मृग नक्षत्र तोंडावर आलं होतं. जुव्वी गावात ‘नोमाळ' पाळला होता. नोमाळ म्हणे त्या दिवशी कुणीही झाड तोडायचं नाही, गावातून जायचं नाही, जमिनीचे व्यवहार करायचे नाहीत. गावात एकच गलका पडला होता. सगळ्या स्त्रिया गोटूलमध्ये जमल्या होत्या. पेरमांची कथा रंगात आली होती. जंगलात बिजाईची पूजा करून सर्व पुरुषांनी गावात प्रवेश केला. ‘तीर्रर्र पुढे'चा जयघोष आसमंतात दुमदुमला.
स्त्रियांनी गाणी म्हणत त्यांचं स्वागत केलं. मुलींनी गोटुलसमोर बांधलेल्या तोरणाला स्पर्श करण्यासाठी प्रत्येक जण उड्या मारू लागला. स्त्रियांच्या प्रसादाचा वाटा त्यांच्या सुपूर्त करण्यात आला. तो त्यांनी गोटूलमध्ये शिजवला. पुरुषांनी त्यांचा प्रसाद जंगलात जाऊन शिजवला. जंगलात एकच दरवळ पसरली होती आणि आसमंतात उत्साह…
हा उत्सव होता ‘विजापंडूम'चा. विजा पंडूम म्हणजे बिजाचा उत्सव. विजा पंडूम झाला की इथला प्रत्येक आदिवासी आपापल्या शेतात धानाची म्हणजे भाताची पेरणी करतात. माडिया आणि गोंड आदिवासींमध्ये विजा पंडूम हा अत्यंत महत्त्वाचा उत्सव... बिजोत्सवच. निसर्ग आणि माणूस यांचं आदिम नातं अधोरेखित करणारा. विशेष म्हणजे, जमीनरुपी योनीचं पूजन करणारा. माडिया भाषेत 'तीर्रर्र' म्हणजे जय हो आणि 'पुढे' म्हणजे योनी.
योनीतून, जमिनीतून नवीन जिवाची निर्मिती होते म्हणून हा ‘विजा पंडूम'. निसर्गपूजक आदिवासी संस्कृतीचा दाखला देणारा…. गावचे पेरमा (धार्मिक पूजा विधी करणारा व्यक्ती), गायता (गावाचा मुखिया), कोतला (गावातील माहितीचा प्रचार आणि प्रसार करणारा व्यक्ती) या पारंपरिक प्रमुखांच्या नेतृत्वाखाली हा उत्सव साजरा केला जातो.
गेल्या अनेक शतकांपासूनची महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यातील माडिया आदिवासी समाजाची ‘विजा पंडूम’ सण साजरा करण्याची ही परंपरा अलीकडच्या काही वर्षांत उशीराने होत आहे. जोपर्यंत त्याची विधिवत पूजा होत नाही तोपर्यंत आदिवासी आपल्या शेतात बीज रोवत नाही की पेरणी करत नाही. आणि जोपर्यंत पहिला पाऊस पडत नाही तोपर्यंत आदिवासी ‘विजा पंडूम’ हा सण साजरा करत नाहीत.
इथेच गेल्या काही वर्षांपासून आदिवासींच्या या सणाचे वेळापत्रक पदलत चाललयं. विजा पंडूम सण साजरा करण्यासाठी कॅलेंडरवर कोणती तारीख निश्चित नसते, पावसाच्या आगमनावर तो सण अवलंबून असतो. गेल्या काही वर्षांपासून गडचिरोलीतील पावसाचे ऋतुचक्र पार कोलमडून गेल्याने, मृग नक्षत्रात पाऊसच पडत नसल्याकारणाने आदिवासींच्या जगण्याचे संदर्भही बदलू लागलेत.
माडिया आदिवासींचे सण गेले लांबणीवर
गडचिरोलीचे माडिया आदिवासी वर्षभरात असे अनेक ‘पंडुम’ साजरे करतात, अशी माहिती भामरागड तालुक्यातील कोठी गावच्या प्रेमीला लेखामी देतात. त्या सांगतात की, इथे प्रत्येक सण एका देवतेच्या नावानं असतो, जी इथल्या जंगलांचं, नदी, कुरणं यांचं रक्षण करते. 'नवा पंडुम' हा माडिया आदिवासींचा आणखी एक उत्सव… पीक आल्यानंतर 'नवा पंडुम' हा उत्सव आदिवासींमध्ये कुळपातळीवर साजरा केला जातो. 'नवा पंडुम' म्हणजे शेतात आलेल्या धान्याची पूजा करणे. पूजा केल्याशिवाय घरामध्ये ते धान्य वापरले जात नाही.
