बोलतात. त्यांच्यावर कोसळलेल्या दु:खामुळे त्यांना कुणाशीही फारसं बोलावसं वाटत नाही. पायाच्या सततच्या दुखण्यानंतरही ते रोज काम करतात, औषधं घेतात आणि पुढे चालत राहतात. त्यांच्या या अबोलपणाचा कधीही स्फोट होऊ शकतो, वर्षानुवर्षे जपलेला त्यांचा संयम कोणत्याही क्षणात तुटू शकतो, याचे कारण म्हणजे त्यांच्या फोनमध्ये असलेला एक चित्रपट… ‘होमबाउंड’. हा चित्रपट राम चरण यांचा मुलगा अमृत कुमारवर आधारित आहे. पण अद्यापही राम चरण यांना ‘होमबाउंड’ हा सिनेमा पाहण्याची हिंमत होत नाहीये. त्यांच्या मनाने अद्याप त्याना तो चित्रपट पाहण्याची परवानगी दिलेली नाही.
काही मीटर अंतरावर त्यांचा १४ वर्षांचा मुलगा शिवम आपल्या फोनवर डाउनलोड केलेला पायरेटेड चित्रपट बघत होता. राम चरण अंतर ठेवून उभे राहिले. हसू आता अर्ध्याहूनही कमी, डोळे पाणावलेले, जणू वर्षानुवर्षांचा संयम वाहून जाण्याच्या बेतात.
एकीकडे त्यांच्या मुलाची कथा नेटफ्लिक्सवर प्रत्येक घराची आठवण बनत चालली आहे, दुसरीकडे राम चरण यांचं आयुष्य त्या क्षणातच गोठलेलं आहे, जेव्हा अमृतच्या मृत्यूचा फोन कॉल त्यांना आला होता. सात सदस्यांचं त्यांचं कुटुंब आजही कोविड संकटाच्या काळात कुटुंबाचा कमावता आधार असलेल्या अमृतच्या मृत्यूतून सावरलेलं नाही आणि त्याने मागे सोडलेली आर्थिक व भावनिक पोकळी समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे.
(‘होमबाउंड’ चित्रपटात अमृत आणि मोहम्मद सैयुब या दोन मित्रांची भूमिका साकारणारे इशान खट्टर आणि विशाल जेठवा हे अभिनेते.)
एक आई, जी स्वतःला कधीही विश्रांती देत नाही, सतत घरकामात गुंतलेली असते. एक वडील, जे आठवणींचं ओझं आणि विस्मरणाचा भार वाहत चालतात. आणि पाच मुलं, इतकी लहान की भावाच्या अनुपस्थितीचा पूर्ण अर्थ लावू शकत नाहीत, पण इतकी मोठी की हे जाणवू शकतं की कुटुंबात काहीतरी असं बदललं आहे, जे आता कधीच पूर्ववत होणार नाही.
त्यांच्या दोन खोल्यांच्या विटांच्या घराच्या भिंती पूर्णपणे रिकाम्या आहेत. अमृतचा एकही फोटो कुठेही लावलेला नाही. दारावर डॉ. बाबासाहेब. आंबेडकर यांचा एक छोटासा फोटो आहे. सात जणांच्या या कुटुंबाला कायम परिचित असलेल्या एकमेव श्रद्धेचं प्रतीक. सर्वात लहान मुलाने फोनवर चित्रपटातील एक दृश्य लावलं. त्याची आई त्याच क्षणी उठली आणि खोलीबाहेर निघून गेली. खोलीत फक्त दीर्घ, थंड उसासे तेवढे उरले.
दोन मित्रांचा व्हायरल फोटो… ज्यात एक मित्र दुसऱ्याला आपल्या मांडीवर धरून आहे. यामुळे पत्रकार व लेखक बशारत पीर यांना एक लेख लिहिण्याची प्रेरणा मिळाली, जो पुढे जाऊन या चित्रपटाच्या निर्मितीचं कारण ठरला. ‘होमबाउंड’ हा दोन मित्रांवर, चंदन आणि शोएबवर केंद्रित आहे. ही कथा प्रत्यक्ष आयुष्यातील अमृत आणि मोहम्मद सैयुब यांच्या जीवनावर आधारित आहे.
