टीम बाईमाणूस
- मराठ्यांच्या इतिहासात जर सर्वात उपेक्षित व्यक्तिमत्व कोण असेल तर ती म्हणजे मस्तानी. आज तिचा स्मृतिदिन… आज एकविसाव्या शतकातही मस्तानीबद्दलची उत्सुकता कमी होत नाही. तिचा महाल, तिची समाधी, तिचा अंघोळीचा तलाव या सर्व ठिकाणी पर्यटक गर्दी करत असतात.
- पुण्याजवळच्या ‘पाबळ’मधील हिंदू समाज मस्तानीच्या या स्थळाला तिची ‘समाधी’ मानतो, तर मुस्लिम समाज त्याला ‘मजार’ म्हणतो. श्रद्धा वेगवेगळ्या असल्या, तरी दोन्ही समाजातील लोक समान भक्तिभावाने मस्तानीच्या कबरीला भेट देतात.
मराठ्यांच्या इतिहासात जर सर्वात उपेक्षित व्यक्तिमत्व कोण असेल तर ती म्हणजे मस्तानी. ती होती तेव्हा पहिल्या बाजीराव पेशव्याची अंगवस्त्र म्हणून तिची हेटाळणी केली गेली. पुण्याच्या कट्टर सनातन्यांनी तिच्यामुळे पेशवा बाजीरावांना देखील प्रचंड त्रास दिला. बाजीरावांच्या मृत्यूनंतर लवकरच मस्तानीचे निधन झालं. मात्र तिच्या मृत्यूनंतर आजही तिच्याबद्दलच्या कथा दंतकथा प्रचलित आहेत. आज एकविसाव्या शतकातही मस्तानीबद्दलची उत्सुकता कमी होत नाही. तिचा महाल, तिची समाधी, तिचा अंघोळीचा तलाव या सर्व ठिकाणी पर्यटक गर्दी करत असतात.
२००९ साली एक विचित्र घटना घडली… पाबळ येथील मस्तानीची कबर चोरट्यांनी उकरून टाकली होती. लोककथेनुसार, आत्महत्या करताना मस्तानीने एक हिरा गिळला होता आणि तो मिळवण्यासाठीच चोरांनी ही तोडफोड केली, अशी समजूत होती. या घटनेनंतर गावातील हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाज एकत्र आले आणि कबरीचे पुनर्बांधकाम व्हावे यासाठी स्थानिक प्रशासनावर दबाव आणला. अवघ्या एका महिन्यात पुरातत्त्व विभागाने कबरीची दुरुस्ती करून ती पूर्ववत उभी केली.

‘’मस्तानी हिंदू होती की मुस्लिम, हे ठरवणारे आपण कोण?”
पाबळमधील हिंदू समाज मस्तानीच्या या स्थळाला तिची ‘समाधी’ मानतो, तर मुस्लिम समाज त्याला ‘मजार’ म्हणतो. श्रद्धा वेगवेगळ्या असल्या, तरी दोन्ही समाजातील लोक समान भक्तिभावाने मस्तानीच्या कबरीला भेट देतात. “मस्तानी महाराजा छत्रसाल यांची कन्या असल्याने पाबळमधील हिंदू तिला हिंदू मानतात. तर तिची आई रुहानी बाई या पर्शियन मुस्लिम असल्याने मुस्लिम समाज तिला मुस्लिम समजतो. मात्र या श्रद्धांतरांच्या भिन्नतेमुळे गावात कधीही वाद निर्माण झाला नाही,” असे पाबळ येथील पद्माणी जैन महाविद्यालयाचे प्राचार्य संजय घोडेकर सांगतात. त्यांनी १९९७ साली सहा वर्षांच्या सखोल संशोधनावर आधारित मस्तानी या विषयावर एम.फिल. पूर्ण केले आहे.
मस्तानी ही मराठा साम्राज्याचे पेशवे बाजीराव पहिले यांची दुसरी पत्नी होती. दंतकथेनुसार, बुंदेलखंडचे राजा महाराजा छत्रसाल यांच्यावर मोहम्मद खान बंगशने आक्रमण केले तेव्हा छत्रसाल यांनी बाजीरावांकडे मदतीची याचना केली. बाजीरावांनी युद्धात विजय मिळवत छत्रसाल यांची सुटका केली. कृतज्ञतेपोटी छत्रसाल यांनी आपल्या राज्याचा एकतृतीयांश भाग तसेच कन्या मस्तानी बाजीरावांना अर्पण केली.
छत्रसाल यांना एकूण १३ पत्नी होत्या. त्यांपैकी रुहानी बाई या पर्शियन मुस्लिम होत्या. बाजीरावांचे काशीबाईंसोबत आधीच लग्न झालेले असले, तरी त्यांनी आवश्यक विधीपूर्वक मस्तानीशीही विवाह केला. मात्र मस्तानी मुस्लिम असल्याची बाब बाजीरावांच्या कुटुंबीयांना रुचली नाही. सुरुवातीला मस्तानी शनिवाऱवाड्यातील ‘मस्तानी महाल’मध्ये राहत होती. पण घरातील असहिष्णुतेमुळे बाजीरावांनी तिला कोथरूड येथील एका महालात हलवले. नंतरही वाद संपले नाहीत, तेव्हा तिच्यासाठी खास बांधण्यात आलेल्या पाबळ येथील महालात तिला नेण्यात आले.

