अविनाश उषा वसंत
- नाओमी ओसाका म्हटलं की डोळ्यासमोर येते ती चार ग्रँड स्लॅम जिंकलेली टेनिस स्टार. पण तिची खरी ओळख केवळ विजेती खेळाडू म्हणून नाही. वर्णद्वेष, मानवी हक्क आणि सामाजिक न्यायाच्या प्रश्नांवर ती सातत्याने स्पष्ट भूमिका घेते.
- अमेरिकन ओपनमध्ये सात सामन्यांत सात कृष्णवर्णीय बळींची नावं असलेले मास्क घालण्यापासून ते यंदाच्या विम्बल्डनमध्ये जपानी सांस्कृतिक वारशाला आधुनिक रूप देणाऱ्या किमोनो-शैलीतील पोशाखापर्यंत, ओसाकाने खेळ हे केवळ मनोरंजन नसून समाजाशी संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असल्याचं दाखवून दिलं आहे.
- तिच्या प्रवासातून खेळाडूंच्या सामाजिक जबाबदारीचा आणि भारतातील खेळविश्वाच्या मौनाचाही वेध घेणारा हा लेख.
जगातील सर्वाधिक लोकप्रिय आणि यशस्वी टेनिसपटूंमध्ये गणली जाणारी नाओमी ओसाका पुन्हा एकदा बातम्यांचा विषय झाली, मात्र त्याअगोदर नाओमीचा एक किस्सा…
ब्रेओना टेलर, एलिजा मॅक्लेन, अहमद अरबेरी, ट्रायव्होन मार्टिन, जॉर्ज फ्लॉईड, फिलांडो कास्टाईल,तामिर राइस... कोण आहेत ही लोकं...? यापैकी बहुतेकांना जॉर्ज फ्लॉईड हे नाव कदाचित अनेकांना ठाऊक असेलच, कारण काही वर्षांपूर्वी "आय कान्ट ब्रीथ' हे जॉर्ज फ्लॉईडचे शेवटचे शब्द. आफ्रो-अमेरिकन वंशाच्या जॉर्ज यांचा वर्णद्वेषी अमेरिकन स्टेटच्या पोलिसांनी संस्थात्मक हत्या केली होती. त्यानंतर "ब्लॅकलाईव्हमॅटर'चे आंदोलन संपूर्ण जगात उभे राहिले. फ्लॉईडसह वर उल्लेख केलेल्या या सातही जणांच्या अशाच संस्थात्मक हत्या झाल्या आहेत आणि जगाला याची पुन्हा एकदा दखल घ्यायला लावली होती ती टेनिस स्टार "नाओमी ओसाका' हिने.

सात मास्क आणि सात जखमा…
टेनिस विश्वात ज्या चार ग्रॅन्ड स्लॅम स्पर्धा असतात त्यापैकी महत्वाची मानली जाणारी एक म्हणजे अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा. अंतिम फेरीपर्यंत पोहचण्यासाठी स्पर्धकाला एकूण सात फेऱ्या पार कराव्या लागतात. या सातही फेऱ्यांमध्ये दरवेळी नाओमी ओसाकाने ब्रेओना टेलर, एलिजा मॅक्लेन, अहमद अरबेरी, ट्रायव्होन मार्टिन, जॉर्ज फ्लॉईड, फिलांडो कास्टाईल आणि तामिर राइस अशी अनुक्रमे सात जणांची नावे काळ्या रंगाच्या "मास्क' वर पांढऱ्या अक्षरात लिहिलेली होती. तिने अमेरिकन ओपनमध्ये सामना सुरू होण्यापूर्वी आणि सामना संपल्यानंतरच्या मुलाखतींवेळी हे मास्क घातले होते. तिच्या राजकीय कृतीची नोंद इतिहासात ठळक लिहिली गेली.