हे ही वाचा :
Homebound… एका फोटोमुळे ‘व्हायरल’ झालेली दलित-मुस्लिम मैत्रीची एक अधुरी कहाणी!
२४ वर्षांचा मोहम्मद सैयुब याने ‘दिप्रिंट’शी फोनवर बोलताना सांगितलं, “जेव्हा मी चित्रपट पाहिला, तेव्हा सगळं खूप चांगल्या पद्धतीने दाखवलं होतं. तो सीन पाहून मी फार भावुक झालो, जिथे चंदन अर्धबेशुद्ध अवस्थेत शोएबला आपल्या बाहूंमध्ये धरून आहे. मी सतत हाच विचार करत राहिलो, जर मी माझ्या मित्राला वाचवू शकलो असतो, जर मी थोडा अधिक प्रयत्न केला असता. पण त्याच्या नशिबात वाचणं नव्हतं. आजही त्याच्या आठवणी परत येतात आणि त्याचा फोटो पाहिला की मी कोसळून पडतो.”
चित्रपटातील शोएबचं पात्र त्याच्याच जीवनावर आधारित आहे.
जे चित्रपटाच्या कथानकात दाखवलंय तसं वास्तवात मात्र नव्हतं…
उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील देवरी गावात फार थोड्या लोकांनी ‘होमबाउंड’ पाहिला आहे. बहुतेक ग्रामस्थांना एवढंच माहीत आहे की त्यांच्या गावातील दोन कुटुंबांवर एक चित्रपट बनला आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये त्यांना सांगण्यात आलं होतं की गावाच्या चौकात मोठ्या पांढऱ्या कापडावर चित्रपट दाखवला जाईल. हे आश्वासन पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आलं आहे, आता मार्च २०२६ पर्यंत. अनेक जण म्हणतात की चित्रपट अजून अपूर्ण आहे, किंवा कदाचित रिलीजच झालेला नाही. चित्रपट ऑस्करपर्यंत पोहोचला आहे, ही बाबही फार जणांच्या लक्षात आलेली नाही.
दूरच्या उपलब्धी त्यांना अमूर्त वाटतात, त्यांच्या रोजच्या आयुष्यापासून तुटलेल्या. गावच्या सरपंचालाही चित्रपटाबद्दल काहीच माहिती नव्हती. मात्र नोएडामध्ये काम करणाऱ्या एका ग्रामस्थाने रिलीजच्या दिवशीच तो डाउनलोड केला आणि गावातील काही लोकांसोबत शेअर केला.
(अमृतच्या घराचे एक चित्र…)
सुमारे ७०० लोकसंख्या असलेलं हे गाव, जिथे बहुसंख्य हिंदू राहतात. विटांची आणि गवत-मातीची घरं यांचं मिश्रण असलेला परिसर आहे. गल्लीबोळांत बांबूंची झुडपं आणि ऊसाची शेतं दिसतात. येथे शेतकरी प्रामुख्याने भात, गहू, ऊस आणि डाळी पिकवतात. गावात दर तासाला तीन ते चार वेळा वीज खंडित होते.
ईशान खट्टर आणि अनन्या पांडे यांच्या क्लोज-अप जाहिरातींचे पोस्टर्स संपूर्ण गावात लावलेले आहेत. काही जण याला चित्रपटाच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्याची चतुर मार्केटिंग रणनीती म्हणू शकतात, पण हा प्रयत्न असला तरीही तो निष्फळ ठरला आहे, कारण बहुतांश ग्रामस्थांनी चित्रपट पाहिलाच नाही. गावातील एका रहिवाशाने सांगितलं, “ही पोस्टर्स तर अलीकडेच लावली आहेत. काही महिन्यांपूर्वीच ती लावण्यात आली.”
