कोमल ठोंबरे
- भारतातील तरुणांच्या मानसिक आरोग्याबाबत चिंताजनक चित्र समोर आले असून जागतिक मानसिक आरोग्य अभ्यासात भारताला ८४ देशांपैकी ६०वे स्थान मिळाले आहे.
- या अहवालानुसार भारतातील १८ ते ३४ वयोगटातील तरुणांचे मानसिक स्वास्थ्य इतर अनेक देशांच्या तुलनेत कमकुवत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
- ‘ग्लोबल माइंड हेल्थ इन २०२५’ हा अहवाल केवळ एक संशोधन दस्तावेज नाही, तर तो आधुनिक जगाच्या अस्वस्थतेचा आरसा आहे. हा अहवाल धोरणकर्ते, शिक्षणतज्ज्ञ आणि विशेषतः पालकांसाठी ‘वेक-अप कॉल’ आहे.
प्रौढांच्या तुलनेत युवकांचे मानसिक आरोग्य अधिक ढासळणे ही भविष्यासाठी धोक्याची घंटा आहे. आर्थिक प्रगती, तांत्रिक उंची आणि जागतिक स्पर्धेत आघाडी घेण्याची महत्त्वाकांक्षा योग्यच; परंतु या सर्वांचा पाया सुदृढ मानसिक आरोग्यावरच उभा असतो. आपण जर युवकांच्या मनाकडे दुर्लक्ष केले, तर उद्याचा भारत अस्थिर मनस्थितीच्या पायावर उभा राहील. हे सगळं अशासाठी की, भारतातील तरुणांच्या मानसिक आरोग्याबाबत चिंताजनक चित्र समोर आले असून जागतिक मानसिक आरोग्य अभ्यासात भारताला ८४ देशांपैकी ६०वे स्थान मिळाले आहे. २०२५ साली प्रसिद्ध झालेल्या ‘ग्लोबल माईंड हेल्थ’ अहवालातून ही बाब उघड झाली आहे. या अहवालानुसार भारतातील १८ ते ३४ वयोगटातील तरुणांचे मानसिक स्वास्थ्य इतर अनेक देशांच्या तुलनेत कमकुवत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रनिर्मितीची खरी सुरुवात युवकांच्या मानसिक बळकटीतून होते. त्यामुळे डिजिटल युगात संतुलन, संवाद आणि संवेदनशीलता या मूल्यांना पुन्हा केंद्रस्थानी आणणे हीच काळाची खरी गरज आहे. झेप आणि आधुनिक जीवनशैलीच्या गजरात मानवी मन अधिकच अस्थिर होत चालले आहे, हा या अहवालाचा केंद्रबिंदू आहे. मानसिक आरोग्य ही केवळ वैयक्तिक समस्या नसून ती सामाजिक, आर्थिक आणि राष्ट्रीय विकासाशी थेट निगडित बाब आहे, हे या निष्कर्षांमधून अधोरेखित होते.
भारतीय तरुणांचे मानसिक आरोग्य धोक्याच्या रेषेवर…
अमेरिकास्थित स्पाईन लॅब या संस्थेने केलेल्या या व्यापक सर्वेक्षणात भारतातील सुमारे ७८ हजार इंटरनेट वापरकर्त्यांचा सहभाग होता. अभ्यासात मानसिक आरोग्य मोजण्यासाठी माईंड हेल्थ कोशंट (एमएचक्यू) या निकषाचा वापर करण्यात आला. त्यानुसार भारतीय तरुणांचा सरासरी एमएचक्यू स्कोअर केवळ ३३ इतका नोंदवण्यात आला. याउलट ५५ वर्षांवरील नागरिकांचा स्कोअर ९६ इतका असून त्यांची मानसिक स्थिती तुलनेने अधिक स्थिर असल्याचे दिसून आले. अहवालातील सर्वात चिंताजनक बाब म्हणजे युवकांच्या मानसिक आरोग्याचा खालावत चाललेला स्तर. अनेक देशांमध्ये १८ ते ३४ वयोगटातील व्यक्तींमध्ये चिंता, नैराश्य, असुरक्षितता आणि भावनिक अस्थिरता यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढलेले दिसते. त्याच्या तुलनेत ५५ वर्षांवरील व्यक्तींचे मानसिक आरोग्य तुलनेने स्थिर आहे.
