अत्यंत गाजलेल्या ‘सत्या’ चित्रपटात एक प्रसंग आहे. बॉलिवुडमध्ये ‘प्लेबॅक सिगर’साठी झगडत असलेली उर्मिला मातोंडकर एका मोठ्या संगीत दिग्दर्शकाकडे जाते. त्या ठिकाणी जो प्रसंग घडतो तो साधारणपणे असा आहे…
उर्मिला : ‘’सर मै क्लासिकल संगीत सिख चुकी हूँ, आप मुझे एक बार गाने का मौका दोगे तो’’
संगीत दिग्दर्शक : ‘’देखो, तुम्हारे तरह कई लडकियां आती है मेरे पास, सब को बनना है प्लेबॅक सिंगर, मौका दे सकता हूँ, पर ये मौका मे तुम्हे ही क्यों दू?’’
उर्मिला : ‘’आप मुझे एक बार मौका दे, तो ही आप समज सकते है की मुझ मे टॅलेंट है की नही’’
संगीत दिग्दर्शक : ‘’टॅलेंट तो सभी लोगों मे है, सवाल टॅलेंट का नही, सवाल ये हे की टॅलेंट के सिवा तुम मुझे क्या दे सकती हो, मेरे गुरुजी हमेशा कहां करते थे, जिंदगी मे कुछ पाने के लिये कुछ देना पडता है… समझी आप…’’
हे असे प्रसंग फक्त पडद्यावरच घडत नाहीत, तर समाजाच्या प्रत्येक टप्प्यावर, कामाच्या ठिकाणी, क्रीडा क्षेत्रात, कलेच्या ठिकाणी, बॉलिवूडमध्ये कुठेही जा, महिलांच्या वाट्याला असे अनुभव येतच असतात. अगदी संगीत क्षेत्रही त्याला अपवाद नाही.
‘’मी तुला गाणं देईन, पण मला अगोदर एक चुंबन दे’’
संगीत क्षेत्रातील या #MeToo चळवळीत सगळ्यात अगोदर बंड पुकारले ते पार्श्वगायिका सोना मोहापात्रा आणि श्वेता पंडीत यांनी. प्रख्यात संगीत दिग्दर्शक अनू मलिकवर या दोघींनी लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. त्या घटनेच्या वेळी श्वेता पंडीत म्हणाली होती की, "2000 मध्ये मोहब्बतें या चित्रपटाद्वारे माझ्या करिअरची सुरुवात झाली. मी चांगल्या नवीन गाण्यांच्या शोधात होते, जेणेकरून माझ्या यशात सातत्य राहील. मला त्यावेळी अनू मलिक यांच्या मॅनेजरकडून फोन आला होता. 2001 मध्ये अंधेरीच्या एंपायर स्टुडिओ मध्ये मला बोलावण्यात आलं. सगळ्या गायकांसारखीच मीसुद्धा उत्साहात होते. एका केबिनमध्ये फक्त मी आणि अनू मलिक होतो. अनू मलिक यांनी कोणत्याही वाद्यांशिवाय मला गायला सांगितलं. गाणं ऐकून अनू म्हणाले, 'मी तुला शान आणि सुनिधीबरोबर एक गाणं देईन. मात्र आधी मला एक चुंबन दे'."

पार्श्वगायिका सोना मोहापात्रा म्हणाली होती की, या इंडस्ट्रीत असे आणखी अनू मलिक आहेत. एकदा गायक कैलाश खेर याने माझ्या मांडीवर हात ठेवत म्हटलं, "तू खूप सुंदर आहे. नशीबवान आहेस की एका संगीतकाराच्या घरी गेलीस, कुण्यास अॅक्टरच्या घरी नाही."
प्रसिद्ध शास्त्रीय गायक गुदेचा बंधूवरही लैंगिक शोषणाचे आरोप झाले होते. मोनिका (नाव बदलले आहे) या शास्त्रीय गायिकेने आरोप केला होता की, धृपद संस्थान या संगीत शाळेत शिकत असताना प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायक रमाकांत गुंदेचा यांनी तिच्यावर बलात्कार केला. धृपद संस्थान हे मध्य प्रदेशात आहे. रमाकांत हे धृपद शैलीतले नावाजलेले शास्त्रीय गायक होते. २०१९ साली त्यांचे निधन झाले.
