सुनिल गजाकोश
- स्टेडियममध्ये हजारो प्रेक्षक ओरडत होते. ढोल, ताशे, झेंडे आणि जल्लोषाच्या गदारोळात एक माणूस मात्र पूर्णपणे शांत उभा होता. लाल सूट, काळा चष्मा आणि आकाशाकडे उंचावलेला हात…जणू तो जिवंत माणूस नसून कांस्याचा पुतळाच होता.
- सामना संपल्यानंतर त्याने तोंडावर हात ठेवला, मग डोक्याकडे बंदुकीचा इशारा केला आणि पुन्हा शांत झाला. अवघ्या काही सेकंदांचा हा क्षण सोशल मीडियावर जगभर पसरला. तो माणूस होता 'लुमुम्बा व्हेआ'.
- तो फुटबॉलचा चाहता म्हणून नव्हे, तर काँगोचे पहिले लोकशाही पद्धतीने निवडून आलेले पंतप्रधान पॅट्रिस लुमुम्बा यांची स्मृती जिवंत ठेवण्यासाठी उभा होता.
- एका स्टेडियममधून सुरू झालेला हा प्रवास आपल्याला आफ्रिकेच्या रक्तरंजित इतिहासापासून आजच्या मोबाईल आणि इलेक्ट्रिक कारच्या बॅटरीपर्यंत घेऊन जातो.
सध्या सुरू असलेल्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या सामन्यात एक अफलातून गोष्ट घडली… ना गोल झाला ना रेफ्रीचा वाद झाला. शेवटच्या मिनिटाला चमत्कारही झाला नाही. पण स्टेडियममध्ये उभ्या असलेल्या एका माणसाने एकही शब्द न बोलता, जगाला एक प्रश्न विचारला…
फिफा विश्वचषकातील काँगोच्या सामन्यांदरम्यान हजारो लोक ओरडत होते, झेंडे फडकवत होते, ढोल वाजत होते आणि त्या गोंधळात एक माणूस लाल सूट घालून, हात वर करून, तब्बल नव्वद मिनिटं पूर्णपणे स्तब्ध उभा होता. तो हलला नाही, हसला नाही त्याने टाळ्या वाजवल्या नाहीत. जणू तो माणूस नव्हताच, तो एक पुतळा बनून राहिला होता. त्याच्या चेहऱ्यावर कोणताही भाव उमटत नव्हता. त्याचा एक हात आकाशाकडे उंचावलेला होता आणि संपूर्ण देहबोली एखाद्या कांस्य पुतळ्याची आठवण करून देत होती.
सामना संपला… त्या माणसाच्या हालचालीला हळूहळू सुरूवात झाली. सर्वप्रथम त्याने स्वतःच्या तोंडावर हात ठेवला. मग बोटांनी स्वतःच्या डोक्याला बंदुकीचा इशारा केला. त्या व्यक्तीचा निषेध इतिहासाचा होता.
पूर्ण सामन्यात पुतळ्याप्रमाणे स्तब्ध असणारा तो माणूस कोण?
हा क्षण अवघ्या काही सेकंदांचा होता. सामन्याच्या प्रसारणादरम्यान कॅमेरा त्याच्याकडून लगेच हटला. हा योगायोग होता की प्रसारणाचं धोरण, हे पिफाने स्पष्ट केलेलं नाही. पण एवढं मात्र खरं की जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धेच्या थेट प्रक्षेपणात हा संदेश जास्त वेळ दिसू दिला गेला नाही. सामना संपल्यानंतर मात्र सोशल मीडियावर त्या व्यक्तीचे फोटो आणि व्हिडिओ प्रचंड वेगाने पसरले. "हा माणूस कोण आहे?" हा प्रश्न हजारो लोक विचारू लागले.

तो माणूस म्हणजे मिशेल कुका म्बोलादिंगा. पण जग त्याला एका वेगळ्या नावाने ओळखतं. "लुमुम्बा व्हेआ या नावाने, ज्याचा अर्थ आहे "लुमुम्बा जगतो आहे."