सामाजिक विषयांवर कायम ठाम भूमिका घेणाऱ्या जपानच्या नाओमीने यंदाच्या विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेचा पहिला दिवस गाजवला तो आपल्या फॅशनने. विम्बल्डनच्या प्रसिद्ध 'ऑल-व्हाईट' म्हणजेच संपूर्ण पांढऱ्या पोशाखाच्या परंपरेला अनुसरून तिने खास किमोनो-शैलीतील पांढरा पोशाख परिधान केला होता. हा पोशाख पारंपरिक जपानी संस्कृती आणि आधुनिक फॅशन यांचा सुंदर मिलाफ आहे.
या किमोनो-शैलीतील पोशाखावर जपानी संस्कृतीतील शांतता, सौंदर्य आणि शुभत्वाचे प्रतीक मानले जाणारे क्रेन (सारस पक्षी) आणि चेरी ब्लॉसम (सकुरा फुले) यांचं आकर्षक भरतकाम करण्यात आलं. विशेष म्हणजे हा पोशाख तयार करताना जुन्या पारंपरिक किमोनो आणि जपानी विवाहसोहळ्यात वापरल्या जाणाऱ्या वस्त्रांमधील कापडाचा पुनर्वापर करण्यात आला. त्यामुळे या पोशाखाला पर्यावरणपूरक आणि सांस्कृतिक असा दुहेरी अर्थ प्राप्त झाला.
विम्बल्डनच्या पांढऱ्या परंपरेत जपानी संस्कृतीची झलक
नाओमीने हा पोशाख परिधान करण्यामागे आणखी एक खास कारणही सांगितले. तिने प्रसिद्ध 'किल बिल' या चित्रपटातील अभिनेत्री ल्युसी लिऊ यांनी साकारलेल्या ओ-रेन इशी या पात्राच्या पांढऱ्या किमोनोमधील लूकमधून प्रेरणा घेतल्याचे सांगितले. तिने फॅशन ही केवळ कपडे घालण्याची गोष्ट नसून स्वतःची ओळख, संस्कृती आणि कथा मांडण्याचे प्रभावी माध्यम असल्याचेही स्पष्ट केले. नाओमीच्या मते, विम्बल्डनमधील 'ऑल-व्हाईट' ड्रेस कोड हा सर्जनशीलतेवर बंधन आणणारा नसून त्यामध्येही वेगळेपण दाखवण्याची संधी असते. त्यामुळेच तिने पारंपरिक जपानी संस्कृतीला आधुनिक शैलीत सादर करण्याचा प्रयत्न केला. कोर्टवर प्रवेश करण्यापूर्वी तिने हा किमोनो-शैलीतील पोशाख परिधान केला होता. त्यानंतर सामना सुरू होण्यापूर्वी तो काढून तिने विम्बल्डनच्या नियमांनुसार नायकीचा अधिकृत पांढरा टेनिस पोशाख परिधान केला आणि सामना खेळला. तिच्या या हटके लूकचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक झाले. अनेकांनी हा पोशाख जपानी परंपरेला दिलेली सुंदर मानवंदना असल्याचे म्हटले, तर काहींनी विम्बल्डनच्या परंपरा आणि आधुनिक फॅशन यांचा अप्रतिम संगम असल्याची प्रतिक्रिया दिली.

यापूर्वी २०१८ मध्ये वयाच्या विसाव्या वर्षी याच अमेरिकन ओपन स्पर्धेत नाओमी जिला रोल मॉडेल समजायची त्या सेरेना विल्यम्सलाच सरळ सरळ दोन सेटमध्ये पराभूत करून पहिलेवहिले ग्रॅन्डस्लॅम पटकावले होते. नाओमी ओसाका जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानी पोहचलेली पहिली आशियाई वंशाची खेळाडू ठरली होती. तशी ती बहुवांशिक आहे, तिची आई जापनीज तर वडील हैतीयन आहेत. ती तिच्या आजीशी हैतीयन क्रियोल भाषेत बोलते, अमेरिकेतच कायम वास्तव्य असल्याने जपानी भाषा तिला फक्त कळू शकते.