भारतीय संगीत क्षेत्रातही #MeToo
या सगळ्या उदाहरणावरून हे तर स्पष्ट झालंय की, भारतीय संगीत क्षेत्राला #MeToo चळवळीने स्पर्श केला आहे. याच पार्श्वभूमीवर ‘स्पॉटिफाय इंडिया’ने संगीत क्षेत्रात करियर करणाऱ्या हजारो मुलींशी बोलून एक सर्व्हे केला आहे. ‘’दै. लोकसत्ता’’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या केतकी जोशी यांच्या एका लेखात स्पॉटिफायने केलेल्या या सर्व्हेबद्दल वृत्त प्रसिद्ध झाले आहे. या सर्व्हेनुसार संगीत क्षेत्रातही महिलांची सुरक्षितता हाच कळीचा मुद्दा असल्याचे समोर आले आहे. संगीत क्षेत्रातील महिलांपुढे कोणती आव्हाने आहेत, त्यांना कोणत्या अडथळ्यांना सामोरे जावे लागते हे जाणून घेण्यासाठी ‘स्पॉटिफाय इंडिया’ने देशभरात हे सर्वेक्षण केले. त्यासाठी जवळपास एक हजारपेक्षा जास्त जणांच्या प्रातिनिधिक मुलाखती घेण्यात आल्या. अगदी मिलेनियल ते जेन झी अशा सर्व वयोगटांतील विविध स्तरांवर आणि विविध प्रकारची कामे करणाऱ्या तरुणी आणि महिलांना याअंतर्गत बोलते करण्यात आले. यामध्ये गायिका, गीतलेखिका, कंपोझर्स आणि डीजे यांचा तर समावेश होताच, पण त्याचबरोबर म्युझिक प्रोडक्शन, साऊंड इंजिनीअरिंग या तांत्रिक क्षेत्रात काम करणाऱ्यांचाही समावेश होता. तसेच म्युझिक कंपन्या किंवा इव्हेट कंपन्यांबरोबर काम करणाऱ्या तरुणीही होत्या. आज या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते हे ‘युगॉव्ह’ने केलेल्या या सर्वेक्षणातून ठळकपणे समोर आले आहे.

पूर्वी भारतीय संगीत क्षेत्रात अगदी मोजक्या महिला असायच्या- गायिका, फारतर साथसंगत करणाऱ्या सहकारी किंवा अगदी बोटावर मोजण्याइतक्या संगीत दिग्दर्शक… आता संगीत क्षेत्राचा विस्तार झाला तसा महिलांसाठी या क्षेत्रातही संधीची अनेक दरवाजे खुले झाले. पण त्या प्रमाणात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मात्र याही क्षेत्रात तसाच ‘असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले.
‘स्पॉटिफाय इंडिया’चा अहवाल काय सांगतो?
सुरक्षितता : सुरक्षितता आणि कामासाठी सर्वसमावेश वातावरण या संगीत क्षेत्रातील महिलांसाठी तातडीच्या गरजा आहेत, असे जवळपास ५६ टक्के महिलांनी सांगितले, तर आपल्याला कामाच्या ठिकाणी असुरक्षित आणि सर्वसमावेशक वातावरण नसल्याचे जाणवते असा ३६ टक्के महिलांचा अनुभव आहे. पुरुषांचीच जास्त मक्तेदारी असलेल्या या क्षेत्रात उशिरापर्यंत किंवा अवेळी काम करायला लागणे, बरोबर एकही महिला नसताना पुरुष सहकाऱ्यांबरोबर काम अशा अनेक गोष्टी असतात. त्यामुळे या क्षेत्रांतील महिलेला कामाच्या ठिकाणी सुरक्षित वाटणे अत्यंत गरजेचे आहे.
मर्यादित संधी : आता संगीत क्षेत्रात महिलांचे प्रमाण किंवा वर्चस्वही जाणवण्याएवढे वाढले आहे. अगदी तांत्रिक क्षेत्रातील महिलांची संख्याही वाढलेली आहे. तरीही प्रगतीच्या संधी कितपत मिळतात असे विचारले असता तांत्रिक क्षेत्रातील फक्त ३१ टक्के महिलांनीच उत्कृष्ट संधी मिळत असल्याचे सांगितले. विविध कार्यक्षेत्रांत महिला दिसत असल्या तरी नेतृत्वाच्या किंवा निर्णय घेण्याच्या जागांवर किंवा मार्गदर्शक म्हणून महिलांना संधी आजही कमीच मिळत आहे. महिलांना ठरावीक भूमिकांमध्येच बघण्याचा पारंपरिक दृष्टीकोन संगीत क्षेत्रात आजही कायम असल्याच्या प्रतिक्रियाही देण्यात आल्या. मार्गदर्शकाचा अभाव हा मुद्दा या अभ्यासातून प्रामुख्याने समोर आला आहे. योग्य त्या मार्गदर्शकांच्या आणि समवयस्कांच्या पाठिंब्याच्या अभावामुळे काही समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे जवळपास ४० टक्के सहभागींनी सांगितले. तर संगीत क्षेत्रात महिलांना नेतृत्व आणि निर्णय घेण्याच्या प्रक्रियेच्या संधी अगदी मर्यादित प्रमाणातच मिळतात, असे ३९ टक्के महिलांचे म्हणणे आहे.
