टीम बाईमाणूस
- 'सैराट' चित्रपटातील 'सल्या' अर्थात अभिनेता अरबाज शेख सध्या मोठ्या वैयक्तिक संकटाचा सामना करत असून, वडिलांच्या उपचारांसाठी त्याने सोशल मीडियावर भावनिक मदतीचे आवाहन केले आहे.
- पहाटे ४ वाजता शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये "माझ्या बापाला मरू द्यायचं नाहीये... प्लीज मदत करा," असे म्हणत अरबाज हुंदके देत रडताना दिसत असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
- वडिलांना ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर उपचारादरम्यान रुग्णालयात आर्थिक लूट झाल्याचा आरोप अरबाजने केला आहे. मात्र, या आरोपांवर संबंधित रुग्णालयाकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेले नाही.
"बापासाठी मुलगा किती हतबल होऊ शकतो, याचं जिवंत उदाहरण म्हणजे आज सकाळी व्हायरल झालेला "सल्याचा" व्हिडिओ. पहाटेचे चार वाजले होते. हॉस्पिटलच्या आवारात उभा असलेला 'सैराट' चित्रपटातील 'सल्या' कॅमेऱ्यासमोर हुंदके देत रडत होता. डोळ्यांत अश्रू, आवाजात वेदना आणि एकच आर्त हाक, "मला माझ्या बाबांना वाचवायचं आहे... त्यांना मरू द्यायचं नाही... प्लीज मदत करा." मराठीतील सुपरहिट 'सैराट' चित्रपटात परश्याचा जिवलग मित्र 'सल्या' ही भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता अरबाज शेख सध्या मोठ्या वैयक्तिक संकटातून जातोय. आपल्या वडिलांना ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर उपचारांसाठी धावपळ करणाऱ्या अरबाजने सोशल मीडियावर भावनिक व्हिडिओ शेअर करत मदतीचे आवाहन केले असून, त्याचा व्हिडिओ पाहून अनेकांचे डोळे पाणावले आहेत.
वडिलांना ब्रेन हॅमरेज; नोबेल हॉस्पिटलवर गंभीर आरोप
व्हिडिओमध्ये अरबाज सांगतो की, त्याच्या वडिलांना आठ दिवसांपूर्वी ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर सोलापूरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर हृदयाशी संबंधित त्रास निर्माण झाल्याने त्यांना सोलापूरमधील नोबेल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान आलेल्या अनुभवाबाबत नोबेल हॉस्पिटलवर गंभीर आरोप करत त्याने आपली व्यथा मांडली आहे.
अरबाजच्या म्हणण्यानुसार, नोबेल हॉस्पिटलमध्ये रुग्ण दाखल करताना सुरुवातीला १० हजार रुपयांचे डिपॉझिट भरावे लागले. त्यानंतर डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे बाहेरून आणता येतील का, अशी विचारणा केली असता, ती रुग्णालयातील मेडिकलमधूनच खरेदी करावी लागतील, असे सांगण्यात आले. त्यानुसार त्याने तीन वेळा औषधे खरेदी केली आणि त्यासाठी ४० हजार रुपयांहून अधिक खर्च झाला.

याबाबत बोलताना अरबाजने दावा केला की, हीच औषधे बाहेरील मेडिकल स्टोअरमधून घेतली असती तर जवळपास निम्म्या किंमतीत मिळाली असती. त्यामुळे उपचारांच्या नावाखाली आर्थिक लूट होत असल्याची भावनाही त्याने व्यक्त केली. मात्र, नोबेल हॉस्पिटलवर करण्यात आलेल्या या आरोपांबाबत रुग्णालयाच्या व्यवस्थापनाकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेले नाही.
अरबाजच्या आरोपानंतर कारवाई; फातिमा मेडिकलची औषधविक्री बंद करण्याचे आदेश
अरबाज शेखने रुग्णालयातील मेडिकलमधूनच औषधे खरेदी करण्यास भाग पाडल्याचा आरोप केल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने तत्काळ कारवाई केली. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी १२ जून रोजी जारी केलेल्या आदेशानुसार रुग्णांना रुग्णालयातील मेडिकलमधूनच औषधे खरेदी करण्याची सक्ती करता येत नाही. या पार्श्वभूमीवर सोलापूरातील नोबेल रुग्णालयाशी संलग्न फातिमा मेडिकलची सहाय्यक आयुक्त अरुण गोडसे यांच्या पथकाने तपासणी केली. प्राथमिक तपासात डॉक्टरांनी दिलेल्या औषधांच्या चिठ्ठ्या थेट फातिमा मेडिकलच्या संगणकावर तयार होत असल्याचे आणि रुग्णांना तेथूनच औषधे घेण्यास सांगितले जात असल्याचे प्राथमिक पुरावे आढळल्याचे गोडसे यांनी सांगितले. त्यानंतर संबंधित मेडिकलची औषधविक्री तात्पुरती बंद करण्याचे आदेश देण्यात आले.
आर्थिक मदतीसाठी सोशल मीडियावर भावनिक आवाहन
व्हिडिओमध्ये तो भावनिक होत म्हणतो, "मला माझ्या बापाला मरताना पाहायचं नाही. मी पूर्णपणे खचून गेलो आहे. आता त्यांच्यावर कुठे उपचार करावेत, काय करावं, काहीच समजत नाही. कृपया मला मार्गदर्शन करा आणि मदत करा."
अरबाजने व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्येही आपली आर्थिक अडचण मांडली आहे. वडिलांचे उपचार सुरू ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतीची गरज असल्याचे सांगत त्याने गुगल पे क्रमांक शेअर केला आहे. "ज्यांना शक्य असेल त्यांनी थोडीशी आर्थिक मदत करा किंवा ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा. तुमची छोटी मदत माझ्यासाठी खूप मोठी ठरेल," अशी भावनिक विनंती त्याने केलीये.
चाहत्यांकडून सहानुभूती, मदतीसाठी पुढे सरसावले नेटकरी
'सैराट' चित्रपटातील 'सल्या' या भूमिकेमुळे अरबाज शेखला मोठी लोकप्रियता मिळाली होती. चित्रपटातील त्याचा निरागस अभिनय आणि परश्यासोबतची मैत्री प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती. आज तोच अभिनेता आपल्या वडिलांच्या जीवासाठी सोशल मीडियावर मदतीची याचना करत असल्याचे पाहून चाहतेही हळहळ व्यक्त करतायेत.

दरम्यान, सोशल मीडियावर अनेकांनी अरबाजच्या व्हिडिओला प्रतिसाद देत त्याच्या वडिलांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे. काहींनी आर्थिक मदतीचे आवाहन पुढे पोहोचवले असून, तर काहींनी योग्य उपचारासाठी मार्गदर्शन करण्याचाही प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर, रुग्णालयाविरोधात करण्यात आलेल्या आरोपांची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशीही मागणी काही नेटकऱ्यांनी व्यक्त केलीये. सध्या अरबाज शेखच्या वडिलांवर उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत वैद्यकीय माहिती समोर आलेली नाही. तसेच, औषधांच्या किंमती आणि उपचारांबाबत अरबाजने केलेल्या आरोपांवर संबंधित रुग्णालयाकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.


