टीम बाईमाणूस
- मुसळधार पाऊस, झाडे कोसळणे, पाणी साचणे आणि जीर्ण इमारतींमुळे नागरिकांच्या जीविताला सतत धोका.
- धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाकडे आणि सुरक्षिततेकडे दुर्लक्ष; प्रशासनाकडून केवळ तात्पुरत्या उपाययोजना.
- ५ जुलै २०२६ रोजी जनता नगर येथील जीर्ण चाळ कोसळून अनेकांचा मृत्यू; शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर.
दरवर्षी पावसाळा सुरू झाला की मुसळधार पावसासह वादळी वाऱ्यांचा तडाखा बसतो आणि त्याचा सर्वाधिक फटका नागरिकांना सहन करावा लागतो. रस्त्यांवरील जुनी, धोकादायक झाडे कोसळण्याच्या घटना वारंवार घडतात. या दुर्घटनांमध्ये अनेक नागरिक जखमी होतात, तर काहींना आपला जीवही गमवावा लागतो. प्रत्येक पावसाळ्यात अशा घटना झाल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येतो.
मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत होते,रस्ते जलमय होतात, वाहतूक ठप्प होते, शाळा बंद पडतात आणि धोकादायक इमारती जीवघेणा सापळा ठरतात. वर्षानुवर्षे तात्पुरते उपाय केले जात असले तरी जुन्या आणि जीर्ण चाळींच्या पुनर्विकासाकडे व सुरक्षिततेकडे सातत्याने दुर्लक्ष झाल्याची किंमत नागरिकांना जीव गमावून चुकवावी लागत आहे. याच निष्काळजीपणाचा फटका ५ जुलै २०२६ रोजी मानखुर्दच्या जनता नगर परिसराला बसला. मुसळधार पावसात ग्राउंड प्लस तीन मजली चाळीचा काही भाग अचानक कोसळून मोठी दुर्घटना घडली आणि अनेक निरपराधांचा जीव गेला.
ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना काढण्यासाठी रेस्क्यू
मानखुर्दमध्ये तीन मजली बांधकाम कोसळल्याची घटना घडली. या घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलीस, अग्निशामक दल आणि मुंबई महापालिकेचे कर्मचारी दाखल झाले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. जेसीबीच्या सहाय्याने मलबा दूर केला जात आहे. एनडीआरएफची टीम देखील घटनास्थळी दाखल झाली आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन केलं जात आहे. दुर्घटना मोठी असल्याने प्रशासनाचं मोठं पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढलं जात आहे. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेलं जात आहे.

मानखुर्दमध्ये जनता नगर परिसरात हनुमान मंदिराजवळ असणाऱ्या चाळ नंबर 5 मध्ये ही दुर्घटना घडली आहे. संबंधित घटना ही रविवारी (5 जुलै) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिक यावेळी बचावासाठी धावले. पण ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढणं हे सोपं नव्हतं. यामुळे तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.
युद्ध पातळीवर शोध मोहीम
घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशामक दलाचे जवान, एनडीआरएफचे पथक आणि मुंबई महापालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी रुग्णवाहिका देखील झाली. घटनेचं गांभीर्य ओळखून प्रशासनाचे कर्मचारी घटनास्थळी मोठ्या संख्येने दाखल झाले. युद्ध पातळीवर शोध मोहीम राबवण्यास सुरुवात झाली. या दुर्घटनेत एकामागेएक अशा आतापर्यंत सहा जखमींना बाहेर काढण्यात आलं आहे. सर्व सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
पावसामुळे बचावकार्यास अडचणी
घटनेतील जखमींना मुंबईतील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण डॉक्टरांनी तपासल्यानंतर सहा जणांचा मृत्यू झाल्याची घोषणा केली. शताब्दी रुग्णालयाचे AMO डॉक्टर पटेल यांनी अधिकृतपणे याबाबत माहिती दिली आहे. अजूनही बचावकार्य सुरु आहे. पण सध्या मुसळधार पाऊस सुरु असल्याने बचावकार्यास अडचणी आल्या.
गेल्या चार दिवसांत अनेक दुर्घटना

मुंबईत पाऊस सुरु झाल्यापासून सातत्याने दुर्घटना घडताना दिसत आहे. सर्वात आधी चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर काही विद्यार्थी जखमी झाले. यानंतर अंधेरीत मॅनहोलमध्ये पडून एका वृद्धाचा मृत्यू झाला. तर रविवारी कुर्ल्यात झाड कोसळल्याने एका वृद्धाचा मृत्यू झाला. तसेच गोरेगावमध्ये झाड कोसळल्याने दोन महिला जखमी झाल्या. या घटना ताज्या असतानाच मानखुर्दमध्ये तीन मजली बांधकाम कोसळल्याची घटना घडली आहे.





