
‘एव्हरेस्टचा कैदी’, जिथे मृतदेह तीस वर्षे वाट पाहत राहिला… जवान ‘दोरजे’ची गोठलेली कहाणी!
समुद्रसपाटीपासून २६,२४७ फूट उंचीवर, माउंट एव्हरेस्टच्या 'डेथ झोन'मध्ये गेली तीन दशके एक मृतदेह पडून होता. हजारो गिर्यारोहकांनी त्याच्याजवळून शिखर गाठलं, अनेकांनी त्याचे फोटो काढले, तर जगाने त्याला त्याच्या पायातील हिरव्या बुटांमुळे 'ग्रीन बूट्स' हे नाव दिलं. मात्र त्या हिरव्या बुटांमागे एक नाव, एक कुटुंब आणि एक अपूर्ण प्रवास दडला होता. तो होता भारत-तिबेट सीमा पोलीस दलातील जवान दोरजे मोरुप. १९९६ च्या एव्हरेस्ट दुर्घटनेत मृत्यू झाल्यानंतर तब्बल तीस वर्षांनी त्यांचे पार्थिव कुटुंबापर्यंत पोहोचवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. एव्हरेस्टवरील सर्वाधिक चर्चिलेल्या मृतदेहामागच्या माणसाची, त्याच्या स्वप्नाची, मृत्यूची आणि अखेर घरी परतण्याच्या प्रतीक्षेची ही अस्वस्थ करणारी कहाणी.









