Skip to main content

‘’जेव्हा फाळणीने क्रिकेटच्या दोन जिवलग मित्रांना मैदानावर प्रतिस्पर्धी बनवलं…’’

Akshay Ramesh
27 May 2026
44 views
 ‘’जेव्हा फाळणीने क्रिकेटच्या दोन जिवलग मित्रांना मैदानावर प्रतिस्पर्धी बनवलं…’’

अक्षय रमेश


  • भारत-पाकिस्तान क्रिकेटचा इतिहास आपण अनेकदा युद्ध, राष्ट्रवाद आणि तणावाच्या चौकटीत पाहतो. पण या वैराच्या मुळाशी एक अशी कहाणी दडलेली आहे, जिथे दोन क्रिकेटपटू एकाच शहरात वाढले, एकाच मैदानावर खेळले आणि एकमेकांना मित्र मानत मोठे झाले. 


  • फाळणीने त्यांना दोन देशांच्या विरुद्ध बाजूंवर उभं केलं; पण त्यांच्या मैत्रीच्या आठवणी सीमारेषाही पुसू शकल्या नाहीत. ही केवळ दोन क्रिकेटपटूंची गोष्ट नाही; ती फाळणीने जखमी झालेल्या उपखंडाची, तुटलेल्या नात्यांची आणि तरीही माणुसकी जिवंत राहू शकते, या आशेची कहाणी आहे.


  • आता आशुतोष गोवारीकर आणि आमिर खान फाळणीच्या पार्श्वभूमीवर याच घटनेवर  आधारित चित्रपटाची तयारी करत असल्याची चर्चा सुरू आहे. 


दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर आणि आमिर खान तब्बल पंचवीस वर्षांनंतर पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानाकडे वळत असल्याची चर्चा सध्या बॉलीवूडमध्ये रंगली आहे. ‘लगान’नंतर भारतीय उपखंडाच्या इतिहासाशी जोडलेल्या आणखी एका क्रिकेटकथेवर हे दोघे काम करत असल्याचं सांगितलं जात आहे. यावेळी केंद्रस्थानी आहे भारताचे पहिले कसोटी कर्णधार लाला अमरनाथ, फाळणीच्या जखमा आणि भारत-पाकिस्तान क्रिकेट दुश्मनीच्या मागे दडलेली एक विस्मरणात गेलेली मैत्री.


रिपोर्ट्सनुसार या कथेत पाकिस्तानचे महान वेगवान गोलंदाज फजल मेहमूद यांचं पात्रही महत्त्वाचं असणार आहे. एकेकाळी लाहोरच्या मैदानांवर एकत्र क्रिकेट खेळणारे, गुरु-शिष्य आणि जिवलग मित्र असलेले लाला अमरनाथ आणि फजल मेहमूद पुढे इतिहासाच्या दोन विरुद्ध बाजूंवर उभे राहिले. एक स्वतंत्र भारताचा पहिला कसोटी कर्णधार बनला; तर दुसरा पाकिस्तान क्रिकेटचा पहिला सुपरस्टार. यात आमिर खान लाला अमरनाथ यांची तर फरहान अख्तर फजल मेहमूदची भूमिका साकारणार असल्याचे कळते.


लाला अमरनाथ आणि फजल मेहमूद यांची ही कहाणी केवळ दोन क्रिकेटपटूंची नाही; ती फाळणीने तुटलेल्या उपखंडाची, विस्थापनाची, रक्तरंजित स्मृतींची आणि तरीही जिवंत राहिलेल्या मानवी नात्यांची कहाणी आहे. 


User Image


“लाला अमरनाथ यांना क्रिकेटविश्व कायमच ‘मिस’ करेल; पण त्यांच्या निधनामुळे माझी मात्र वैयक्तिक हानी झाली आहे. आमच्यात अतिशय जवळचे आणि घनिष्ठ संबंध होते. क्रिकेटचं अप्रतिम ज्ञान असलेले आणि उत्कृष्ट रणनीतीकार असलेले लाला अमरनाथ हे स्वातंत्र्यपूर्व काळात मी नॉर्थ झोनकडून खेळत असताना माझे कर्णधार होते.”


