Skip to main content

सिनेमा-वेबसिरीज क्षेत्रात ‘इराणफोबिया’, ‘इस्लामोफोबिया’ नावाचा ‘व्हायरस’ अमेरिकेने कसा पसरवला?

टीम बाईमाणूस
04 Mar 2026
7 min read
10 views
सिनेमा-वेबसिरीज क्षेत्रात ‘इराणफोबिया’, ‘इस्लामोफोबिया’ नावाचा ‘व्हायरस’ अमेरिकेने कसा पसरवला?
  • हॉलिवूडचे निर्माते-दिग्दर्शक इराणविरोधी युद्धासाठी जनमत तयार करण्याच्या उद्देशाने अशाप्रकारच्या प्रोपगंडा सिनेमे आणि सिरीज तयार करत असल्याचा आरोप.


  • मनोरंजन क्षेत्रात ‘इस्लामोफोबिया’ सारखाच आता ‘इराणफोबिया’ नावाच्या व्हायरसने शिरकाव.


  • ९/११ हल्ल्यानंतर अमेरिका-इस्त्रायलने प्रोपगंडा सिनेमांना कशी बळकटी दिली?


जगाला ज्या दिवसाची भीती होती, ते अखेर होत आहे. अमेरिका-इस्रायल या दोन देशांनी संयुक्तपणे कारवाई करत इराणवर भीषण हल्ला केला आहे. याचे पडसाद आता दिसू लागले आहेत. या तणावग्रस्त वातावरणात एक वेबसिरीज चर्चेचा विषय ठरत आहे. सध्या जगात जी तणावग्रस्त परिस्थिती आहे, त्याच परिस्थितीशी मिळतीजुळती वेब सिरीज जिचं नाव आहे ‘तेहरान’. ही इस्रायली गुप्तचर थ्रिलर सिरीज इराण-इस्रायलमधील शत्रुत्व, हेरगिरी आणि अणुकार्यक्रमावर केंद्रित आहे, जी सध्याच्या घटनांशी खूप संबंधित आहे.


‘तेहरान’ची कथा एका इस्त्रायली मोसाद एजेंटभोवती फिरताना दिसते ही महिला एजंट तेहरान याठिकाणी खोटी ओळख बनवून घुसते आणि परमाणू रिएक्टर नष्ट करण्याचा प्रयत्न करते. या सिरीजमध्ये सायबर हल्ले, गुप्त कारवाया, हत्या आणि प्रॉक्सी युद्धे दाखवली आहेत जी आजच्या इराण-इस्रायल संघर्षाशी आश्चर्यकारक साम्य दर्शवतात.


अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर ‘तेहरान’चा तिसरा सिझन प्रदर्शित होणे हा निव्वळ योगायोग नसून यामागे मोठं कटकारस्थान असल्याचा आरोप हॉलिवूडमध्ये केला जातोय. हॉलिवूडचे पटकथालेखक-निर्माते-दिग्दर्शक इराणविरोधी युद्धासाठी जनमत तयार करण्याच्या उद्देशाने अशाप्रकारच्या प्रोपगंडा सिनेमे आणि सिरीज तयार करत असल्याचा आरोप केला जातोय. मनोरंजन क्षेत्रात ‘इस्लामोफोबिया’ सारखाच आता ‘इराणफोबिया’ नावाच्या व्हायरसने शिरकाव केल्याचे म्हटले जात आहे.


तेहरानसारखी सिरीजच नव्हे तर आर्गो, होमलँड, २४, द फिफ्थ शेड, टॉप गन : मावरिक या सारख्या अनेक कलाकृतींची नावे सांगता येतील ज्यात इराणला खलनायक पद्धतीने रंगवण्यात आले आहे. ‘आर्गो’ सिनेमाला ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंर तर इराणने आंतरराष्ट्रीय न्यायालयात हॉलिवूड दिग्दर्शक–निर्मात्यांविरुद्ध खटला दाखल करण्याची योजना आखली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार या चित्रपटांनी  ‘इराणफोबिया’ला अधिक खतपाणी मिळत आहे.


