Skip to main content

Women's Day 2026 : "आमचा महिला दिन पाण्याच्या रांगेतच…"

Apsara Aga
08 Mar 2026
5 min read
9 views
Women's Day 2026 : "आमचा महिला दिन पाण्याच्या रांगेतच…"

अप्सरा आगा 


  • पुण्यातील हडपसर परिसरात अनेक महिलांचा दिवस अजूनही पहाटे पाण्याच्या रांगेत उभं राहूनच सुरू होतो.


  • पाणीटंचाईमुळे घरकाम, नोकरी आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना महिलांवर अतिरिक्त ताण निर्माण होतो.


  •  महिला दिन साजरा होत असतानाच या महिलांसाठी खरे सशक्तीकरण म्हणजे नळातून नियमित पाणी मिळणे, हीच त्यांची प्राथमिक अपेक्षा आहे.


आज ८ मार्च….पहाटेचे पाच वाजले आहेत, अजून अंधार पूर्णपणे सरलेला नाही. गल्लीत कुत्र्यांचं भुंकणं आणि अधूनमधून जाणाऱ्या एखाद्या दुचाकीचा आवाज एवढंच ऐकू येतं. पण पुण्यातील हडपसरच्या एका छोट्या गल्लीत मात्र दिवस सुरू झालाय. हातात कळशी, बादल्या, हंडे आणि प्लास्टिकचे कॅन घेऊन काही महिला आधीच नळाजवळ रांगेत उभ्या आहेत.


आज ८ मार्च. या दिवशी जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. महिलांच्या सशक्तीकरणाबद्दल चर्चा, कार्यक्रम, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सगळीकडे महिला दिनाचं वातावरण आहे. पण या गल्लीत उभ्या असलेल्या महिलांसाठी हा दिवस इतर दिवसांसारखाच आहे. कारण त्यांचा महिला दिन अजूनही पाण्याच्या रांगेत उभा राहूनच सुरू होतो.


डब्ल्यूएचओ आणि युनिसेफच्या 2025 मधील अहवालानुसार, जगात अजूनही ४ पैकी एका व्यक्तीला सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. अनेक देशांमध्ये घरासाठी पाणी आणण्याची जबाबदारी मुख्यतः महिला आणि मुलींवरच असते, आणि काही ठिकाणी त्यांना दररोज ३० मिनिटांहून अधिक वेळ पाणी आणण्यासाठी खर्च करावा लागतो.


त्यामुळे पाणीटंचाईचा सर्वाधिक परिणाम महिलांच्या दैनंदिन आयुष्यावर होत असल्याचे या अहवालातून स्पष्ट होते. भारतासारख्या विकसनशील देशात तर पाणीटंचाई ही महिलांच्या आयुष्याचा रोजचा भाग बनली आहे. घरात पाणी कमी पडलं की पहिली धाव तली बाईच घेते. त्यामुळे पाणीटंचाई ही केवळ पायाभूत सुविधांची समस्या राहत नाही. ती महिलांच्या दैनंदिन आयुष्याशी थेट जोडलेली समस्या बनते.


पाणी नसल्यामुळे रोजच्या जगण्यावर परिणाम 


पुण्याच्या हडपसर आणि वानवडी हे दोन्ही उपनगर झपाट्याने वाढत आहेत, पण या भागात राहणाऱ्या महिलांचं जीवन अजूनही एका वेगळ्या वास्तवात आहे. नळाला पाणी येत नाही, पण घरकाम, मुलांची काळजी, स्वयंपाक, घराची स्वच्छता आणि  नोकरी हा सगळा भार महिलांवर आहे. जेव्हा नळाला पाणी येत नाही, तेव्हा हा भार दुप्पट, कधी कधी तिप्पट होतो 


आरती तिवडे गेली सव्वीस वर्षे हडपसर परिसरात राहतात. ‘बाईमाणूस’शी बोलतांना त्या म्हणाल्या,