पाकिस्तानचे महान वेगवान गोलंदाज फजल मेहमूद यांनी आपल्या जिवलग मित्र आणि मैदानावरील प्रतिस्पर्धी, स्वतंत्र भारताचे पहिले कसोटी कर्णधार लाला अमरनाथ यांना श्रद्धांजली वाहताना अशा भावनिक शब्दांत सुरुवात केली होती. 


२००० सालीलाला अमरनाथ यांचे निधन झाल्यानंतर फजल मेहमूद यांनी ही भावना व्यक्त केली होती.


लाला अमरनाथ आणि फजल मेहमूद, लाहोरच्या मैदानावर जुळलेली मैत्री


भारत-पाकिस्तान क्रिकेट म्हटलं की आजही आपल्या डोळ्यांसमोर तणाव, राष्ट्रवाद, सीमारेषा आणि मैदानावरील तीव्र संघर्ष उभा राहतो. पण या वैराच्या इतिहासामागे एक अशीही कथा दडलेली आहे, जिथे क्रिकेट धर्मापेक्षा मोठं होतं, मैत्री सीमांपेक्षा खोल होती आणि लाहोर, दिल्ली, मुंबई, कराची ही शहरं अजून दोन राष्ट्रांत विभागली गेली नव्हती. सीमारेषा आखली जाण्यापूर्वी, दोन राष्ट्रांचे मार्ग वेगळे होण्यापूर्वी, ही कथा होती मैत्रीची आणि एकत्र पाहिलेल्या स्वप्नांची… लाहोरमध्ये क्रिकेटचे धडे गिरवणाऱ्या दोन महान क्रिकेटपटूंची…


लाहोरमधून घडलेले दोन क्रिकेटपटू, लाला अमरनाथ आणि फजल मेहमूद… १९४७ च्या फाळणीनंतर इतिहासाच्या दोन विरुद्ध बाजूंना जाऊन उभे राहिले. पुढे जाऊन तीक्ष्ण क्रिकेट बुद्धिमत्ता असलेले धडाकेबाज आणि आक्रमक फलंदाज लाला अमरनाथ स्वतंत्र भारताचे पहिले कर्णधार बनले. तर सहा फूट उंची, भेदक निळे डोळे आणि एखाद्या बॉलीवूड नायकासारखा करिष्मा असलेले वेगवान गोलंदाज फजल मेहमूद पाकिस्तानचे पहिले महान क्रिकेटर ठरले.


परंतू मैदानावर प्रतिस्पर्धी होण्याआधी लाला अमरनाथ हे फजल मेहमूद यांचे मार्गदर्शक आणि जवळचे मित्र होते आणि लाहोर हे दोघांचंही घर होतं. विशेष म्हणजे, १९४० च्या दशकात अमरनाथ आणि तरुण फजल मेहमूद देशांतर्गत क्रिकेटमध्ये एकत्र खेळले होते. असंख्य तरुण क्रिकेटपटूंना घडवणारे स्पष्टवक्ते आणि शिस्तप्रिय लाला अमरनाथ यांनी फजल मेहमूदमधील प्रतिभा खूप लवकर ओळखली होती. फजल हे त्यांच्यापेक्षा तब्बल १६ वर्षांनी लहान होते.


स्वतंत्र भारताच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट दौऱ्यात, म्हणजे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अमरनाथ आणि मेहमूद हे दोघेही एकाच संघाचा भाग असणार होते. पण इतिहासाने वेगळंच वळण घेतलं आणि पुढे ते भारत-पाकिस्तानच्या पहिल्याच मालिकेत हे दोघे चक्क एकमेकांविरुद्ध उभे राहिले.