ही विसंगती अनेक प्रश्न उपस्थित करते. या अहवालाच्या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक विश्लेषक भागा वरखडे म्हणतात की, स्मार्टफोन, ‘सोशल मीडिया’ आणि सततचा ‘स्क्रीन-टाइम’ हे युवकांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम करणारे घटक ठरत आहेत. बालपणापासूनच स्क्रीनशी जोडले जाणे, प्रत्यक्ष खेळ आणि सामाजिक संवादाचा अभाव, तसेच आभासी मान्यतेवर (लाइक्स, फॉलोअर्स) अवलंबून राहणे यामुळे आत्मसन्मान आणि भावनिक संतुलन ढासळते. डिजिटल माध्यमांनी माहितीचा महासागर उपलब्ध करून दिला; परंतु त्याचवेळी तुलना, असुरक्षितता आणि एकाकीपणाही वाढवला.

आभासी जोड वाढली; पण प्रत्यक्ष नाती कमकुवत झाली. भावनांचे व्यवस्थापन, तणाव सहन करण्याची क्षमता आणि प्रतिकूल परिस्थितीत उभे राहण्याचे सामर्थ्य यांवर याचा विपरीत परिणाम होत आहे. अहवालात कौटुंबिक जिव्हाळा आणि सामाजिक आधार, व्यवस्थेतील घट यावरही प्रकाश टाकण्यात आला आहे. संयुक्त कुटुंबपद्धतीचे विघटन, एकल कुटुंबांची वाढ, पालकांची व्यस्तता आणि स्थलांतरित जीवनशैली यांमुळे युवकांच्या भावनिक सुरक्षिततेचा पाया कमकुवत झाला आहे. कुटुंब आणि समुदाय हे मानसिक आरोग्याचे नैसर्गिक संरक्षण कवच असते. तेच जर ढासळले, तर युवक अधिक अस्थिर होणे अपरिहार्य ठरते. त्यामुळे मानसिक आरोग्याचा प्रश्न हा केवळ वैद्यकीय न राहता सामाजिक धोरणाचा विषय ठरतो.
ग्लोबल माइंड हेल्थ इन २०२५’ हा अहवाल केवळ एक संशोधन दस्तावेज नाही, तर तो आधुनिक जगाच्या अस्वस्थतेचा आरसा आहे. आर्थिक वृद्धी, तांत्रिक प्रगती आणि शहरीकरणाच्या गतीमध्ये आपण मानवी मनाकडे दुर्लक्ष केले, तर विकासाची संकल्पना अपुरी ठरेल. एक सशक्त राष्ट्र उभे राहते, ते मानसिकदृष्ट्या सक्षम नागरिकांवर. युवकांची मनःस्थिती जर अस्थिर असेल, तर भविष्याचा पाया दुर्बल राहील. म्हणूनच, मानसिक आरोग्याला विकासाच्या केंद्रस्थानी ठेवणे ही काळाची अपरिहार्यता आहे. जागतिक इशाऱ्याला गांभीर्याने घेत, सजग आणि संवेदनशील समाज उभारणे हेच पुढील पाऊल असले पाहिजे, असेही भागा वरखडे स्पष्ट करतात.
चिंताजनक : जागतिक मानसिक आरोग्य अभ्यासात भारत ६० व्या स्थानी
या अहवालात मानसिक स्वास्थ्यावर परिणाम करणारे चार प्रमुख घटक अधोरेखित करण्यात आले आहेत. त्यामध्ये कुटुंबीयांशी कमी होत चाललेले संबंध, आर्थिक-सामाजिक दबाव, प्रक्रिया केलेल्या अन्नाचे वाढते सेवन आणि लहान वयात स्मार्टफोनचा वाढता वापर यांचा समावेश आहे. आरोग्य व्यवस्थेत आजही मानसिक आरोग्य उपचाराला दुय्यम स्थान मिलताना दिसते. शासकीय पातळीवरही मानसिक आरोग्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जात नाही.