“पूर्वी आमच्या परिसरात पाणी भरपूर यायचं. सकाळ-संध्याकाळ नळ सुरू केला तरी पाणी संपायचं नाही. पण आता सगळं बदललं आहे. महानगरपालिका पाणी सोडते, पण त्या पाण्याला धारच नसते. त्यामुळे पाण्याचा दाब इतका कमी असतो की खालच्या भागातल्या घरांपर्यंतही नीट पाणी पोहोचत नाही. माझ्या घरापर्यंत तर अजिबातच नाही. माझं घर रस्त्याच्या शेवटी आणि चढावर आहे, त्यामुळे आमच्या नळात कधी कधी एक थेंबही येत नाही. सकाळी उठल्यापासून पाण्याचीच चिंता डोक्यात सुरू असते. मला सकाळी कामावर जायचं असतं. मी मजुरीवर काम करते. घरकाम, भांडी घासणे, कधी कधी बांधकामावरही जाते. काम केलं तरच खायला मिळतं, नाहीतर दिवसभर उपाशी राहावं लागतं. पण पाणी नसल्यामुळे सकाळची सगळी कामं अडकून पडतात. आंघोळ करायची, चहा करायचा, कपडे धुवायचे, स्वयंपाक करायचा. हे सगळं पाण्यावर अवलंबून असतं. त्यामुळे सतत टेन्शन असतं. मनात एकच विचार येतो आज उशीर झाला तर मालकीणबाई रागावतील का? मजुरी कापतील का? किंवा कामचं गमावलं तर?”


आरती सांगतात की, या परिस्थितीचा त्यांच्या आर्थिक आयुष्यावरही परिणाम झाला आहे. कामावर वेळेवर पोहोचता येत नाही, त्यामुळे कधी कधी अर्ध्या दिवसाची मजुरीही जाते. “शरीर थकलेलं असतं, पण विश्रांती घ्यायला वेळ नसतो. चिडचिड होते, राग येतो, पण कोणाला सांगायचं? महानगरपालिकेच्या कार्यालयात गेलं तर ‘आम्ही करू काहीतरी’ असं म्हणून विषय टाळतात. शेजाऱ्यांकडून पाणी घ्यायचं म्हणलं तर त्यांच्या नळालाही पाणी कमी येतं. त्यामुळे मी आता रात्रीच एक कळशी भरून ठेवते. सकाळी तेच पाणी कसबसं वापरून कामाला जाते." 


User Imageप्रातिनिधिक छायाचित्र


“पाणी भरायचं की घरातली कामं करायची?” 


अश्विनी काकडे गेली वीस वर्षे वानवडी मध्ये राहतात. त्यांनी या परिसरातील पाण्याच्या परिस्थितीत झालेला मोठा बदल जवळून पाहिला आहे. त्या सांगतात,


“पूर्वी पाणी भरपूर यायचं. प्रेशर कमी असले तरी पाण्यासाठी एवढी धडपड करावी लागत नव्हती. पण आता परिस्थिती पूर्ण बदलली आहे. पाणी येतंच नाही आणि पाणीपुरवठ्याचं कोणतंही ठरलेलं वेळापत्रक नाही. पाणी येणार नाही याची कोणतीही आगाऊ सूचना दिली जात नाही. आता नळाला फक्त करंगळी एवढी धार असते. सकाळी पाच वाजता पाणी सुटतं आणि आठ वाजता बंद होतं. म्हणजे फक्त दोन तास. या दोन तासात अनेकदा पाणीच येत नाही." 


त्या पुढे सांगतात की, या दोन तासांतच घरातील सगळी महत्त्वाची कामं पूर्ण करावी लागतात.


“सकाळी मुलांचा डबा बनवायचा, त्यांना शाळेत पाठवायचं, घर साफ करायचं  सगळा ताण असतो. त्यात पाणी भरण्यासाठी वेळ द्यावा लागतो. त्यामुळे रोज एक प्रश्न उभा राहतो  पाणी भरायचं की घरातली कामं करायची? हा निर्णय घेताना प्रचंड ताण येतो. चिडचिड वाढते, मानसिक तणाव वाढतो आणि रोजचं जगणं खूप कठीण होतं.”


ही गोष्ट फक्त आरती आणि अश्विनीची नसून पाणी टंचाई आणि आर्थिक गरिबी यांचा एकत्रित फटका बसलेल्या हजारो महिलांची गोष्ट आहे. २०२५ च्या उन्हाळ्यात हडपसर-वानवडी भागात अपुऱ्या  पाणीपुरवठ्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली होती. पुणे महानगरपालिकेच्या पाईपलाइनमधून पाणी येणे बंद झाले होते. मागणीप्रमाणे पुरवठा न झाल्याने हडपसर, वानवडी, मागरपट्टा, खराडी परिसरातील हजारो घरांमध्ये टँकरने पाणी मिळत होते.