पडद्यावर चंदन आणि शोएब यांना महत्त्वाकांक्षी आणि आशावादी असल्याचे दाखवण्यात आलयं. सरकारी नोकऱ्यांची तयारी करणारे तरुण, शिपाई होण्याचं स्वप्न पाहणारे आणि ज्या मर्यादित जगात त्यांचा जन्म झाला, त्यापलीकडील आयुष्याची कल्पना करणारे. चित्रपट आशेने भरलेला आहे आणि प्रेक्षकांना सांगतो की अधिक काहीतरी हवं असणं ना अस्वाभाविक आहे, ना चुकीचं. मात्र, वास्तव थोडं वेगळं होतं. अमृत आणि मोहम्मद सैयुब यांनी कधीही सरकारी परीक्षांची तयारी केली नव्हती. दोघांनी आठवीच्या पुढे शिक्षण सोडलं आणि सूरतमधील एका कारखान्यात कापड व साड्या तयार करण्याचं काम करू लागले.
सैयुब, जो सध्या दुबईत बांधकाम मजूर म्हणून काम करतो, गेली तीन वर्षे घरी आलेला नाही. देवरीपासून हजारो किलोमीटर दूर, त्याने तीन मित्रांसोबत मिळून हा चित्रपट पाहिला. सैयुब म्हणाला,
“अमृत आणि मी आमची मैत्री पूर्ण ताकदीने निभावली. आता तो गेला आहे आणि आमच्यावर एक चित्रपट बनला आहे, पण त्याच्या अनुपस्थितीची एकाकी भावना कधीच जात नाही. ती वेदना माझ्यासोबत आहे आणि कायम राहील.”
‘काही ना काही नेहमीच अपूर्ण वाटतं’
मृत अमृतच्या घरचे कशा परिस्थितीत राहतात?
हिवाळ्यातील एका थंड सकाळी, अमृतची आई सुभावती (४०) हाताने बनवलेल्या मातीच्या चुलीसमोर बसून आपल्या मुलांसाठी पराठे बनवत होत्या. मुलींनी पराठ्यांची मागणी केली होती. हिवाळी सुट्ट्यांचा तो पहिलाच दिवस होता. छोट्या चुलीच्या बाजूला जळणाची लाकडं ठेवलेली होती. सगळ्यात लहान शिवम पोळीबरोबर शिमला मिरची आणि मटारची भाजी खात होता आणि म्हणाला, “जबरदस्त बनली आहे,” तेव्हा त्याच्या आईच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मितरेषा उमटली.
हे स्वयंपाकघर चार महिन्यांपूर्वी उभारलेल्या छोट्या झोपडीतील नवी भर आहे, जी त्यांच्या घरासमोर आहे. त्या झोपडीचं गवत आणि बांबूचं छप्पर फक्त आठवडाभरापूर्वीच पूर्ण झालं होतं. पूर्वी स्वयंपाकघर घराच्या आतल्या एका खोलीत होतं. आता ती खोली रिकामी पडली आहे. उरलेल्या खोल्यांत फक्त पिठाचा एक स्टीलचा ड्रम आणि एक गॅस शेगडी ठेवलेली आहे, जी जवळजवळ कधीच पेटत नाही.
जवळच्या एका सरकारी शाळेत शिकणारी सुमन म्हणाली, “आम्ही भाजी उधार घेतो आणि पैसे मिळाले की देतो. मला भविष्यात पोलीस अधिकारी व्हायचं आहे; त्यामुळे माझ्या आई-वडिलांना घर चालवायला मदत होईल.”
त्यांची आई आपलं दुःख सतत कामात स्वतःला गुंतवून लपवत राहते. गोवऱ्या थापणं, अंगण झाडणं आणि कधीही न संपणाऱ्या घरगुती कामांत गुंतलेलं राहणं. वयाच्या केवळ ४०व्या वर्षीच सुभावती आपल्या वयापेक्षा मोठ्या दिसू लागल्या आहेत; त्यांच्या पायाच्या टाचा फाटल्या आहेत. ही अशी प्रतिमा आहे, जी पुढे चित्रपटात त्यांच्या ओळखीचा महत्त्वाचा भाग बनते. सुभावती म्हणाल्या, “सगळं ठीक वाटतं, तरीही काही ना काही नेहमीच अपूर्ण वाटतं.”