विशेष म्हणजे आर्थिकदृष्ट्या विकसित देशांतील तरुणांनाही मानसिक आरोग्याच्या समस्या अधिक प्रमाणात भेडसावत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. या जागतिक क्रमवारीत घाना देशाने प्रथम स्थान पटकावले असून फिनलंडसारख्या आनंद निर्देशांकात आघाडीवर असलेल्या देशालाही अपेक्षेपेक्षा खालचे स्थान मिळाले आहे.मानसिक आरोग्य ही केवळ वैयक्तिक नव्हे तर सामाजिक आणि सार्वजनिक आरोग्याची गंभीर बाब बनत चालली असल्याने सरकार, शैक्षणिक संस्था आणि कुटुंब व्यवस्थेने एकत्रितपणे ठोस उपाययोजना राबविण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
‘ग्लोबल माइंड हेल्थ इन २०२५’ च्या अहवालात धक्कादायक निष्कर्ष
‘ग्लोबल माइंड हेल्थ इन २०२५’ या ताज्या अहवालाकडे भारताच्या संदर्भात केवळ आकडेवारीवर आधारित अभ्यास म्हणून पाहणे ही गंभीर चूक ठरेल. ८४ देशांमध्ये करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात भारतीय युवकांचा ६०वा क्रमांक लागणे ही केवळ क्रमवारी नाही, तर आपल्या बदलत्या जीवनशैली, कुटुंबरचना आणि प्राधान्यक्रमांचे प्रतिबिंब आहे. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे ५५ वर्षांवरील भारतीयांचा ‘माइंड हेल्थ कोशिएंट’ (एमएचक्यू) ९६ या सन्मानजनक पातळीवर असताना, युवकांचा गुणांक अवघ्या ३३ वर घसरलेला आहे. तंत्रज्ञान, संधी आणि संसाधनांनी समृद्ध असलेली पिढी मानसिकदृष्ट्या अधिक असुरक्षित असणे हे आधुनिक विकास मॉडेलवरच प्रश्नचिन्ह निर्माण करते. ज्या पिढीला ‘डिजिटल नेटिव’ म्हटले जाते, तीच पिढी डिजिटल जगाच्या दुष्परिणामांनी सर्वाधिक प्रभावित होताना दिसते.
अहवालात कौटुंबिक जिव्हाळा कमी होत असल्याबद्दलही गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. ५५ वर्षांवरील ७८ टक्के लोक स्वतःला कुटुंबाच्या जवळचे समजतात, तर युवकांमध्ये हा आकडा केवळ ६४ टक्क्यांवर आहे. भारतीय समाजाची ओळख असलेली संयुक्त कुटुंबपद्धती आणि सामुदायिक बांधिलकी हळूहळू लुप्त होताना दिसत आहे. वाढते एकल कुटुंब, पालकांची व्यस्त दिनचर्या आणि संवादाचा अभाव यामुळे युवक अंतर्मुख आणि एकाकी होत आहेत.

संकटाच्या वेळी कुटुंबाकडून मिळणारा भावनिक आधारही आता कमी होत आहे. यासोबतच बदलत्या आहारपद्धतींचाही मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. ‘अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड’ आणि ‘जंक फूड’चे नियमित सेवन मेंदूच्या कार्यक्षमतेवर आणि भावनिक स्थैर्यावर परिणाम करते. जेव्हा ४४ टक्के युवक नियमितपणे ‘जंक फूड’चे सेवन करतात, तेव्हा तो केवळ शारीरिक नव्हे, तर मानसिक आरोग्यासाठीही धोक्याचा इशारा आहे.
मानसिक आरोग्याचा प्रश्न फक्त नैराश्य किंवा चिंतेपुरता मर्यादित नाही. तो युवकांच्या निर्णयक्षमतेवर, एकाग्रतेवर, स्थिर नाती निर्माण करण्याच्या क्षमतेवर आणि तणावातून सावरण्याच्या ताकदीवर परिणाम करतो. जर युवकवर्ग मानसिकदृष्ट्या अस्थिर असेल, तर त्याचा परिणाम राष्ट्राच्या उत्पादकतेवर, सामाजिक सलोख्यावर आणि दीर्घकालीन विकासावर होणारच
मानसिक आरोग्यासाठी तरुण मदत का घेत नाहीत?