‘इराणफोबिया’, ‘इस्लामोफोबिया’ आणि मनोरजंनाची माध्यमे


आजच्या जागतिकीकरणाच्या काळात माध्यमे आणि सिनेमा हे केवळ मनोरंजनाचे साधन राहिलेले नाहीत, तर विचारसरणी, राजकारण आणि जनमत तयार करण्याची अत्यंत प्रभावी साधने बनली आहेत. विशेषतः हॉलिवूड, जे अमेरिकेच्या सॉफ्ट पॉवरचे सर्वात मोठे प्रतीक मानले जाते, आपल्या चित्रपटांद्वारे, टीव्ही मालिकांद्वारे आणि माध्यमकथनांद्वारे केवळ अमेरिकन संस्कृती आणि मूल्यांचे प्रसारण करत नाही, तर प्रतिस्पर्धी देशांची प्रतिमा देखील आकारते. ही अमेरिकन रणनीती केवळ इराण पुरतीच मर्यादित नाही; तर अमेरिका किंवा पश्चिमेकडील राष्ट्रे जे देश “शत्रू” मानतात, उदा. रशिया, चीन, क्युबा, उत्तर कोरिया, इराक आणि अफगाणिस्तान… त्यांच्याविरुद्धही याच माध्यमांचा वापर सतत केला जातो.


‘इस्लामोफोबिया’ची व्याख्या स्पष्ट करताना गेनॉट मायर यांच्या एका शोध निबंधाचा आधार घेतो. मायरच्या निबंधानुसार ‘इस्लामोफोबिया’ ही संज्ञा सर्वप्रथम इब्राहिम स्लीमन बेन आणि दिनेट इटिएन यांनी मुहम्मद पैगंबर यांच्यावर जे लेखन केलं त्यात वापरली गेली होती. मात्र, तेव्हाचा या संज्ञेचा अर्थ आपल्याला आता ज्ञात असलेल्या अर्थाहून भिन्न होता. पुढे जाऊन ‘रनीमीड ट्रस्ट कमिशन’ने १९९७ मध्ये सादर केलेल्या अहवालात ही संज्ञा तत्कालीन सामाजिक-राजकीय संदर्भात मांडली गेली.


User Image


ज्यात ‘इस्लाम धर्माविषयीची अकारण भीती’ अशी नोंद आढळते. त्यानंतर इस्लामोफोबियाची व्याख्या वेळोवेळी अद्ययावत झाल्याने अधिक सुस्पष्ट होत गेली. ज्यातून लक्षात येतं की, ‘इस्लामोफोबिया’ म्हणजे ‘इस्लाम धर्म किंवा तो अंगिकारलेल्या व्यक्तींविषयीची भीती’ इतकं साधं समीकरण नाही. कारण, या मुद्द्याला बरेच कंगोरे आहेत. ज्यात केवळ भयगंडच नव्हे, तर मुस्लिम ही ओळख बाळगणाऱ्या व्यक्तींचा द्वेष, त्यांना सामाजिक, राजकीय, धार्मिकदृष्ट्या वाळीत टाकलं जाणं किंवा धिक्कारलं जाणं, इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. शिवाय, या सर्व कृती इतक्या टोकाच्या असू शकतात की, अनेकांना आपली मुस्लिम ही ओळखच लांच्छनास्पद वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण होते.


हे का घडतं, तर माध्यमांमध्ये मुस्लिम पात्रांना साचेबद्ध (स्टिरिओटिपीकल) आणि चुकीच्या स्वरुपात सादर करणं, इस्लाम धर्माशी आणि हा धर्म अंगिकारलेल्या व्यक्तींशी निगडीत समज-गैरसमजांची मालिका तयार होणं, इत्यादी गोष्टींमुळे. आता इस्लाम धर्माची चिकित्सा होत असेल, तर त्याला कुणाचा काही आक्षेप असण्याचं कारण नाही. इतर कुठल्याही धर्माप्रमाणेच इस्लामचीही अशी चिकित्सा जरूर व्हावी. मात्र, चिकित्सेऐवजी वर्षानुवर्षे माध्यमांमधून समोर मांडल्या गेलेल्या संकल्पनांना आणि चुकीच्या चित्रणाला खतपाणी घातलं जात असेल, एका संपूर्ण समाजघटकाच्या मनात दुरावलेपणाची भावना निर्माण केली जात असेल, तर नक्कीच काहीतरी चुकत असते. बहुतांशी चित्रपट-मालिकांच्या बाबतीत नेमकं हेच घडतं. 


९/११ हल्ल्यानंतर अमेरिका-इस्त्रायलने प्रोपगंडा सिनेमांना कशी बळकटी दिली?


