Skip to main content

महात्मा बसवेश्वर : ९०० वर्षांपूर्वी पाळीचा विटाळ झुगारून देणारा महापुरुष

Channveer Bhadreshwarmath
6 days ago
4 min read
12 views
महात्मा बसवेश्वर : ९०० वर्षांपूर्वी पाळीचा विटाळ झुगारून देणारा महापुरुष

चन्नवीर भद्रेश्वरमठ


  • ज्याकाळात आधुनिकता ह्या शब्दाचा मागमूस देखील नव्हता. जेव्हा स्त्रिया सोडाच पण माणसालाच माणूस म्हणून वागवलं जात नव्हतं. अशा काळात एका महात्म्याने मासिक पाळीला विटाळ म्हणण्यास कडकडून विरोध केला होता.


  • महात्मा बसवेश्वर यांनी जनन, मरण, जात, रजस्व आणि उच्छिष्ट हे पंचसूतक नाकारलंय. त्यापैकी जन्म आणि रजस्व ही दोन्ही सुतकं थेट स्त्रीत्वाशी नातं सांगतात. त्यामुळे मासिक पाळीतला विटाळ पाळणं, स्पर्श केल्यास अपवित्र झाल्याचं मानणं, हे बसवण्णांच्या विचारांच्या विरोधात आहे.


भारतीय मूळ असणाऱ्या अमेरिकन अंतराळवीर सुनिता विल्यम्स अंतराळ मोहिमेवरून परतल्या, तेव्हा त्या प्रत्यक्ष अंतराळात सर्वाधिक काळ घालवलेल्या महिला होत्या. त्यांनी इतिहास घडवला होता. वर्षानुवर्षं बाईपणाच्या म्हणून लादलेल्या बंधनांना त्यांनी कर्तृत्वाने झुगारलं होतं. त्या पृथ्वीवर परतल्या तेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारलं, या मोहिमेत बाई म्हणून तुला काही अडचणी आल्या नाहीत का?


सुनिता विल्यम्स म्हणाल्या,यंत्र केवळ कमांड स्वीकारतात. तुमच्या आदेशाचं पालन करतात. कॉम्प्युटर कमांड देणारे हात कुणाचे आहेत, बाईचे किंवा पुरूषाचे हा भेद करत नाही. कोणीही क्लिक केल्यावर ही यंत्रं त्याचं काम करतातच. 


सुनिता विल्यम्स यांनी दिलेलं उत्तर थेट वेगळ्या संदर्भात पण अक्कमहादेवींशी नातं सांगणारं आहे. ९०० वर्षांपूर्वी क्रांतिकारी विचार मांडणाऱ्या अक्कमहादेवी म्हणाल्या होत्या,


‘’बाई किंवा पुरूष केवळ शरीरावरूनच ठरतं. पण आत्म्याला लिंगभेद नाही़.’’


अक्कमहादेवींची जवळपास ५०० वचनं म्हणजे कविता उपलब्ध आहेत़. केवळ मोकळे केस हेच कपडे मानून वावरणाऱ्या महादेवीने स्त्री- पुरूष समानतेचा पुरस्कार केलाय. 


स्त्रीपुरुष समानतेची क्रांती


अशा अक्कमहादेवी एकट्या नाहीत. महात्मा बसवेश्वर म्हणजेच बसवण्णा यांनी उभं केलेल्या लिंगायत क्रांतीचं नेतृत्व अशा शेकडो महिला करत होत्या. तेही बाराव्या शतकात म्हणजे आजपासून नऊशे वर्षांपूर्वी. आज आपल्याकडे अशा ३४ महिला शरणांची वचनं उपलब्ध आहेत. बसवण्णांनी केलेल्या या क्रांतीत एक मुख्य आधार स्त्रीपुरूष समानतेचा होता. त्यातून त्यांनी सर्व प्रकारचा विटाळ झिडकारून लावला.