‘बाईमाणूस’ने या अहवालाच्या पार्श्वभूमीवर मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आशिष देशपांडे यांच्याशी संपर्क साधला तेव्हा ते म्हणाले की, संशोधनातून दिसून आलं आहे की किशोरवयीन मुलं आणि तरुण पुरुषांच्या मानसिक आरोग्याच्या समस्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र ते यासाठी अनेकदा मार्गदर्शन किंवा मदत घेत नाहीत. समाजाद्वारे होणारी हेटाळणी, पुरुषत्वाबद्दलच्या कल्पना आणि तरुणांसाठी अनुकूल असणाऱ्या मदत करणाऱ्या व्यवस्थेचा अभाव ही त्यामागची कारणं आहेत. गेल्या 15 ते 20 वर्षांमध्ये, मुलं आणि मुली दोघांच्याही बाबतीत मानसिक आरोग्याच्या समस्या असलेल्यांच्या संख्येत चिंताजनक वाढ झाली आहे. मात्र या समस्यांच्या बाबतीत मदत किंवा मार्गदर्शन घेण्याचं प्रमाण तरुण पुरुषांमध्ये खूपच कमी आहे.
स्मार्टफोन आणि ‘सोशल मीडिया’ने संवादाची व्याख्याच बदलून टाकली आहे. बालपणाचा मोठा काळ स्क्रीनसमोर घालवल्याने प्रत्यक्ष सामाजिक कौशल्यांचा विकास होत नाही. आभासी जगात ‘लाईक’ आणि ‘फॉलोअर्स’ यांची संख्या आत्मसन्मानाचे मोजमाप ठरू लागली आहे. परिणामी भावनिक संतुलन आणि आत्मनियंत्रणाची क्षमता कमकुवत होत चालली आहे.
भागा वरखडे म्हणतात की, हा अहवाल धोरणकर्ते, शिक्षणतज्ज्ञ आणि विशेषतः पालकांसाठी ‘वेक-अप कॉल’ आहे. शिक्षणव्यवस्थेत मानसिक आरोग्याला अनिवार्य घटक म्हणून स्थान देणे ही काळाची गरज आहे. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये समुपदेशन व्यवस्था बळकट करणे, स्क्रीन-टाइम नियंत्रणासाठी ठोस राष्ट्रीय धोरण आखणे आणि कुटुंबांमध्ये मुक्त संवादाची संस्कृती पुन्हा रुजवणे अत्यावश्यक झाले आहे. मुलांना केवळ गुणांच्या स्पर्धेत ढकलण्याऐवजी त्यांना भावनिकदृष्ट्या सक्षम बनवणे गरजेचे आहे. राष्ट्राची ताकद केवळ उंच इमारती, तांत्रिक प्रगती आणि जीडीपीच्या आकड्यांनी मोजली जात नाही. खऱ्या अर्थाने मजबूत राष्ट्र तेच, ज्याची युवक पिढी मानसिकदृष्ट्या संतुलित, आत्मविश्वासू आणि सामाजिकदृष्ट्या जोडलेली आहे. हा इशारा वेळेत ओळखला नाही, तर भविष्यात हे संकट अधिक गडद होऊ शकते.

विकासाच्या व्याख्येत मानसिक आरोग्याला केंद्रस्थानी ठेवण्याची हीच योग्य वेळ आहे. जग झपाट्याने बदलत आहे. तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, जागतिकीकरण आणि स्पर्धेच्या नव्या समीकरणांनी मानवी जीवन अधिक वेगवान केले आहे; परंतु या वेगाच्या शर्यतीत एक गंभीर वास्तव समोर येत आहे. प्रौढांच्या तुलनेत युवकांचे मानसिक आरोग्य अधिक वेगाने खालावत आहे. हा केवळ आरोग्यविषयक प्रश्न नाही, तर तो सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय भवितव्याशी निगडित मुद्दा आहे.
अनेक जागतिक अभ्यास आणि अहवालांनी अधोरेखित केले आहे, की विकसित असो वा विकसनशील देश; बहुतेक देशांत युवकांमध्ये चिंता, नैराश्य, एकाकीपणा आणि आत्मविश्वासाचा अभाव वाढताना दिसतो आहे. विशेष म्हणजे, ५०-५५ वर्षांवरील प्रौढांच्या तुलनेत युवकांमध्ये मानसिक अस्थिरतेचे प्रमाण अधिक आहे. आर्थिक स्थैर्य नसणे, करिअरची अनिश्चितता, स्पर्धेचा ताण आणि सामाजिक माध्यमांवरील तुलना यांचा एकत्रित परिणाम युवकांच्या मनावर होत आहे. आजचा युवक माहितीने परिपूर्ण असला, तरी अनुभवाने अपरिपक्व आहे. डिजिटल जगात त्याला हजारो ‘मित्र’ मिळतात; पण संकटाच्या वेळी खांद्यावर हात ठेवणारा माणूस मात्र दुर्मिळ ठरतो.
