द्वारकानाथ संझगिरी
- क्रिकेटच्या इतिहासात 'सर्वश्रेष्ठ अष्टपैलू' हा शब्द ज्या एका नावाशी कायमचा जोडला गेला, त्या सर गारफिल्ड 'गॅरी' सोबर्स यांचं वयाच्या ८९व्या वर्षी निधन झालं.
- फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि नेतृत्व या चारही आघाड्यांवर त्यांनी उभारलेलं साम्राज्य आजही अजिंक्य मानलं जातं. २८ जुलै २०२६ रोजी ९० वर्षांचे होणारे सोबर्स वाढदिवसाच्या अवघ्या अकरा दिवस आधी काळाच्या पडद्याआड गेले आणि क्रिकेटविश्वाने आपल्या सर्वात तेजस्वी युगपुरुषाला गमावलं.
- सोबर्स यांच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाचं आणि अफाट क्रिकेटवैभवाचं शब्दचित्र दिवंगत ज्येष्ठ क्रीडालेखक द्वारकानाथ संझगिरी यांनी त्यांच्या 'चॅम्पियन्स' या पुस्तकात विलक्षण ओघवत्या शैलीत रेखाटलं आहे.
- क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक वाचकासाठी हा लेख म्हणजे एका दंतकथेचं जिवंत दर्शनच. 'बाईमाणूस'च्या वाचकांसाठी हा लेख साभार पुनर्प्रकाशित करत आहोत.
तसं पाहिलं तर मानवी प्रयत्नाला नेहमी मर्यादा पडतातच किंबहुना स्वत:च्या मर्यादा ओळखून जो वागतो, त्याला शहाणं म्हटलं जाते. परंतु जगात अपवादात्मक का होईना पण काही मंडळी निघतात की ज्यांच्या कर्तृत्वाला मर्यादा वगैरे नसतेच. त्यांच्या कर्तृत्वाच्या कक्षा नेहमी वाढतच असतात... त्यांच्या कर्तृत्वाला काही अंत वगैरे आहे असं जाणवतपण नाही. क्रिकेटमध्ये सर गॅरी सोबर्सच्या बाबतीत त्याची प्रचिती येते.
क्रिकेटमधल्या गॅरी सोबर्सच्या कर्तृत्वाला काही अंतच नव्हता. क्रिकेट हा खेळ तसा आत्मसात करायला कठीणच आहे. इथे हजारोंना हयात घालवूनही क्रिकेटच्या किमान एका दालनात नाव मिळवणं कठीण गेलंय. फार थोड्या जणांनी फलंदाजी, गोलंदाजी किंवा क्षेत्ररक्षणासारख्या अनेक क्षेत्रांत एकाच वेळी वर्चस्व गाजवायचा पराक्रमही केला. परंतु गॅरी सोबर्सएवढं उतुंग यश गेल्या शंभर वर्षाच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कुणालाही मिळालं नाही.
क्रिकेटमध्ये आजतागायतचा सर्वश्रेष्ठ फलंदाज कोण म्हटल्यावर सर डॉन ब्रॅडमनकडे बोट दाखवता येतं. पण तरीही ज्या ऑस्ट्रेलियन आणि इग्लिश बुजुर्ग मंडळींनी व्हिक्टर ट्रंपरला पाहिलंय ते हा मान ट्रंपरला देतात, ब्रॅडमनला नव्हे. पण अष्टपैलूत्वाच्या बाबतीत सोबर्सशिवाय दुसरं नावच पुढं येऊ शकत नाही. किथ मिलर ऱ्होड्स, विनू मंकड, अॅलन डेव्हीडसन वगैरे अष्टपैलू खेळाडू आपापल्या परीने निश्चितच महान होते. परंतु सोबर्सने महानतेच्या सर्व कसोट्या इतक्या वरच्या पातळीवर नेऊन ठेवल्या की तिथे पोहोचणं इतर कुणालाही जमलं नाही.

बार्बाडोसमधल्या एका गरीब कुटुंबातला हा मुलगा. बघता बघता क्रिकेटच्या साम्राज्याचा शहेनशहा बनला आणि त्याच्या कारकीर्दीत एकाही क्रिकेटपटूला त्याच्या सिंहासनाच्या आसपाससुद्धा फिरकू दिलं नाही. सोबर्सने क्रिकेटमध्ये काय केलं ह्यापेक्षा काय केलं नाही ह्याचं उत्तर देणं सोप ठरेल. त्याने फक्त यष्टीरक्षण केलं नाही. बाकी सर्व काही केलं! नुसतं केलं असा फक्त टिळा लावला नाही तर ज्या ज्या गोष्टींना हात घातला तेथे तेथे देदीप्यमान यश मिळवलं. मनात आणले असतं तर आंतरराष्ट्रीय कीर्तीचा यष्टीरक्षकही तो होऊ शकला असता. इतकी त्याची गुणवत्ता चतुरस्त्र होती.
