टीम बाईमाणूस
- मराठवाड्यातील हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये गुरुवारी मध्यरात्री भूकंपाचे तीव्र धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
- हिंगोलीच्या शिरळी परिसरात रात्री १ वाजून ३७ मिनिटांनी ४.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा पहिला मोठा धक्का बसला. या धक्क्यामुळे घाबरलेल्या नागरिकांनी आपली घरे सोडून रस्त्यावर धाव घेत संपूर्ण रात्र जागून काढली.
- हिंगोलीच्या पांगरा शिंदे गावात मागील ९ वर्षांपासून भूकंपाची मालिका सुरू आहे. या धक्क्यांचा महिला व लहान मुलांवर होणारा परिणाम, मातीच्या घरांचा धोका आणि भौगोलिक कारणांबाबत 'बाईमाणूस'ने यापूर्वीच ग्राउंड रिपोर्ट प्रसिद्ध केला होता.
मराठवाड्यातील हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये गुरुवारी मध्यरात्री भूकंपाचे तीव्र धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंगोलीच्या शिरळी परिसरात रात्री १ वाजून ३७ मिनिटांनी ४.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा पहिला मोठा धक्का बसला. या धक्क्यामुळे घाबरलेल्या नागरिकांनी आपली घरे सोडून रस्त्यावर धाव घेत संपूर्ण रात्र जागून काढली.
हिंगोली जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून भूकंपाची मालिकाच सुरू असून, मध्यरात्री बसलेला धक्का हा त्याचाच एक भाग आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, या भूकंपाचे केंद्रबिंदू वसमत तालुक्यातील शिरली येथे १० किलोमीटर खोलीवर होते. यानंतरही सलग तीन धक्के जाणवले. रात्री २:१५ वाजता ३.६ रिश्टर, २:१७ वाजता ३.९ रिश्टर आणि ३:२३ वाजता ४.१ रिश्टर स्केलची नोंद झाली, ज्याचे केंद्रबिंदू औंढा नागनाथ तालुक्यातील काकडदाभा येथे होते.
या धक्क्यांमुळे वसमत, हिंगोली, कळमनुरी व औंढा नागनाथ तालुक्यांत सर्वाधिक दहशत पाहायला मिळाली. नांदेड शहरातील तरोडा नाका, मालेगाव, कावरानगर भागातही धक्के जाणवले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आमदरी येथे एका घराची भिंत कोसळली असून १० ते १२ घरांना तडे गेले आहेत. तर सततच्या भूकंपाचे केंद्र राहिलेल्या पांगरा शिंदे गावात ५० ते ६० घरांच्या भिंतींना पुन्हा तडे गेले आहेत.
अफवांवर विश्वास ठेवू नका - जिल्हाधिकारी
या घटनेनंतर हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी तातडीने नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. "नागरिकांनी घाबरून जाऊ नये. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असून यंत्रणांना सूचना देण्यात आल्या आहेत. समाजमाध्यमांवर भीती पसरवणारे संदेश फॉरवर्ड करू नका आणि काही नुकसान आढळल्यास थेट प्रशासनाशी संपर्क साधा," असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

'बाईमाणूस'ने यापूर्वीच मांडली होती पांगरा शिंदे गावाची विदारक स्थिती…
हिंगोली जिल्ह्यात आणि विशेषतः वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावात जाणवणारे हे धक्के नवीन नाहीत. मागील ९ वर्षांपासून या परिसरात भूकंपाची मालिका सुरू आहे. सततच्या या धक्क्यांमुळे ग्रामस्थांच्या, विशेषतः महिला आणि लहान मुलांच्या मनावर झालेला परिणाम, जुन्या मातीच्या घरांना असलेला धोका आणि यामागील भौगोलिक कारणे, याबाबत 'बाईमाणूस'ने यापूर्वीच ग्राउंड रिपोर्ट प्रसिद्ध केला होता.
११ एप्रिलला याच पांगरा शिंदे गावात ४.७ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. त्यावेळी केलेल्या ग्राउंड रिपोर्टमध्ये काही अत्यंत गंभीर मुद्दे समोर आले होते. २०१७ पासून गावात २०० ते २५० वेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
'बाईमाणूस'चा ग्राउंड रिपोर्ट वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा: नऊ वर्षापासून भूकंपाच्या सावटाखाली जगणाऱ्या ‘पांगरा शिंदे’ गावाची व्यथा…
घरातील पुरुष शेतात गेल्यावर घरात एकट्या असणाऱ्या महिला, वृद्ध आणि बाळंतिणींना या धक्क्यांमुळे जीव मुठीत धरून जगावे लागते. दिवाळीच्या सणादरम्यानही भूकंप झाल्याने अनेक लेकी-बाळी माहेर सोडून परत गेल्याच्या घटना घडल्या होत्या.
पांगरा शिंदे गावात आजही ३५ ते ४० टक्के घरे जुनी आणि मातीची आहेत. सततच्या हादऱ्यांमुळे या घरांना मोठे तडे गेले असून, मोठा धक्का बसल्यास ही घरे १००% कोसळतील अशी भीती सेनगाव तोष्णीवाल महाविद्यालयाचे भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. भगवान घुटे यांनी व्यक्त केली होती. भूकंपाच्या धक्क्यांमुळे जमिनीखालील 'पोअर स्पेसेस'मध्ये बदल होऊन काही कोरड्या विहिरींना अचानक पाणी आले, तर भरलेल्या बोअरवेलचे पाणी अचानक आटले, हा धक्कादायक प्रकारही समोर आला होता.
जमिनीखालील २.५ अब्ज वर्षे जुन्या ग्रॅनाईट्स खडकातील जुन्या भेगांच्या (फॉल्ट्स) हालचालींमुळे हे धक्के बसत असून, हिंगोली परिसरात प्राथमिक सर्वेक्षणात असे दोन फॉल्ट्स दिसून आल्याचे भूगर्भशास्त्रज्ञांनी स्पष्ट केले होते.
व्हिडिओ रिपोर्ट - https://youtu.be/qbb50ayuu-I?si=oMvIuncVrQwOAvy-