User Image


कपूरथळा येथे जन्मलेले, पण लाहोरच्या क्रिकेट संस्कृतीत वाढलेले लाला अमरनाथ यांनी प्रसिद्ध मिन्टो पार्कमध्ये (आताचे इक्बाल पार्क) आपल्या क्रिकेट कौशल्याला धार दिली. त्यांची प्रतिभा लहानपणापासूनच स्पष्ट दिसत होती. १९३३ मध्ये मुंबईत इंग्लंडविरुद्ध अखंड भारतासाठी पहिले कसोटी शतक झळकावत त्यांनी जगाचं लक्ष वेधून घेतलं. लाला अमरनाथ यांची आक्रमक फलंदाजी आणि झुंजार वृत्ती त्या काळातील भारतीय क्रिकेटपटूंमध्ये क्वचितच दिसत असे. त्यामुळे ते भारतीय क्रिकेटमधील एक आघाडीचे  व्यक्तिमत्त्व ठरले, यात आश्चर्य नव्हतं.


दुसरीकडे, फजल मेहमूद आपल्या विलक्षण ‘सीम’ गोलंदाजीमुळे क्रिकेटविश्वात नाव कमावत होते. किशोरवयातच त्यांनी चेंडूला आपल्या इशाऱ्यावर नाचवण्याची कला आत्मसात केली होती.


मात्र १९४७-४८ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी फजलची भारतीय संघात निवड झाली ,त्याच वेळी फाळणी झाली आणि सगळंच बदलून गेलं.


फाळणीमध्ये मृत्यूच्या दारातून परतले…


“१९४७ मध्ये अखिल भारतीय क्रिकेट संघ पहिल्यांदाच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार होता. डॉन ब्रॅडमन आणि पुढे ‘इन्विन्सिबल्स’ म्हणून ओळखल्या गेलेल्या संघाविरुद्ध खेळण्याबद्दल प्रचंड उत्सुकता होती,” असे पत्रकार-लेखक राहुल भट्टाचार्य यांनी आपल्या २००५ मध्ये प्रकाशित झालेल्या Pundits from Pakistan या पुस्तकात लिहिले आहे.


“हा दौरा हिवाळ्यात होणार असला तरी भारतीय संघाची घोषणा मार्च महिन्यातच करण्यात आली होती. उदयोन्मुख तारा असलेला फजल मेहमूद याची संघात निवड झाली होती. पण काही महिन्यांतच लोकांना परिचित असलेला ‘भारत’ अस्तित्वात राहणार नव्हता,” असेही भट्टाचार्य पुढे लिहितात.


संघाची घोषणा झाली तेव्हा फजल मेहमूद पुण्यात होते. भारताच्या पहिल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट प्रशिक्षण शिबिरात ते सहभागी झाले होते. पण त्या काळातील अस्थिरतेचं प्रतिबिंब जणू पुण्याच्या आकाशातही दिसत होतं. सतत पडणाऱ्या पावसामुळे ते शिबिर रद्द करण्यात आलं.


क्रिकेट खेळण्याची संधी हुकली होती आणि देशही आता विभागला गेला होता. अशा परिस्थितीत फजल मेहमूद यांनी आपल्या घराकडे  म्हणजे लाहोरकडे धोकादायक प्रवास सुरू केला. मात्र या प्रवासात पुढे त्यांची काय वाट पाहत आहे, याची त्यांना कल्पनाही नव्हती. भारत आणि पाकिस्तानच्या अनेक भागांत त्या वेळी भीषण हिंसाचार उसळला होता. फजल मेहमूद यांची रेल्वे गावोगावातून पुढे जात असताना डब्यांमध्ये हत्या, दंगली आणि रक्तपाताच्या अफवा पसरत होत्या. लोकांना त्यांच्या धर्माच्या आधारावर डब्यांतून बाहेर ओढून मारहाण केली जात होती. फजल ज्या डब्यात प्रवास करत होते, तिथेही तणाव वाढू लागला. काही जण संशयाने त्यांच्याकडे पाहत असल्याचं त्यांनी ओळखलं आणि त्याचा अर्थ काय असू शकतो, हेही त्यांना समजलं होतं.


