(जितेंद्र घाटगे)
पंखांचं काय झालं
याबाबत
मी कधीच काहीएक बोलत नाही
एवीतेवी ते काल्पनिकच
मी सांगत आलेय फक्त
उखडल्या गेलेल्या हातांविषयी
सतत
दोन-तीनवेळा ‘सैराट’ पाहिल्यानंतर लेखिका-कवयित्री कविता महाजन यांच्या या ओळी मनात रेंगाळत आहे. शो सुटल्यावर बऱ्याच वेळानं बायको बोलली, ‘’त्या पोराचं पुढे कसं होईल?’’ मला मात्र वेगळीच चिंता लागून राहिली होती. म्हणजे अजून पण आहे. ‘लंगड्या’ प्रदीप आणि ‘सल्याचं’ पुढं काय झालं असेल? सैराट रिलीज झाल्यापासून सर्वत्र परश्या आणि आर्चीची धूम चालू आहे. इलेक्ट्रॉनिक, सोशल मिडिया त्यांच्या कौतुकाने ओसंडून वाहत आहे. इंटरव्ह्यू, रिंकू राजगुरूचे शाळेतले मार्क, त्यांच्यावर व्हाट्सऍपला आलेले जोक... सगळंच महिनाभर तरी न संपणारं. ‘लंगड्या’ रूढार्थाने हिरो नाही. त्याला ना सिनेमात फुटेज मिळणार ना प्रत्यक्ष आयुष्यात…
खरं सांगायचं तर मला परश्याचा हेवा वाटतो. त्याच्या वाटेला आलेलं तो भारीच जगला. बुद्धी, शरीर, रूप ह्या बाबतीच नियतीनं परश्यावर मेहरबानी दाखवली होती. लंगड्या मात्र सर्वच बाबतीत कमनशिबी निघाला. हेच आयुष्य लंगड्याच्या वाटेला आलं असतं तर तो देखील असच भारी जगला नसता कशावरून! एका सिन मध्ये दुकानातल्या पोरीवर लाईन मारत असताना- लाईन मारणं हा शब्द खरं तर शोभत नाही तिथे.
हा केवळ आशाळभूतपणे पाहत असताना त्याच्या वाटेला तिने कापलेली नखं तेवढी येतात. हा गडी आपली लायकी समजून तिथेच कोसळून पडतो. थेटरभर हशा पिकतो. त्याचे मित्रही हसतात. लंगड्या काय रडायचं ते रडून घेतो आणि वेळीच सावरतो. उलट मित्रांनाच - जिंदगी कि यही रीत है, हार के बाद हि जीत है- असं साधं सरळ तत्वज्ञान सांगत ढुंगणावर हात ठेऊन समाधानी वृत्तीने निघून जातो. त्याच्या फेगड्या पायांवर प्रेक्षक वेळोवेळी दात काढायला विसरत नाही हे विशेष!
नागराजचा कास्टिंग सेन्स अफाट आहे. अगदी छोट्या छोट्या भूमिकांसाठी असणारी पात्रं खऱ्या आयुष्यातुन उडी मारून पडद्यात घुसली आहेत असं वाटतं! लंगड्या प्रदीपच्या भूमिकेत फिट्ट बसणारा तानाजी गालगुंडे त्याला कसा गावला त्यालाच माहित. मित्राच्या भूमिकेतला एवढा माणसाळलेला दोस्त मी अजूनपर्यंत आपल्याकडच्या सिनेमात पाहिलेला नाही. सैराटने झपाटलेली जनता परश्या-आर्ची वर पाने खरडु खरडु लिहित आहे. सिनेमातल्या त्यांच्या शोकांतिकेबद्दल आणि पडद्याबाहेरील आयुष्यातबद्दल सुद्धा. लंगड्या प्रदीप साठी कुणी लिहणार नाही, ना त्याची भूमिका जगणाऱ्या तानाजी गालगुंडेबद्दल.
