प्रीती रंजन
- कथकली ही १७ व्या शतकापासून पुरुषप्रधान कला राहिली आहे. महिलांना शारीरिक कष्ट आणि 'पवित्रते'च्या नावाखाली यातून जाणीवपूर्वक बाहेर ठेवले गेले.
- चावरा पारुकुट्टी अम्मा यांनी सर्व सामाजिक विरोध झुगारून पहिल्या महिला कथकली कलाकार म्हणून इतिहास घडवला.
- कथकलीतील महिलांची उपस्थिती हा केवळ सांस्कृतिक बदल नसून, परंपरेच्या नावाखाली होणाऱ्या भेदभावाविरुद्ध दिलेला एक स्त्रीवादी लढा आहे.
जेव्हा आपण कलेबद्दल बोलतो, तेव्हा हे समजून घेणे आवश्यक आहे की कला कधीही समाजापासून वेगळी नसते. कला समाजाच्या विचारसरणीचे, त्याच्या सत्ताकारणाचे आणि लैंगिक राजकारणाचे प्रतिबिंब असते. ती केवळ मनोरंजनाचे साधन नसून समाजातील मूल्ये आणि भेदभावही समोर आणते. केरळची प्राचीन नृत्य-नाट्य शैली कथकली दीर्घकाळ पुरुषांच्या एकाधिकाराखाली होती. परंपरेच्या नावाखाली याला अनेकदा योग्य ठरवण्यात आले. पण प्रश्न असा आहे की ही खरोखर परंपरा होती का, की पितृसत्तेचे एक सोयीचे साधन होती? जेव्हा महिलांनी कथकलीच्या मंचावर पाऊल ठेवले, तेव्हा त्यांनी फक्त नृत्य शिकण्याचा प्रयत्न केला नाही.
त्यांनी प्रश्न उपस्थित केले, विरोधाचा सामना केला आणि स्वतःची जागा निर्माण करण्यासाठी संघर्ष केला. ही यात्रा दाखवते की स्त्रीवाद केवळ समान हक्कांची मागणी करत नाही, तर असमानतेला ‘संस्कृती’ आणि ‘परंपरा’च्या नावाखाली वैध ठरवणाऱ्या सांस्कृतिक रचनांनाही आव्हान देतो. कथकलीमध्ये महिलांची उपस्थिती आपल्याला शिकवते की बदल तेव्हाच शक्य आहे, जेव्हा आपण परंपरेच्या नावाखाली होणाऱ्या बहिष्काराला ओळखतो आणि तो बदलण्याचे धैर्य दाखवतो.

पितृसत्तेची मुळे: कथकली केवळ पुरुषांपुरती मर्यादित का राहिली?
कथकलीचा इतिहास १७व्या शतकापासून ओळखण्यात येतो. ही कला केरळमधील मंदिरे आणि राजदरबारांत विकसित झाली. सुरुवातीपासूनच ती फक्त पुरुषांसाठी योग्य मानली गेली. यामागे अनेक कारणे दिली जात होती—शारीरिक कष्ट, दीर्घ प्रशिक्षण, उशिरापर्यंत चालणारे प्रयोग आणि ‘पवित्रते’चा मुद्दा. परंतु ही कारणे पूर्ण सत्य सांगत नाहीत. खरी कारणे समाजाची पितृसत्ताक विचारसरणी होती. विशेष म्हणजे कथकलीमध्ये पुरुष कलाकार सीता, द्रौपदी आणि पार्वतीसारख्या स्त्री पात्रांची भूमिकाही साकारत होते. यावरून स्पष्ट होते की समस्या महिलांच्या क्षमतेची नव्हती, तर त्यांच्या प्रवेशावर नियंत्रण ठेवण्याची होती.
पितृसत्ताक समाजात महिलांना सार्वजनिक मंचांपासून दूर ठेवणे ही एक विचारपूर्वक आखलेली राजकीय प्रक्रिया राहिली आहे. कला आणि अभिव्यक्तीची क्षेत्रेही यापासून मुक्त नव्हती. अनेक शैक्षणिक अभ्यास दर्शवतात की कथकलीच्या रचनेतच लैंगिक पक्षपात होता, जिथे स्त्रीत्व पुरुषांच्या नजरेतून घडवले आणि सादर केले गेले. त्यामुळे कथकलीतील महिलांचा संघर्ष हा केवळ कलायात्रा नसून पितृसत्ताक व्यवस्थेला दिलेले आव्हानही आहे.