एक ५००० लिटरचा टँकर ८०० ते १२०० रुपये दराने विकला जात होता. अनेक सोसायटीमध्ये आठवड्यातून फक्त दोन-तीन वेळा टँकर मिळत होता. पावसाळ्यात अपुरा पाऊस, भूजल पातळी खाली जाणे आणि उकाड्याने नद्या-नाले आटणे यामुळे हडपसर-वानवडीत पुन्हा पाणीटंचाई होण्याची शक्यता आहे. या संदर्भात स्थानिक नागरिकांना पुन्हा या समस्येला सामोरं जावं लागणार आहे. यामुळे आर्थिक ताण प्रचंड वाढेल.


User Imageप्रातिनिधिक छायाचित्र


नळ सुटताच सुरू होते पाण्यासाठीची धावपळ


नळाला पाणी सुटल्याचा हलकासा आवाज जरी आला, तरी गल्लीत अचानक हालचाल सुरू होते. काही क्षणांपूर्वी शांत असलेली गल्ली काही मिनिटांतच गजबजून जाते. कुणीतरी घरातून घाईघाईने हंडा घेऊन बाहेर पडतं, तर कुणी शेजाऱ्यांना हाक मारतं – “लवकर या, पाणी आलंय!” थोड्याच वेळात नळाजवळ महिलांची रांग लागते. हातात कळशा, प्लास्टिकचे डबे, बादल्या आणि मोठे हंडे घेऊन महिला पाणी भरण्यासाठी उभ्या राहतात.


पाणी किती वेळ येईल याची कोणालाही खात्री नसते. कधी पंधरा मिनिटे, तर कधी अर्धा तासातच पाणी बंद होते. त्यामुळे शक्य तितकं पाणी साठवून ठेवण्याची धडपड सुरू असते. अनेक घरांत दहा-बारा हंडे आणि कॅन ठेवलेले असतात, जे पाणी आलं की भरून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.


उन्हाळ्यात ही परिस्थिती आणखी कठीण बनते. पाण्याचा पुरवठा कमी होतो आणि रांगा आणखी लांब होतात. स्थानिक रहिवासी संगीता शिंदे सांगतात,


“पाणी आलं की आम्ही सगळ्या महिलांची धावपळ सुरू होते. आधी कोण भरणार यावरून कधी कधी वादही होतात, कारण सगळ्यांनाच भीती असते की आपला नंबर येईपर्यंत पाणी बंद होईल ” 


योजना आहेत; पण अंमलबजावणीचं आव्हान कायम


पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. ग्रामीण भागात प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पाणी पोहोचवण्याच्या उद्देशाने जल जीवन मिशन राबवले जात आहे. तसेच अटल भूजल योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आणि विविध जलसंधारण उपक्रमांद्वारे पाण्याचे स्रोत वाढवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.


मात्र प्रत्यक्षात अनेक भागांमध्ये पाणीपुरवठ्याची समस्या अजूनही कायम असल्याचे दिसून येते. पाईपलाईन, जलसाठा आणि वितरण व्यवस्थेतील अडचणी, वाढती लोकसंख्या आणि घटती भूजल पातळी यामुळे अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई निर्माण होत आहे. परिणामी, योजनांची घोषणा होत असली तरी पाण्यासाठीची धावपळ अजूनही अनेक महिलांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनून राहिली आहे.


महिला सशक्तीकरणाची सुरुवात अजूनही पाण्यापासूनच


८ मार्चला जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. महिलांच्या हक्कांबद्दल, समानतेबद्दल आणि सशक्तीकरणाबद्दल चर्चा होते. विविध कार्यक्रम, भाषणं आणि मोहिमांमधून महिलांच्या प्रगतीचा गौरव केला जातो. मात्र हडपसर आणि वानवडीसारख्या भागात राहणाऱ्या अनेक महिलांसाठी सशक्तीकरणाचा अर्थ अजूनही खूप मूलभूत गरजांशी जोडलेला आहे. त्यांच्या दृष्टीने सशक्तीकरणाची सुरुवात मोठ्या घोषणांपासून नव्हे, तर घरच्या नळातून नियमित पाणी येण्यापासून होते.