(अमृत आणि मोहम्मद सैयुब… यांच्याच आयुष्यावर होमबाऊंड हा सिनेमा आहे.)
शिवमला छोट्या-छोट्या गोष्टींत आनंद मिळतो. मित्रांसोबत रील्स बनवण्यात. त्या रील्समध्ये तो भोजपुरी गाण्यांवर चष्मा घालून चालतो, कधी कधी एक-दोन डान्स स्टेप्सही करतो. मग तो धावत जाऊन आईला दाखवतो, आणि जेव्हा ती त्याला “हिरो” म्हणते, तेव्हा तो आनंदाने उड्या मारतो. राम चरण आणि सुभावती यांचं उत्पन्न अत्यंत अस्थिर आहे. वर्षात फक्त दोन ते तीन महिनेच ते शेतमजुरीचं काम करू शकतात. त्यांच्याकडे एक गाय आहे, ज्याचं दूध कुटुंबासाठी उपयोगात येतं; मात्र बहुतांश दूध शेजाऱ्यांना विकलं जातं.
राम चरण म्हणाले,
“२००३ मध्ये सरकारने आम्हाला ही जमीन दिली होती. ती पडीक होती आणि ज्यांच्याकडे जमीन नव्हती, त्यांना ती सांभाळण्यासाठी दिली जात होती. १० वर्षांनंतर तिची कागदपत्रं तयार होतात. सगळं नीट झालं तर जमीन कायमस्वरूपी तुमची होते; नाहीतर कोणताही स्थानिक अधिकारी ती काढून घेऊ शकतो. दोन-चार वर्षांपूर्वी आम्ही स्थानिक बाबूकडे नोंदणीसाठी विचारलं, पण त्याने यासाठी ४० हजार रुपयांची लाच मागितली.”
त्या छोट्याशा भूखंडासाठी सरकार त्यांना महिन्याला २,००० रुपये मदत देते, आणि हाच कुटुंबाच्या खर्चासाठी नियमित उत्पन्नाचा एकमेव स्त्रोत असल्याचं राम चरण यांनी सांगितलं.
राम चरण सकाळी ४ वाजता उठतात, अंघोळ करतात, आंबेडकरांच्या फोटोसमोर दिवा लावतात आणि ५ वाजेपर्यंत बाहेर पडतात. ते म्हणाले, “पायांमध्ये कितीही वेदना असल्या तरी मी ना झोपू शकतो, ना गप्प बसू शकतो. मी कायम चालत राहतो.”
घराचा खर्च भागवण्यासाठी, राम चरण यांनी गेल्या वर्षी अल्पवयीन शिवमला एका महिन्यासाठी सूरतला पाठवलं होतं, जेणेकरून तो आपल्या मोठ्या बहिणीकडे आणि तिच्या सासरच्यांकडे राहू शकेल. त्यांना आशा होती की तो गावाबाहेरचं आयुष्य पाहील आणि काही आर्थिक मदत करू शकेल. पण शिवमला मित्रांसोबत गावातच जास्त वेळ घालवायचा होता आणि तो लवकरच परत आला. सुमन म्हणाली, “भाऊ आता शिक्षण घेत नाही. आठवी नंतर त्याने शाळा सोडली. बाबा त्याला जानेवारीत पुन्हा पाठवतील, जेणेकरून तो काम करू शकेल आणि खर्चांमध्ये मदत करू शकेल.”