नुसत्या अमेरिकन चित्रपट-मालिकांचा विचार केला तरी वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या समाजघटकाला, समुदायाला नकारात्मक छटांमध्ये चितारणं, त्यांच्याविषयी निरनिराळे (गैरसमज) पसरवणं अशा गोष्टी कायम केल्या गेल्याचं दिसून आलेलं आहे. ११ सप्टेंबर २००१ ला अमेरिकेत ठिकठिकाणी घडलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आधीच अल्पसंख्यांक असलेला मुस्लिम समुदाय अमेरिकन माध्यमांच्या आणि पर्यायाने अमेरिकन समाजाच्या रडारवर आला.


९/११ मुळे जागतिक राजकारणाच्या दृष्टीने मध्यपूर्व देशांमधील कारभारात हस्तक्षेप करण्यास कायम उत्सुक असलेल्या अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राच्या हाती आयतं कोलीत मिळालं. त्यामुळे या घटनेनंतर अमेरिकन चित्रपट-मालिकांमध्ये खलभूमिकांमध्ये दिसणाऱ्या मुस्लिम पात्रांच्या संख्येत वाढ होऊ लागली. चित्रपट-मालिका आणि या सामाजिक-राजकीय-धार्मिक मुद्द्यांच्या परस्परसंबंधांमुळे इस्लामविरोधी आशय असलेल्या कलाकृतींची निर्मिती होऊ लागली.


लवकरच त्यात इंग्लंड, इस्राईलसारखे देश, युरोपियन देश यांनीही उडी घेतल्याने या प्रकारच्या कलाकृतींच्या संख्येत अधिकच भर पडली. ज्यातून दहशतवादापेक्षा मुस्लिम समुदायच त्या-त्या राष्ट्राचा मुख्य शत्रू असल्याचं बिंबवलं जाऊ लागलं. या सगळ्याचा एकत्रित परिणाम असा की, २००१ नंतर मुस्लिम व्यक्तींविरोधातील द्वेषकारक घटना आणि गुन्ह्यांच्या संख्येत अधिकच वाढ झाली. 


User Image


1979 च्या इस्लामी क्रांतीनंतर, जेव्हा इराणने अमेरिकापरस्त सरकार उलथवून इस्लामी राज्यव्यवस्था प्रस्थापित केली, तेव्हापासून पाश्चात्त्य माध्यमांनी इराणचे नकारात्मक चित्रण सुरू केले. 9/11 नंतर, जेव्हा अमेरिकेने ‘ग्लोबल वॉर ऑन टेरर’ जाहीर केले, तेव्हा इराणला दहशतवादाचे केंद्र म्हणून अधिक तीव्रतेने दाखवले गेले. हॉलिवूडनेही ही प्रतिमा अधिक दृढ केली. इथे इराण सतत खलनायक, मागासलेला, कट्टर आणि असहिष्णुप्रवृत्तीचा देश म्हणून दिसतो.


याचे सर्वांत प्रसिद्ध उदाहरण म्हणजे Argo, जो 1979 च्या अमेरिकन दूतावास संकटावर आधारित आहे. यात इराणी लोकांना हिंसक न दाखवले जाते, तर अमेरिकन व कॅनेडियन पात्रे हुशार, धाडसी आणि मानवी मूल्यांनी प्रेरित दाखवली जातात.एक CIA अधिकारी सहा अमेरिकन नागरिकांना वाचवण्यासाठी बनावट विज्ञानकथा चित्रपटाच्या नावाखाली मोहीम आखतो आणि इराणची प्रतिमा अस्थिर, धोकादायक आणि पाश्चात्त्य-विरोधी म्हणून दाखवली जाते. 


टीव्ही मालिका Homeland मध्येही हाच पॅटर्न दिसतो. इराणला दहशतवादाचा गड, अमेरिकेच्या सुरक्षेला धोका आणि कट्टरवादाचे केंद्र दाखवले जाते. Not Without My Daughter (1991) आणि The Stoning of Soraya M. (2008) सारख्या चित्रपटांमध्ये इराणमधील स्त्रियांवरील अत्याचार, कठोर इस्लामिक कायदे आणि अमानवी शिक्षांचा, विशेषतः दगड मारून ठार मारण्याच्या प्रथेचा अतिशयोक्तीपूर्ण प्रभाव दाखवला आहे.


