विकिपीडियाचा निर्माता जिमी वेल्स 60 वर्षाचा झाला. त्याचं विकिपीडिया 25 वर्षाचं झालं. विकिपीडिया हा खुल्ला विश्वकोष आहे. त्यात आता 300 भाषांत 65 कोटी लेख-नोंदी आहेत. महिन्यात 1 अब्ज माणसं हा कोष वापरतात. विकिपीडिया मोफत आहे. एकेकाळी ब्रिटानिका, पियर्स इत्यादी अनेक खंडांचे विश्वकोष होते.
दर काही काळानं त्यात नव्या नोंदी होत, पुरवण्या निघत. लोकांची कपाटंच्या कपाटं विश्वकोषानं भरलेली असत. तो विकत घेणं परवडत नसे, पुस्तकालयात जाऊन तो वाचावा लागे. जिमी वेल्स मुळात अमेरिकन. गेली काही वर्षं तो लंडनमधे स्थायिक झालाय. एका इमारतीच्या तळघरात तो बसतो.
एका खोलीचं त्याचं ऑफिस. समोर दोन कंप्यूटर असतात. बस. येवढंच. ईलॉन मस्क, जेफ बेझोज, लॅरी पेज, सर्जे बिन इत्यादी इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीवाली मंडळी जिमीची समकालीन. सर्वांनी जवळपास एकाच वेळी कामाला सुरवात केली. मस्क आता ट्रिलियनपती होतोय. बाकीचे अब्जाधीश आहेत.
जिमी त्यांच्या तुलनेत कणभरच आहे. जिमी आनंदात आहे. तो समाजवादी नाही, तो बाजारवादी आहे. तरीही त्याला पैसे मिळवण्यात रस नाही.कामं करता येतील, सुखानं जगता येईल येवढेच पैसे त्याला हवेत. विकीपेडिया चालवण्याचा खर्च असतो. तेवढे पैसे विकीपेडिया वाचकांकडून देणग्यांच्या रुपात मिळवतो.
विकीपीडियात हज्जारो संपादक आहेत, ते सर्व विनावेतन काम करतात. विकीपीडिया चालवण्यासाठी इंजिनयर्स, हिशोब ठेवणारे, कंप्यूटरवर कामं करणारे इत्यादी मिळून सुमारे 700 कर्मचारी आहेत. त्यांना प्रत्येकाला साधारणपणे वर्षाला 15 ते 16 लाख रुपये वेतन मिळतं. विश्वासार्ह माहिती प्रत्येक व्यक्तीला मुक्तपणे मिळाली पाहिजे या तत्वासाठी जिम्मीनं विकीपीडिया उभं केलंय.
जिमी वेल्सच्या मुलीचं आजारपण आणि विकीपीडियाचा जन्म
त्याचं असं झालं. जिमीची छोटी मुलगी असाध्य रोगानं आजारी पडली. एक डॉक्टर उपचार करणार होते, ते उपचार नवे होते, सिद्ध झाले नव्हते. जिमी जिवाच्या आकांतानं व्याधीबद्दल माहिती गोळा करत होता. या व्याधीचे उपचार घेतलेल्या व्यक्तीनी लिहिलेले लेख उपलब्ध होते.
त्यात वैज्ञानिक, शास्त्रीय ज्ञानाचा अभाव होता. जिमीला विश्वास ठेवण्यालायक माहिती अगदी लगोलग हवी होती. मिळाली नाही. उपचार यशस्वी झाले. मुलगी ठीकठाक झाली. आज ती उत्तम जगतेय. पण त्या वेळी जिमीनं जगातलं सारं ज्ञान मावू शकेल असा विश्वकोष प्रत्येक क्षणी उपलब्ध करायचं ठरवलं.
तो ट्रेडिंग करत असे, काही पैसा त्याच्या जवळ होता. तेवढ्यावर विकीपीडिया सुरू झाला. विश्वकोषात नोंदी करणारी जाणकार, ज्ञानी माणसं लागतात. त्या नोंदी अचूक, खऱ्या आहेत की नाहीत ते तपासणारी माणसं लागतात. तेच आव्हान होतं. सभोवताली खोट्या, विषारी,मतलबी, एकतर्फी माहितीला उधाण आलं होतं.