उचल्यांनी मस्तानीचे संरक्षण केले म्हणून ‘उचल्यांचे पाबळ’...
मस्तानीला आत्मसन्मानाने स्वतः जगता यावे म्हणून पाबळ-केंदूर व आसपासच्या काही गावांची जहागीर बाजीराव पेशवे यांच्याकडून देण्यात आली. हे गाव म्हणजे पुण्यापासून 60 किलोमीटर अंतरावर असणारे शिरूर- राजगुरूनगर- आंबेगाव तालुक्याच्या सीमेवर असणारे पाबळ गाव होय. ह्या गावाला इतिहासाचा प्रचंड मोठा वारसा आहे. गावात भैरवनाथ व नागेश्वराचे जुने मंदीर आणि त्यासोबतच पीर आणि नाथांची गोलाकार मंदिरे असा सांस्कृतिक वारसा आहे. आज जरी मस्तानीच्या गढीच्या जागी फक्त भग्नावशेष उरले असले तरी कधी काळी या ठिकाणाने सोन्याचे दिवस पाहिले असल्याची कथा गावात पूर्वपार चालत आली आहे.
येथील बऱ्याचशा गावांना कुठल्यातरी प्रसंगावरून किंवा विशेषणांनी ओळखले जाते. पाबळ गावात मस्तानी साहेबांच्या संरक्षणाची जबाबदारी गावातील उपेक्षित 'उचल्या' समाजावर सोपविण्यात आली होती. या बहादूर लोकांनी आपल्या राणीचा शूरपणे सांभाळ केला व पुण्याने नाकारलेल्या या राणीला आपल्या गावात सामावून घेतले. या घटनेवरूनच आजही या गावाला जुनी माणसे 'उचल्यांचे पाबळ' म्हणून ओळखतात.

गावातील हिंदू- मुस्लिम एकत्र आले आणि मस्तानीच्या कबरीचे जतन केले
पुण्यापासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या पाबळ गावात मस्तानीची कबर आहे. सुमारे २,००० चौरस फूट जागेच्या मध्यभागी हे स्मारक उभे असून त्याभोवती संरक्षणभिंत बांधलेली आहे. या जागेला तीन प्रवेशद्वारे आहेत, तर चौथ्या बाजूस नमाज पठणासाठी उंचवटा स्वरूपाचे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. कबरीच्या एका बाजूस ‘ताबूत’ (दिया कुंड) आहे, जिथे कबरीचे देखरेखदार मोहम्मद इनामदार दररोज दिवा लावतात.
मरणानंतरसुद्धा मस्तानीला उपेक्षेला सामोरे जावे लागले. इथे विकासाची व इतिहास जपून ठेवण्याची किरकोळ कामेही केली गेली नाहीत. शेवटी गावकऱ्यांनी स्वतः यासाठी कंबर कसली आणि गावाच्या एकीतून ह्या क्षेत्राला पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यात आले. गढ़ीचे काम जुन्या दगडांचा वापर करून करण्यात आले. नमाज पढण्यासाठी उरलेल्या भागाची डागडुजी करण्यात आली. त्यावरील जुन्या लाकडी नक्षीकामाचे सुशोभीकरण करण्यात आले आणि कबरीचेही बांधकाम मूळ पद्धतीने त्याच साधनांचा वापर करून पुन्हा पूर्ववत करण्यात आले. ह्याकामी गावकऱ्यांनी सर्व कामात स्वतः सहभाग घेतला आणि आजतागायत ह्या स्थळाची स्वतः जोपासना केली. गावातील प्राचीन मंदिरे, दरवाजे असणारे प्रचंड मोठे बारव आणि विहीर व इतर जुन्या वास्तूंचे गावकऱ्यांनी प्राणपणाने जतन केले आहे.
“कबरीचे पुनर्बांधकाम झाले त्या दिवशी मुस्लिम परंपरेनुसार धार्मिक विधी पार पडले, पण त्याच वेळी हिंदू समाजातील लोकही हार घेऊन आले आणि त्यांनी श्रद्धेने ते कबरीवर अर्पण केले,” असे देखरेखदारांचे पुतणे बाबा इनामदार सांगतात. ते ऑल इंडिया मुस्लिम अँड ओबीसी ऑर्गनायझेशनचे उपाध्यक्षही आहेत.
“इथे कोणत्याही धर्माच्या व्यक्तीच्या प्रवेशावर बंधन नाही. कोण कोणत्या श्रद्धेचा आहे, याला येथे काहीच महत्त्व नाही,” असे ते सांगतात.