२०१३ पासून तो काँगोच्या प्रत्येक फुटबॉल सामन्यात असाच उभा राहतो. लाल सूट, दोन्ही हात वर, नव्वद मिनिटे. ना घोषणा, ना भाषण, ना पोस्टर. फक्त शांतता. मिशेल कुका म्बोलादिंगा स्वतःला 'सुपर फॅन' म्हणवत नाहीत. उलट, अनेक मुलाखतींमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की ते स्टेडियममध्ये संघाला प्रोत्साहन देण्यासाठी जितके येतात, तितकेच एका व्यक्तीची आठवण जिवंत ठेवण्यासाठीही येतात. ती व्यक्ती म्हणजे काँगोचे पहिले लोकशाही पद्धतीने निवडून आलेले पंतप्रधान पॅट्रिस एमरी लुमुम्बा. लुमुम्बा व्हेआ यांची उभी राहण्याची शैली, सूट, चष्मा आणि उंचावलेला हात हे सर्व काँगोमध्ये उभारण्यात आलेल्या पॅट्रिस लुमुम्बांच्या पुतळ्याची जाणीवपूर्वक केलेली पुनर्रचना आहे. स्टेडियममध्ये ते प्रत्यक्षात एका नेत्याचं स्मारक बनून उभे असतात.
काँगो : संपत्तीचा शाप आणि रक्तरंजित क्रांती
या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला स्टेडियमच्या प्रेक्षक गॅलरीतून बाहेर पडून आफ्रिकेच्या इतिहासात प्रवेश करावा लागेल. कारण पॅट्रिस लुमुम्बांची कथा ही केवळ एका नेत्याची कथा नाही; ती वसाहतवाद, संपत्ती, साम्राज्यवाद आणि स्वातंत्र्याच्या अपूर्ण लढ्याची कथा आहे.
आफ्रिकेच्या इतिहासात विसाव्या शतकाच्या मध्यावर एक मोठा बदल घडत होता. शेकडो वर्षे युरोपीय वसाहतवादी सत्तांच्या ताब्यात असलेले अनेक देश स्वातंत्र्य मिळवू लागले होते. पण राजकीय स्वातंत्र्य मिळालं म्हणजे आर्थिक आणि मानसिक स्वातंत्र्यही मिळालं, असं नव्हतं. विशेषतः काँगोसारख्या देशाची परिस्थिती वेगळी होती. नैसर्गिक संपत्तीने समृद्ध असलेल्या या देशावर बेल्जियमने जवळजवळ अमानुष पद्धतीने राज्य केलं होतं. रबर, तांबे, हिरे, सोने, युरेनियम आणि आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचं ठरलेलं कोबाल्ट या संपत्तीने जगाचं लक्ष काँगोकडे वेधलं होतं. पण या संपत्तीचा लाभ काँगोच्या जनतेला नव्हे, तर युरोपियन साम्राज्यांना होत होता.
काँगोच्या इतिहासाची गोष्ट सांगताना केवळ १९६० सालापासून सुरुवात करून चालत नाही. त्यामागे जवळपास ऐंशी वर्षांचा असा काळ दडलेला आहे, ज्याने या देशाच्या सामूहिक स्मृतीवर आजही न भरून येणाऱ्या जखमा उमटवल्या आहेत. आफ्रिकेच्या नकाशावर प्रचंड विस्तारलेला, नद्यांनी, जंगलांनी आणि अफाट खनिजसंपत्तीने समृद्ध असा हा प्रदेश युरोपियन सत्तांच्या नजरेत एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भरला. पण इतर अनेक वसाहतींप्रमाणे काँगोवर सुरुवातीला एखाद्या देशाने राज्य केलं नाही; तो एका व्यक्तीच्या मालकीचा प्रदेश बनला. ती व्यक्ती होती बेल्जियमचा राजा लिओपोल्ड दुसरा.
१८८५ मध्ये युरोपीय राष्ट्रांनी आफ्रिकेच्या वाटणीला मान्यता दिल्यानंतर 'काँगो फ्री स्टेट' नावाने ओळखला जाणारा हा विशाल प्रदेश प्रत्यक्षात लिओपोल्ड दुसऱ्याची खासगी मालमत्ता बनला. 'फ्री' म्हणजे मुक्त असा शब्द नावात असला, तरी प्रत्यक्षात तिथे उभं राहिलं ते आधुनिक इतिहासातील सर्वात क्रूर शोषणाचं साम्राज्य होतं. औद्योगिक क्रांतीनंतर युरोपमध्ये रबरची मागणी झपाट्याने वाढत होती. मोटारींचे टायर, यंत्रसामग्री आणि विविध उद्योगांसाठी रबर अत्यावश्यक बनलं होतं. काँगोच्या जंगलात रबर विपुल प्रमाणात मिळत होतं. त्याची किंमत मात्र लाखो काँगोवासीयांनी आपल्या रक्ताने चुकवली. रबर गोळा करण्याचं लक्ष्य पूर्ण न करणाऱ्या लोकांना अमानुष शिक्षा दिली जात असे.