सौदी आणि इतर अरब देशांपेक्षा इराणला केले जाते टार्गेट


या सर्व चित्रणांमध्ये इराणी लोकांना कट्टर, दहशतवादी किंवा दडपशाही करणारे म्हणूनच दाखवले जाते. महिलांना बहुतेक वेळा पीडित किंवा दडपल्या गेलेल्या रूपातच दाखवले जाते. इराणमधील अनेक चित्रपट उदा. Persepolis (2007), The Circle (2000), Taxi (2015), This Is Not a Film (2011) स्त्रियांवरील निर्बंध, अभिव्यक्तीस्वातंत्र्यावरची मर्यादा, सामाजिक विषमता आणि राजकीय दडपशाही यांचे चित्रण करतात. या चित्रपटांना पाश्चात्त्य चित्रपट महोत्सवांत मोठा प्रतिसाद मिळतो आणि ते पश्चिमेकडील कथनाला अधिक विश्वसनीयता देतात. हे निश्चित आहे की इराणमध्ये स्त्रियांच्या हक्कांवरील बंधने, राजकीय सहभागाची कमतरता, कायदेशीर विषमता यावरची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. परंतु त्याच प्रकारची दडपशाही सौदी अरेबिया आणि इतर अरब देशांतही अस्तित्वात आहे. तरीही हॉलिवूडमध्ये केवळ इराणलाच सातत्याने नकारात्मक दाखवले जाते. 


९/११ च्या प्रत्यक्ष हल्ल्याच्या आधीपासून आंतरराष्ट्रीय राजकीय वातावरणात अस्थैर्य निर्माण झालेलं होतं. सप्टेंबर २००१ मध्ये प्रक्षेपणास सुरुवात झालेल्या ‘द एजन्सी’ या मालिकेत अमेरिकेतील दहशतवादी हल्ला हीच संकल्पना होती. खरंतर खऱ्या दहशतवादी हल्ल्याच्या आधीच त्याच्याशी साधर्म्य असणाऱ्या हल्ल्याभोवती फिरणारी ही मालिका निर्मितीच्या प्रक्रियेत होती. पुढे जाऊन सप्टेंबरमध्ये खरा हल्ला झाल्यानंतर मालिकेच्या मूळ कथानकात काही बदल करत, नव्याने घडलेल्या घटनेची गुंफण करून ही मालिका प्रक्षेपित केली गेली. 


User Image


त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात प्रक्षेपणास सुरुवात झालेली ‘२४’ ही मालिका, २००३-०४ दरम्यान प्रक्षेपित झालेली ‘थ्रेट मॅट्रिक्स’ या मालिकादेखील कमी अधिक फरकाने याच मार्गावर वाटचाल करतात. या मालिकांमध्ये नायक किंवा मुख्य पात्रांचा संच हा फेडरल ब्युरो ऑफ इन्वेस्टिगेशन (एफबीआय), क्रिमिनल इन्वेस्टिगेशन एजन्सी (सीआयए) किंवा तत्सम अमेरिकन संस्थेत काम करणारा असायचा. त्यांचा लढा दहशतवादाविरुद्ध असल्याने त्यांना सर्व नियमांपासून सुटका मिळालेली असायची.


उदाहरणार्थ, ‘२४’ मालिकेची मध्यवर्ती संकल्पना अशी आहे ज्यात - अमेरिकेतील ‘काऊन्टर टेररिस्ट युनिट’ (दहशतवाद विरोधी पथक) दहशतवाद्यांच्या वेगवेगळ्या योजना धुळीस मिळवताना दिसतं. ज्यात जॅक बॉअर हे मुख्य पात्र साम-दाम-दंड-भेद अशा सर्व कृती करताना दिसतं. ज्यात अनेकदा जॅक गुन्हेगारांकडून किंवा संशयितांकडून माहित काढण्यासाठी त्यांचा शारीरिक छळ करताना दिसतो. मालिकेतील बहुतांशी गुन्हेगार आणि दहशतवादी पात्रं ही मुस्लिम होती, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. 


अमेरिकेचा जन्मच जगाचा उद्धार करण्यासाठी…


होतं असं की, ‘जे काही केलं जात आहे ते देशासाठी आणि देशवासीयांच्या सुरक्षेसाठी' असा दृष्टिकोन असल्याने या नायकांना किंवा पात्रांच्या संचाला विशेषाधिकार प्राप्त होतात. ज्यातून अगदी द्वेषकारक, हिंसक कारवाया केल्या गेल्या तरी त्या न्याय्य ठरतात असा पात्रांचा आणि निर्माणकर्त्यांचा दृष्टिकोन असतो. प्रत्यक्षात मात्र असा वंशविद्वेषी हिंसाचार, संशयाची सुई कायम मुस्लिम पात्रांकडे जाणं, इत्यादी घटना सतत दिसत राहिल्याने एका सबंध समुदायाचं नकारात्मक चित्र उभं केलं जातं. ‘२४’, ‘द एजन्सी’ ही केवळ काही उदाहरणं झाली. कारण, या यादीमध्ये ‘स्लीपर सेल’ (२००५-२००६), २०११ मध्ये सुरु झालेली आणि या वर्षी पूर्णत्वास आलेली ‘होमलँड’, ‘द अमेरिकन्स’ (२०१३-२०१८), ‘जॅक रायन’ अशा कित्येक मालिकांचा समावेश होतो. अगदी ‘लॉ अँड ऑर्डर’च्या काही भागांमध्येही मुस्लिम विरोधी विचार दिसून येतात. 