User Image

बसवण्णांच्या नेतृत्वात घडलेल्या शरणांच्या क्रांतीमधे धर्मासह सर्वच क्षेत्रांत स्त्रीपुरुष समान मानलेत. स्त्री ही केवळ दासी नसून ती सहचारिणी आहे. ती माया नसून महादेवी आहे. स्त्री शूद्र नाही, तर साक्षात महादेवी आहे. असा स्त्री समानता वादी दृष्टीकोन अनुभव मंटपाने स्वीकारला होता. स्त्रियांना अनिष्ट प्रथा परंपरेच्या जोखडातून मुक्त करून अनुभव मंटपाने त्यांच्या विचार शक्तीला प्रेरित केलं.


अनुभव मंटप : देशातली पहिली लोकसंसद


अनुभव मंटप (किंवा अनुभव मंडप) हे १२ व्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी बसवकल्याण (कर्नाटक) येथे स्थापन केलेले एक अद्वितीय आध्यात्मिक आणि सामाजिक व्यासपीठ होते. लिंग, जात किंवा वर्णाचा भेद न बाळगता स्त्री-पुरुषांना आध्यात्मिक, सामाजिक आणि आर्थिक विषयांवर चर्चा करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य होते. याला जगातील पहिली धार्मिक संसद मानले जाते. महात्मा बसवण्णांच्या या अनुभव मंटपात अनुभाव मिळवलेल्या व्यक्तींना स्थान होतं.अनुभव आणि अनुभाव यात फरक आहे.अनुभाव म्हणजे जीवनानुभवामुळे आणि स्वत:ला ओळखल्यामुळे मिळणारी अंतरंग बहिरंग शुद्धीची शक्ती होय. अशाच अनुभाव शक्तीचा आविष्कार असणारे बसवादी शरण अनुभव मंटपात अनुभाव चर्चा करत. अनुभावाच्या पातळीवर सर्वांना समान मानलं गेल्याने मानवी मूल्यांची प्रस्थापना आपसूकच झाली.


अनुभव मंटपात सहभागी होणाऱ्या सर्व जाती धर्माच्या ७७० सदस्यांपैकी महिलांची संख्या ७० होती. महिलांना अनुभव मंटपाच्या चर्चेत सहभाग घेण्याचा, प्रश्नोत्तरं करण्याचा अधिकार होता. अक्कमहादेवी, दुग्गळे, धान्य गोळा करणारी लक्कम्मा, सत्यक्का, मुक्तायक्का, अक्कनागम्मा, निलांबिका, गंगांबिका, कल्याणम्मा, रायम्मा, संकव्वा, महादेवी, सोमव्वा अशा अनेक शरणी आपला नित्याचा कायक म्हणजे कामं करून अनुभव मंटपात चर्चेसाठी सहभागी होत. सूळी संकव्वा या शरीरविक्रय करणारी भगिनीही त्यात होती.


विचारांचं स्वातंत्र्य आणि अभिव्यक्तीचंही…


त्याकाळी प्रस्थापित असणाऱ्या वैदिक वर्णाश्रम व्यवस्थेत बाईला शूद्रच ठरवून दुय्यम स्थान दिलं होतं. मनूसारख्यांनी तिला माणूस म्हणूनही जगण्याचे हक्कही नाकारले होते. ती केवळ उपभोग्य वस्तू बनली होती. मात्र शरण संस्कृतीत बाईला दुय्यम नाही, तर समान स्थान होतं. बाराव्या शतकातल्या बसवांसह सर्व शरणांच्या वचन साहित्यात स्त्रीचा गौरव पदोपदी दिसून येतो. फक्त साहित्यात नाही, तर प्रत्यक्षातही महिला पुरुषांच्या बरोबरीने वावरताना दिसतात. त्यांना विचार स्वातंत्र्य होतं. अभिव्यक्ती स्वातंत्र्य होतं. त्यांच्या विचारांना, भूमिकांना महत्त्व होतं. इतकंच नाही, तर कर्तव्यात कसूर केल्याबद्दल आपल्या पतीला जाब विचारण्याची धमक त्यांच्यात होती़.