सैयुबचं कुटुंब मात्र बऱ्यापैकी सुस्थितीत
देवरीमध्ये असे नमुने सर्वसाधारण आहेत. बहुतांश मुलं आठवी नंतर शाळा सोडून देशभर मजुरीच्या कामाच्या शोधात निघून जातात. शिवमचा एक शेजारी नोएडामध्ये काम करतो, एक मुंबईत आणि एक सूरतमध्ये, तर काही जण सिम कार्डच्या दुकानासारखे छोटे व्यवसाय चालवण्यासाठी गावातच थांबतात. मात्र मुली घरीच राहतात, आईसोबत घरकामात हातभार लावत. जोपर्यंत कुटुंबात त्यांच्या लग्नाची तयारी सुरू होत नाही.
(हेच ते गाजलेले छायाचित्र. कोरोनामध्ये एका महामार्गावर सैयुबच्या हातात अमृतने आपले प्राण सोडले.)
सुभावती आपल्या पाहुण्यांचं स्वागत स्टीलच्या ग्लासात पाणी आणि गूळाची एक छोटी वाटी देऊन करतात. उत्तर प्रदेशच्या ऊस पट्ट्यात, हिवाळ्यात हे सामान्य आहे. अमृतच्या मृत्यूपर्यंत कुटुंबाला जे काही मिळायचं, त्यात मेहनत करून ते निभावत होते; पण त्याच्या मृत्यूने सगळंच उलथापालथ झालं.
अमृतच्या सर्वांत जिवलग मित्राच्या म्हणजे सैयुबच्या घरी मात्र याच्या अगदी उलट चित्र आहे. येथे येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत बिस्किटं, ड्राय फ्रूट्स आणि मिठाया भरलेल्या मोठ्या थाळीने केलं जातं आणि पाणी लांब, स्वच्छ काचेच्या ग्लासांत दिलं जातं, ज्यावर नाजूक नक्षी असते. सैयुब दर महिन्याला १५,००० ते २०,००० रुपये घरी पाठवतो.
त्याचे आई-वडील संयुक्त कुटुंबात राहतात. घरात, त्यांच्या वाट्याला रंग न लावलेल्या तीन खोल्या आहेत. सैयुबचे वडील, ६० वर्षांचे मोहम्मद युनुस आपला बहुतेक वेळ ओट्यावर ठेवलेल्या खाटेवर पडून घालवतात. त्यांना तीन मुलगे आहेत; त्यांपैकी प्रत्येक महिन्याला सुमारे २५,००० ते ३०,००० रुपये कमावतो. कुटुंब कसंबसं चालावं इतकंच. पण युनुस स्वतः जवळजवळ चालू-फिरू शकत नाहीत. संधिवातामुळे खाटेवर कुस बदलणंही वेदनादायक झालं आहे आणि ते पूर्णपणे आपल्या पत्नीवर अवलंबून आहेत.
थंडीपासून बचावासाठी हात आगीजवळ धरत, आणि धूर त्यांच्या चेहऱ्याभोवती फिरत असताना, ते म्हणाले, “मी अनेक महिन्यांपासून आयुर्वेदिक औषधं घेतोय. डॉक्टर म्हणतात ऑपरेशनची गरज आहे, पण त्याचा खर्च आम्ही उचलू शकत नाही.”
सैयुबचा मोठा भाऊ सुहैल याने सूरतमध्ये या दोन्ही मित्रांसोबत काही वर्षे काम आणि आयुष्य घालवलं आहे. एकत्र स्वयंपाक करणं, एकत्र मजुरी करणं. आता तो गावात आणि आसपासच्या भागांत पेंटिंगची कामं (ठेके) घेतो आणि बाईकवर प्रवास करतो. याआधी तो मुंबईत पीओपी (प्लास्टर ऑफ पॅरिस)चं काम शिकत होता. एका शहरातून दुसऱ्या शहरात फिरत, स्थलांतरित मजुरासारखा. आजही त्याला काम क्वचितच मिळतं; नियमित नाही. सुहैलने अद्याप चित्रपट पाहिलेला नाही. तो म्हणाला, “जेव्हा तो यूट्यूबवर येईल, तेव्हा मी पूर्ण कुटुंबाला दाखवेन.”