'खेळाडूंनी फक्त मनोरंजन करावं?' ओसाकाचा थेट सवाल
"ब्लॅकलाईव्हमॅटर' या आंदोलनाची आणि आफ्रो-अमेरिकन समुहांवर होणाऱ्या वर्णद्वेषी अन्यायाची संपूर्ण जगाला माहिती करून देणे ही गोष्ट नाओमीने फक्त काही वर्षांपूर्वीच्या अमेरिकन स्पर्धेच्या वेळीच केलेली नाही तर या चळवळीमध्ये ती सुरुवातीपासून सक्रिय राहिली आहे. सोशल मीडियावर ती याबाबतीत कायम आघाडीवर असते. आपल्या एका ट्विटमध्ये नाओमी म्हणते की,
‘’ज्यांचा काहीएक संबंध नाही ती व्यक्ती जेव्हा खेळाडूंनी राजकीय कृतीत सहभागी होऊ नये, खेळाडूंनी फक्त मनोरंजन करावे असे म्हणते तेव्हा मला राग अनावर होतो.’’
त्यापुढच्या ट्विटमध्ये ती त्यांनाच प्रश्न विचारते की, "तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त बोलण्याचा अधिकार दिलेला आहे का?' एवढेच करून नाओमी थांबत नाही तर "ब्लॅकलाईव्हमॅटर' च्या आंदोलनात स्वत: रस्त्यावर उतरून भाग घेते. लॉस एंजलीस व मिसेनेओटा मधील "ब्लॅकलाईव्हमॅटर'च्या आंदोलनात सहभागी झाल्यानंतर अनेकांनी तिला प्रश्न विचारले होते. मात्र नाओमी आपल्या भूमिकेवर नेहमीच ठाम राहिली. "वर्णद्वेषातून अमेरिकेत आफ्रो-अमेरिकन समुदायावर जे अन्याय व शोषण होत आहे त्यावर मी नेहमीच आवाज उठवणार आणि ते जगासमोर आणण्यात कमी पडणार नाही' असे नाओमी म्हणते.
नाओमीची ही बंडखोर वृत्ती साधारणपणे खेळ, कला अशा ठिकाणी कारकिर्दीच्याबाबतीत घातक ठरू शकते. "भांडवल संपृक्त' बहुराष्ट्रीय कंपन्यांनी घेरलेल्या बाजार केंद्री टेनिससारख्या खेळात तिचे प्रायोजकत्व कधीही हिरावून घेतले जाऊ शकते. प्रायोजकांना घाबरूनच अनेक मातब्बर खेळाडू तोंडावर कायमची पट्टी बांधून असतात. मात्र नाओमी तिच्या तोंडावरची पट्टी ही निषेधाचे शस्त्र म्हणून वापरते.
नाओमीची ही कृती अनेक खेळाडूंसाठी आदर्श ठरली आहे. नाओमीने अमेरिकन ओपन स्पर्धेच्या सात फेऱ्यांमध्ये सात मास्क घालण्याची कृती ज्या स्टेडियमवर केली होती, ते स्टेडियम "आर्थर एश' यांच्या नावाने आहे. अमेरिकन डेव्हीस चषक संघात समाविष्ट होणारे आर्थर एश हे पहिले आफ्रो-अमेरिकन खेळाडू होते. तसेच टेनिसमध्ये ग्रँड स्लॅममधील विजेतेपद पटकवणारेही ते पाहिले आफ्रो अमेरिकन ठरले होते. त्यामुळे आर्थर एश स्टेडियम मधील नाओमीचे कृत्य संपूर्ण आफ्रो-अमेरिकन समुदायाला प्रेरणादायी ठरणारे आहे. तिची ही कृती केवळ आफ्रो-अमेरिकन समुदाय नाहीतर जगातील सर्वच शोषित समुदायांसाठी प्रेरक ठरणारी आहे.

ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर आणि खेळविश्वाची भूमिका
आफ्रो-अमेरिकन समुदायावर होणाऱ्या अत्याचारांबद्दल बोलणारी नाओमी ही पहिलीच खेळाडू नाही. याचा इतिहास १९६८ च्या मेक्सिको ऑलिम्पिकपर्यंत जातो. म्हणजे गेल्या बावन्न वर्षापासून अमेरिकेतील चित्र बदललेले नाही हेच दिसून येते. १९६८ च्या मेक्सिको ऑलिम्पिक मध्ये २०० मी. धावण्याच्या शर्यतीत अमेरिकेच्या टॉमी स्मिथने सुवर्ण, ऑस्ट्रेलियाच्या पीटर नॉर्मनने रौप्य, तर अमेरिकेच्या जॉन कोर्लोसने कांस्य पदक मिळवले. पदक प्रदान समारंभावेळी आफ्रो-अमेरिकन टॉमी स्मिथ व जॉन कोर्लोस हे दोघेही काळे मोजे घालून आले. दोघांनी एका हातात काळे ग्लोव्हज घातले होते आणि एका हातात बूट धरले होते. पदक समारंभानंतर अमेरिकचे राष्ट्रगीत सूरू असताना दोघांनी काळा ग्लोव्ह्ज घातलेला एक हात उंचावला आणि मान खाली घालून उभे राहिले.
जागतिक स्तरावरचा हा खेळाडूंचा पहिलाच सांकेतिक निषेध होता. अमेरिकेत मानवी हक्कांची पायमल्ली होतेय यावरही बोट ठेवले गेले. सबंध जगाला स्वातंत्र्याची प्रेरणा देणाऱ्या अमेरिकेसाठी ही घटना नाचक्की करणारी ठरली. याच समारंभात ऑस्ट्रेलियाचा श्वेतवर्णीय पीटर नॉर्मनने देखील मानवी हक्काचा बिल्ला जॅकेटला लावून, जॅकेटची चेन उघडी ठेवून टॉमी स्मिथ आणि जॉन कोर्लोसच्या कृती बद्दल केवळ सहानभूती दाखवली नाही तर त्यांना सोबतही केली. या कृत्याबद्दल तिघांचेही पदक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने काढून घेतले. यात पीटर नॉर्मनची सोबत ही महत्वाची होती, नाहीतर शोषित समाजालाच उलटे प्रश्न विचारून त्यांच्या अन्यायाला बगल देणारेही भरपूर असतात. त्यानंतर महम्मद अलीने व्हिएतनाम युद्धाबद्दल अमेरिका सरकारवर ताशेरे ओढले होते.
क्रिकेट जगतातही यासंदर्भात निषेधाचे सुरू उमटले होते. जॉर्ज फ्लॉईड प्रकरण जेव्हा घडलं तेव्हा इंग्लंड व वेस्ट इंडिज दरम्यानचा पहिला कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी इंग्लंड आणि वेस्ट इंडिज संघातील सर्व खेळाडूंनी "ब्लॅकलाईव्हमॅटर' आंदोलनाच्या समर्थनार्थ दोन मिनिटे मैदानावर गुुडघे टेकले होते. वेस्ट इंडिज संघातील खेळाडूंनी टॉमी स्मिथ आणि जॉन कोर्लोस यांच्यासारखेच हातात काळ्या रंगाचे ग्लोव्हज घालून हात उंचावून गुुडघे टेकले होते. क्रिकेटच्या जन्मदात्या देशात "ज्यांनी वसाहतवादी राजवटीचा' पाया घातला, त्याच वसाहतवादी मानसिकतेतून त्यांनी गुलामी व इतर अत्याचारांची मालिका जगभर पसरवली. त्या देशात आफ्रो- अमेरिकन अत्याचारांबाबत सुरू असणाऱ्या "ब्लॅकलाईव्हमॅटर' आंदोलनाचे समर्थन आणि मानवी एकतेचा संदेश दोन्ही संघांनी दिला.