आय्यदक्की मारय्याला त्याची पत्नी लक्कम्माने जाब विचारल्याची वचनं आहेत.पण पती पत्नींच्या एकरूप सहजीवनाचा प्रत्यय शरण साहित्य वाचताना येतो. अनेक स्त्री शरणांनी आपल्या नावात पतीचंही नाव गुंफलेलं आहे. शरण संस्कृतीने म्हणजेच बसव युगाने स्त्रियांना सर्वच पातळ्यांवर समान स्थान दिलं होतं.


९०० वर्षांपूर्वी पाळीचा विटाळ झुगारून देणारा महापुरुष


समाजातील विषमतेचं उच्चाटन झालं पाहिजे, असं म्हणणारा खऱ्या अर्थाने पुरोगामी विचार बसवण्णांनी व्यापक स्वरूपात मांडला. स्त्री आणि पुरुषात केला जाणारा दुजाभाव त्यांनी नाकारला. स्त्री ही अपवित्र आहे अशी बतावणी करणाऱ्या परंपारावादी, प्रतिगामी आणि पाखंडी धर्मांचा त्यांनी समाचार घेतला.ज न्म जाती, रजस्व, उच्छिष्ट आणि मृत्यू ही पंचसुतकं अनुभव मंटपाने निषिद्ध ठरवली.


आई देव आहेच यात वाद असायचं कारण नाही़. पण स्त्री म्हणून बायको, बहीण, मुलगी, काकी, मामी यासह इतर सगळ्या नात्यांमधील स्त्रीसुद्धा देवच आहे. एकट्या आईला देवत्व देताना इतर स्त्रियांना दुय्यम स्थान देण्यावर महात्मा बसवण्णा यांनी हल्ला चढवलाय. 


User Image

स्त्री गौरव हा शरण संप्रदायाचा मानबिंदू आहे. त्यामुळे बाईला धर्माच्या नावाने जोखडात अडकवणाऱ्या मासिक पाळीच्या पावित्र्याच्या कल्पनेला बसवण्णांनी तेव्हाच सुरुंग लावला होता. मासिक पाळीचा विचार करताना बसवादी शरण काळाच्या कितीपुढे होते याची जाणीव होते. बसवण्णांनी जनन, मरण, जात, रजस्व आणि उच्छिष्ट हे पंचसूतक नाकारलंय. त्यापैकी जन्म आणि रजस्व ही दोन्ही सुतकं थेट स्त्रीत्वाशी नातं सांगतात. त्यामुळे मासिक पाळीतला विटाळ पाळणं, स्पर्श केल्यास अपवित्र झाल्याचं मानणं, हे बसवण्णांच्या विचारांच्या विरोधात आहे.


शरणांच्या साहित्यातली बंडखोरी.


विटाळाबद्दल अक्कमहादेवी म्हणतात,


स्त्री स्त्री झाल्यास तिला पुरूषाचा विटाळ

पुरूष पुरूष झाल्यास त्याला स्त्रीचा विटाळ

मनातला विटाळ नष्ट झाल्यास

शरीराच्या विटाळाला काही अर्थ आहे का?

हे देवा, अस्तित्वातच नसलेल्या विटाळाला जग भुललंय पहा

माझे गुरू चन्नमल्लिकार्जुन देवांसाठी सारं जगच स्त्री पहा़


ज्येष्ठ वचनकार विणकर दासिमय्या म्हणतात, छाती पुढे आल्यास आणि मासिक पाळी आल्यावर त्या शरीराला स्त्री म्हणतात. दाढी मिशा वाढल्यावर त्या शरीराला पुरूष म्हणतात. त्या दोन्ही शरीरातला आत्मा एकच आहे. आत्मा स्त्री नाही वा पुरूष नाही़.