उन्हाळ्यामध्ये दोन पंडुम महत्वाचे आहेत. एक म्हणजे 'मरका पंडुम' आणि दुसरा 'बुरींग पंडुम'. 'मरका पंडुम' हा आंब्यांशी संबंधित आहे. झाडाला आंबे लागले की आंबे खाण्याआधी त्या आंब्यांची पूजा केली जाते म्हणजेच 'मरका पंडुम'. 'बुरींग पंडुम' मोहाच्या फुलांशी संबंधित आहे. जेव्हा मोहाच्या झाडाला फुले येतात तेव्हा ती मोहाची फुले खाली पडल्यावर वाळू घालायची आणि ती फुलं खाण्याआधी आणि त्या फुलाची दारू बनवण्याआधी त्याची जी पूजा केली जाते ते 'बुरींग पंडुम'....
याशिवाय आम, पोरा पंडुम, पुंगाअ कच्ची, कोड अचना, एरक कच्ची, पिंड पंडुम, भूमिया कोडी, दोआड आणि बीमाना मंडा अशा काही आदिवासी सण आणि परंपरा आहेत, अशी माहिती प्रेमीला लेखामी देतात.
आदिवासींचे वरील सर्व सण-उत्सव हे पिकांशी आणि जमिनींशी संबंधित आहे. मात्र, दिवसेंदिवस हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत असल्याकारणाने त्या बदलाचा परिणाम आदिवासींच्या सण -उत्सवांवर होतोय. हवामान बदलामुळे ऋतुचक्र बिघडत चाललंय.. ठरलेल्या वेळेत पाऊस न येता उशीरा येतो त्यामुळं पेरणीला उशीर होतो.. आणि त्यामुळे हा सण उशिरा साजरा केला जातो.
कधी तर अवकाळी पावसामुळे पिकांचे बरेच नुकसान होते... झाडाचे आंबे पडून जातात, किंवा मोहाची फुलेच गळून पडतात त्यामुळे बऱ्याचदा पंडुम साजरे केले जात नाहीत... पंडुम असला की, पाड्यातील सर्व लोकं एकत्र येतात पण आता असे खूप कमी प्रमाणात व्हायला लागलयं.
जी परिस्थिती आदिवासी सणांच्याबाबतीत दिसून येतेय तशीच परिस्थिती आता गडचिरोलीच्या शेतीमध्येही दिसून यायला लागलीये. हवामान बदल आदिवासींच्या पारंपरिक शेतीतही बदल घडवून आणतोय..
निसर्गपुरक पेंदा-पडका शेती कालबाह्य झाली…
आदिवासी समाज हा शेती करणारा समाज नव्हताच. नागरी समाजाच्या संपर्कात आल्यावर तो शेती करायला लागला. माडिया समुदाय हा तर ‘हंटींग अँण्ड गँदरिंग’ म्हणजे शिकार करणं आणि कंदमुळं गोळा करणं असा जंगलावर उपजीविका असलेला समाज. पुढे हा समाज शेती करू लागला खरा, परंतु त्यातही सपाटीवरील एकसुरी, परावलंबी आणि पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या शेतीपेक्षा आदिवासींची शेती आणि त्यास जोडलेली संस्कृती खूप वेगळी आणि वैविध्यपूर्ण आहे. 
जंगल हेच आदिवासींचे पहिले शेत. आदिवासींनी शेतीची सुरुवात केली तीच जंगलातील स्थलांतरित पद्धतीची. अगदी आताआतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित शेती केली जायची. वनाधिकार कायदा आल्यानंतरच शेतीच्या हक्काचे पट्टे तयार झाले. जंगल आणि पर्यावरण याचे अत्यंत संतुलन साधणारी स्थलांतरित शेती पहाडीतील गावांमध्ये केली जायची. आजही काही ठिकाणी अशाप्रकारची शेती केली जाते म्हणा… पहाडातील स्थलांतरित शेतीला माडिया भाषेत "पेंदा' म्हणतात, तर पठारावरील स्थीर शेतीला "पडका'.