या मालिकांच्या कथानकांमध्ये इराक, इराण, अफगाणिस्तान यासारख्या इस्लामी देशांमधून संपूर्ण जगविघातक कारवायांच्या योजना आखल्या जात असल्याचं चित्र रेखाटलं जातं. तर, अमेरिका, अमेरिकन व्यवस्था ही जगाचा उद्धार करणार असल्याचा आभास निर्माण केला जातो. यापुढे जात अमेरिकेसारख्या देशात असलेले मुस्लिम रहिवासीदेखील सतत यंत्रणेच्या देखरेखीखाली असतात. उच्चपदस्थ अधिकारी अनेकदा मुस्लिम धर्मीय लोकांना ‘ते’ असं संबोधत राहतात.


‘ते सर्वत्र आहेत, त्यांनी आपल्या समाजातील प्रत्येक भागात प्रवेश केला आहे’ यासारखी विधानं केली जातात. किंवा मग ‘प्रत्येक मुस्लिम हा दहशतवादी नसतो, पण बहुतांशी दहशतवादी मुस्लिम का असतात?’ यासारखे प्रश्न विचारत सोयीस्कर कथन तयार केलं जातं. ज्यातून अमेरिका वगळता इतर सर्व राष्ट्रांची राजकीय-सामाजिक धोरणं चुकीची आणि आत्मघातक तसेच जगविघातक असल्याचंही बिंबवलं जातं. 


मुळातच जेव्हा ‘‘ते’ विरुद्ध ‘आपण’’ असं कथन निर्माण केलं जातं, तेव्हा केवळ चांगली आणि वाईट बाजू अशा दोनच बाजू अस्तित्त्वात असल्याची बायनरी निर्माण होते. पुढे जाऊन त्यातूनच ‘चांगला, देशप्रेमी मुस्लिम’ आणि ‘वाईट, देशद्रोही, अतिरेकी मुस्लिम’ अशी विभागणी केली जाते. त्यात पुन्हा चांगला मुस्लिम सुद्धा पुढे जाऊन वाईट बाजूकडे झुकू शकतो, देशविघातक कृत्यं करण्यात अतिरेक्यांना मदत करू शकतो, असं दिसतं. मुळातच पूर्णतः चांगलं किंवा पूर्णतः वाईट असं काही अस्तित्त्वात असण्याचे हे दिवस नाहीत.


सगळ्या बाजूंकडून इतकं काही मांडलं जातं की, सगळं चित्र धूसर नि राखाडी छटा असलेलं बनतं. अशात या मालिकांचा सूर ‘पुन्हा ९/११ सारखी घटना घडू नये म्हणून या प्रतिबंधात्मक योजना राबवल्या जात आहेत’ असा असल्याने मालिकांमधील राष्ट्रप्रेम अधोरेखित केलं जातं. इस्लामविरोधी आशयापेक्षा देशप्रेम सहजासहजी लक्षात येणारं असतं. मालिकांना मिळणारी प्रसिद्धीदेखील याच राष्ट्रप्रेमी भावनेतून आलेली असते. 


याखेरीज मुस्लिम स्त्रियांची होणारी दडपशाही आणि अत्याचार हीदेखील या मालिकांमध्ये दिसणारी एक सामाईक संकल्पना आहे. सदर मालिकांमध्ये कायम बुरख्याआड दिसणाऱ्या स्त्रिया, त्यांना मारहाण करणारे पती, त्यांची लहान वयात बंदुका हातात घेणारी मुलं दिसतात. यातून ‘जो धर्म स्त्रिया आणि लहान मुलांनाही स्वतंत्रपणे विचार करू देत नाही, तो धर्म अतिरेकी आहे’ असा विचार पुढे येतो. 


