मुकेश भावसार
- कोण होती सीमॉन द बोव्हा जिच्या पुस्तकाने जगभर खळबळ माजली होती?
- वयाच्या १४ वर्षीच सीमॉन vs स्वत:ला नास्तिक का घोषित केलं?
- ‘द सेकंड सेक्स’ हे पुस्तक स्त्रीवादावरचं बायबल का समजलं जातं…?
स्त्रीवादी विचारांची सुटसुटीत मांडणी करण्यात अग्रेसर असलेल्या फ्रेंच लेखिका सीमॉन द बोव्हाची कालच ( 9 जानेवारी) जयंती होती. मला सिमोन एका लेखात भेटली. तेव्हापासून ती आणि तिचा 50 वर्ष पार्टनर राहिलेला सात्र यांची जोडी माझी फेवरेट झाली. स्त्रीवादाची (feminism) ओळख करून देणारी ही लेखिका भन्नाट आहे, हे कळायला तीच ‘सेकंड सेक्स’ पुस्तक वाचलं पाहिजे. त्या काळी फ्रान्समधे फर्स्ट म्हणजेच पहिलं सेक्स किंवा लिंग म्हणून पुरुषांना मान होता आणि सेकंड किंवा दुय्यम सेक्स म्हणजे बाई असं ते समीकरण होतं.
वयाच्या १४ वर्षीच स्वत:ला नास्तिक घोषित केलं…
9 जानेवारी 1908 ला पॅरिस मधे कॅथलिक घरात जन्मलेली सिमोन वयाच्या एकविसाव्या वर्षी तत्वज्ञानाची पदवी घेऊन बाहेर पडणारी सगळ्यात तरुण व्यक्ती होती. तिने वयाच्या 14 व्या वर्षीच स्वतःला नास्तिक घोषित केलं होतं आणि गणित, तत्वज्ञान आणि साहित्याचा अभ्यास सुरू केला होता. त्यावेळी यूनिवर्सिटीमधे तिचा पुढे पार्टनर बनलेला ‘सात्र’ पहिला येतो आणि ती दुसरी. परंतु दोघांचा तात्विक अभ्यास पाहता असं म्हणतात की ती स्त्री नसती तर नक्कीच पहिली आली असती. सात्र त्याच्या जागी मोठा आहेच. त्याला पुढे नोबेल मिळतं… ते तो नाकारतो आणि बरंच काही आहे पण ते नंतर बोलू… आजचा दिवस सिमोनचा आहे.
पुरुषांबरोबरच स्त्रियांनाही समान अधिकार असावा यासाठी स्त्रियांची झालेली चळवळ पाश्चात्त्य जगात एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात सुरू झाली. स्त्रियांचे स्वातंत्र्य, त्यांचे शिक्षण, त्यांचे स्वतःचे खास प्रश्न, पुरुषप्रधान समाजव्यवस्थेपासून त्यांना हवी असणारी मुक्ती, त्यांचा सामाजिक-सांस्कृतिक प्रक्रियेमधील सहभाग, मतदानाचा अधिकार यांविषयीचे विचारमंथन त्यानंतर सुरू झाले. त्यातूनच विसाव्या शतकातील स्त्रीवादी विचारसरणीचा जन्म झाला. आपल्या अभ्यासपूर्ण लेखातून त्यावेळच्या अनेक विचारवंतांची विचार करायची पद्धत आणि विचार सिमोनने मोडीत काढले.
स्त्रीचं अस्तित्व आणि जगणं समाजाच्या आणि पुरुषप्रधान संस्कृतीच्या मान्यतेवर (validation) अवलंबून असणं तिला पटत नव्हतं. दांडगा अभ्यास आणि लिखाण चांगलं असूनही सुरवातीला त्यावेळच्या अनेक पुरुष विचारवंतांनी तिच्याकडे सपशेल दुर्लक्ष केलं हे ऐकून अजिबात आश्चर्य वाटत नाही. त्याकाळी प्रचलित पुरुषप्रधान तत्वचिंतकांनी सर्जनशीलतेचा मक्ताही पुरुषांनाच देऊन टाकलेला होता. याच विचारवंतांची रि ओढणारे अनेक अविचारवंत आजही सापडतील.