गोलंदाज म्हणून सुरुवात
मंदगती डावखुरा गोलंदाज म्हणून त्याने आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. पुढे चायनामन शिकला आणि त्यानंतर फ्रॅन्क वॉरेलच्या डावपेचांना मदत व्हावी म्हणून अत्यंत परिणामकारक मध्यमगती गोलंदाजही बनला आणि हे सर्व उपद्व्याप करत असताना त्याच्या फलंदाजीनं इतकं आश्चर्यकारक वळण घेतलं की जगातल्या गाजलेल्या गोलंदाजांना त्याने दे माय धरणी ठाय करून सोडलं. त्याचबरोबर चित्याच्या चपळाईने, चमत्कार वाटावेत, असे झेल घेऊन क्रिकेटच्या दुनियेतल्या इतर फलंदाजांचं खेळपट्टीवरच 'आयुष्य' कमी करण्यातही हातभार तो लावतच होता आणि पुढे सर फ्रॅन्क वॉरेलनी नेतृत्वाची वस्त्रं उतरवल्यावर नेतृत्वाची जबाबदारी स्वतःच्या भक्कम खांद्यावर घेऊन वेस्ट इडीजला क्रिकेटच्या जगाचं सम्राटपदही मिळवून दिलं.
हे एवढं सर्व कार्य माणूस करू शकेल ह्यावर पूर्वी विश्वास बसला नसता आणि ह्यापुढे जर सोबर्सच्या तोडीचा क्रिकेटपटू निर्माण झाला नाही तर भविष्यकाळातील पिढ्यांनाही प्रश्न पडू शकेल की सोबर्स हा एकच माणूस होता की अनेक होते! इतकं त्याचं कर्तत्वच अद्भुत आहे.
सोबर्सच्या ह्या प्रत्येक पैलूचा थोडक्यात आढावा घेणं ही सोबर्सला बाद करण्याएवढीच कठीण गोष्ट आहे. कारण संपूर्ण शब्द भांडार जरी रितं केलं तरी सोबर्सचं अथांग कर्तृत्व त्यात सामावणं कठीण आहे. प्रथम नुसती त्याची फलंदाजी विचारात घेऊ या..
मैदानाचा एकमेव राजा!
पूर्वी एका रॉबर्टसन -ग्लासगोने फॅन्क चुली ह्या शैलीदार डावखुऱ्या फलंदाजाविषयी म्हटले होतं की, ' त्याचा खेळ पाहणं सोपं होतं. त्याला गोलंदाजी करणं अवघड होतं आणि त्याच्याविषयी लिहिणं तर अशक्यच होत जेव्हा तुम्ही त्याला गोलंदाजी करता तेव्हा क्षेत्ररक्षक अपुरे पडतात आणि त्यांच्याविषयी लिहिता तेव्हा शब्द अपुरे पडतात.'' सोबर्सच्या केवळ एकट्या फलंदाजीच्या बाबतीतही तेच जाणवतं. अगदी कुठल्याही भाषाप्रभूची प्रतिभा त्याच्या फलंदाजीचं वर्णन करायला तोकडी पडावी अशी त्याची फलंदाजी होती.

सोबर्स फलंदाजीला उतरला की जगातला सर्वश्रेष्ठ गोलंदाजही त्याचा गुलाम बने. का सर्व काही सोबर्सच्या मनाप्रमाणे चालायचं. गोलंदाजाची चेंडूवरची हुकमत संपायची. सोबर्सच्या बॅटचा हुकूम चेंडूला शिरसावंद्य मानावा लागे. गोलंदाजांची ही तऱ्हा, तर क्षेत्ररक्षकांचं काय होणार? भोक पडलेल्या छत्रीसारखी क्षेत्ररक्षणाची अवस्था होऊन जायची. मग फटक्याचा धबधबा थांबणार कसा?