अमृतची आई आजही सैयुबला “चुन्नू” म्हणूनच हाक मारते…
अमृतला आपल्या फोनवर चित्रपट पाहणं फार आवडायचं, पण सैयुब अनेकदा त्याला थांबवायचा. त्याला आठवतं की कित्येकदा तो अमृतला झापायचा. स्क्रीनकडे पाहण्यापेक्षा हाताच्या कामावर लक्ष द्यायला सांगायचा. सैयुब म्हणाला, “तो आज इथे असता आणि त्याच्यावर चित्रपट बनला आहे हे त्याला माहीत असतं, तर तो खूप आनंदी झाला असता.” जेव्हा जेव्हा सैयुब गावात येतो, तेव्हा तो नेहमी अमृतच्या घरी जातो, आणि अमृतची आई आजही त्याला “चुन्नू” म्हणूनच हाक मारते.
‘होमबाउंड’चे दिग्दर्शक नीरज घेवान यांनी चित्रपट बनवताना सैयुबशी सविस्तर चर्चा केली होती आणि “दोन्ही कुटुंबांना त्यांच्या समाधानानुसार उदार भरपाई मिळेल, याची खात्री केली होती.” चित्रपटात त्यांची मैत्री साधीच दाखवली आहे, मात्र एक दृश्य आहे, गावकऱ्यांमध्ये होणाऱ्या क्रिकेट सामन्यात शोएबला किंचितसं एकटं पाडलेलं दाखवलं आहे. त्याच्या धर्मामुळे त्याला हे जाणवून दिलं जातं की तो इथला नाही: “आपल्या लोकांसोबत जाऊन खेळा, इथे येण्याची गरज नाही.”
(मोहम्मद सैयुबचे घर.)
तरीही चित्रपटात त्यांची मैत्री कधीही असामान्य वाटत नाही, अगदी तशीच, जशी ती प्रत्यक्ष आयुष्यात नेहमीच वाटायची. सैयुब आणि अमृत यांच्या वयात फक्त चार वर्षांचं अंतर होतं आणि ते जवळजवळ एकत्रच मोठे झाले होते. अमृत सैयुबच्या सहा वर्षे आधी सूरतला गेला होता; पण जेव्हा जेव्हा तो घरी यायचा, तेव्हा दोघं जवळच्या चहाच्या टपरीपर्यंत लांब फेरफटका मारायचे आणि तासन्तास गप्पा मारायचे. आता सैयुबला त्या नात्याचा अर्थ पूर्णपणे उमगला आहे. तो सांगतो, “सर्वात आधी एकमेकांत माणुसकी पाहा. धर्म किंवा जात नंतर येते, माणुसकी आधी येते. आपण आयुष्याला एकत्र सामोरं गेलो, तर सगळं काही सोपं होतं.”
अमृतच्या घरी परतल्यावर, भूतकाळाचा कुठलाही उल्लेख त्या शांततेला भंग पाडतो, जी कुटुंबाने आता त्याच्या मृत्यूभोवती जपून ठेवली आहे. ते आता त्याच्याबद्दल बोलत नाहीत. आणि कधी बोललेच, तर सुभावती ते सहन करू शकत नाहीत. त्या समोरच्या ओट्यावर बसल्या होत्या, डोळे अश्रूंनी भरलेले. त्या वारंवार साडीच्या पदराने डोळे पुसत होत्या. त्यांच्या शेजारी त्यांची सगळ्यात धाकटी मुलगी, शिवानी (९), आपल्या हिंदीच्या शाळेच्या पुस्तकातून मोठ्याने वाचत होती, “जेव्हा तो एक खेकडा वर येण्याचा प्रयत्न करतो.”
सुभावती हळू आवाजात म्हणाल्या, “मी जेव्हा मरेन, तेव्हाच मी त्याला विसरू शकेन. आज माझा मुलगा जिवंत असता, तर तो चांगलं कमावला असता. तो माझी खूप चांगली काळजी घेत असता.”
(सौजन्य - द प्रिटं, अनुवाद - प्रतिक पुरी)