भामरागडचे लालसू नागोटी ‘बाईमाणूस’शी बोलताना आदिवासींच्या शेती पद्धतीतील फरक समजावून सांगितले. ते म्हणाले की, ‘पेंदा’ पद्धतीत आदिवासी कुटुंब पहाडावरील एक तुकडा निवडतो, तेथील जंंगल छाटून, जाळून शेतीसाठी जमीन तयार करतो. यात कोणतीही अवजारे वापरली जात नाहीत, अगदी नांगरही नाही. त्यामुळे पती-पत्नी दोघे हाताने जेवढी जमीन तयार करू शकतील तेवढीच करतात.
विशेषत: दोन-तीन वर्ष तो तुकडा कसतात आणि चौथ्या वर्षी ती जमीन सोडून देऊन पहाडीचा दुसरा तुकडा निवडतात. तिथे पुन्हा पहिल्याप्रमाणे नव्याने मशागत. पुन्हा दोन-तीन वर्ष हा पट्टा कसून तिसरा तुकडा तयार करतात. त्यामुळे एकावेळी एका तुकड्यावर ते शेती करीत असताना पहाडीच्या उरलेल्या भागात दहा-बारा वर्षात पूर्ववत जंगल उभं राहात असतं. ‘पेंदा’ पद्धतीच्या या शेतामुळे फक्त जंगलच नाही तर शेतीचाही समतोल राखला जातो.
आदिवासींच्या शेतीचा दुसरा प्रकार म्हणजे "पडका'. पहाडीहून खालच्या परिसरात पडका शेती केली जाते. पहाडाखालील स्थीर - पडका शेती करू लागलेल्या आदिवासींनी सागवान, हिरड्याच्या लाकडांपासून नांगर तयार केले. बिगर आदिवासींची शेती बघून ते ही आता भाताची पेरणी, लावणी करू लागले.
आदिवासी शेतीचा तिसरा प्रकार आहे तो 'वेटूळ' म्हणजे घराभोवतीची वाडी. प्रत्येक आदिवासी घराभोवती वेटूळ असते. परसबागेपेक्षा मोठी आणि पडक्यापेक्षा लहान अशी ही शेती. यात मका, काकडी, भोपळा, भेंडी याची शेती केली जाते. वेटूळमध्ये धान्याशिवाय अन्य भाज्या, वनस्पती लावल्या जातात.
शेतीचा चौथा प्रकार म्हणजे चेलका. म्हणजे नदीच्या काठावर केली जाणारी शेती. ही रब्बी हंंगामातील शेती आहे. पावसाळ्यात वाहून आलेल्या नदीपात्रातील कसदार गाळावर चेलक्यात डाळी पिकवल्या जातात.
शेतीच्या या चारही पद्धती आता बदलत चालल्या आहेत. आदिवासींची शेती संस्कृती समजून न घेता, पठडीबंद सरकारी योजना त्यांच्यावर लादण्यात आल्या. त्यामुळे आदिवासींची पारंपरिक शेती मागे पडली आणि तथाकथित ‘प्रगत' शेती पसरली. पारंपरिक शेती मागे पडली आणि परावलंबी तोट्याची, कर्जबाजारी शेती आदिवासींच्या माथ्यावर मारली गेली. आदिवासींची मूळ शेती ही पावसाच्या पाण्यावर आणि ऋतुचक्रावर अवलंबून होती. पण आता बिघडत चाललेल्या ऋतुचक्रामुळे आदिवासींच्या या शेतीपद्धतीचं गणितंच चुकत चाललंय.
‘फॉरेस्ट कॉमन्स’ आणि हवामान बदल
गडचिरोलीमध्ये ‘फॉरेस्ट कॉमन्स’ शतकांपासून वस्तीच्या सीमा निश्चित करत आहेत. लोकांच्या दैनंदिन जगण्याशी, सांस्कृतिक जीवनाशी त्यांचा जवळचा संबंध आहे. ‘फॉरेस्ट कॉमन्स’ अशा असंरक्षित जंगलांना म्हणतात, ज्याची निगराणी स्थानिक आदिवासी समूह करतात. आपल्या जगण्यासाठी, संस्कृतीसाठी, अन्नासाठी ते यावर अवलंबून असतात. यात आता घसरण होत आहे. वाढती लोकसंख्या, जंगलतोड, विकास योजना यांच्यासोबतच हवामान बदलही याला कारणीभूत ठरताहेत. एप्रिल महिन्यात इथे उष्णतेची लाट आली होती. तापमान 45 अंशांवर पोहोचलं होतं जी इथल्या वातावरणात असामान्य बाब होती. फॉरेस्ट कॉमन्समध्ये नेहमीच जमिनीच्या स्पष्ट आणि विस्कळीत हक्कांवरून अतिक्रमणाचा धोका असतो.