दासिमय्यांनी इथे ‘मुडी’ हा शब्द वापरलाय. मुडी - मुडचट्टा या कन्नड शब्दाचा विटाळ असा आहे. मातंग धूळय्या शरण या विटाळाविषयी म्हणतात,


मनाचं किटाळ आत्मप्रज्ञाने घालवावं

शरीराचं किटाळ आत्मप्रज्ञाने घालवावं

लिंगाचं किटाळ आत्मप्रज्ञाने घालवावं

गर्भाचं किटाळ आत्मप्रज्ञाने घालवावं 

किटाळ नष्ट झाल्यावर कामधूम धूळेश्वर लिंग

कुणाला काही म्हणणार नाही 


हेण्णू (बाई), होन्नू (सोनं), मण्णू (जमीन) या तीन माया असून, त्यांच्यापासून लांब राहण्याची पक्की समाजधारणा होती. त्यामुळे स्त्री म्हणजे माया म्हणजे मोहात ओढणारी आणि विनाशाला कारणीभूत ठरणारी ठरवली असताना शिवयोगी सिद्धरामांनी याचं खंडन केलं.


स्त्री ही माया नसून, ती साक्षात कपिलसिद्ध मल्लिकार्जुन असल्याचं सिद्धरामांनी सांगितलं. कपिलसिद्ध मल्लिकार्जुन हे सिद्धरामांचं आराध्य दैवत. म्हणूनच सिद्धरामांनी म्हणजेच सिद्धेश्वरांनी स्त्रीला आपलं आराध्य दैवत म्हटलंय. सिद्धरामांनी गंगा, पार्वती, सरस्वती आणि लक्ष्मी या देवतांचा संदर्भ दिलेलं एक वचन असंय,


देवा तुम्ही निर्मिलेली स्त्री तुमच्या डोक्यावर बसली.

देवा, तुम्ही निर्मिलेली स्त्री तुमच्या मांडीवर बसली.

देवा, तुम्ही निर्मिलेली स्त्री ब्रह्माच्या जिभेवर बसली.

देवा, तुम्ही निर्मिलेली स्त्री तुमच्या डोक्यावर बसली.

देवा, तुम्ही निर्मिलेली स्त्री नारायणाच्या छातीवर बसली.

म्हणूनच स्त्री ही केवळ स्त्री नाही, स्त्री ही सुवर्ण वा संपत्ती नव्हे,

स्त्री ही माया नव्हे, स्त्री ही राक्षसी नव्हे 

तर ती साक्षात कपिलसिद्ध मल्लिकार्जुन होय.


म्हणून बसवण्णा फार मोठे.


तर आणखी एक शरण चन्नबसवण्णा म्हणतात,


ज्या डोळ्यांनी ईश्वराला पाहतो,

त्याच डोळ्यांनी पर स्त्रीकडे पाहिल्यास ईश्वर कसा दिसेल?

वासना आपल्या मनात आलीच तर तिथे देवत्वाचा ऱ्हास होतो़.

तर सोड्डळ चामरस हा शरण विचारतो,

स्तनांचं अमृतपान करूनच मोठ्या झालेल्या मना, तेच पाहून कसा रे तडफडतोस?


बसवण्णांचा सहकारी असलेला हडपद अप्पण्णा हा शरण म्हणतो स्थावर मालमत्ता, संपत्ती आणि स्त्री यांच्याविषय़ी लालसा न ठेवणाऱ्यालाच मी ईश्वर म्हणूनच पाहीन.


User Image


बसवण्णांसह शरणांनी बालविवाहाला विरोध केला. पुनर्विवाहाला संमती दिली होती़. शिवाय लग्नाच्या निर्ययात पुरूषाइतकाच स्त्रियांनाही निर्णय घेण्याचा, पसंती नापसंती दाखवण्याचा अधिकार दिला होता़. चर्मकार जातीतल्या हरळय्या आणि ब्राह्मण जातीतल्या मधुवय्या यांच्या मुलामुलींच्या अनुभव मंटपात घडवून आणलेल्या लग्नाचा एकूणच पैस आपण समजून घेतला, तर लक्षात येतं की बसवयुगाने मुलीला मनाप्रमाणे जोडीदार निवडण्याचा अधिकार दिलाय.