लंगड्या प्रदीप सारखे जीवाला जीव देणारे मित्र आपल्याला भेटलेले असतातच की… कधीतरी आपणच कुणासाठी प्रदीप झालेलो असतो. परश्याला जे देखणं रूप, शरीर, बुद्धी मिळाली त्यातलं प्रदीपला काहीच नाही मिळालं. फेंगडे पाय तेवढे मिळाले. रंगाने काळा-सावळा. उंची जेमतेम. त्यात शर्ट-पँट दोघं आखूड. कॉलर टाईट करायला शर्ट वर करतो तेव्हा पँट अगोदरच खाली असल्यामुळे वर आलेली चड्डी आणखीन चमकते. आपापल्या चड्डीला किती भोकं असतात हे ज्याचं त्याला चांगलं माहित असतं.
लंगड्या प्रदीपच्या चड्डीलाही भोक आहे. भोक कसलं, भगदाडच भलं मोठं. पोरीसमोर जरी भोक लपवत चालताना दाखवला असला तरी मित्रांसोबत तो बिलकुल लाजत नाही. आपल्याला आवडणाऱ्या मुलीसमोर गुटखा मागायला, खायला तो लाजत नाही. ती दुकानदारीण लंगड्याला पटण्याची सुतराम शक्यता नव्हती. जर कधी त्याचं सुत जुळलं असते तरी हा बिनधास्त घरात फाटक्या अंडरपैंटवर फिरला असता. पोरीला भेटायला जायचं म्हणून अंघोळ करुन नवीन शर्ट घालून तर कधीच गेला नसता.
परश्यापेक्षा लंगड्या प्रदीप मला जवळचा, एकदम खरा वाटतो तो यामुळेच. ह्या परश्या-लंगड्याची जोडी मला थोडी श्रीकृष्ण-पेंद्या सारखी वाटते. परश्याच्या आयुष्याचा शेवट थोडा अनपेक्षितपणे झाला. तसा तो कुठल्याही परिस्थितीत समर्थनीय नसला तरी जेवढं तो जगला भारीच जगला. परश्याच्या वाटेला आलेलं आयुष्य लंगड्याच्या वाटेला आलं असत तर तोही तितक्याच समर्थपणे जगला नसता कशावरून? त्याच्यासारखा सामान्य माणूस एखाद्या गोष्टीत हिरो म्हणून कधीच गणला जाणार नाही. जसं महाभारतातल्या एकूण एक पात्रांवर चरित्रे लिहून झाली असली तरी पेंद्या कुठल्याच कथा-कादंबरीचा हिरो होऊ शकत नाही. शरीरात ठिकठिकाणी वाकडा असलेला पेंद्या आणि फेगडया प्रदीप या दोघांनाही ही गोष्ट पक्की लक्षात आली आहे. 
शरीरात व्यंग असलं तरी मित्र म्हणून प्रदीप परिपूर्ण आहे. परश्याला स्वतः इतका आनंद होत नसेल तितका प्रदीपला मित्राच्या छोट्या मोठ्या गोष्टीसाठी होतो. आर्ची वर्गात एकटक परश्याकडे बघत असताना प्रदीपच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहा. हा डायरेक्ट सातवे आसमान पे असतो. वर्गातून बाहेर आल्यावर हा जेवढा खुश होतो तेवढा तर तो त्या पुडीत मिळणाऱ्या नखांऐवजी लव्ह लेटर मिळलं असतं तरी नसता झाला! आर्चीला लेटर देण्यासाठी त्या लहान पोराला पटवतात तेव्हा विदाउट क्रीमची बिस्कीटं खाणारा त्याचा निर्विकार चेहरा आठवा. तिला शेतात भेटायला जाताना ट्रेन येण्याअगोदर केलेला भन्नाट डान्स आठवा. प्रत्यक्षातले दोस्त याहून वेगळे असतात काय?