१९७१ साली मेलबोर्नला जागतिक संघासाठी खेळताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध २५६ धावांची जी अविस्मरणीय खेळी सोबर्सने केली तेव्हा जवळ जवळ प्रत्येक ऑस्ट्रेलियन क्षेत्ररक्षक सीमारेषेवर उभा होता. परंतु सोबर्सने त्यांच्यामधूनही फटके हाणले. त्याना हलायलासुद्धा फुरसद मिळू दिली नाही. मग अशा वेळेला हतबद्ध झालेला कर्णधार काय कप्पाळ करणार? सोबर्स स्वत: चूक कधी करतो ह्याची प्रतिक्षा करणं एवढंच कर्णधाराच्या हातात शिल्लक राहतं?
दुसरं म्हणजे सोबर्सच्या फटक्यांचा भाता अर्जुनाप्रमाणे अक्षय आहे. पुस्तकातल्या प्रत्येक फटक्यानं तर त्याचं मांडलिकत्व स्वीकारलंच होतं, पण तेवढं सोबर्सला पुरेसं वाटलं नसावं ! त्याने स्वतःचे असे काही फटके उदयाला आणले. अर्थात त्याचे 'सर्व हक्क' सोबर्सच्याच स्वाधीन' होते. दुसऱ्याला आयुष्यभर प्रयत्न करूनही त्याचे अनुकरण करायला जमलं नसतं ऐनवेळी एखादा फटका बदलण्याचं त्याचं कसब तर मुलखावेगळं होतं. ऑस्ट्रेलियात, १९६१च्या मालिकेत, सिडनीला मेकिफचा चेंडू ड्राईव्ह करण्यासाठी म्हणून सोबर्स पुढे सरसावला, पण आपण फसलोय. चेंडू बॅटीच्या टप्प्यात येत नाही हे त्याला जाणवलं. पण त्याने क्षणार्धात काय केलं? अचानक पाय मागे घेतला आणि बॅकफूटवरून आडव्या बॅटने मिडऑनच्या दिशेला चक्क गगनाला गवसणी घालणारा षट्कार चढवला. बरं मोकिफ म्हणजे काही फिरकी गोलंदाज नव्हे. चक्क चांगला वेग असलेला जलदगती गोलंदाज. अशा गोलंदाजासमोर चुकलेला स्ट्रोक क्षणार्धात बदलणे आणि टोलेजंग षट्कार ठोकणे हे साधंसुधं काम नाही. ते फक्त सोबर्ससारखा महान फलंदाज करू जाणे आणि हे एकदाच जमून गेलंय वगैरे प्रकार नव्हता. असा हा जवळपास भुताटकीचा अनुभव अनेक गोलंदाजींना आलाय. सोबर्सच्या फूटवर्कचा दर्जा कुठल्या श्रेणीचा होता हे ह्मातून चटकन लक्षात यावं.
सोबर्सचं पदलालित्य…
पण त्याचबरोबर सोबर्सच्या पदलालित्याचा आणखी एक चमत्कारिक भाग होता. निल हार्वेप्रमाणे, सोबर्स पॉपिंग क्रिझची बंधने झुगारून कधीही फिरकी गोलंदाजाला खेळताना पुढे सरसावत नसे. तो क्रिझमधूनच खेळायचा. त्याचा भर बॅकफूटवरच जास्त असे. पण त्याच्या हालचाली इतक्या विद्युतवेगाने होत असत की, अचूक टप्प्याचा चेंडूसुद्धा बघता बघता सीमापार होई. सुप्रसिद्ध टाय-टेस्टमध्ये रिची बेनॉच्या लेगस्पिनची मनमानी कत्तल सोबर्सन बहुतेक वेळा क्रिझमधूनच केली. १९५६ साली निल हार्वेने सुभाष गुप्तेला नामोहरम करायचं ठरवलं तेव्हा चेंडू आपल्यापर्यंत यायच्या आधीच चेंडूवर चालून जायचा पवित्रा हार्वेने घेतला होता आणि तोपर्यंत कुणीही मिळवलं नव्हतं असं प्रभुत्च हार्वेने गुप्तेवर मिळवलं. पण १९५८ साली भारताविरुद्ध तीन कसोटी शतक झळकवताना, सोबर्सने गुप्तेचा समाचार घेताना त्याच्याशी क्रिझमधून खेळण्याचंच तंत्र वापरलं.