आधी उल्लेख केल्याप्रमाणे, एखाद्या धर्माची चिकित्सा होण्यास काहीच हरकत नाही. मात्र, ती अतिसरसकटीकरण करणारी, फक्त आणि फक्त तिऱ्हाईत दृष्टिकोनातून आलेली असेल तर अशी चिकित्सा सर्वांगीण असू शकत नाही. त्यामुळे असं लक्षात येतं की, इस्लाम धर्मातील स्त्रियांची दडपशाही किंवा अत्याचारावर बोललं गेलं आणि त्यांचं अस्तित्त्व मान्य केलं तरी शेवटी हा मुद्दा एक राजकीय हत्यार/साधन म्हणून वापरला जातो. 


User Image


‘इतिहास विजेते लिहितात’ असं कायम म्हटलं जातं. सध्या दृक्-श्राव्य माध्यम हे अशा प्रकारे वापरलं जाऊन समांतरपणे इतिहास रचण्याचे दिवस आहेत. अमेरिका, ब्रिटनसारख्या देशांमध्ये उपलब्ध असलेली संसाधने वापरून अशा प्रकारच्या कलाकृतींची निर्मिती इतक्या मोठ्या प्रमाणात होणं तसं साहजिक आहे. मात्र, राजकीय, सामाजिक, धार्मिक अजेंड्याने प्रेरित आशय असलेल्या या मालिका म्हणजे इतिहास किंवा सत्य असं समजण्याची चूक कुणी करायला नको.


संपूर्ण सत्य किंवा शुद्ध असं काही अस्तित्त्वात नसतं, असं कन्स्ट्रक्टिव्हिस्ट विचारांच्या लोकांचं मत. त्यामुळे त्या-त्या देशात निर्माण होणाऱ्या कलाकृती त्यांना ज्ञात असलेल्या किंवा त्यांना अपेक्षित असलेल्या दृष्टिकोनातून सभोवतालाकडे, उरलेल्या जगाकडे पाहणार हे तसं अपेक्षित असतं. या दृष्टिकोनात किमान काहीएक प्रमाणात का होईना, पण सत्याचा अंश आला तरी ते न्याय्य ठरू शकेल. आता हा सत्याचा अंश येणार कसा, तर जुन्याच स्टिरिओटिपीकल चित्रणाऐवजी किंवा नुसती काळी-पांढरी/बरी-वाईट/चूक-बरोबर अशा बाजू दाखवण्यापेक्षा राखाडी बाजू दाखवायला हव्यात. सरसकटीकरण टाळून क्लिष्ट, संमिश्र भावभावना समोर यायला, दिसायला हव्यात. 


अमेरिकेतील काही राज्यांमधील शैक्षणिक अभ्यासक्रमातून वंशविद्वेषाचा इतिहास वगळल्याच्या बातम्या नवीन नाहीत. अगदी त्याच धर्तीवर फ्लोरिडा राज्यातील शैक्षणिक पुस्तकांतून इस्लामचा इतिहास वगळल्याच्या घटना निदर्शनास आल्या आहेत. या घटना पाहिल्यास अमेरिकेत इस्लामबाबत, मुस्लिम व्यक्तींबाबत असलेल्या भीतीची कल्पना येते. शिवाय, या घटना पाहिल्यास अमेरिकेसारखी राष्ट्रं मुद्द्याची क्लिष्ट, राखाडी बाजू दाखवण्याऐवजी इतिहासाकडे दुर्लक्ष करताना नि अनुल्लेखाने मारताना दिसत आहेत.


दृक्-श्राव्य माध्यमात अस्तित्त्वात असलेल्या इस्लामोफोबियाचे सूक्ष्म परिणाम असे आहेत की, त्यातून मांडले जाणारे वंशविद्वेषी विचार अनेकांना प्रभावित करतात. ९/११ चा प्रत्यक्ष हल्ला आणि त्यानंतर आलेल्या इस्लामविरोधी चित्रपट-मालिकांची मोठी पार्श्वभूमी असताना अमेरिकेत मुस्लिम समुदायाविरुद्धच्या हिंसाचाराच्या घटनांच्या संख्येत वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे एकांगी इतिहास रचण्याचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे दुहेरी परिणाम वेळोवेळी दिसून आलेले आहेत. 


आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे: या सततच्या साचेबद्ध चित्रणावर, ढिगाने निर्माण होत असलेल्या इस्लामोफोबिक आशय असलेल्या कलाकृतींवर उपाय काय? यावरील मुख्य उपाय हा की, मुस्लिम धर्मीय व्यक्तींनी स्वतःच्या कथा जगासमोर मांडणं. नकारात्मक चित्रण, साचेबद्ध प्रतिमांचा परिणाम सहजासहजी पुसला जाणारा नसतो. अशावेळी दूरवर पोहोच असलेल्या दृक्-श्राव्य माध्यमातून आपला मुद्दा समोर मांडणं गरजेचं आहे.