पाण्याच्या अभावामुळे महिलांना दररोज तासन्तास रांगेत उभं राहावं लागतं, घरातील कामांवर परिणाम होतो, मुलांच्या शिक्षणावर आणि त्यांच्या स्वतःच्या आरोग्यावरही ताण येतो. त्यामुळे महिला दिन साजरा करण्याच्या चर्चांपेक्षा त्यांना रोजच्या जगण्यात मूलभूत सुविधांची गरज अधिक तीव्रतेने जाणवते. जोपर्यंत पाण्यासारख्या अत्यावश्यक गरजेसाठी संघर्ष करावा लागतो, तोपर्यंत महिलांचा महिला दिन खऱ्या अर्थाने साजरा होणं कठीण आहे.


त्यामुळेच अनेक महिलांच्या मनात एकच प्रश्न सतत उपस्थित राहतो.  महिला सशक्तीकरणाच्या चर्चा होण्याआधी त्यांच्या रोजच्या आयुष्यात पाण्यासारखा मूलभूत हक्क कधी मिळणार? तोपर्यंत त्यांच्या आयुष्यातील महिला दिन हा उत्सव नसून पाण्यासाठीच्या रोजच्या संघर्षाचीच आठवण बनून राहणार आहे.


(अप्सरा आगा या ‘बाईमाणूस’च्या पुण्याच्या प्रतिनिधी आहेत.)

Share this article
धाराशिवमध्ये पहिल्यांदाच महिला पंचायत परिषद; हवामान बदल आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी महिलांचा पुढाकार
ग्राउंड रिपोर्ट

धाराशिवमध्ये पहिल्यांदाच महिला पंचायत परिषद; हवामान बदल आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी महिलांचा पुढाकार

धाराशिव येथे पहिल्यांदाच 'पंचायत परिषद' आयोजित करण्यात आली, यात ३५ गावांतील महिला सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्र येत हवामान बदल आणि दुष्काळ निवारणासाठी स्थानिक पातळीवरील 'कृती आराखडा' तयार केला गेला. वाढत्या उष्णतेचा आणि पाणीटंचाईचा थेट फटका ग्रामीण महिलांच्या आरोग्याला, आर्थिक स्थितीला आणि विशेषतः मुलांच्या शिक्षणाला कसा बसत आहे, यावर महिलांनी आपले वास्तव अनुभव मांडले. केवळ समस्या न मांडता महिलांनी गट शेती, ठिबक सिंचन, रेन पाईपचा वापर, वृक्षलागवड आणि शेळी-कुक्कुटपालनासारख्या पूरक व्यवसायांच्या माध्यमातून हवामान बदलावर मात करण्यासाठी धोरणात्मक उपायांची मागणी केली. याच परिषदेत 'दुष्काळ पूर्वसूचना प्रणाली' अहवालाचेही प्रकाशन झाले.

3 min read
A
Apsara Aga
वाघांच्या मागावर कॅमेरे की शिकारी? ताडोबामध्ये नेमकं काय सुरू आहे…?
ग्राउंड रिपोर्ट

वाघांच्या मागावर कॅमेरे की शिकारी? ताडोबामध्ये नेमकं काय सुरू आहे…?

ताडोबातील काही वाघ दिसेनासे झाल्याच्या चर्चांमुळे वन्यजीव क्षेत्रात खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर बंगळुरूस्थित एका वन्यजीव छायाचित्रकाराच्या चौकशीमुळे संशयांना नवे वळण लागले आहे. छायाचित्रणाच्या नावाखाली जंगलात नियमबाह्य हालचाली, मेलेली जनावरे टाकणे आणि रात्री-अपरात्री फिरण्याचे आरोप या छायाचित्रकारावर आहेत. वन विभागाने मात्र चौकशी केवळ अनधिकृत प्रवेशासंदर्भात असून शिकारीचे कोणतेही पुरावे नाहीत, असा दावा केला आहे.

8 min read
S
Shantanu Khuje
Beed : बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी मोकाट की अटकेत?
Video content
ग्राउंड रिपोर्ट

Beed : बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी मोकाट की अटकेत?