फारसं पदलालित्य न वापरता केलेल्या सोबर्सच्या घणाघाती फलंदाजीचा किस्सा सुनील गावस्करने त्याच्या सनीडेज 'मध्ये लिहून ठेवलाय... २५४ धावांचा संस्मरणीय डाव आकार घेत असताना सोबर्स कसा खेळला याचं वर्णन करताना सुनील लिहितो, बॅटच्या कक्षेत आलेल्या चेंडू गॅरी गोलंदाजाजवळून सणसणीतपणे ड्राईव्ह करी आणि शॉर्ट पिच्ड चेंडू टाकला तर तो निर्दयपणे कट् किंवा हूक करी. गॅरीच्या ५० धावा होईपर्यत त्याच्या खेळात फारसं पदलालित्य दिसून येत नव्हतं. फटका मारताना पुढचा पाय चेंडूजवळ पाहिजे, असल्या तांत्रिक गोष्टी त्याच्या हिशोबात नव्हत्या. फटका मारण्यासाठी तो बेट उंच उचली आणि त्याचं पर्यवसान अभिजात फटक्यात होई.'

सोबर्सच्या फलदाजीची तऱ्हा ही अशी होती. तो कधी यॉर्करसुद्धा एक पाय मागे घेऊन खेळे आणि तरीही त्याचा अंतिम निकाल एकच असे- चौकार! कधी कधी तर आपल्या पायांच्या टाचांवर उभा राहून तो नुसताच बॅटने चेंडू थोपवणार असं वाटत असतानाच शेवटच्या क्षणी आपल्या शरीराला गिरकी देऊन चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने तडकवी.
पुस्तकाशी तोलून मापून पाहिलं तर काही वेळेला सोबर्सची फलंदाजी सदोष वाटे खरं म्हणजे त्याला सदोष म्हणणं चुकीचे आहे. कारण सोबर्सच स्वत:चं असं वेगळंच पुस्तक' होतं आणि त्याच्याशी त्याने कायम इमान राखलं. १९६६ साली सोबर्स इंग्लंडची गोलंदाजी धो धो धुवून काढत असताना एका टीकाकाराने लेन हटनना म्हटलं, ' सोबर्सच्या फलंदाजीत बरेच दोष आहेत. '' त्या महाभागाला हटनने आपादमस्तक न्याहाळलं आणि खवचटपणे म्हटलं, ' 'निदान काही इंग्लिश खेळाडूंच्या फलंदाजीत असे दोष असते तर बरं झालं असतं. ''
होय, सोबर्सच्या फलंदाजीत काही दोष होते, पण सोबर्सच्या प्रचंड नैसर्गिक क्षमतेमुळे त्याचा फायदा उठविणंही फार कठीण होत. स्क्वेअर कट मारताना सोबर्सचा चेंडू नेहमीच जमिनीलगत जात नसे. पण तिथेही या 'क्रिकेटसिंहाला' जाळ्यात पकडणं सोपं नव्हतं एकदा इयान चॅपेलने सोबर्ससाठी गलीला दोन क्षेत्ररक्षक ठेवले. पण तरीही परिणाम पूज्य. नंतर रिची बेनॉने हताश झालेल्या चॅपेलची समजूत घालाना त्याला सांगितले की, ' बेड्या असा हताश होऊ नकोस. तुझी काही चूक नाही. ळ्येअर कट मारताना सोबर्सचा चेंडू काही काळ हवेत राहतो हे खरंच. परंतु तो झेलणारा माणूस अजून तरी जन्मायचाय. ''
अविस्मरणीय फटका
मेलबोर्नला २५४चा वैभवशाली डाव खेळताना लिलीच्या एका उत्कृष्ट चेंडूवर मारलेला वादळी फटका लिलीच्या हदयात कायम कोरला गेलाय. लिली 'बँक टू द मार्क ' या आपल्या पुस्तकात म्हणतो, एकदा मी सोबर्सला माझ्या दृष्टीने उत्तम असा चेंडू टाकला. दुसऱ्या नवीन चेंडूने टाकलेला तो यॉर्कर होता. पण हा चेंडू सोबर्सने इतक्या जोराने तडकावला की तो बंदुकीतून सुटलेल्या एखाद्या गोळीप्रमाणे माझ्या जवळून गेला. मी थांबून मागे पाहण्याच्या आतच चेंडू साईड बोर्डाखालील कुंपणावर आदळला. सोबर्सने ठोकलेला हा सणसणीत तुफानी हाईव्ह मी कधीच विसरणार नाही.' ही नुसती एका फटक्याची झलक झाली. अनेकांनी सोबर्सच्या फटक्यांमागच्या ताकदीचे अनुभव आपापल्या प्रतिभेप्रमाणे लिहून ठेवलेत... एकदा एका समीक्षकाने लिहिलं होतं की, 'गोलंदाजाचे दोन्ही पाय जमिनीवर टेकायच्या आत चेंडू सीमारेषेपलीकडे गेला! '