धोरणकर्ते, शिक्षणतज्ज्ञ आणि विशेषतः पालकांसाठी ‘वेक-अप कॉल’
भारत हा जगातील सर्वात तरुण देशांपैकी एक मानला जातो. ही लोकसंख्यात्मक ताकद भविष्यासाठी संधी मानली जाते; मात्र अलीकडील सर्वेक्षणे सूचित करतात, की भारतीय युवकांचा मानसिक आरोग्य निर्देशांक चिंताजनकरीत्या कमी आहे, तर प्रौढांची स्थिती तुलनेने स्थिर आहे. शैक्षणिक स्पर्धेचा अतिरेक, पालकांच्या अपेक्षांचा दबाव, रोजगाराची अनिश्चितता आणि वाढता सामाजिक तुटवडा. संयुक्त कुटुंबपद्धतीचे विघटन, शहरीकरण आणि स्थलांतरामुळे युवकांच्या भावनिक आधारव्यवस्थेत कमतरता आली आहे.भारतीय संस्कृतीत ‘कुटुंब’ हे मानसिक सुरक्षिततेचे केंद्र होते. आज मात्र एकल कुटुंबपद्धती, दोन्ही पालकांची व्यस्तता आणि संवादाचा अभाव यामुळे युवक अधिक अंतर्मुख होत आहेत. बाह्य यशाच्या शर्यतीत अंतर्मनाची काळजी घेणे मागे पडले आहे.
आजची पिढी ‘डिजिटल ॲडिक्ट’ म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. स्मार्टफोन, गेमिंग, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि ‘सोशल मीडिया’ या माध्यमांनी युवकांच्या दैनंदिन जीवनावर पूर्ण वर्चस्व मिळवले आहे. सततच्या ‘स्क्रीन-टाइम’मुळे मेंदूच्या लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. झोपेचा अभाव, चिडचिड, असुरक्षितता आणि तुलना करण्याची सवय वाढते. ‘सोशल मीडिया’वर दाखवले जाणारे ‘परिपूर्ण जीवन’ युवकांना स्वतःबद्दल न्यूनगंड निर्माण करायला भाग पाडते. डिजिटल माध्यमांमुळे माहिती सहज उपलब्ध झाली; पण भावनांवर नियंत्रण ठेवण्याची आणि प्रत्यक्ष संवाद साधण्याची क्षमता कमी झाली. व्हर्च्युअल संवादाने प्रत्यक्ष सहवासाची जागा घेतली; पण त्यातून भावनिक समाधान मिळत नाही. परिणामी, युवक अधिक एकाकी आणि अस्थिर होत आहेत. या पार्श्वभूमीवर काही ठोस उपाय अनिवार्य आहेत. शाळा, महाविद्यालये आणि कार्यस्थळांवर समुपदेशन सेवा आणि भावनिक शिक्षण अनिवार्य करणे आवश्यक आहे.

‘स्क्रीन-टाइम’वर मर्यादा, ‘सोशल मीडिया’चा सजग वापर आणि ‘डिजिटल डिटॉक्स’ यांचा प्रसार करणे गरजेचे आहे. तंत्रज्ञान साधन म्हणून वापरले जावे, जीवनाचा केंद्रबिंदू म्हणून नव्हे. दररोज ठराविक वेळ कुटुंबीयांमध्ये संवादासाठी राखणे, मुलांना ऐकून घेणे आणि भावनिक आधार देणे ही प्राथमिक जबाबदारी आहे. नियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी झोप आणि मैदानी उपक्रम मानसिक स्थैर्यासाठी अत्यावश्यक आहेत. मानसिक आरोग्यासाठी स्वतंत्र आणि व्यापक राष्ट्रीय आराखडा, ग्रामीण-शहरी भागात सहज उपलब्ध सेवा, तसेच हेल्पलाईन आणि जागरूकता मोहिमा राबवणे आवश्यक आहे.
(‘ग्लोबल माइंड हेल्थ इन २०२५’ चा पूर्ण अहवाल वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लि करा)
https://sapienlabs.org/global-mind-health-in-2025-report-read-en/