‘सेकंड सेक्स’ या पुस्तकाने जगभरात खळबळ
सिमोनने 1949 मधे लिहलेल्या ‘सेकंड सेक्स’ या पुस्तकात मांडलेल्या विचारांनी तेव्हापासून जी खळबळ उडाली ती अजून शांत व्हायची आहे. स्त्रीकडे दुय्यम सेक्स किंवा वस्तु (object) म्हणून बघितल्या जाण्याचा इतिहास काय आहे याचा ती या पुस्तकात शोध घेते. प्रत्येक स्त्रीने पत्नी व माता होण्याआधी एक पूर्ण विकसित व्यक्ती बनले पाहिजे असं तिचं ठाम मत होतं.
‘द सेकंड सेक्स’ या पुस्तकात सिमोनने स्त्रीवादाचं अस्तित्ववादाच्या दृष्टिकोनातून सखोल विश्लेषण केलंय. स्त्रीच्या दुय्यमत्वाची इतक्या विविध अंगानी चर्चा तिच्या अगोदर व तिच्यानंतरही कोणीच केलेली नाही. केवळ स्त्रीच नाही, तर प्राणी जगतातील नर-मादी हा जीवशास्त्रीय फरकसुध्दा एका टप्प्यावर कसा धुसर होत जातो, याचे विश्लेषण करत करत सिमोन माणसातील नर-मादी या दोन वर्गाचा शारीरिक, मानसिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक अंगांनी ज्या सखोलतेने उहापोह करते, त्याने आपण स्तिमित होतो. आज ‘द सेकंड सेक्स’ हे पुस्तक स्त्रीवादावरचे बायबल समजले जाते.
“One is not born, but rather becomes, a woman” (स्त्री जन्मत नाही तर घडवली जाते)
सिमोन म्हणते की “जोवर स्त्रियांमध्ये आत्मभान येत नाही तोवर शाश्वत सुख काय असतं हे त्यांना उमजणार नाही”. स्त्री पुरुष समानता आणि स्वातंत्र्याचा पुरस्कार करताना ती म्हणते की “प्रत्येक व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचे अस्तित्व स्वतःच्या अस्तित्वाइतकेच मान्य केले पाहिजे”. ही बाई माझा नवरा मला पूर्ण स्वातंत्र्य ‘देतो’ याच्या पुढे जायचं बोलते आहे. स्वातंत्र्याच्या नावावर वाट्टेल तसं वागणं किंवा सुडबुद्धीने स्वैर वागणं इतकं उथळ नाहीये ते.
सिमोन म्हणते की, धर्म, कायदा, शिक्षण, विज्ञान, तत्त्वज्ञान या सर्वच क्षेत्रांमध्ये पुरुषप्रधान व पुरुष-केंद्री विचारचौकटीने स्त्रीकडे अभाववादी वा न्यूनतावादी दृष्टिकोणातून पाहिलेले आहे. या चौकटीत मानवाचे केवळ सत्त्व किंवा त्याचा ‘ स्व ’ (द वन ) हा पुरुषच असतो व स्त्री ही नेहमी ‘ पर ’ (द अदर) असते किंवा मानवी सत्त्वाचा केंद्रबिंदू पुरुष असतो, तर स्त्री ही नेहमी परिघावर असते. स्त्रीत्व म्हणून जे काही नैसर्गिक गुणधर्म मानले जातात, ते खरे पाहता पुरुषप्रधान समाजाने स्त्रीच्या माथी मारलेले असतात.
स्त्रीची भूमिका ही वस्तुतः समाजाने निश्चित केलेली असते व तीच ‘ नैसर्गिक ’ म्हणून स्त्रियांच्याही गळी उतरविली जाते. ही विचारचौकट सामाजिक जाणिवेत इतकी खोलवर रुजलेली आहे, की स्वतः स्त्रियांनीही ती आपलीशी केलेली आहे व त्यांनाही ती नैसर्गिक वाटलेली आहे, असे बोव्हारचे म्हणणे आहे. म्हणूनच पुढे ती म्हणते की जन्मतःच कोणी स्त्री असत नाही ‘ स्त्रीत्व ’ हे समाजाने, संस्कृतीने घडविलेले असते. म्हणूनच “आमची सून/मुलगी हुशार आहे, ती ऑफिसला तर जातेच पण घरातले सगळे कामंदेखील करते” यात काय गेम होतो आहे ते समजून घ्या.