बॅटचा हातोड्यासारखा उपयोग करूनही सोबर्सच्या फलंदाजीतील सौंदर्य कलात्मकता अणुभरही कमी होत नसे. सोबर्सच्या प्रत्येक हालचालीत लय होती. कुरूपतेला तिथे शिरकाव करायलाही मज्जाव होता. कॉलर टाईट केलेला, शर्टाची एक दोन बटणं उघडी टाकलेला आणि किंचित पार्श्वभगा मागे घेऊन आत्मविश्वासाने पावले टाकीत पॅव्हेलियनकडून खेळपट्टीकडे जाणारा सोबर्स पाहिला की 'हा महान फलंदाज आहे हो!' वगैरे सांगण्याचीही गरज नव्हती. क्रिकेटच्या मैदानावरच्या अनभिषिक्त सम्राटाचे ते आगमन आहे हे आवर्जून सांगण्यासाठी तुताऱ्या वाजवायचीही आवश्यकता नव्हती. सोबर्सने क्षेत्ररक्षकांकडे दृष्टिक्षेप टाकून पवित्रा घेतला की सोबर्सच्या दिशेने येणारा प्रत्येक चेंडू याताना सोबर्सच्या बॅटचा एकच निरोप मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यावर पोहचवत असे. सावधान आलमगीर सोबर्सच आगमन झालंय!' आणि मग जमलेला तमाम रसिक प्रेक्षक सोबर्सच्या फटक्यांच्या धबधब्यात न्हाऊन निघायचा.
निखळ आक्रमण!
सोबर्सच्या फलंदाजीचं आणखीन एक वैशिष्ट म्हणजे सोबर्स फलंदाजी करताना एकही क्षण कंटाळवाणा वाटायचा नाही. कंटाळा येणार तरी कसा? डावाच्या सुरुवातीपासूनच तो आक्रमणाचाच संकल्प सोडायचा. जगातल्या मान्यवर गोलंदाजांसमोर सातत्याने आक्रमक खेळणं ही काही सोपी गोष्ट नव्हे. पण नेपोलियनप्रमाणे सोबर्सनेही स्वत:च्या शब्दकोशातून 'अशक्य ' हा शब्द कधीच काढून टाकला होता. ज्यावेळी सोबर्स फारसा ज्ञात नव्हता किंबहुना ज्या काळात त्याला स्वत:त असलेल्या गुणांच्या अफाट खजिन्याची पुरती जाण नव्हती, तेव्हासुद्धा सोबर्स आक्रमकपणेच खेळायचा.

१९५५ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध वेस्टइंडीजला चांगला आघाडीचा फलंदाज सापडत नव्हता, तेव्हा मिलर -लिंडवाल ह्या तुफानी जोडीसमोर सोबर्सला उभे करण्यात आलं. सोबर्सने काय करावं? केवळ १५ मिनिटात ६ खणखणीत चौकार हाणून ४३ धावा केल्या आणि महाशय परतले. 'विलो पार्टनर्स ' ह्या आपल्या पुस्तकात त्या छोट्या झंझावती डावाबद्दल बेनॉ म्हणतो, 'सोबर्सने ज्या ४३ धावा केल्या तेवढ्या नेत्रदीपक धावा मी पूर्वी क्वचित पाहिल्या आहेत. त्याच्या रूपाने एक असाधारण क्रिकेटपटू उदयाला येत आहे हे सिद्ध झालं.'
स्वत : बेनॉलाही सोबर्सच्या बॅटीतल्या ' अंगाऱ्याची ' झळ १९६१ साली पोहोचली. दौऱ्याच्या सुरुवातीच्या सामन्यात बेनॉने दोन -तीनदा सोबर्सची विकेट घेतल्यावर उत्साहित होऊन ऑस्ट्रेलियन समीक्षक लिहिते झाले सोबर्स हा बेनांचा बकरा आहे.' अजाणतेंपणे सोबर्सचा अहकार डिवचला गेला होता. बिचाऱ्या बेनॉला त्याची फळं भोगावी लागली. शेवटीवर पाय पडलेल्या नागाप्रमाणे सोबर्स चवताळला आणि सोबर्सने अक्षरशः बेनॉच्या गोलंदाजीचा चोळामोळा केला. डेव्हीडसन-मेफिक आणि विशेषत: बेनॉला खुन्नसने धोपटत फक्त १२५ मिनिटांत शतक ठोकळ. रॉबिन्सने नतर ह्या डावाबद्दल लिहिलं होते की ' ऑस्ट्रेलियन गोलदाज सोबर्स खेळताना चक्क नपूंसक वाटत होते.'