पूर्वी ज्याला लेखक किंवा पत्रकार म्हणत त्यांना हल्ली कंटेंट क्रिएटर म्हणतात. हे माहिती-ज्ञान निर्माते ज्या माहितीच्या अवकाशात वाढले होते तिथं लोकांना भडकवणं, चिथावणं, खोटी माहितीचा मारा करून त्यांचं रूपांतर वस्तूंचा उपभोग घेणाऱ्या प्राण्यांमधे करणं असा धंदा चालला होता.
तिथं नीती (एथिक्स) शिकवली जात नव्हती. तिथं सचोटी, विश्वसनीयता या गोष्टी नष्ट झाल्या होत्या. जिमीचं म्हणणं की सत्य लोकांसमोर मांडलं पाहिजे, त्यातून जो काही निर्णय घ्यायचा तो नागरिकानी घ्यावा. हिटलरनं काय काय केलं ते लोकांसमोर ठेवावं, तो क्रूरकर्मा होता असं आपण सांगायची आवश्यकता नाही, माहिती नीटपणे ठेवली गेली तर ते लोकांना कळेल.
डोनाल्ड ट्रम्प, एलॉन मस्क यांचा विकीपीडियावर इतका राग का आहे?
ट्रंप हा भीषण खोटारडा माणूस आहे असं जिमीला वाटतं. पण अमेरिकन वर्तमानपत्रं आणि चॅनेल जसं ट्रंपला विशेषणं लावून ठोकत असतात तसं करायला जिमी तयार नाही. जे जे घडतंय ते विकीपीडिया लोकांसमोर ठेवतं; ट्रंप जे जे बोलतात ते विकीपीडियातून लोकांसमोर येतं; वस्तुस्थिती काय आहे तेही विकीपीडिया लोकांसमोर ठेवतं.
पुढं त्यातून काय अर्थ काढायचे ते लोकांनी ठरवायचं असं जिमीचं म्हणणं आहे. एलॉन मस्कचा विकीपीडियावर खुन्नस आहे. विकीपीडिया डावा आहे, तो पॉलिटिकली करेक्ट गोष्टी (वोक) प्रसिद्ध करतो असं मस्कचं म्हणणं आहे. ट्रंप यांचा समर्थक टकर कार्लसन म्हणतो की विकीपीडिया अप्रामाणिक आहे.
जिमी अशा आरोपांना उत्तर देत नाही. जिमी म्हणतो की ज्या कोणाला एका बाजूनं ठोकाठोकी किंवा कौतुक करायचं असेल ते त्यांनी आपापल्या ब्लॉगमधून करावं, विकीपीडिया ते करणार नाही. विकीपीडिया टोकाची भूमिका घेत नाही. जिमी म्हणतो सत्य मांडा. पर्यायी सत्य मांडू नका.
ब्रिटनचे पुढारी जिमीकडं सल्ला मागायला जातात. टोनी ब्लेअर, कीर स्टार्मर,एड मिलिबँड, जिमीशी विविध विषयावर चर्चा करतात. ही सल्ला मसलत फुकट असते. ब्रिटनमधले सेलिब्रिटी जिमीच्या परिचयाचे आहेत, पण जिमी एका हद्दीपलीकडं घसट वाढवत नाहीत. या संबंधांचा परिणाम विकीवर होत नाही.
रशिया, चीनमध्ये विकीपीडियावर बंदी
विकीपीडियातली चुक कोणी दाखवली, तर विकीपीडिया ती सुधारतो. विकीपीडिया सर्वार्थानं लोकाश्रयावर चालतो, लोकच तो चालवतात. कोणी विकीपीडिया ताब्यात ठेवू पाहील तर ते जमणार नाही कारण जिमी खमक्या आहे. सरकारनं किंवा कोणीही विकीपीडियात हस्तक्षेप केलेलं जिमीला चालत नाही.