जवळपास नऊशे वर्षांपूर्वी महात्मा बसवण्णा, त्यांच्या हजारो सहकाऱ्यांनी आणि लिंगायत धर्म मानणाऱ्या समाजाने उभी केलेली स्त्री पुरुष समानता आजच्या आधुनिक युगातही मान्य होत नाही. साधा मासिक पाळीचा विटाळही आपण झुगारू शकत नाही. बसवण्णा म्हणूनच मोठे आहेत. फार फार मोठे आहेत…


Share this article
लोकशाहीचे सजग प्रहरी व संघर्षाचे प्रतीक : जॉर्ज फर्नांडिस
कला / साहित्य / सिनेमा

लोकशाहीचे सजग प्रहरी व संघर्षाचे प्रतीक : जॉर्ज फर्नांडिस

फुटपाथवरच्या संघर्षमय आयुष्यातून देशाच्या संरक्षणमंत्री पदापर्यंत पोहोचलेले जॉर्ज फर्नांडिस हे भारतीय राजकारणातील सर्वात प्रभावी समाजवादी नेत्यांपैकी एक होते. १९७४ च्या ऐतिहासिक रेल्वे संपापासून ते आणीबाणीविरोधातील लढ्यापर्यंत त्यांनी सत्तेविरोधात निर्भीड भूमिका घेत लोकशाही मूल्यांचे रक्षण केले. कामगार नेता, उद्योगमंत्री, रेल्वेमंत्री, संरक्षणमंत्री आणि लोकशाहीचा कट्टर पुरस्कर्ता अशा विविध भूमिकांमधून त्यांनी भारतीय सार्वजनिक जीवनावर अमिट ठसा उमटवला.

9 min read
V
Vikas Meshram
'ए मेरे वतन के लोगो'... सुमन कल्याणपूर आणि लता दीदी काय आहे संबंध?
कला / साहित्य / सिनेमा

'ए मेरे वतन के लोगो'... सुमन कल्याणपूर आणि लता दीदी काय आहे संबंध?

‘ऐ मेरे वतन के लोगो’ गाण्याची संधी ऐनवेळी हातातून निसटली, पण सुमन कल्याणपूर यांनी त्यासाठी कधीही लता मंगेशकरांना दोष दिला नाही. • लता मंगेशकर यांच्या आवाजाशी असलेल्या विलक्षण साम्यामुळे सुमनताईंना काम मिळालं, पण त्याच साम्यामुळे त्यांची स्वतंत्र ओळख अनेकदा झाकोळली गेली. • मराठी आणि हिंदी संगीतविश्वात दर्जेदार गायकीचा ठसा उमटवणाऱ्या सुमन कल्याणपूर यांच्या कारकिर्दीत प्रतिभेपेक्षा नियतीनेच अधिक परीक्षा घेतल्याची भावना अनेकदा उमटते.

7 min read
S
Sameer Gaikwad
जिथे आठवणी उजळतात, तिथे बशीर बद्र भेटतात…!
कला / साहित्य / सिनेमा

जिथे आठवणी उजळतात, तिथे बशीर बद्र भेटतात…!

महान शायर बशीर बद्र गेले, काळजात कळ उठली. पिकलं पान गळून पडलं. खरं तर ते गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनीक जीवनापासून दूर असले तरी त्यांचे काव्य हे असंख्य रसिकांच्या मनाला कायम भुरळ घालत राहिले आहे. बशीरजींच्या गेल्यानंतर त्यांच्या कार्याला प्रचंड प्रमाणात दिला जाणारा उजाळा हा त्यांच्या महत्तेची ग्वाही देणारा ठरला आहे.