सामने फिरले!
सोबर्सने अभूतपूर्व फलंदाजीच्या जोरावर सामने फिरवले तर आहेतच, परंतु काहीवेळेला गोलंदाजीच्या जोरावरही वेस्ट इंडीजकडे विजयश्री अक्षरश: खेचून आणली. १९६८ - ६१ च्या ऑस्ट्रेलियन दौऱ्याच्यावेळी ब्रिस्बेनच्या पहिल्याच कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी जवळ जवळ साडे दहा तासांत ३६६ धावा करायच्या होत्या. लॉरी रेडपाथ, चपइल, वाल्टर्स वगैरेच्या खरं म्हणजे ह्या धावा कुवतीच्या अजिबात बाहेर नव्हत्या आणि मुख्य म्हणजे सोबर्सच। खांदा दुखत होता. तज्ज्ञ डॉक्टरांनी त्याची तपासणी करून त्याला ताबडतोब शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. पण सोबर्सने सल्ला धुडकावून गोलंदाजी केली आणि ७३ धावांत ६ बळी घेऊन ऑस्ट्रेलियाचा डाव फक्त २४० धावांत संपवला. अशी आणखीन काही उदाहरणं देता येतील.
सोबर्सच क्षेत्ररक्षणसुद्धा त्याच्या क्रिकेटचा एक अत्यंत दिपवून टाकणारा पैलू तो आऊटफिल्डला असेल तर त्याची घारीसारखी तीक्ष्ण नजर चुकवून पळणं चेंडूला जमत नसे आणि फलंदाजाच्या जवळ क्षेत्ररक्षण करताना तर एखाद्या जिमनॅस्टिकच्या खेळाडूप्रमाणे त्यांच्या हालचाली होत. फुलं वेचावित तसा तो स्लिप किंवा शॉर्टलेग जवळ झेल 'वेचत' असे. सोबर्स जवळ असताना चेंडू क्षणभरसुद्धा हवेत ठेवणं फलंदाजाच्या दृष्टीने खतरनाक होतं. सर नेव्हील कार्डसने त्याच्या स्लिपमधल्या क्षेत्ररक्षणाची तुलना थेट हॅमंड आणि सिम्पसनसारख्या त्याबाबतीत अखेरचा शब्द ठरलेल्यांशी केलीय.
सोबर्सच्या क्षेत्ररक्षणाचा एक गमतीदार किस्सा मला आठवतोय. भारताचा संघ १९६२ साली वेस्ट इंडीजला गेला होता. तेव्हा सोबर्स पहिल्या सामन्याच्या फक्त एक तास अगोदर येऊन मेदानावर हजर झाला. दूर ऑस्ट्रेलियावरून प्रवास करून तो आला होता. सकाळची न्याहारी घेण्याइतकाही वेळ त्याला मिळाला नाही. सोबर्सच्या दुदैवाने वॉरेल टॉस हसला आणि सोबर्सला क्षेत्ररक्षणाला जावं लागलं. नेहमीप्रमाणे स्लिपमध्ये सोबर्स उभा होता. त्यावेळी रेडिओवर लिअरी कॉन्स्टनटाईन समालोचन करत होते. त्यांनी भाष्य केलं की, ' या पोराला स्लिपमध्ये उभं करणं साफ चुकीचं आहे. रात्रभर प्रवास करून तो दमलाय आणि तत्पूर्वी ऑस्ट्रेलियात २५१ धावा करून तो सरळ मैदानावर उतरलाय. दमल्यामुळे त्याचं क्षेत्ररक्षण चपळ होणार नाही. ''

अंदाज उलटे पालटे
पण सोबर्सने कॉन्स्टनटाईनसारख्या भीष्माचार्यांनाही खोटं ठरवलं. पहिल्या तासात दोन अतर्क्य असे झेल टिपले. कॉन्स्टनटाईन न रहावून उद्गारले, ' हा पोरगा तर अजब आहे. दुसऱ्या कुणीही हे झेल घेतले असते असे असे वाटत नाही.'' सोबर्सच्या क्षेत्ररक्षणाचा हा दर्जा होता.
