सुपरस्टार देव आनंद यांनी 1940 मध्ये एका मुलीला लग्नाचा प्रस्ताव दिला होता. त्यावेळी त्या मुलीने नकार दिला आणि दुसऱ्या व्यक्तीशी लग्न केले. निर्माता, अभिनेता आणि दिग्दर्शक असलेल्या एसडी नारंगची पत्नी झाल्यानंतर ती जुहूच्या आलिशान नारंग व्हिलामध्ये राहू लागली.
वयाच्या दहाव्या वर्षी बालकलाकार म्हणून बंगाली चित्रपटसृष्टीतून कारकिर्दीचा प्रांरभ करणारी आणि पुढे हिंदी चित्रपटसृष्टीत 1930 ते 1960 हा काळ गाजविणारी ती मुलगी म्हणजे स्मृती विश्वास नारंग…
1986 मध्ये एसडी नारंग यांचे निधन झाले. स्मृती नारंग यांची कहाणी इथून पुढे सुरू होते. जुहूच्या त्या आलिशान बंगल्याची जरा डागडुजी करण्यासाठी स्मृतीने एका बिल्डरला काम दिलं. बिल्डरने स्मृती नारंगला बंगल्याची दुरुस्ती होईपर्यंत काही दिवस बाहेर राहण्यास सांगितलं आणि तेव्हापासून स्मृतीला त्या बंगल्याचे दर्शनही दुर्लभ झाले.

बिल्डरने फसवणुकीने तो बंगलाच हडपला. स्मृती नारंगने त्यानंतर तब्बल 28 घरं बदलली आणि अखेर अत्यंत वैफल्यग्रस्त अवस्थेत वयाच्या शंभरीत असताना गेल्या आठवड्यात तिचे निधन झाले…
आपल्या सालस अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीवर स्वत:ची छाप उमटविणाऱ्या एकेकाळच्या या सेलिब्रेटी अभिनेत्रीला शंभराव्या वर्षी मायानगरी मुंबईपासून दूर नाशिकमध्ये अतिशय हलाखीत आणि एकांतात शेवटचा श्वास घ्यावा लागला.
वयाच्या दहाव्या वर्षी बालकलाकार म्हणून बंगाली चित्रपटसृष्टीतून कारकिर्दीचा प्रांरभ करणारी आणि पुढे हिंदी चित्रपटसृष्टीत 1930 ते 1960 हा काळ गाजविणारी ही अभिनेत्री तशी कमनशिबीच ठरली.
अर्धे आयुष्य गर्भश्रीमंतीत, तर उर्वरित काळ टोकाच्या दारिद्र्यात तिला कंठावा लागला. पती तथा प्रख्यात दिग्दर्शक एस. डी. नारंग यांच्या निधनानंतर नातेवाईक, तसेच आप्तांकडून आर्थिक फसवणूक झाल्यानंतर दुर्दैवाचे दशावतार त्यांच्या वाट्याला आले.
मुंबईतील आलिशान आश्रयस्थान एका बांधकाम व्यावसायिकाने बळकावल्यानंतर परवड सुरू झाली. 90 पेक्षा अधिक चित्रपटांतून ख्याती पावून मिळालेला मानमरातब प्रत्यक्षात तकलादू आहे, हे लक्षात आल्यानंतर दोन तपांपूर्वी एका नातेवाइकाच्या मदतीने त्या नाशिकला स्थलांतरित झाल्या. नंतर तर त्या एक वेळच्या अन्नालाही मोताद झाल्या.
पारितोषिके आणि भेटवस्तू विकून गुजराण करावी लागली. सरकारदरबारी, तसेच बॉलिवूडसह अनेक दिग्गजांकडे मदत मागूनही हाती फार काही न लागल्याने त्यांची दोन्ही मुलेही वैफल्यग्रस्त झाली. ‘अपराजिता’, ‘मॉडर्न गर्ल’, ‘नेक दिल’ असे काही गाजलेले चित्रपट त्यांच्या नावावर आहेत.

उदरनिर्वाहासाठी 15 हजारांत विकली होती गाणी
स्मृती यांचे पती एस. डी. नारंग यांनी 1985 ते 87 या कालावधीत अनुराधा पौडवाल आणि बप्पी लहरी यांच्या आवाजात वैष्णोदेवी आणि प्रेम गीत गाऊन घेतले होते. काही कारणास्तव हा चित्रपट पूर्ण झाला नाही. मात्र, या गाण्याचे सर्व हक्क स्मृती विश्वास यांच्याकडे होती.
जुलै 2023 मध्ये उदरनिर्वाहासाठी पंधरा हजार रुपयात तीन गाणे विकावी लागली होती. स्मृती विश्वास यांची दोन्ही मुलं अविवाहित असून नाशिकमध्ये भाडेतत्त्वावर घेतलेल्या खोलीत ते राहतात. आईच्या उदरनिर्वाहासाठी ही गाणी विकावी लागली, अशी खंत त्यांच्या मुलांनी बोलून दाखवली होती.
1930 मध्ये प्रदर्शित झालेला संध्या हा त्यांचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात स्मृती विश्वास यांनी बालकलाकार म्हणून काम केले होते. 1940 च्या सुमारास त्या लाहोर येथे गेल्या. त्यावेळचे प्रसिद्ध दिग्दर्शक - निर्माते दलसूख पांचोली यांनी 'धमकी' या चित्रपटात त्यांना संधी दिली.
1943 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. एस.डी. नारंग दिग्दर्शित नई भाभी (1944) या चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. फाळणीनंतर स्मृती विश्वास या कोलकात्यात गेल्या. कोलकात्यात त्यांनी निरक्षर, अनुराग, अबू हसन अशा बंगाली चित्रपटांमध्ये काम केले.

वयाची चाळीशी गाठत असताना स्मृती मुंबईत आल्या. यानंतर त्यांनी बॉलीवूडमधील दिग्गज कलाकांरासोबत काम केले. चांदनी चौक (1954), राज कन्या (1955), बाप रे बाप (1955), जागते रहो (1956), सैलाब (1956), मॉडर्न गर्ल (1961) या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या.
देव आनंद, किशोरकुमार, राजकपूर यांसारखे दिग्गज अभिनेते आणि गुरुदत्त, व्ही. शांताराम, मृणाल सेन, बिमल रॉय, बी. आर. चोप्रा आदी नामवंत निर्मात्यांसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीच्या अंतिम प्रवासासाठी चार खांदेकरीही मिळू नयेत, यासारखे दुर्दैव ते काय? शंभर वर्षांचे आयुष्य लाभूनही अखेरच्या काळात ही ‘नेक दिल’ अभिनेत्री दररोज मरण मागत राहिली. चित्रपटसृष्टीतील चमचमत्या तारे-तारकांचे वार्धक्य काळातील वास्तवही यानिमित्ताने समोर आले.