तिऱ्हाईत दृष्टिकोनाऐवजी खुद्द अल्पसंख्यांकांनी स्वतःचे मुद्दे, स्वतःच्या समस्या समोर मांडल्याने त्या अधिक व्यक्तिगत आणि उत्कट बनण्याच्या शक्यता निर्माण होतात. ज्यामुळे नसते गैरसमज टाळले जाऊ शकतात. शिवाय, सरळ एकतर काळी, किंवा मग वाईट बाजू दाखवण्यापेक्षा, म्हणजेच इस्लामचं उदात्तीकरण आणि आत्यंतिक नकारात्मक चित्रण यापेक्षा मधला, संमिश्र नि अधिक योग्य मार्ग निवडणं अधिक श्रेयस्कर. असा दृष्टिकोन ज्यात मुस्लिम पात्रांचं मानवीकरण केलं जाऊन ती त्यांच्या गुणावदोषांसोबत चितारली जातात. 


(सौजन्य- इस्लामोफोबिया नावाचा व्हायरस - अक्षय शेलार, दिव्य मराठी दिवाळी अंक २०२०)

Share this article
लोकशाहीचे सजग प्रहरी व संघर्षाचे प्रतीक : जॉर्ज फर्नांडिस
कला / साहित्य / सिनेमा

लोकशाहीचे सजग प्रहरी व संघर्षाचे प्रतीक : जॉर्ज फर्नांडिस

फुटपाथवरच्या संघर्षमय आयुष्यातून देशाच्या संरक्षणमंत्री पदापर्यंत पोहोचलेले जॉर्ज फर्नांडिस हे भारतीय राजकारणातील सर्वात प्रभावी समाजवादी नेत्यांपैकी एक होते. १९७४ च्या ऐतिहासिक रेल्वे संपापासून ते आणीबाणीविरोधातील लढ्यापर्यंत त्यांनी सत्तेविरोधात निर्भीड भूमिका घेत लोकशाही मूल्यांचे रक्षण केले. कामगार नेता, उद्योगमंत्री, रेल्वेमंत्री, संरक्षणमंत्री आणि लोकशाहीचा कट्टर पुरस्कर्ता अशा विविध भूमिकांमधून त्यांनी भारतीय सार्वजनिक जीवनावर अमिट ठसा उमटवला.

9 min read
V
Vikas Meshram
'ए मेरे वतन के लोगो'... सुमन कल्याणपूर आणि लता दीदी काय आहे संबंध?
कला / साहित्य / सिनेमा

'ए मेरे वतन के लोगो'... सुमन कल्याणपूर आणि लता दीदी काय आहे संबंध?

‘ऐ मेरे वतन के लोगो’ गाण्याची संधी ऐनवेळी हातातून निसटली, पण सुमन कल्याणपूर यांनी त्यासाठी कधीही लता मंगेशकरांना दोष दिला नाही. • लता मंगेशकर यांच्या आवाजाशी असलेल्या विलक्षण साम्यामुळे सुमनताईंना काम मिळालं, पण त्याच साम्यामुळे त्यांची स्वतंत्र ओळख अनेकदा झाकोळली गेली. • मराठी आणि हिंदी संगीतविश्वात दर्जेदार गायकीचा ठसा उमटवणाऱ्या सुमन कल्याणपूर यांच्या कारकिर्दीत प्रतिभेपेक्षा नियतीनेच अधिक परीक्षा घेतल्याची भावना अनेकदा उमटते.

7 min read
S
Sameer Gaikwad
जिथे आठवणी उजळतात, तिथे बशीर बद्र भेटतात…!
कला / साहित्य / सिनेमा

जिथे आठवणी उजळतात, तिथे बशीर बद्र भेटतात…!

महान शायर बशीर बद्र गेले, काळजात कळ उठली. पिकलं पान गळून पडलं. खरं तर ते गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनीक जीवनापासून दूर असले तरी त्यांचे काव्य हे असंख्य रसिकांच्या मनाला कायम भुरळ घालत राहिले आहे. बशीरजींच्या गेल्यानंतर त्यांच्या कार्याला प्रचंड प्रमाणात दिला जाणारा उजाळा हा त्यांच्या महत्तेची ग्वाही देणारा ठरला आहे.