दुसरीकडे अनियमित पाऊस, गरमी यामुळेही त्याचं नुकसान होतंय. त्याचा थेट परिणाम आदिवासींच्या उत्पनावर पडतोय कारण त्यांचं जगणं कॉमन्सवरच अवलंबून असतं. आदिवासींमध्ये ‘फॉरेस्ट कॉमन्स’ ही संकल्पना पूर्वापार पासून चालत आलेली आहे. जंगलातील बांबू असो, लाकूड असो, वनस्पती असो, त्यांचे संरक्षण आणि व्यवस्थापन आदिवासी हे सामूहिकपणाने करतात. यामध्ये 'नाटोरा पोलम' (सामूहिकरीत्या शेती करणं) आणि डोहातील नदी-नाल्यातील मासे पकडणं ही आलं.
लालसू नागोटी सांगतात की, चांगलं पिक यावं यासाठी प्रत्येक मोसमात त्या त्या देवतेला ते ते पिक अर्पण केलं जातं.कोणाला कधी काय द्यायचं हे निश्चित असतं. यातील बहुतांश गोष्टी फॉरेस्ट कॉमन्समधून मिळतात. प्रत्येकजण आपल्या वाट्यापेक्षा जास्त घेत नाही. ही वनसंपत्ती संपू नये यासाठी अशा परंपरा पाळणं गरजेचं आहे.”
आदिवासी समाज हा सुरुवातीपासूनच समूहाने आयुष्य जगत आलाय. सामुदायिकरित्या जे काही उत्पन्न मिळायचं ते सर्वांमध्ये वाटलं जायचं. पण 'फॉरेस्ट कॉमन्स' ही संकल्पना आता काळानुसार लोप पावत चालली आहे. आता नवीन पिढी 'सीएफआर' (community forest right) कडे दुर्लक्ष करून 'आयएफआर' (Individual forest right) कडे वळायला लागलीये. हे आदिवासींच्या पुढील पिढ्यांसाठी खूप चिंताजनक आहे.
आदिवासी महिलांच निसर्गाचे खरे रक्षक
सर्व उत्सव, परंपरा यांची जबाबदारी स्थानिक समितीवर असली तरीही, जंगलातील दैनंदिन निगराणीची जबाबदारी बायकांवर असते, ज्या वनोत्पादन गोळा करण्यात पुढे असतात. हलवेर गावच्या राजश्री लेखामी सांगतात की, “पुरुषांच्या तुलनेत बायकांना वनसंपत्तीची देखभाल कशी करावी हे माहिती असतं. जंगलातील फळं गोळा करणं असेल किंवा फुलं वेचणं असेल ही कामे आदिवासी महिला प्रामुख्याने करतात.
ही कामं महिला करत असल्याकारणाने त्या आवश्यक तेवढंच जंगलातून आणत असत. पण ही कामं जर पुरुषाकडे असती तर, त्याने कुऱ्हाड नेऊन मोहाच्या फुलाचं असेल किंवा चारोळीचं असेल झाडचं तोडून आणलं असतं. पण, आदिवासी महिला ह्या त्यांच्या पद्धतीने आवश्यक तितकाच जंगलातून आणतात त्यामुळे जंगलाचं व्यवस्थापन आणि रक्षण ही जबाबदारी चोखपणे पार पडली जाते.
राजश्री लेखामी म्हणतात,’’आमच्याकडे पूर्वी असे म्हणायचे की आदिवासी महिला चुलीवर पाणी गरम करायला ठेवायच्या आणि जंगलात वास्ते (बाम्बू शूट्स) आणायला जायच्या. म्हणजे दहा ते पंधरा मिनिटात त्या घरी येऊन लगेच भाजी करायला घ्यायच्या. पण आता तशी स्थिती नाहीये. कारण आधी घराच्या शेजारीच बांबूचे झाडं असायचं. आता जंगलात क्वचितच बांबूचे झाड मिळतात.
आधी रस्त्यांनी चालतांनाही बांबूचे झाड दिसायचे पण आता रस्त्याच्या बाजूला बांबूचं दिसत नाही. बांबूची भूमिका आदिवासींच्या जीवनात फार महत्वाची आहे. मग ते जेवणामध्ये बांबू शूट्स असो, घराच्या बाजूला बांबूचे कुंपण असो किंवा घरातील काही बनवण्यासाठी जसे की टोपली-सूप असो.. पण, आता बांबू शूट्स ना आदिवासींच्या आहारात आहेत ना बांबूचे कुंपण आदिवासींच्या घराला..