‘द सेकंड सेक्स’ हे पुस्तक स्त्रीवादावरचं बायबल समजलं जातं…
सिमोनची सैद्धांतीकरणाची ताकद एवढी जबरदस्त आहे की, सेकंड सेक्स वाचलेली व्यक्ती; मग ती स्त्री असो, वा पुरुष, एका निराळ्या (आणि अधिक स्वच्छ) नजरेने स्वतःकडे आणि भिन्नलिंगी व्यक्तीकडे बघून लागते. आज काही लिंगभेद न मानणारे, घरातलं काम फक्त ‘बायकोला मदत’ म्हणून न करता आपली जबाबदारी म्हणून करणारे पुरुष सुद्धा आहेतच. परंतु या दुर्मिळ पुरुष प्रजातीला अनेकदा ‘बायकोच ऐकतो, बायकोला डोक्यावर बसवून ठेवलं आहे’ या शब्दांनी टोचून बोललं जातं हे त्यांचं दुर्दैव आहे.
तरी ते फक्त स्त्री-पुरुष समानताच मानत नाहीत तर स्त्रीचा एक व्यक्ती म्हणून आदर देखील करतात. बाईचा जन्म जसा कठीण असतो म्हणतात तसं विचारी आणि संवेदनशील पुरुष बनून राहणं हे काही खायच काम नाही. आपल्या आजूबाजूला असे पुरुष नाहीत असं वाटत असेल तर आपण कश्या लोकांसोबत राहतोय याबद्दल विचार करायची वेळ अजून गेलेली नाही!
वर्गलढा हा स्त्रियांच्या लढ्यापेक्षा अधिक मूलभूत स्वरूपाचा असतो आणि मानवी समतेवर आधारलेली समाजवादी राज्यपद्धती एकदा आली, की स्त्रियांच्या समस्या आपोआपच सुटतील आणि स्त्रीवादी भूमिकेची गरज राहणार नाही, असा विश्वास त्या वेळी बोव्हारला वाटत होता. त्यामुळेच तिने स्वतःला स्त्रीवादी न म्हणविता समाजवादी म्हणविले परंतु १९७२ मध्ये तिने स्त्रीमुक्ती संघटनेचे सदस्यत्व स्वीकारून स्वतःला स्त्रीवादी म्हणून घोषित केले. समाजवादाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्याआधीच स्त्रियांच्या मुक्तीची चळवळ स्वतंत्रपणे उभी केली पाहिजे अशी जाणीव तिला बहुदा झाली असावी.
काम करत असताना अनेक चित्रविचित्र लोकं भेटतात. एकदा काही जागांसाठी एका कंपनीत HR म्हणून इंटरव्ह्यु घेत असतांना एक व्हीपी लेवलचा माणूस मला चक्क मुलींचे लग्नाचे प्लॅन आहेत का असं विचार म्हणाला होता. 1-2 वर्ष आधी लग्न झालेल्या मुली (6 महीने maternity ची सुट्टी द्यावी लागते म्हणून) माझ्याकडे इंटरव्ह्युला पाठवू नको असंही म्हणाला होता. अश्या बॉसने women’s day ला चॉकलेट्स दिल्यामुळे हुरळून जायचे दिवस गेले आता.
अनेक जण म्हणतात की स्त्री समजून घ्यायची असेल तर पुरुषांनी सिमोनला वाचलं पाहिजे. मी म्हणेन की स्त्रियाना आपलं स्त्री असणं नीट समजून घ्यायला आणि त्याचा सर्वप्रथम स्वतः आदर करायला हवा असेल तर त्यांनीही सिमोनला वाचलं पाहिजे! जगभर गाजलेलं ‘सेकंड सेक्स’ पुस्तक मराठीत देखील उपलब्ध आहे. ते वाचणं ही सिमोन समजून घेतांना एक चांगली सुरवात असू शकते. परिस्थिती थोडी बदललेली असली तरी 70 वर्ष आधी तिने पुस्तकात मांडलेली गृहीतके आजही लागू होतात.