खेळांचा इतिहास बघता आदिम काळात खेळ मनोरंजनाचे साधन म्हणून सुरू झाले. प्राचीन काळात स्पेनच्या कलोजीयममध्ये गुलामांच्या कुस्त्या लावून मनोरंजन केले जाई. आजही खेळ हे मनोरंजनाचे सर्वात मोठे माध्यम आहे. आज अनेक खेळांत 'आफ्रो-अमेरिकन वांशिक समुदायातील खेळाडू सर्वोच्च स्थानी आहेत. तरी देखील "आम्हाला केवळ पळण्यासाठी आणि बॉल ड्रिबल करण्यासाठी तुम्ही पैसे देत नाहीत, आमचे हक्क ही तितकेच महत्वाचे आहेत' अशी त्यांची भावना आहे. खेळ हा मनोरंजनाचा भाग आहे आणि मनोरंजनापासून राजकीय कृती लांब असल्या पाहीजेत ही नेहमीच "राजकीय व्यवस्थांची' भूमिका राहिलेली आहे. मनोरंजन क्षेत्र हे सार्वत्रिक मानवी जीवनावर छाप पाडत असते, त्यातून राजकीय व्यवस्थांना मनोरंजन क्षेत्र हादरवू शकते ही भीती कायम वाटत आलेली आहे. पूर्वी राजे राजवाडे यांचे मनोरंजन करणारे खेळाडू आता बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या तालावर जनतेचे मनोरंजन करतात. त्यामुळे राजकीय व्यवस्था अस्थिर करणाऱ्या कृतींना त्यांचा विरोध असतोच.

भारतीय खेळाडू सामाजिक प्रश्नांवर इतके शांत का?
हे सर्व घडत असताना भारतातही जातवास्तवातून शोषण व अत्याचार होत असतात. अल्पसंख्याक समुदायावर मॉब लिंचिंगद्वारे हत्या केल्या जातात. स्त्री भ्रूण हत्या व स्त्रियांवर सामूहिक अत्याचार अशा घटना घडत असतात. पण यावर मोजकेच खेळाडू तेही मगरीचे अश्रू समाजमाध्यमांवर गाळत राहतात. क्रिकेटवेड्या देशात क्रिकेटचा मोठा आर्थिक बाजार आहे. कमीत कमी पन्नास कोटी क्रिकेटचे चाहते या देशात असतील. त्यामुळे खूप मोठ्या समाजावर क्रिकेटचे खेळाडू प्रभाव टाकू शकतात. पण क्रिकेटपटू अन्याय, शोषण, अत्याचारांच्या प्रश्नांबाबत आग्रही दिसून येत नाहीत. उलट राष्ट्रवादाचे प्रतीक असणारी "मिलिटरी टोपी' घालून मात्र खेळतात, राजकारण्यांच्या जेवणावळींना उपस्थित राहतात. कित्येक खेळाडू निवृत्तीनंतर जनतेचे प्रतिनिधीही होतात. पण सामाजिक प्रश्नांकडे काकुळतीने बघत नाहीत, त्याबद्दल त्यांची अनास्थाच असते.
या सगळ्याचा विचार करता "तुम्ही शांत राहिलात तर तुम्हाला उत्तरे मिळत नाही' अशी खंबीर भूमिका घेणाऱ्या नाओमी ओसाकाची प्रगल्भता दिसून येते. सामाजिक प्रश्न आणि मानवी मूल्ये हीच मानवी जीवनाच्या केंद्रस्थानी आहेत, हेच तिला दर्शवायचे आहे. महिला टेनिस मध्ये अनेक खेळाडू तिथल्या झगमगाटात अडकून जातात, त्या झगमगाटालाच आपले क्षेत्र समजतात... असे असताना टेनिसमध्ये उत्तुंग यश मिळवूनही त्या झगमगाटात न अडकता सामाजिक व राजकीय प्रश्नांची जाण असणाऱ्या नाओमीसारख्या अनेक खेळाडूची गरज आहे. त्यातूनच जगातील सर्वच अन्याय, शोषण, अत्याचारांविषयी वेळेत जागरूकता निर्माण होऊन मानवी हक्कांना बळ मिळेल.