मात्र योगायोगाने त्याच डब्यात भारताचे पहिले कसोटी कर्णधार सी. के. नायडूही प्रवास करत होते. १९३१ च्या इंग्लंड दौऱ्यात नायडूंनी भारतीय संघाचं नेतृत्व केलं होतं. धोक्याची चाहूल लागताच नायडू तात्काळ पुढे सरसावले.


User Image


आपल्या प्रभावी व्यक्तिमत्त्वासह हातात क्रिकेट बॅट घेऊन त्यांनी जमावाला दूर राहण्याचा इशारा दिला. फजल मेहमूद यांनी आपल्या From Dusk to Dawn या आत्मचरित्रात हा प्रसंग सांगितला आहे.


नायडूंनी केलेल्या हस्तक्षेपामुळे फजल सुरक्षितपणे मुंबईपर्यंत पोहोचू शकले. तिथून त्यांनी कराचीला जाण्याची व्यवस्था केली. तेव्हा ते पूर्णपणे थकून गेले होते. आयुष्यातील सर्वांत भीषण प्रवासांपैकी एक अनुभवून अखेर तीन दिवसांनी ते लाहोरला पोहोचले.


फजल मेहमूद यांचे मार्गदर्शक आणि मित्र लाला अमरनाथ यांनाही फाळणीपासून सुटका मिळाली नव्हती. ते देखील मृत्यूच्या दारातून परत आले होते.


“त्या काळात लाला अमरनाथ पतियाळामध्ये होते. लाहोरमधील त्यांचं पिढीजात घर त्यांनी गमावलं. घरातील सर्व सामान नष्ट झालं, ज्यामध्ये भारतासाठी पहिले कसोटी शतक झळकावणारी त्यांची प्रसिद्ध Gunn & Moore ‘non-jar’ बॅटही होती,” असं पत्रकार-लेखक राहुल भट्टाचार्य यांनी लिहिलं आहे.


ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ निश्चित करण्यासाठी अमरनाथ दिल्लीकडे जात असताना त्यांनी रेल्वेत एक भीषण रक्तपात अनुभवला. संतप्त जमावाने त्यांच्या डब्यावर ताबा मिळवला होता. काही लोकांनी अमरनाथ यांना सावध केलं की जमावातील काही जण त्यांना ठार मारण्याचा विचार करत आहेत. पण क्रिकेटच्या मैदानावर जशी त्यांची निर्णयक्षमता काम करत असे, तशीच ती दंगलीच्या त्या भयावह प्रसंगातही उपयोगी पडली आणि त्यामुळेच त्यांचा जीव वाचला.


“काही धिप्पाड पुरुष माझ्याकडे पाहत कुजबुज करत होते आणि बोट दाखवत होते, हे अमरनाथ यांच्या लक्षात आलं,” असं भट्टाचार्य लिहितात. जीवाला धोका असल्याची जाणीव होताच अमरनाथ अंबाल्यात उतरले. तिथे त्यांना ओळखणाऱ्या एका पोलिस अधिकाऱ्याने त्यांच्या हातात शीख धर्मीय घालतात तसं ‘कडा’ घालायला दिलं. नंतर जेव्हा तो जमाव पुन्हा अमरनाथ यांच्या समोर आला, तेव्हा त्यांच्या हातातील कडा पाहून त्यांनी त्यांना सोडून दिलं.


“देवाचे आभार माना,” त्या लोकांनी अमरनाथ यांना सांगितलं, “करनालच्या आधी आम्ही तुम्हाला मारण्याचा विचार करत होतो.”


फाळणीनंतर फजल मेहमूद यांनी अमरनाथांची ऑफर नाकारली


फाळणीच्या हिंसाचाराने उपखंडातील अनेक भाग पेटून उठले असताना, फजल मेहमूद यांनी भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय घेतला. हा पाच कसोटी सामन्यांचा दौरा होता, ज्यात भारतीय संघाचं नेतृत्व लाला अमरनाथ करत होते, तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार होता महान डॉन ब्रॅडमन.