पहिली महिला कथकली कलाकार: चावरा पारुकुट्टी अम्मा
कथकलीमध्ये महिलांच्या सहभागाबाबत बोलायचे झाल्यास सर्वप्रथम नाव चावरा पारुकुट्टी अम्मा (१९०४–१९८७) यांचे घेतले जाते. पारुकुट्टी या सुवर्णकाराच्या मुलगी होत्या. त्यांना लहानपणापासूनच कथकली नृत्याची गाढ आवड होती. जेव्हा त्यांनी स्थानिक नृत्यशाळेत प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा केवळ मुलगी असल्यामुळे त्यांना नकार देण्यात आला. या नकाराने पारुकुट्टी थांबल्या नाहीत. त्यांनी घरीच आपल्या गुरूंकडून कथकलीचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. कठीण परिस्थितीतही त्यांनी सराव सुरू ठेवला आणि हळूहळू स्वतःची ओळख निर्माण केली.
१९३० च्या दशकात त्यांनी सार्वजनिक मंचावर कथकली सादर करण्यास सुरुवात केली. त्या काळात महिलांचे सार्वजनिक मंचावर नृत्य करणे समाजमान्य नव्हते. पारुकुट्टी अम्मांनी केवळ स्वतः सादरीकरण केले नाही, तर इतर महिलांनाही कथकलीचे प्रशिक्षण दिले. त्यांनी या कलेत महिलांसाठी मार्ग खुला केला. त्यांच्या योगदानामुळे त्यांना “कथकलीतील क्रांतीची जननी” असे म्हटले जाते.
१९७०-८०चे दशक: सामूहिक चळवळीची सुरुवात
१९७५ हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. याच वर्षी त्रिपुनिथुरा कथकली केंद्रात ‘वनिता ट्रूप’ची स्थापना झाली. ही पूर्णपणे महिलांची कथकली मंडळी होती. हा एक ऐतिहासिक टप्पा होता. प्रथमच महिलांनी संघटित होऊन कथकलीवर त्यांचाही अधिकार असल्याचे स्पष्टपणे मांडले. १९७० च्या दशकानंतर ‘केरळ कलामंडलम्’सारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्येही महिलांना प्रवेश मिळू लागला.
(चावरा पारुकुट्टी अम्मा)
मात्र ही प्रक्रिया सोपी नव्हती. अनेक संस्थांनी सुरुवातीला केवळ लिंगाच्या आधारावर महिलांना प्रवेश नाकारला. महिलांना ही लढाई एकट्याने लढावी लागली. कधी कुटुंबाचा विरोध, कधी समाजाची टोमणे, तर कधी संस्थात्मक भेदभाव—अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. तरीही महिलांनी कथकलीमध्ये स्वतःची जागा निर्माण केली आणि या पारंपरिक कलेला नवे अर्थ आणि नवी अभिव्यक्ती दिली.
कथकलीमध्ये महिलांची यात्रा
कथकलीतील महिलांची यात्रा स्पष्ट करते की स्त्रीवाद ही केवळ एक विचारसरणी नसून एक गरज आहे. समानता आपोआप मिळत नाही. जेव्हा महिलांना ‘परंपरा’ आणि ‘संस्कृती’च्या नावाखाली एखाद्या मंचापासून दूर ठेवले जाते, तेव्हा तो एक राजकीय निर्णय असतो. तो ओळखल्याशिवाय बदल शक्य नाही. दीर्घकाळ कथकलीमध्ये केवळ पुरुषांनाच ‘प्रामाणिक’ कलाकार मानले गेले. पुरुष कलाकार स्त्री पात्रे साकारत राहिले आणि त्याला कलेची उंची म्हटले गेले.
पण जेव्हा खऱ्या महिलांनी मंचावर येण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांना परंपरा मोडणाऱ्या म्हणून संबोधले गेले. यावरून स्पष्ट होते की प्रश्न प्रतिभेचा नव्हता, तर नियंत्रणाचा होता. स्त्रीवाद याच नियंत्रणाला आव्हान देतो. तो विचारतो की एखाद्या कलेवर केवळ एका लिंगाचा अधिकार का असावा? ‘असेच चालत आले आहे’ यालाच अंतिम सत्य का मानले जावे? आणि स्त्रीअनुभव पुरुषांच्या नजरेतूनच का परिभाषित केला जावा?
आजही कथकलीमध्ये महिलांसाठीचा मार्ग पूर्णपणे सुलभ नाही. अनेक गुरू महिलांना प्रशिक्षण देण्यास कचरतात. त्यांच्याकडून पुरुष कलाकारांसारखीच शारीरिकता अपेक्षित केली जाते. त्यांना अनेकदा मर्यादित आणि कमकुवत समजल्या जाणाऱ्या भूमिका दिल्या जातात. मानधन आणि संधींमध्येही असमानता कायम आहे. कथकलीमध्ये महिलांची उपस्थिती हा केवळ सांस्कृतिक बदल नाही. तो सत्ता, परंपरा आणि लिंगभेदाच्या प्रश्नांना दिलेले थेट आव्हान आहे. तो आपल्याला आठवण करून देतो की परंपरा पवित्र नसतात. त्या राजकीय असतात—आणि म्हणूनच बदलल्या जाऊ शकतात.