हा लंगड्या जेवढा परश्याचा जिवलग मित्र आहे, तेवढा परश्या मात्र लंगड्याचा नाही. आर्ची विहिरीवर आलीय हे सांगण्यासाठी लंगड्या प्रदीप उघडाबंब पळत ओरडत सुटतो. तसं परश्याने कधी केलं असत असं वाटत नाही. आर्चीशी त्याची ओळख करून देताना सुद्धा – हे लंगडं व्हय – असं हिणवल्यासारखं हसतो. पळून गेल्यानंतर सल्याचा नातेवाईक त्यांना विचारतो – ‘ह्याचं ठीक आहे ह्याचं प्रेम आहे एकमेकांवर. तुम्ही का पळताएत? असच?’ ह्यांच्या कडे उत्तर नाहीत. असली तरी त्यांना द्यायची गरज वाटत नाही. परत मागे फिरून जाण्याचा पर्याय असताना सुद्धा दोस्ताची साथ हे सोडत नाही.
ज्याच्याकडे गेल्यावर फक्त चल म्हटल्यावर- कुठे जायचं, कशाला जायचं, कधी परत यायचं - असं काहीच न विचारता सरळ आपल्यासोबत येतो, अशा मित्राची आपल्याला किती गरज असते हे ज्याचं त्याला चांगलं च माहित असतं. ऐन उमेदीचा किती मोठा काळ अशा मित्रासोबत घालवलेला असतो. लंगड्या प्रदीप हा परश्याला भेटलेला यार होता.
सैराट परत पाहिला तेव्हा इंटर्वल नंतर- इंटर्वल कसला- वेगळा संसारात गुरफटल्यानंतर परश्याला दोस्तांची कधीच आठवण येत नाही. सगळं मार्गी लागल्यानंतर सुद्धा मित्राचं पुढं काय झालं असेल याची साधी चौकशी सुद्धा त्याला करावीशी वाटली नाही. मला त्या दिवशी लंगड्या प्रदीप एकदम हमदर्द वाटला. पडद्यात घुसून त्याला भेटता आलं असतं तर गळ्यात पडून मनसोक्त रडलो असतो. सिनेमा दुसऱ्यांदा पाहताना ही जाणीव जास्त तीव्रतेने होत होती.
मागे कुठल्यातरी सायन्टिस्टची थेअरी वाचली होती की आपण बोललेले शब्द हवेत विरुन जात नाही. ते कायम वातावरणात घुमत असतात. खरं खोटं त्यालाच माहित. पण माझी स्वतःपुरती एक थिअरी आहे. सिनेमात दाखवलेली पात्रं सिनेमा संपला तरी पडद्याच्या आत त्यांचं पुढचं आयुष्य जगत असतात.
त्या नार्नियात नाही का, आरशात, एखाद्या फ्रेममध्ये घुसुन त्या जगात जगता येतं. अगदी तसच. परश्या-आर्ची तर गेलीए पण लंगड्या-सल्या अजून कुठेतरी असतील की भटकत…? काय झालं असेल लंगड्याचं पुढे? नखांच्या ऐवजी कधी कुणाचे चार प्रेमाचे शब्द आले असतील का? ट्रेनचा रूळ ओलांडताना अजून पण नाचतो का? का जुंपलाय तोही रहाटगाड्याला? सुधारलाय, चड्डीचे भगदाड झाले असतील गायब!
जाऊद्या. हे जरा जास्तच भाबडं होतय. पाटलाच्या पोरानं काय त्याला थोडच जित्ता सोडलं असेल!! सोडलं असलं तर पस्तावल भाड्या. लंगड्याला परश्या-आर्चीचं समजल्यावर फेंगडा पाय प्रिन्सच्या पार्श्वभागात घातल्याशिवाय तो राहणार नाही.
(जितेंद्र घाटगे हे सिने अभ्यासक आणि ब्लॉगर आहेत. हा लेख त्यांनी सैराट प्रदर्शित झाल्यानंतर 2016 साली लिहिला होता.)