User Image


फजलचे मित्र आणि मार्गदर्शक लाला अमरनाथ यांनी त्यांना निर्णय बदलण्याची विनंती करणारा एक भावनिक तारसंदेश पाठवला होता. फजलच्या प्रतिभेमुळे भारताला मोठा गौरव मिळू शकतो, असा त्यांचा विश्वास होता. नव्यानं आखलेल्या सीमारेषेच्या दोन्ही बाजूंवरील पंजाब प्रांतांच्या मुख्यमंत्र्यांनीही फजलला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र फजल आपल्या निर्णयावर ठाम राहिले.


पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या निर्णयाबद्दल विचारलं असता फजल मेहमूद यांनी थेट शब्दांत उत्तर दिलं, 


“बडे भाई, तुम्हाला खरंच वाटतं का की मी भारतासाठी गौरव मिळवून द्यावा?”


या एका वाक्यात फाळणीने माणसांच्या मनात निर्माण केलेली दरी, वेदना आणि बदललेली ओळख स्पष्टपणे दिसून येत होती.



काही वर्षांनी फजल मेहमूद यांनी हा प्रसंग पुन्हा आठवला होता.


“मी भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडला गेलो, तेव्हा त्या संघाचे कर्णधार लाला अमरनाथ होते. पण नव्याने निर्माण झालेल्या पाकिस्तानबद्दलची माझी भावना क्रिकेटपेक्षा मोठी होती. त्यामुळे मी त्या दौऱ्यावर जाण्यास नकार दिला. माझ्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांनी त्या वेळी पंजाबचे मुख्यमंत्री असलेल्या नवाब ऑफ मामडोट यांनाही फोन करून मला जाऊ द्यावं, अशी विनंती केली. ‘फजल संघात असेल तर आम्ही जगातील कोणत्याही देशाला हरवू शकतो,’ असं त्यांनी म्हटलं होतं.


माझ्या माजी कर्णधाराकडून आणि त्या काळातील महान क्रिकेटपटूकडून मिळालेलं हे माझ्यासाठी खूप मोठं कौतुक होतं,” असं फजल मेहमूद यांनी २००० मध्ये लाला अमरनाथ यांना वाहिलेल्या श्रद्धांजलीत म्हटलं होतं.


या आठवणीतून केवळ दोन क्रिकेटपटूंचं नातंच दिसत नाही, तर फाळणीच्या राजकीय भूकंपानंतरही टिकून राहिलेला परस्पर सन्मान, जिव्हाळा आणि क्रिकेटमधील बंधही स्पष्टपणे जाणवतात.


मित्र ते प्रतिस्पर्धी : १९५२ ची ऐतिहासिक मालिका


काही वर्षांनंतर, १९५२ मध्ये पाकिस्तानने आपल्या इतिहासातील पहिली कसोटी मालिका खेळली आणि प्रतिस्पर्धी होता भारतीय संघ… पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजी आक्रमणाचं नेतृत्व फजल मेहमूद करत होते. त्यांच्या नजरा आपल्या जुन्या मित्रावर — लाला अमरनाथ यांच्यावर खिळल्या होत्य आणि योगायोग असा की, कसोटी क्रिकेटमध्ये फजल मेहमूद यांनी घेतलेली पहिली विकेट होती लाला अमरनाथ यांचीच.


