नववीच्या प्रॅक्टिकल परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना आंब्याच्या झाडाला बांधून मारहाण केल्याचा (रांची येथील) एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रातूनही या घटनेची चर्चा होत आहे. शिक्षकांनी जाणीवपूर्वक मार्क्स न दिल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. विशेष म्हणजे हे सर्व विद्यार्थी जेमतेम चौदा-पंधरा वर्षाचे असावेत. मुख्याध्यापक आणि शिक्षकांना भेटल्यानंतरही त्यांच्याकडून कोणताच ‘सकारात्मक प्रतिसाद‘ मिळाला नाही, म्हणून हे विद्यार्थी संतापले.
तर असो, एखादी सामान्य घटना म्हणून या घटनेकडे दुर्लक्ष करता येणार नाही. एखाद- दुसऱ्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांना मारहाणीच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. पण वर्गातील बहुतेक मुलांनी एकत्र येऊन, अत्यंत नियोजनपूर्वक अशी सामूहिक आणि हिंसक कृती करावी, ही गोष्ट मात्र भयंकर आहे. शिक्षकांनी खरोखरच जाणीपूर्वक मार्क्स दिले नसतील तर त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी हे खरे; पण त्या ‘प्रशासकीय कारवाई’ची वाट न बघता या मुलांनी थेट आपला रोष अशा पद्धतीने व्यक्त करणे, ही घटना अत्यंत चिंताजनक आहे. विद्यार्थी आणि शिक्षकातले नाते (मार्कांच्या) एवढ्या तांत्रिक बाबींवर अवलंबून राहणार असेल तर भविष्यकाळ अत्यंत धोक्याचा आहे.
हे का आणि कसे घडले? याचे उत्तर आपल्याकडे नाही. पण या निमित्ताने काही चर्चा करता येईल. विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान-विज्ञानाच्या जिज्ञासेसह नैतिक मूल्ये रुजवणे, त्यांचा दृष्टीकोन अधिक व्यापक करणे- हा शिक्षणाचा मुख्य उद्देश आहे. सार्वत्रिक साक्षरता हे त्यात अंतर्भूत आहेच. तथापि शिक्षणाची तत्त्वे आणि प्रत्यक्ष व्यवहार्यता यात मोठी तफावत आहे. आज भौतिक साधनांची व्याप्ती वाढली आहे. गाव-खेड्यापर्यंत ही साधने पोहोचली आहेत. शिक्षणाची एक नवीच संरचना आता अस्तिवात आली आहे. त्यामुळे शिक्षकांविषयीचे जे पारंपरिक आदर्श वगैरे होते, ते सगळे गळून पडले आहेत. शिक्षक म्हणजे केवळ एक ‘पगारी नोकर‘, एवढीच त्यांची प्रतिमा विद्यार्थी आणि समाजमनात रुजत आहे.
संस्कृतीरक्षण, संप्रेषण, शिष्टाचार, मूल्य इ. गोष्टी अभ्यासक्रमाचा भाग असल्या तरी त्याविषयी शिक्षकांना थेट बोलता येत नाही. शिक्षकाची भूमिका संचलनाची असली तरी आजच्या जातीय आणि धार्मिक विभाजनाच्या संकुचित वातावरणात कोणत्याही शिक्षकाला सौहार्द, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षतेच्या ‘तात्त्विक‘ गप्पा खरंच मारता येतील काय? तेवढे निकोप वातावरण आज शिल्लक आहे का? शालेय विद्यार्थ्यांची संवेदनशीलता समाज आणि पालकांनी बधीर करून टाकली आहे. आता नवमाध्यमांनी ती अधिक बत्थड झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये पडलेले अंतर भरून काढता येणार नाही इतके ते वाढले आहे. भौतिक आणि नव्या आर्थिक संरचनेने विद्यार्थ्यांच्या जीवनशैलीला नवे वळण दिले आहे. विशेषतः कोचिंग क्लासेसचा बाजार फोफावल्यापासून ‘पैसा फेका आणि शिक्षण (पदवी) मिळवा’ या व्यापारी ट्रेंडने शिक्षण व्यवस्थेला आरपार बदलून टाकले आहे. बायजू हे त्याचे उत्तम उदाहरण.
‘सामाजिक मूल्य आणि आदर्शतत्त्वे संप्रेषित करणे’, हे शिक्षणाचे कार्य होते, म्हणे! आज काय परिस्थिती आहे? व्यक्तीच्या सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेला शिक्षण हा घटक खरोखरच गतिमान करू शकतो काय? ज्ञान, कौशल्य, नेतृत्वगुण, आकलन, मूल्य, कृती यापेक्षा थेट गुणपत्रिकेवरचा ‘परफॉर्मन्स’ महत्त्वाचा वाटायला लागला. येथे थोडे ‘अधिक-उणे’ झाले तर पालक आणि विद्यार्थी शिक्षकांना जाब विचारायला मागेपुढे पाहत नाहीत. या गोष्टीचा अत्यंत नकारात्मक परिणाम होत आहे. शाश्वत विकास वगैरेपेक्षा ‘गुणांना’ महत्त्व प्राप्त झाले. इंटरनेट आणि तत्सम माध्यमांनी शिक्षक या घटकावर गंडांतर आणले आहे. ‘युट्युबवर कोणत्याही गोष्ट उपलब्ध असताना शाळा आणि शिक्षक हवेत कशाला?’ अशी मानसिकता आता तयार होत चालली आहे. भलेही नव्या शैक्षणिक धोरणाने शाळेच्या शैक्षणिक संरचनेत आमूलाग्र बदल करण्यात आला असला तरी, अनेक शाळांना आणि शिक्षकांना आजही किमान अपेक्षित पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत.






