टीम बाईमाणूस
- मुंबईतील चेंबूर परिसरात विद्यार्थ्यांना शाळेतून घरी घेऊन जाणाऱ्या एका स्कूल व्हॅनवर रस्त्याकडचे जुने पिंपळाचे झाड अचानक उन्मळून पडले.
- या दुर्घटनेत बसच्या मागील बाजूस बसलेला ११ वर्षीय विद्यार्थी विहान श्रीवास्तव याचा दुर्दैवी मृत्यू झाला तर इतर ४ ते ५ विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर चेंबूरमधील झेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
- पण ह्या नैसर्गिक म्हटल्या जाणाऱ्या घटनांमागची मानवनिर्मित कारणं शोधणं आणि त्यावर नेमक्या काय उपाययोजना असू शकतात याचा विचार करणं महत्वाचा आहे. त्याचाच घेतलेला हा आढावा.
मुंबईतील चेंबूर परिसरात विद्यार्थ्यांना शाळेतून घरी घेऊन जाणाऱ्या एका स्कूल व्हॅनवर रस्त्याकडचे जुने पिंपळाचे झाड अचानक उन्मळून पडले. ज्यात एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर इतर ४ ते ५ विद्यार्थी जखमी झाले.
दरवेळी अश्या घटना नैसर्गिक म्हणून गणल्या जातात. पण ही घटना फक्त नैसर्गिक आहे असं म्हणून मुळीच चालणार नाही. ह्या नैसर्गिक म्हटल्या जाणाऱ्या घटनांमागची मानवनिर्मित कारणं शोधणं आणि त्यावर नेमक्या काय उपाययोजना असू शकतात याचा विचार करणं महत्वाचा आहे. त्याचाच घेतलेला हा आढावा.
नेमकी घटना काय..?
३० जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास मुंबईतील चेंबूर परिसरात दुर्दैवी घटना घडली. मुसळधार पावसात, युनिव्हर्सल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना शाळेतून घरी घेऊन जाणाऱ्या एका स्कूल व्हॅनवर रस्त्याकडचे एक मोठे आणि जुने पिंपळाचे झाड अचानक उन्मळून पडले. या व्हॅनमध्ये सुमारे १२ ते १५ शाळकरी मुले होती.

या दुर्घटनेत बसच्या मागील बाजूस बसलेला ११ वर्षीय विद्यार्थी विहान श्रीवास्तव याचा दुर्दैवी मृत्यू झाला. अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने बचावकार्य करत इतर अडकलेल्या मुलांना बाहेर काढले. या घटनेत इतर ४ ते ५ विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर चेंबूरमधील झेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
झाडं अचानक का कोसळतात?
शहरांमध्ये वरवर हिरवीगार दिसणारी मोठी झाडे अचानक उन्मळून पडण्यामागे मानवी चुका आणि चुकीचे शहरीकरण कारणीभूत असल्याचं 'सायन्स डायरेक्ट' मधील संशोधनात समोर आलंय.
- झाडांच्या बुंध्याभोवती सिमेंट, काँक्रीट, डांबर किंवा पेव्हर ब्लॉक टाकल्यामुळे झाडांची नैसर्गिक वाढ पूर्णपणे बाधित होते.
- एकंदर काँक्रीटीकरणामुळे मातीची रंध्रता म्हणजेच पोरॉसिटी कमी होते. यामुळे पावसाचे पाणी जमिनीत झिरपत नाही आणि मुळांना हवेतून मिळणारा ऑक्सिजनही बंद होतो.
- पाणी आणि हवेअभावी मुळांची खोलवर जाण्याची व विस्तारण्याची प्रक्रिया थांबते. मातीतील सूक्ष्मजीवांची वाढ खुंटते. परिणामी, मुळांची जमिनीवरची पकड सैल होते. झाड वरून जिवंत दिसत असले तरी आतून पोखरलेले आणि कमकुवत असते, ज्यामुळे वादळी वाऱ्यात किंवा मुसळधार पावसात ते आपला तोल गमावून कोसळते.
- जसे मानवी शरीरावर सर्व बाजूंनी सिमेंटचे प्लास्टर केल्यास गुदमरून मृत्यू ओढवेल, तशीच जीवघेणी अवस्था या काँक्रीटीकरणामुळे झाडांची होते.
कायदेशीर तरदुदी पण अंबलबजावणी मात्र शून्य
झाडांच्या खोडांभोवती किमान एक मीटर जागा सोडण्याच्या आदेशाचे कंत्राटदार उल्लंघन करत असल्याचा आरोप काही वर्षांपूर्वी मुंबईतील रहिवाशांकडून करण्यात आला होता.
ज्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने आपला डिसेंबर २०१८ चा आदेश दक्षता विभागासह सर्व विभागांना पुन्हा जारी केला होता. “असे निदर्शनास आले आहे की, रस्त्यांचे रुंदीकरण किंवा सुधारणा करताना झाडांभोवती कोणतीही जागा सोडली जात नाही.