महिलांचे नेतृत्वामधील प्रतिनिधीत्व आणि जास्तीत जास्त संख्या हा करिअर वृध्दीसाठी महत्त्वाचा मुद्दा ठरत असल्याचे ६१ टक्के महिलांना वाटते. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत जास्तीत जास्त महिलांना संधी मिळाली पाहिजे असेही मत बहुसंख्य प्रतिनिधींनी नोंदवले आहे. विविध क्षेत्रांतील तसेच तांत्रिक क्षेत्रातील त्यांच्या कामांना मान्यता मिळावी, अशीही मागणी केली आहे.

करिअर म्हणून संगीत क्षेत्र निवडलेल्या महिलांच्या प्रगतीसाठी पोषक मुद्दे काय ठरू शकतात यावरही अभ्यासात विचार करण्यात आला होता. कामाच्या ठिकाणी अधिक सुरक्षित वातावरण निर्माण करणे तर गरजेच आहेच. पण अधिक मोकळेपणाने संवाद, कामाच्या बाबतीतील अभिप्राय तसेच सहकार्य मोकळेपणाने देणारी कामाची ठिकाणे निर्माण करणेही तितकेच गरजेचे आहे, असे या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. संगीत क्षेत्रातील क्रिएटीव्ह, प्रोडक्शन तसेच निर्णय प्रक्रियेतील महिलांचे प्रतिनीधीत्व आणि नेतृत्व अधिक वाढवणे, तसेच करियरच्या सर्वच टप्प्यांवर आवश्यक ते सहकार्य आणि योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी सहकार्य किंवा मार्गदर्शन गट निर्माण करणे महत्त्वाचे आहे.
७० टक्के महिलांना संगीत क्षेत्रात लैगिक छळाला सामोरे जावे लागले
भारतीय-अमेरिकन गायिक आणि गीतकार अमांडा सोधी यांनी देखील मध्यतरी भारतातील संगीत क्षेत्रात महिलांना होणाऱ्या लैंगिक छळाचा तपशील जाणून घेण्यासाठी एक देशव्यापी सर्वेक्षण केले. या क्षेत्रातील 100 हून अधिक महिलांच्या वाट्याला आलेले अनुभव त्यांना विचारले असता जे निकाल आले ते धक्कादायक आहेत.
69.52% महिलांनी सूचित केले की त्यांना अनेक प्रकारच्या लैंगिक छळाचा सामना करावा लागला आहे.
46.67% महिलांना चुकीच्या टिप्पण्यांच्या स्वरूपात लैंगिक छळाला सामोरे जावे लागले आहे.
44.76% महिलांना शरीराला वाईट स्पर्श/मांडीला थाप मारणे/मिठी मारणे/चुंबन घेणेया स्वरूपात लैंगिक छळाला सामोरे जावे लागले आहे.
21.91% महिलांना लोकांना लैंगिक अनुकूलतेच्या बदल्यात प्रस्तावित कामाच्या स्वरूपात लैंगिक छळाला सामोरे जावे लागले आहे.

या संदर्भात प्रख्यात ख्याल गायिका नीला भागवत म्हणतात की, प्राचीन पद्धतीने शिकण्यासाठी गुरू-शिष्याची परंपरेतील कठोरता टिकवून ठेवणे मुलभूत गरज आहे. मात्र, ही पद्धत शोषणाची सोपी पद्धत आहे हे आपण ओळखायला हवं. शिष्यानं गुरुला पूर्णपणे अधीन किंवा शरण व्हावं असं या परंपरेत अपेक्षित असतं. शिष्य पुरुष असेल तर शरण होण्याचं प्रमाण कमी असतं. शिष्य स्त्री असेल तर शरण होण्याचं प्रमाण जास्त असतं. यामुळेच स्त्री अधिक असुरक्षित होण्याची शक्यता असते,"
कर्नाटक संगीतातील प्रसिद्ध शास्त्रीय गायक टीएम कृष्णा तर म्हणतात की, गुरू-शिष्य परंपरा पूर्णपणे रद्द केली पाहिजे. इतर नात्यांप्रमाणेच गुरू-शिष्य नातंही अधिकाराच्या पातळीवर असमतोल असणारं आहे. पण धक्कादायक गोष्ट ही आहे की या असमानतेचं उदात्तीकरण केलं जातं."
(संदर्भ - लोकसत्ता)