एका तरुण कलाकाराचा अनुभव
२२ वर्षांची विस्मया विजयन एर्नाकुलम, केरळ येथील अमृता विश्वविद्यापीठात वित्त आणि कर विषयात एमबीएचे शिक्षण घेत आहे. यासोबतच ती भरतनाट्यम आणि कथकलीची प्रशिक्षणार्थी देखील आहे. तिचे मत आहे की आजही एका महिला कलाकाराला मंचावर आपली उपस्थिती योग्य ठरवावी लागते. अनेक लोक अजूनही असे मानतात की कथकली ही फक्त पुरुषांची कला आहे, कारण तिची वेशभूषा जड असते. ती सांगते, “आता हळूहळू बदल होत आहे. कार्यक्रमांच्या वेळी ब्रोशर आणि परिपत्रकांमध्ये कलाकारांची नावे दिली जातात, जेणेकरून प्रेक्षकांना कळेल की मंचावर सादरीकरण करणारी कलाकार एक महिला आहे. माझ्या मते अशी जागरूकता खूप आवश्यक आहे.”

चावरा पारुकुट्टी अम्मा यांच्या पिढीची आणि आजच्या पिढीची तुलना करताना विस्मया म्हणते, “पारुकुट्टी अम्मा यांनी त्या काळात मंचावर पाऊल ठेवले, जेव्हा कथकलीमध्ये महिलांसाठी कोणतीही जागा नव्हती. सुरुवातीच्या काळात ही पूर्णपणे पुरुष-प्रधान कला होती आणि संस्थाही महिलांना प्रवेश देत नव्हत्या. आज केरळ कलामंडलम् आणि आरएलवी कॉलेजसारख्या संस्थांमध्ये मुलींना प्रवेश मिळत आहे आणि अनेक महिला कथकलीला आपला व्यवसाय बनवत आहेत.” तरीही ती मान्य करते की लैंगिक पूर्वग्रह पूर्णपणे संपलेले नाहीत. महिलांना कठीण भूमिका साकारता येतील का यावर आजही प्रश्न उपस्थित केले जात असतात. मंदिरांमध्ये सादरीकरणाच्या वेळी मासिक पाळीशी संबंधित समजुतीही अडथळा ठरतात. मात्र, पूर्वीच्या तुलनेत प्रेक्षकांची विचारसरणी, संस्थांचे समर्थन आणि कुटुंबाचे सहकार्य अधिक चांगले झाले आहे.
ट्रान्सजेंडर कलाकार: समावेशकतेची नवी दिशा
लैंगिक समानतेची चर्चा अनेकदा फक्त पुरुष आणि महिलांपुरती मर्यादित राहते, पण खरी समावेशकता प्रत्येक लैंगिक ओळखीला सामावून घेण्यात असते. ट्रान्सजेंडर समुदायाला कला क्षेत्रात खूप उशिरा संधी मिळाल्या आहेत. २०२२ मध्ये प्रथमच एका ट्रान्सजेंडर कलाकाराला कथकलीमध्ये मंच मिळाला. नोव्हेंबर २०२२ मध्ये रेंजुमोल मोहन याने आरएलवी कॉलेज ऑफ म्युझिक अँड फाइन आर्ट्स, त्रिपुनिथुरा येथून आपले अरंगेत्रम् सादर केले. त्याने भगवान कृष्णाची भूमिका साकारली. हा कथकलीच्या इतिहासातील एक महत्त्वाचा आणि प्रतीकात्मक क्षण होता. त्याच वर्षी केरळमधील कन्हनगड ब्लॉक पंचायतने १५ ट्रान्सजेंडर महिलांच्या पहिल्या व्यावसायिक नृत्य मंडळीस प्रोत्साहन दिले, ज्यामध्ये कथकली आणि यक्षगान यांचा संगम होता. हा कला क्षेत्रातील समावेशकतेच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा होता.
गेल्या दोन दशकांत परदेशी महिला कलाकारांनीही कथकली शिकण्याची आवड दाखवली आहे. वर्ष २०२२ मध्ये केरळ कलामंडलमने महिला विद्यार्थिनींना केवळ प्रवेशच दिला नाही, तर त्यांना समान संधी देण्याच्या दिशेनेही पावले उचलली. हा बदल दीर्घ संघर्ष आणि सातत्याने प्रश्न उपस्थित करण्याचा परिणाम आहे. आजच्या तरुण महिला कलाकार कथकलीमध्ये नवे प्रयोग करत आहेत. त्या स्त्रीवादी विषय सादर करत आहेत आणि पारंपरिक पात्रांची नवी व्याख्या करत आहेत. कथकलीमध्ये महिला आणि ट्रान्सजेंडर कलाकारांची वाटचाल अजूनही सुरू आहे. ही केवळ कलेचीच नव्हे, तर समाजात समानता, सन्मान आणि समावेशकतेकडे वाटचाल करण्याची प्रक्रिया आहे.
(सौजन्य - फेमिनिजम इन इंडिया, अनुवाद - प्रतिक पुरी)