परिणामी झाडांना मोकळा श्वास घेण्यासाठी जागा उरत नाही, जी श्वसनासाठी आणि झाडांच्या मुळांना हवा मिळण्यासाठी तसेच त्यांच्या सखोल वाढीसाठी आवश्यक आहे. आणि यामुळे झाडांच्या वाढीस व देखभालीस अडथळा निर्माण होतो." असं या आदेशात म्हंटल होतं.
"नियमांकडे सर्रास दुर्लक्ष केले जात आहे. झाडांभोवतीच्या जागेचे काँक्रिटीकरण केल्यामुळे झाडे मरत आहेत आणि झाडे कोसळण्याचा धोका वाढतो आहे. झाडांसाठी जागा दाखवण्यासाठी रस्त्याचा केवळ वरचा थर सजवला जातो, परंतु खाली तो पूर्णपणे काँक्रिटने भरलेला असतो आणि तिथे मातीच नसते," असे निरीक्षण तेव्हा 'ग्रीन मुंबई मिशन'चे सुभजित मुखर्जी यांनी नोंदवले होते.
या घटना घडू नयेत यासाठी काय करावे…?
पुन्हा अशा निष्पाप जिवांचे बळी जाऊ नयेत यासाठी काही उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.
- महाराष्ट्र वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियम, १९७५ नुसार प्रत्येक झाडाच्या बुंध्याभोवती किमान १ मीटर अंतराचा व्यास मोकळा सोडणे कायदेशीररित्या बंधनकारक आहे.
- राष्ट्रीय हरित लवादच्या निर्देशानुसार आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या निरीक्षणांनुसार, झाडांच्या बुंध्याभोवतीचे आधीच झालेले काँक्रीटीकरण प्रशासनाने काळजीपूर्वक काढून तिथे पुन्हा सुपीक माती भरणे गरजेचे आहे.
- मुंबई महानगरपालिकेने रस्ते व पदपथांची कामे करताना झाडांजवळ पेव्हर ब्लॉक किंवा सिमेंट टाकू नये, याबाबत काढलेल्या परिपत्रकाची ग्राउंड लेव्हलवर कडक अंमलबजावणी करावी.
महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियम, १९७५ काय सांगतो..?
महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियम, १९७५ कायद्यानुसार, रस्त्यावरील झाड कोसळून झालेली जीवितहानी ही केवळ 'नैसर्गिक घटना' ठरत नाही, तर त्यामागे प्रशासकीय उत्तरदायित्वाचा मुद्दा येतो.
या कायद्याच्या कलम ३ नुसार, प्रत्येक नागरी स्थानिक स्वराज संस्थेमध्ये एक 'वृक्ष प्राधिकरण' स्थापन करणे बंधनकारक आहे. या प्राधिकरणाचे मुख्य काम शहरातील झाडांचे जतन, संरक्षण आणि संवर्धन करणे हे आहे.
वृक्ष प्राधिकरणावर दर ५ वर्षांनी शहरातील सर्व झाडांची गणना करण्याची कायदेशीर जबाबदारी आहे. यासोबतच रस्त्यांच्या कडेला असलेल्या झाडांच्या आरोग्यावर लक्ष ठेवणे तसेच धोकादायक, आजारी किंवा आतून पोकळ झालेली झाडे शोधून काढणे आणि जीवितहानी टाळण्यासाठी त्यांची योग्य छाटणी करणे किंवा ती काढून टाकणे हे या प्राधिकरणाचे कर्तव्य आहे.
जर एखादे झाड अतिशय जुने झाले असेल, कोसळण्याच्या स्थितीत असेल आणि ज्यामुळे सार्वजनिक सुरक्षिततेला धोका निर्माण झाला असेल, तर वृक्ष अधिकाऱ्याला ते झाड तात्काळ छाटण्याचे किंवा काढून टाकण्याचे अधिकार आहेत.
जर अशा धोकादायक झाडाबाबत तक्रार करूनही किंवा ते उघडपणे दिसत असतानाही पालिकेने कारवाई केली नसेल, तर तो कायदेशीर कर्तव्यात केलेली चूक मानली जाते
जरी या मूळ कायद्यात थेट 'काँक्रिट' हा शब्द नसला, तरी झाडांचे 'संवर्धन व जतन' करण्याच्या मुख्य उद्देशाचा आधार घेऊन राष्ट्रीय हरित न्यायाधीकरण आणि उच्च न्यायालयाने या कायद्यांतर्गत स्पष्ट नियम केले आहेत.
त्यानुसार रस्त्यांचे काँक्रिटीकरण करताना झाडाच्या खोडाभोवती किमान १ मीटर बाय १ मीटरची जागा (मातीचा भाग) सोडणे बंधनकारक आहे.मुळांना सिमेंटने ब्लॉक करणे हे या कायद्याच्या मूळ उद्देशाच्या विरोधात आहे, कारण त्यामुळे झाड कमकुवत होऊन पडण्याचा धोका वाढतो.