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडले आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावी आलेल्या एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील व्यक्तीने बलात्कार केला, ज्यामुळे ती प्रचंड मानसिक धक्क्यात आहे. ही एक गंभीर "crime" असून, या "rape case" मुळे "beed news" मध्ये मोठी खळबळ उडाली आहे, ज्यामुळे "breaking news" म्हणून हा प्रकार समोर आला आहे. या "crime news" संदर्भात अधिक माहितीसाठी पाहा हा विशेष रिपोर्ट.

S
Sukeshani Naikwade
"पूर्वी रोज भांडणं... आता 3 महिन्यांपासून शांतता!" | CCTV मुळे बदललं बीडमधलं हे गाव...
Video content
ग्राउंड रिपोर्ट

"पूर्वी रोज भांडणं... आता 3 महिन्यांपासून शांतता!" | CCTV मुळे बदललं बीडमधलं हे गाव...

बीड जिल्ह्यातील खळवट लिमगाव हे गाव एकेकाळी किरकोळ कारणांवरून होणाऱ्या भांडणांसाठी आणि पोलिस स्टेशनच्या फेऱ्यांसाठी ओळखलं जायचं. मात्र आता गावभर बसवण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यांमुळे परिस्थितीत मोठा बदल झाल्याचा दावा ग्रामस्थ करत आहेत. ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून गावात CCTV यंत्रणा उभारण्यात आली. त्यानंतर गावातील भांडणं, वाद-विवाद आणि असामाजिक प्रकारांवर मोठ्या प्रमाणात आळा बसल्याचं ग्रामस्थ सांगतात. विशेष म्हणजे गेल्या तीन महिन्यांपासून गावात एकही भांडण झालेलं नसल्याचा दावा करण्यात येत आहे. या विशेष ग्राउंड रिपोर्टमध्ये पोलीस अधिकारी, महिला ग्रामस्थ आणि सरपंच यांच्याशी संवाद साधत CCTV मुळे गावात नेमका काय बदल झाला, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. पाहा बाईमाणूसचा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट.

S
Sukeshani Naikwade
"पाणी आलं... पाणी आलं...!" स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर सातपुड्याच्या 'सादरी'मध्ये पहिल्यांदाच नळाला आलं पाणी!
ग्राउंड रिपोर्ट

"पाणी आलं... पाणी आलं...!" स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर सातपुड्याच्या 'सादरी'मध्ये पहिल्यांदाच नळाला आलं पाणी!

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील सादरी पाड्यावर स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर पहिल्यांदाच नळाद्वारे पाणी पोहोचलं. नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं गाव असूनही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज डोंगर-दऱ्या उतरून नदीपर्यंत जावं लागत होतं. जलजीवन मिशनसारख्या योजनांचे दावे असतानाही या दुर्गम आदिवासी पाड्यावर पाण्याची समस्या कायम होती. ग्रामस्थांच्या श्रमदानातून, यंग फाउंडेशनच्या पुढाकारातून आणि DJED फाउंडेशनच्या आर्थिक मदतीतून दोन महिन्यांत ही पाणी योजना उभी राहिली. सादरी पाड्यावर आलेलं हे पाणी केवळ एका गावाची तहान भागवणारं नाही, तर सातपुड्यातील शेकडो दुर्गम आदिवासी पाड्यांच्या वास्तवावर प्रकाश टाकणारं उदाहरण आहे.

11 min read
S
Sanjana Khandare
Hingoli। हिंगोलीच्या पांगरा शिंदे गावात सतत भूकंप का होत आहेत?
Video content
ग्राउंड रिपोर्ट

Hingoli। हिंगोलीच्या पांगरा शिंदे गावात सतत भूकंप का होत आहेत?

हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसरात गेल्या ९ वर्षांपासून सुरू असलेल्या भूकंपाच्या मालिकेमुळे गावकऱ्यांचे जीवन भयभीत झाले आहे. ११ एप्रिल रोजी बसलेल्या ४.७ रिश्टर स्केलच्या धक्क्याने गावातील जुन्या मातीच्या घरांची कशी पडझड झाली आणि गावकरी कोणत्या भीतीच्या छायेत जगत आहेत, याचा सविस्तर आढावा घेणारा ‘बाईमाणूस’चा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट.

S
Shantanu Khuje

Comments

Comments are currently disabled or loading...