7 min read
S
shekhar patil
 ‘’जेव्हा फाळणीने क्रिकेटच्या दोन जिवलग मित्रांना मैदानावर प्रतिस्पर्धी बनवलं…’’
कला / साहित्य / सिनेमा

‘’जेव्हा फाळणीने क्रिकेटच्या दोन जिवलग मित्रांना मैदानावर प्रतिस्पर्धी बनवलं…’’

भारत-पाकिस्तान क्रिकेटचा इतिहास आपण अनेकदा युद्ध, राष्ट्रवाद आणि तणावाच्या चौकटीत पाहतो. पण या वैराच्या मुळाशी एक अशी कहाणी दडलेली आहे, जिथे दोन क्रिकेटपटू एकाच शहरात वाढले, एकाच मैदानावर खेळले आणि एकमेकांना मित्र मानत मोठे झाले. फाळणीने त्यांना दोन देशांच्या विरुद्ध बाजूंवर उभं केलं; पण त्यांच्या मैत्रीच्या आठवणी सीमारेषाही पुसू शकल्या नाहीत. ही केवळ दोन क्रिकेटपटूंची गोष्ट नाही; ती फाळणीने जखमी झालेल्या उपखंडाची, तुटलेल्या नात्यांची आणि तरीही माणुसकी जिवंत राहू शकते, या आशेची कहाणी आहे. आता आशुतोष गोवारीकर आणि आमिर खान फाळणीच्या पार्श्वभूमीवर याच घटनेवर आधारित चित्रपटाची तयारी करत असल्याची चर्चा सुरू आहे.

10 min read
A
Akshay Ramesh
अजिंठ्याची पारू : प्रेम, उपेक्षा आणि इतिहासाचा अंधार…दीडशे वर्षांनंतरही रॉबर्ट स्मरणात राहिला, पण पारूची ओळख धूसरच!
कला / साहित्य / सिनेमा

अजिंठ्याची पारू : प्रेम, उपेक्षा आणि इतिहासाचा अंधार…दीडशे वर्षांनंतरही रॉबर्ट स्मरणात राहिला, पण पारूची ओळख धूसरच!

अजिंठ्याच्या संशोधकाला शिल्पकहाणीची गाथा उघडल्यावर, एक कहाणी विलक्षण लक्ष वेधून घेते, ती कहाणी म्हणजे रॉबर्ट गिल आणि पारूची प्रेमकथा. जी अजिंठ्याच्या शिल्परांगेत एक जिवंत शिल्प बनून उभी आहे. अमर पावली आहे... अजिंठ्याच्या पारू आणि रॉबर्ट गिलची प्रेमकथा गेली दीडशेहून अधिक वर्ष जगाने ऐकली आहे. भेदाच्या भारतीय समाज मानसाने अजिंठ्याच्या पारूच्या प्रेमकथेला नावे ठेवली, विपर्यस्त करून सांगितले. जिच्या प्रेमकथेने अजिंठ्याच्या कातळालाही भावनांनी ओलावून टाकले, त्या पारूची समाधी आज मात्र उपेक्षा, दुर्लक्ष आणि विस्मृतीच्या सावलीत उभी आहे. आज २३ मे हा पारूचा स्मृतीदिवस त्यानिमित्ताने एका ‘सैराट’ कथेची झालेली ही आठवण.

6 min read
V
Vira Rathod
प्रिय चहाच्या कपास, पत्र लिहिण्यास कारण की…!
कला / साहित्य / सिनेमा

प्रिय चहाच्या कपास, पत्र लिहिण्यास कारण की…!

चहा हे असं पेय आहे, जे झोपडीतल्या गरिबापासून ते पंचतारांकित हॉटेलातल्या श्रीमंतापर्यंत सर्वच पितात. म्हणून तर मी चहाला समाजवादी पेय म्हणतो. चहा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. ‘चहातरी घेऊन जा’ असं घरी आलेल्या माणसाला आपण किमान सांगतो तरी (ह्यात अस्सल सदाशिव पेठी घरं धरलेली नाहीत.) सध्या ‘रात्री सातनंतर चहा घेत नाही’ असं म्हणण्याचा जरी जमाना आलेला असला, तरी सकाळी उठल्यावर पहिली आठवण अजूनही चहाची येते. म्हणूनच आजच्या ‘आंतरराष्ट्रीय चहा दिना’निमित्त हे आपल्या जीवाभावाच्या मित्राला पत्र...

7 min read
D
Dwarkanath Sanjhgiri

Comments

Comments are currently disabled or loading...