7 min read
S
shekhar patil
महात्मा बसवेश्वर : ९०० वर्षांपूर्वी पाळीचा विटाळ झुगारून देणारा महापुरुष
कला / साहित्य / सिनेमा

महात्मा बसवेश्वर : ९०० वर्षांपूर्वी पाळीचा विटाळ झुगारून देणारा महापुरुष

ज्याकाळात आधुनिकता ह्या शब्दाचा मागमूस देखील नव्हता. जेव्हा स्त्रिया सोडाच पण माणसालाच माणूस म्हणून वागवलं जात नव्हतं. अशा काळात एका महात्म्याने मासिक पाळीला विटाळ म्हणण्यास कडकडून विरोध केला होता. महात्मा बसवेश्वर यांनी जनन, मरण, जात, रजस्व आणि उच्छिष्ट हे पंचसूतक नाकारलंय. त्यापैकी जन्म आणि रजस्व ही दोन्ही सुतकं थेट स्त्रीत्वाशी नातं सांगतात. त्यामुळे मासिक पाळीतला विटाळ पाळणं, स्पर्श केल्यास अपवित्र झाल्याचं मानणं, हे बसवण्णांच्या विचारांच्या विरोधात आहे.

4 min read
C
Channveer Bhadreshwarmath
 ‘’जेव्हा फाळणीने क्रिकेटच्या दोन जिवलग मित्रांना मैदानावर प्रतिस्पर्धी बनवलं…’’
कला / साहित्य / सिनेमा

‘’जेव्हा फाळणीने क्रिकेटच्या दोन जिवलग मित्रांना मैदानावर प्रतिस्पर्धी बनवलं…’’

भारत-पाकिस्तान क्रिकेटचा इतिहास आपण अनेकदा युद्ध, राष्ट्रवाद आणि तणावाच्या चौकटीत पाहतो. पण या वैराच्या मुळाशी एक अशी कहाणी दडलेली आहे, जिथे दोन क्रिकेटपटू एकाच शहरात वाढले, एकाच मैदानावर खेळले आणि एकमेकांना मित्र मानत मोठे झाले. फाळणीने त्यांना दोन देशांच्या विरुद्ध बाजूंवर उभं केलं; पण त्यांच्या मैत्रीच्या आठवणी सीमारेषाही पुसू शकल्या नाहीत. ही केवळ दोन क्रिकेटपटूंची गोष्ट नाही; ती फाळणीने जखमी झालेल्या उपखंडाची, तुटलेल्या नात्यांची आणि तरीही माणुसकी जिवंत राहू शकते, या आशेची कहाणी आहे. आता आशुतोष गोवारीकर आणि आमिर खान फाळणीच्या पार्श्वभूमीवर याच घटनेवर आधारित चित्रपटाची तयारी करत असल्याची चर्चा सुरू आहे.

10 min read
A
Akshay Ramesh
अजिंठ्याची पारू : प्रेम, उपेक्षा आणि इतिहासाचा अंधार…दीडशे वर्षांनंतरही रॉबर्ट स्मरणात राहिला, पण पारूची ओळख धूसरच!
कला / साहित्य / सिनेमा

अजिंठ्याची पारू : प्रेम, उपेक्षा आणि इतिहासाचा अंधार…दीडशे वर्षांनंतरही रॉबर्ट स्मरणात राहिला, पण पारूची ओळख धूसरच!

अजिंठ्याच्या संशोधकाला शिल्पकहाणीची गाथा उघडल्यावर, एक कहाणी विलक्षण लक्ष वेधून घेते, ती कहाणी म्हणजे रॉबर्ट गिल आणि पारूची प्रेमकथा. जी अजिंठ्याच्या शिल्परांगेत एक जिवंत शिल्प बनून उभी आहे. अमर पावली आहे... अजिंठ्याच्या पारू आणि रॉबर्ट गिलची प्रेमकथा गेली दीडशेहून अधिक वर्ष जगाने ऐकली आहे. भेदाच्या भारतीय समाज मानसाने अजिंठ्याच्या पारूच्या प्रेमकथेला नावे ठेवली, विपर्यस्त करून सांगितले. जिच्या प्रेमकथेने अजिंठ्याच्या कातळालाही भावनांनी ओलावून टाकले, त्या पारूची समाधी आज मात्र उपेक्षा, दुर्लक्ष आणि विस्मृतीच्या सावलीत उभी आहे. आज २३ मे हा पारूचा स्मृतीदिवस त्यानिमित्ताने एका ‘सैराट’ कथेची झालेली ही आठवण.

6 min read
V
Vira Rathod

Comments

Comments are currently disabled or loading...