User Image


ती केवळ एक विकेट नव्हती तर ती जणू एका युगातून दुसऱ्या युगाकडे झालेली प्रतीकात्मक वाटचाल होती. फाळणीने काय हिरावून घेतलं आणि काय निर्माण केलं, याची आठवण करून देणारा तो क्षण होता. ती मालिका अत्यंत चुरशीची ठरली. दिल्लीतील पहिली कसोटी भारताने जिंकली. पण लखनौमध्ये पाकिस्तानने जोरदार पुनरागमन केलं. फजल मेहमूद यांनी त्या सामन्यात तब्बल १२ विकेट्स घेत पाकिस्तानला इतिहासातील पहिला कसोटी विजय मिळवून दिला. अखेर भारताने मालिका जिंकली, पण या मालिकेने पुढे क्रिकेटमधील सर्वांत तीव्र आणि भावनांनी भारलेल्या प्रतिस्पर्धेची पायाभरणी केली.


भारत-पाक क्रिकेटला आकार देणारे दोन सुपरस्टार


लाला अमरनाथ यांच्या नेतृत्वाने भारतीय क्रिकेटच्या जडणघडणीत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. ते कठोर शिस्तीवर विश्वास ठेवणारे, स्पष्टवक्ते आणि तडजोड न करणारे कर्णधार होते. तरुण प्रतिभेला घडवण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. त्यांनी भारतीय संघात शिस्त, आत्मविश्वास आणि लढाऊ वृत्ती रुजवली आणि पुढील काळातील भारतीय क्रिकेटच्या यशाचा पाया घातला. पॉली उम्रीगर आणि विजय मांजरेकर यांसारख्या पुढे भारतीय क्रिकेटचे आधारस्तंभ ठरलेल्या खेळाडूंना घडवण्यातही अमरनाथ यांची महत्त्वाची भूमिका होती.


दुसरीकडे, फजल मेहमूद पाकिस्तानचे पहिले क्रिकेट सुपरस्टार बनले. १९५४ मध्ये इंग्लंडमधील द ओव्हल मैदानावर पाकिस्तानला ऐतिहासिक विजय मिळवून देणाऱ्या गोलंदाजीने त्यांना जागतिक ओळख मिळवून दिली. फजल मेहमूद हे केवळ महान गोलंदाज नव्हते; ते पाकिस्तानच्या क्रिकेट संस्कृतीला शैली, करिष्मा आणि कठोरता देणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची मोहिनी इतकी होती की त्यांना बॉलीवूड आणि हॉलीवूडमधून चित्रपटांच्या ऑफर्सही मिळाल्या होत्या. मात्र त्यांनी आपल्या पहिल्या प्रेमाशी म्हणजेच क्रिकेटशी प्रामाणिक राहणंच पसंत केलं.


User Image


काळ जसजसा पुढे गेला, तसतशी भारत-पाकिस्तान क्रिकेटमधील स्पर्धा अधिक तीव्र होत गेली. भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला की क्रिकेटच्या व्यावसायिक कमाईचे विक्रम मोडले जातात, नव्या सुपरस्टार्सचा जन्म होतो. भारत-पाकिस्तान सामन्यामुळे अनेक खेळाडू घडले तर काहींची कारकिर्द संपली. या स्पर्धेने अनेकदा राजकीय तणाव क्रिकेटच्या मैदानावर ओसंडून वाहतानाही पाहिलं आहे .१९८९ मध्ये कराचीतील भारतीय खेळाडूंवरील हल्ल्यांपासून ते २००८ नंतर द्विपक्षीय मालिकांचं पूर्णपणे बंद होणं, अशा अनेक घटनांनी या स्पर्धेवर परिणाम केला.


फाळणीच्या जखमा, दोन्ही देशांत जन्माला आलेल्या महान क्रिकेटपटूंचा वारसा आणि क्रिकेटकडे केवळ खेळ म्हणून नव्हे तर भावनांच्या माध्यमातून पाहणारे लाखो चाहते, या सगळ्यांनी भारत-पाकिस्तान क्रिकेटला आकार दिला आहे आणि पुढेही देत राहतील. स्पष्टपणे सांगायचं तर भारत-पाकिस्तान क्रिकेट हे केवळ विजय-पराजयाचं गणित नाही; ती एक सामूहिक स्मृती आहे.