भन्साळीच्या ‘बाजीराव मस्तानी’ मुळे पर्यटकांची गर्दी
आज त्या महालाचा गावात कोणताही ठसा शिल्लक नाही. घोडेकर सांगतात की, पाबळ, तेंडूर आणि लोणी या तीन गावांतून कररूपाने गोळा होणारा महसूल बाजीराव मस्तानीच्या देखभालीसाठी वापरत असत.
“महाराजा छत्रसाल, बाजीराव आणि मस्तानी यांनी कधी धर्माला आपल्या नात्याच्या आड येऊ दिले नाही, तर मग मस्तानी हिंदू होती की मुस्लिम, हे ठरवणारे आपण कोण?” असा सवाल बाबा इनामदार उपस्थित करतात.
बाजीराव आणि मस्तानी यांच्या विलक्षण प्रेमकथेने प्रेरित होऊन प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी बाजीराव मस्तानी हा चित्रपट निर्माण केला. विशेष म्हणजे, गावकरी शिवाजी जाधव सांगतात की, पूर्वी या गावाकडे फारसे कोणी फिरकत नव्हते; मात्र भन्साळी यांच्या चित्रपटाची चर्चा सुरू झाल्यापासून येथे येणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
“अनेकांना मस्तानीच्या कबरीबद्दल कुतूहल वाटते. लोक कबरीजवळ उभे राहून छायाचित्रे काढतात. पूर्वी कुणालाही या ठिकाणाची फारशी दखल नव्हती. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, चित्रपट निर्मिती संस्थेतील कोणीही अद्याप गावाला भेट दिलेली नाही,” असा दावा जाधव करतात.
पाबळ गावाच्या मध्यभागी एक विशाल विहीरही आहे. आणखी एका दंतकथेनुसार, मस्तानी शनिवाऱवाड्यात राहत असतानाही तिच्यासाठी खास पाणी आणण्याकरिता एक सेवक पुण्याहून पाबळपर्यंत प्रवास करून या विहिरीचे पाणी नेत असे. आज मात्र ही विहीर कोरडी पडलेली आहे.

“काही दशकांपूर्वी गावात एक तलवार सापडली होती. ती कदाचित मस्तानीच्या सुरक्षारक्षकांची असावी, असा अंदाज बांधून ती ग्रामपंचायत कार्यालयात सुरक्षित ठेवण्यात आली. मात्र त्या तलवारीचा इतिहास सिद्ध करणारा कोणताही पुरावा उपलब्ध नाही,” असे घोडेकर सांगतात.
या गावात सुंदर राणी मस्तानीची आठवण अनेक प्रकारे जपली जाते. पद्माणी जैन महाविद्यालय दरवर्षी मस्तानीला आदरांजली म्हणून वार्षिक अंक प्रकाशित करते. याशिवाय महाविद्यालयात ‘बाजीराव मस्तानी वादविवाद स्पर्धा’ या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजनही केले जाते, ज्यात राज्यभरातील विद्यार्थी सहभागी होतात.