रशिया आणि चीनमधे विकीपीडियाला बंदी आहे. जिमी म्हणतो, ती त्यांची मर्जी. आता ट्रंप यांचा डोळा विकीपीडियावर आहे. विकीपीडियाला खिंडीत गाठायचा प्रयत्न ट्रंप यांच्या वतीनं कोणी कोणी करत आहेत. जिमी यांच्या ते गावीही नाही. जिम्मी याचं The Seven Rules of Trust: Why It Is Today’s Most Essential Superpower is out now हे पुस्तक नुकतंच प्रसिद्ध झालंय. समाजात विश्वासाचं वातावरण निर्माण करून समाजातली दुही कशी संपवता येईल ते या पुस्तकात जिमी वेल्सनं सांगितलंय.
विकीपीडियाबद्दलच्या काही रंजक गोष्टी
-
एवढी माहिती विकिपीडिया जमा कशी करते तर तुमच्या आमच्यामधून येणाऱ्या 2,50,000 स्वयंसेवकांच्या टीमद्वारे. हे व्हॉलेंटर्स कोणतीही फी न घेता विकिपीडियावर काम करत असतात. आता तुमच्या आमच्यासारखे म्हटल्यावर आपल्यापैकी काही अतिशहाणे खोटी माहिती भरू शकतात, त्याचबरोबर कोणाबद्दल अपमानास्पद माहिती टाकणे, समजत तेढ निर्माण करणारी माहिती अपलोड करणे अश्या गोष्टी घडू शकतात. मग इथं विकिपीडिया ऍक्शन मोडमध्ये येतं. विकिपीडियाचे प्रशासक जी पानं "तोडफोड" तसेच अपमानास्पद भाषा किंवा खोटेपणाच्या अधीन आहेत त्यांना थेट एडिट करण्यापासून मॉडरेट करतं.
-
पण मग दिलेल्या माहिती किती खरी आहे, त्या माहितीचा दर्जा कसा आहे हे कोण बघतं हा सहज पडणारा प्रश्न. तर हे विकिपीडिया सेल्फ पॉलिसींग तत्वावर चालतं. म्हणजे विकिपीडियाचे स्वयंसेवकच त्यांना एकादी माहिती चुकीची किंवा अर्धवट वाटली तर त्यात बदल करतात किंवा नवीन माहिती समाविष्ट करतात. नवीन माहिती टाकताना ते त्याचा पुरावाही देतात.
-
आता तुम्हाला जर स्वयंसेवक बनायचं असेल तर तुम्हाला विकिपीडियावर लॉग इन करावा लागत नाही. तुम्हाला फक्त साईटवर रजिस्टर करावा लागत. आता हे रेजिस्ट्रेशन करण्यासाठी एकदम बेसिक माहिती द्यावी लागते आणि तुम्ही फेक नावाने अकाउंटही बनवू शकता. आणि इथंच विकिपीडियाचा सीन गंडतो. त्यामुळं विकिपीडियावर लिहलेल्या अनेक आर्टिकलवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं.
-
आता येऊ विकिपीडियाच्या रेव्हेनु मॉडेलवर. तर विकिपीडिया कोणतीच स्पॉन्सरशिप किंवा जाहिरात घेत नाही. तर ते लोकांनी दिलेल्या देणगीवर विकिपीडिया काम करतं. पण लोकांना फुकटची सवय त्यामुळं ते पण नाही म्हटल्यावर शेवटी आम्ही तुम्हाला नम्रपणे विचारतोय स्क्रोल करू नका, आम्ही मोजक्याच वाचकांच्या देणग्यांवर अवलंबून असतो, परंतु 2% पेक्षा कमी वाचक देणगी देतात द. तुम्ही फक्त £150 दिले तर... विकिपीडिया भरभराट होऊ शकेल. धन्यवाद." असं मेसेज विकिपीडियावर झळकला होता.
(निळू दामले हे जगभरातील विविध विषयांवर अभ्यासपूर्ण आणि सहज शैलीत लिखाण करणारे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
(सौजन्य - niludamle.com)