ही कथा आहे त्या मैत्रीची जी कधीकाळी अस्तित्वात होती, त्या नात्यांची जी फाळणीने तोडून टाकली आणि त्या आशेची की इतिहासाने कितीही विभाजन केलं तरी खेळ माणसांना पुन्हा एकत्र आणू शकतो. म्हणूनच आजही आपण लाला अमरनाथ आणि फजल मेहमूद यांच्या मैदानावरील प्रतिस्पर्धेला आणि मैदानाबाहेरील मैत्रीला आठवत राहतो.


(सौजन्य - इंडिया टुडे)



Share this article
लोकशाहीचे सजग प्रहरी व संघर्षाचे प्रतीक : जॉर्ज फर्नांडिस
कला / साहित्य / सिनेमा

लोकशाहीचे सजग प्रहरी व संघर्षाचे प्रतीक : जॉर्ज फर्नांडिस

फुटपाथवरच्या संघर्षमय आयुष्यातून देशाच्या संरक्षणमंत्री पदापर्यंत पोहोचलेले जॉर्ज फर्नांडिस हे भारतीय राजकारणातील सर्वात प्रभावी समाजवादी नेत्यांपैकी एक होते. १९७४ च्या ऐतिहासिक रेल्वे संपापासून ते आणीबाणीविरोधातील लढ्यापर्यंत त्यांनी सत्तेविरोधात निर्भीड भूमिका घेत लोकशाही मूल्यांचे रक्षण केले. कामगार नेता, उद्योगमंत्री, रेल्वेमंत्री, संरक्षणमंत्री आणि लोकशाहीचा कट्टर पुरस्कर्ता अशा विविध भूमिकांमधून त्यांनी भारतीय सार्वजनिक जीवनावर अमिट ठसा उमटवला.

9 min read
V
Vikas Meshram
'ए मेरे वतन के लोगो'... सुमन कल्याणपूर आणि लता दीदी काय आहे संबंध?
कला / साहित्य / सिनेमा

'ए मेरे वतन के लोगो'... सुमन कल्याणपूर आणि लता दीदी काय आहे संबंध?

‘ऐ मेरे वतन के लोगो’ गाण्याची संधी ऐनवेळी हातातून निसटली, पण सुमन कल्याणपूर यांनी त्यासाठी कधीही लता मंगेशकरांना दोष दिला नाही. • लता मंगेशकर यांच्या आवाजाशी असलेल्या विलक्षण साम्यामुळे सुमनताईंना काम मिळालं, पण त्याच साम्यामुळे त्यांची स्वतंत्र ओळख अनेकदा झाकोळली गेली. • मराठी आणि हिंदी संगीतविश्वात दर्जेदार गायकीचा ठसा उमटवणाऱ्या सुमन कल्याणपूर यांच्या कारकिर्दीत प्रतिभेपेक्षा नियतीनेच अधिक परीक्षा घेतल्याची भावना अनेकदा उमटते.

7 min read
S
Sameer Gaikwad
जिथे आठवणी उजळतात, तिथे बशीर बद्र भेटतात…!
कला / साहित्य / सिनेमा

जिथे आठवणी उजळतात, तिथे बशीर बद्र भेटतात…!

महान शायर बशीर बद्र गेले, काळजात कळ उठली. पिकलं पान गळून पडलं. खरं तर ते गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनीक जीवनापासून दूर असले तरी त्यांचे काव्य हे असंख्य रसिकांच्या मनाला कायम भुरळ घालत राहिले आहे. बशीरजींच्या गेल्यानंतर त्यांच्या कार्याला प्रचंड प्रमाणात दिला जाणारा उजाळा हा त्यांच्या महत्तेची ग्वाही देणारा ठरला आहे.