सोबर्सची फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण यातलं कर्तृत्वच जेवढं वादातीत ठरलं तेवढे त्याचं नेतृत्व दुर्देवाने ठरलं नाही. सुरुवातीच्या काळात जेव्हा तो जिंकत होता, तेव्हा वॉरेलचा सच्चा वारसदार वगैरे त्याचं कोडकौतुक झालं. परंतु ज्या क्षणी अपयशाचे चटके बसायला लागले तेव्हा सोबर्सच्या नेतृत्वावर कठोर टीका झाली. सोबर्सचा क्रिकेटमधला इंटरेस्ट गेला, तो गोल्फच्या मैदानावर पडलेला असतो वगैर आरोपांची सरबत्ती सुरू झाली.
खुद्द वेस्ट इंडीजमध्ये सोबर्सच्या नेतृत्वाविरुद्ध लॉबी तयार झाली. ' पण तरीही काही मान्यवर समीक्षकांनी आणि त्याच्या साथीदारांनी सोबर्सच्या नेतृत्वगुणांना दाद दिलीय. नेव्हीलकार्डस् आपल्या सोबर्स द लायन ऑफ विकेट' ह्या लेखात म्हणतो, तो संपट व सिम्प्सनच्या वर्गातील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि हुशार कर्णधार आहे. ' कॉनरॅड हॅट आपल्या 'प्लेईंग टु वीन ' या पुस्तकात म्हणतो, सोबर्स कुशल डावपेचतज्ज्ञ व उत्साही कर्णधार आहे.'
चतुर नेतृत्व
सोबर्स आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीप्रमाणेच नेतृत्च करतानाही आक्रमक डावपेच वापरायचा. १९६८ साली इंग्लंडविरुद्ध खुद्द वेस्ट इंडीजमध्ये एक अतिशय धाडसी डावपेच अंगाशी आला आणि त्यानंतर सोबर्सच्या नेतृत्चाला उतरती कळा लागली. पहिले तीन सामने अनिर्णित राहिल्यावर चौथ्या कसोटीत इंग्लंडपुढे १६५ मिनिटांत २१५ धावा करायचं आव्हान सोबर्सने ठेवलं आणि इंग्लंडने केवळ तीन बळी गमावून इंग्लंडने सामना जिंकला. उठसूट आक्रमकतेच्या नावाने गळा काढून रडणाऱ्या समीक्षकांनीही सोबर्सला फैलावर घेतलं. अर्थात विल्डेन आणि स्वत : इंग्लंडचा कर्णधार कॉलीन कौडेने सोबर्सच्या डावपेचाचं समर्थन केलं होतं. त्या मालिकेत दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडला १५० मिनिटांत १५५ धावा करून विजय हस्तगत करणं जमलं नव्हतं. म्हणूनच खरं तर सोबर्सने जोखीम पत्करली होती. त्यातून वेस्ट इंडीजला यश मिळण्याचीही दाट शक्यता होती. सोबर्स या पराभवानंतर एवढंच म्हणाला, 'जुगार यशस्वी ठरला की कर्णधार थोर ठरतो आणि अपयश आल की तो गाढव ठरतो.''
पण दुदैवाने त्यानंतर अपयशाने सोबर्सला पुरते घेरलं. ओळीने तो मालिकांमागून मालिका हरत गेला आणि १९७१ साली सुरुवातीला कमकुवत वाटलेल्या भारतीय संघानेही सोबर्सच्या वेस्ट इंडीज संघाचा पराभव करून इतिहास निर्माण केला. कदाचित त्यामुळे असेल, परंतु त्या दौऱ्यावर असलेल्या बऱ्याच भारतीय खेळाडूंचं सोबर्सच्या नेतृत्वाबद्दल फारसं चांगलं मत नाही.
परंतु सोबर्सच्या खिलाडू वृत्तीबद्दल मात्र त्यांचं दुमत असायचं कारण नाही. इंग्लंडच्या कट्टर व्यावसायिक वातावरणात बराच काळ वावरूनसुद्धा खिलाडू वृत्तीला त्याने तलाक दिला नाही हे १९६७ साली राजन कुदरनला परत बोलावून त्याने सिद्ध केलं. कसोटी क्रिकेटमध्ये असले प्रसंग फगती वाचत घडतात.
सोबर्सच्या नेतृत्वाबाबत कुणीही भलोबुरी टीका करो, परतु क्रिकेटमधला जवळ जवळ वीस वर्षांचा कालखड सोबर्सने गाजवला हे मात्र निर्विवाद सत्य आहे.