आदिवासींच्या आहारातून रानभाज्या गायब
आदिवासींनी वनजमिनीतून ज्या काही वनस्पती मिळवल्या त्याचा आदिवासींनी त्यांच्या आहारात समावेश केला. पारंपरिक शेती आणि शिकार हा आदिवासींचा मुख्य आहार. पण, वनजमिनींची धूप झाल्याने आदिवासींना पारंपरिक शेती आणि शिकारीवर अवलंबून राहणं कठीण झालंय. जमिनीची धूप झाल्याने आदिवासींच्या आहारातील अनेक रान भाज्या ह्या नष्ट होत गेल्या. 'कोडील जब्बा (जब्बा म्हणजे झाडाची पानं), करकू, वाली, बोनुम जब्बा, वरेली दोबे, मुस बोडा, मिरंगन जब्बा, कयमूल जब्बा, बोल जब्बा, बोत्ते जब्बा, टिटूळ जब्बा, एमील जब्बा, वाडंगुल जब्बा, आल जब्बा, कोकोड जब्बा, उरपाल वंजाअ, एटोळ जब्बा, अशा अनेक रानभाज्यांची नावे सांगता येतील.
या सर्व रानभाज्या हा आदिवासींचा पारंपरिक आहार. ह्या रानभाज्या पौष्टिक आहेत. आज यातील फक्त ५ ते ६ रानभाज्याच जंगलात सापडतात. त्यामुळे आदिवासींना नवीन खाद्यपदार्थांचा स्वीकार करावा लागतोय ज्या मुळे आदिवासी भागात पोषणाची कमतरता मोठ्या प्रमाणात दिसून येतेय.
आदिवासींकडे त्यांच्या आजारांना बरी करणारी औषधी वनस्पती ही होती. साप चावला की त्याचं विष पसरू नये म्हणून एक काढा पाजला जायचा पण आता ती औषधी वनस्पती शोधायलाच भटकंती करावी लागतीये. तो पर्यंत सर्पदंश झालेला माणूस मरून जातो. जंगलातील बऱ्याचश्या औषधी वनस्पती नष्ट होत चालल्या आहेत. काया कट्टी, पाले मड्डा, पाले मर्रा, गोटीया मर्रा, कोनजुटला वडवाले, मंग मर्रा, डुंगा पोरका, इला कट्टा, जेंडे कट्टा, मर्द मर्रा, वेपा मर्रा, गारवून्ज मर्रा, गोरगा मर्रा, तिरका मर्रा, बेसे माटी, मोडिया मर्रा, वेडमा मर्रा, करका मर्रा, कोअका मर्रा, तुमीर मर्रा, पिडमील मर्रा, ओडसा मर्रा, मोंटोअ मर्रा, मरका मर्रा, इकोअ जप्पी, तुलसी पोरका, लिमा, मूस तुमरी, कार्याला कमका, लेसे तोंडा."
ह्या सर्व औषधी वनस्पती आजारांवर रामबाण उपाय होती. पण आज यातील एक चतुर्थांश औषधी वनस्पतीच शिल्लक राहिलेल्या आहेत. 'हिरोरा मर्रा' हे एक पांढऱ्या रंगाचं झाड असतं. यापासून आदिवासींचा देव बनवला जातो. आदिवासी हा निसर्गाचं पूजन करतो तर त्या झाडाला विशेष महत्व आहे. पण आता 'हिरोरा मर्रा' हे झाडाचं नष्ट झालेलं आहे. ते झाड नसल्यामुळे सागवनाच्या पानापासून आदिवासींचा देव बनवला जातो.
आदिवासींची केवळ उपजीविकाच नव्हे, तर त्यांची र्सवकष जीवनशैली वनवैभवाशी अतूटपणे जोडली आहे. पर्यावरण संतुलन आणि जैवविविधतेचे व्यवस्थापन, आदिवासी आणि अन्य स्थानिक जनतेच्या सहभागाशिवाय करणे अशक्य आहे.
संकलन आणि संपादन - संजना खंडारे
(असर आणि बाईमाणूस यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ‘प्रोजेक्ट धरित्री’ उपक्रमांतर्गत ‘पर्यावरण बदल आणि लिंगभाव’ (Climate & Gender) या विषयावरची ही एक विशेष मालिका आहे.)