7 min read
S
shekhar patil
महात्मा बसवेश्वर : ९०० वर्षांपूर्वी पाळीचा विटाळ झुगारून देणारा महापुरुष
कला / साहित्य / सिनेमा

महात्मा बसवेश्वर : ९०० वर्षांपूर्वी पाळीचा विटाळ झुगारून देणारा महापुरुष

ज्याकाळात आधुनिकता ह्या शब्दाचा मागमूस देखील नव्हता. जेव्हा स्त्रिया सोडाच पण माणसालाच माणूस म्हणून वागवलं जात नव्हतं. अशा काळात एका महात्म्याने मासिक पाळीला विटाळ म्हणण्यास कडकडून विरोध केला होता. महात्मा बसवेश्वर यांनी जनन, मरण, जात, रजस्व आणि उच्छिष्ट हे पंचसूतक नाकारलंय. त्यापैकी जन्म आणि रजस्व ही दोन्ही सुतकं थेट स्त्रीत्वाशी नातं सांगतात. त्यामुळे मासिक पाळीतला विटाळ पाळणं, स्पर्श केल्यास अपवित्र झाल्याचं मानणं, हे बसवण्णांच्या विचारांच्या विरोधात आहे.

4 min read
C
Channveer Bhadreshwarmath
अजिंठ्याची पारू : प्रेम, उपेक्षा आणि इतिहासाचा अंधार…दीडशे वर्षांनंतरही रॉबर्ट स्मरणात राहिला, पण पारूची ओळख धूसरच!
कला / साहित्य / सिनेमा

अजिंठ्याची पारू : प्रेम, उपेक्षा आणि इतिहासाचा अंधार…दीडशे वर्षांनंतरही रॉबर्ट स्मरणात राहिला, पण पारूची ओळख धूसरच!

अजिंठ्याच्या संशोधकाला शिल्पकहाणीची गाथा उघडल्यावर, एक कहाणी विलक्षण लक्ष वेधून घेते, ती कहाणी म्हणजे रॉबर्ट गिल आणि पारूची प्रेमकथा. जी अजिंठ्याच्या शिल्परांगेत एक जिवंत शिल्प बनून उभी आहे. अमर पावली आहे... अजिंठ्याच्या पारू आणि रॉबर्ट गिलची प्रेमकथा गेली दीडशेहून अधिक वर्ष जगाने ऐकली आहे. भेदाच्या भारतीय समाज मानसाने अजिंठ्याच्या पारूच्या प्रेमकथेला नावे ठेवली, विपर्यस्त करून सांगितले. जिच्या प्रेमकथेने अजिंठ्याच्या कातळालाही भावनांनी ओलावून टाकले, त्या पारूची समाधी आज मात्र उपेक्षा, दुर्लक्ष आणि विस्मृतीच्या सावलीत उभी आहे. आज २३ मे हा पारूचा स्मृतीदिवस त्यानिमित्ताने एका ‘सैराट’ कथेची झालेली ही आठवण.

6 min read
V
Vira Rathod
प्रिय चहाच्या कपास, पत्र लिहिण्यास कारण की…!
कला / साहित्य / सिनेमा

प्रिय चहाच्या कपास, पत्र लिहिण्यास कारण की…!

चहा हे असं पेय आहे, जे झोपडीतल्या गरिबापासून ते पंचतारांकित हॉटेलातल्या श्रीमंतापर्यंत सर्वच पितात. म्हणून तर मी चहाला समाजवादी पेय म्हणतो. चहा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. ‘चहातरी घेऊन जा’ असं घरी आलेल्या माणसाला आपण किमान सांगतो तरी (ह्यात अस्सल सदाशिव पेठी घरं धरलेली नाहीत.) सध्या ‘रात्री सातनंतर चहा घेत नाही’ असं म्हणण्याचा जरी जमाना आलेला असला, तरी सकाळी उठल्यावर पहिली आठवण अजूनही चहाची येते. म्हणूनच आजच्या ‘आंतरराष्ट्रीय चहा दिना’निमित्त हे आपल्या जीवाभावाच्या मित्राला पत्र...

7 min read
D
Dwarkanath Sanjhgiri

Comments

Comments are currently disabled or loading...