या ना त्या नात्याने प्रत्येक कसोटी सामन्यात सोबर्सची काहीतरी कॉट्रीब्युशन असायची. बऱ्याच कसोटीत त्याने असामान्य अष्टपैलूत्व सिद्ध केलंय. १९६७-६८ला एक सामना गमावल्यानंतर शेवटचा कसोटी सामना जिंकण्यासाठी सोबर्सने जी पराक्रमी शर्थ केली तेवढी क्वचित क्रिकेटच्या इतिहासात सापडेल. दोन्ही डावात अनुक्रमे १५२ आणि नाबाद ९५ धावा करून, वर प्रत्येक डावात त्याने तीन विकेटस् घेतल्या. पण दुर्दैवाने विजयासाठी एक विकेट कमी पडली. पण ही झाली फक्त एका कसोटीची कथा! सोबर्सने अनेक मालिकेत अफाट अष्टपैलूत्व दाखवलंय. १९६१ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४३० धावा, १५ बळी आणि १२ झेल, ६२मध्ये भारताविरुद्ध ४२५ धावा आणि २३ बळी, १९६६ साली इंग्लंडविरुद्ध ७२२ धावा, २० बळी आणि १० झेल अशी कितीतरी उदाहरणं देता येतील.

१९६० नंतर वेस्ट इंडीजचा क्रिकेटच्या जगतात दबदबा प्रचंड वाढला. ऑस्ट्रेलिया-इंग्लंडसारखे संघही वेस्ट इंडीजला दबकून राहू लागले. त्या काळात इंग्लंड-ऑस्ट्रेलियावर मात करून वेस्ट इंडीज क्रिकेटच्या छोट्या विश्वाचे चँपियन गणला जाऊ लागला. ह्या सर्व परिवर्तनात सोबर्सचा वाटा सिंहाचा होता. एखाद्या कल्पवृक्षाप्रमाणे, त्या काळात सोबर्स वेस्ट इंडीजला भासला असेल. १९६५ साली इंग्लंडचा ३ - १ असा खात्मा केल्यावर एव्हरिथिंग दॅटस् क्रिकेट' ह्मा पुस्तकात जॉन क्लार्क व ब्रायन स्कॉव्हेलने लिहिलं होतं, वेस्ट इंडीजला विजय मिळाला ह्याचं कारण सोबर्स. यापूर्वी कोणताच संघ एकाच व्यक्तिच्या इतक्या ऋणाखाली नसेल.'
हे एवढे मोठमोठाले पराक्रम करणारी असामी व्यक्तिगत जीवनात एकदम बिनधास्त होती क्रिकेटबरोबरच घोड्यांच्या शर्यती आणि गोल्फचा त्याला चांगलाच शौक होता. मदिरा आणि मदिराक्षींशीही त्याची चांगलीच गट्टी जमायची. एक मस्तीत स्वच्छंद असं जीवन तो जगायचा. पण त्याचा त्याच्या वैयक्तिक खेळावर कधीही परिणाम झाला नाही. अगदी कसोटी सामन्याच्या वेळीही लवकर निजावं, लवकर उठावं' वगैरे नीतीपाठ त्याने गिरवले नाहीत. उलट एकदा तर सोबर्सने इतकी दारू झोकली होती की त्याच्या सवंगड्यांनी त्याला उचलून शॉवरखाली नेऊन बसवलं. पण तरीही काही तासांनंतर त्याने झंझावाती शतक झळकवलं.
सोबर्सचं सर्वच काही दुनियेपेक्षा वेगळं होतं. असामान्यत्वही कुठल्या पराकोटीचं असू शकतं त्याचा हा नमुना होता. त्यामुळे सोबर्सला दुसऱ्या कुणाची उपमाच देता येत नाही. सोबर्सला उपमा सोबर्सचीच. ब्रायन जॉन्स्टन म्हणतो, ' गॅरी सोबर्सपेक्षा अधिक चांगला क्रिकेटपटू होईल का? होणार असेल तर तो पाहण्यासाठी मला आयुष्य लाभावे अशी माझी आहे.'' अर्थात क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या कुणाचीही ती इच्छा असेल. सोबर्सच्या दिसणारी दिव्यत्त्वाची प्रचिती उद्या कुणाच्यात दिसो ना दिसो. परंतु आज मात्र सोबर्सचा अद्भुतरम्य पराक्रम पाहिल्यावर म्हणावसं वाटतं - तेथे कर माझे जुळती.'
(द्वारकानाथ संझगिरी यांच्या चॅम्पियन्स पुस्तकातून साभार)