गावोगावी सैन्य पाठवलं जाई. मारहाण, जाळपोळ, सामूहिक हत्या आणि हात छाटण्याच्या शिक्षा हा त्या राजवटीचा भाग बनला. इतिहासकारांमध्ये मृतांच्या अचूक संख्येबाबत मतभेद असले, तरी अनेक संशोधकांच्या मते या काळात काँगोची लोकसंख्या कोट्यवधींनी घटली. आफ्रिकेच्या इतिहासावर लिहिणाऱ्या अनेक अभ्यासकांनी या काळाला 'मानवनिर्मित आपत्ती' असं संबोधलं आहे. युरोपमध्ये संपत्ती आणि उद्योग उभे राहत असताना, काँगोमध्ये माणसांचं आयुष्य जवळजवळ काहीच मोलाचं राहिलं नव्हतं.
लुमुम्बा कोण होते?
आंतरराष्ट्रीय दबाव वाढल्यानंतर १९०८ मध्ये बेल्जियम सरकारने काँगोचा कारभार लिओपोल्डच्या हातातून काढून घेतला. अशा वेळी पॅट्रिस लुमुम्बा हे नाव पुढे आलं. ते केवळ राजकारणी नव्हते; ते नव्या आफ्रिकेचा आवाज होते. त्यांना ठाऊक होतं की राजकीय स्वातंत्र्य पुरेसं नाही. जर खाणी, उद्योग आणि अर्थव्यवस्था परकीय हितसंबंधांच्या ताब्यातच राहिली, तर ध्वज बदलेल; पण जनतेचं आयुष्य बदलणार नाही. त्यांच्या भाषणांमध्ये वारंवार एकच विचार दिसतो, काँगोची संपत्ती काँगोच्या जनतेच्या कल्याणासाठी वापरली गेली पाहिजे.

३० जून १९६० रोजी काँगोला बेल्जियमपासून स्वातंत्र्य मिळालं आणि लुमुम्बा देशाचे पहिले पंतप्रधान बनले. स्वातंत्र्य समारंभात बेल्जियमचे राजा बौद्वाँ यांनी वसाहतवादी राजवटीचं कौतुक केलं. त्यांनी बेल्जियमने काँगोमध्ये विकास, शिक्षण आणि सभ्यता आणल्याचा दावा केला. प्रोटोकॉलनुसार लुमुम्बांनी औपचारिक आभार मानून भाषण संपवायचं होतं. पण त्यांनी ते केलं नाही.
लुमुम्बांनी उभं राहून जे भाषण केलं, ते आजही आफ्रिकेच्या इतिहासातील सर्वात धाडसी राजकीय भाषणांपैकी एक मानलं जातं. त्यांनी बेल्जियमच्या राजाकडे पाहून सांगितलं की काँगोचं स्वातंत्र्य कोणाची भेट नाही; ते लाखो लोकांनी अपमान, गुलामी, शोषण आणि संघर्षातून मिळवलं आहे. त्यांनी वसाहतवादी अत्याचारांचा सार्वजनिक उल्लेख केला. त्या क्षणी ते फक्त काँगोचे पंतप्रधान राहिले नाहीत; ते संपूर्ण आफ्रिकेच्या स्वाभिमानाचा आवाज बनले.
याच भाषणानंतर पॅट्रिस लुमुम्बा हे नाव जगभरात गाजलं आणि त्याच वेळी अनेक शक्तिशाली राष्ट्रांच्या नजरेत ते धोकादायक ठरू लागले. कारण लुमुम्बा केवळ राजकीय स्वातंत्र्यावर समाधानी नव्हते. त्यांना काँगोच्या संपत्तीवर काँगोच्या जनतेचा अधिकार हवा होता. शीतयुद्धाच्या काळात खनिजसंपन्न आफ्रिकेतील एका नव्या राष्ट्राचा हा आग्रह अमेरिका, बेल्जियम आणि इतर पाश्चात्त्य देशांसाठी अस्वस्थ करणारा होता.
कॉँगोचे पहिले पंतप्रधान लुमुम्बा यांची हत्या
पण अशा माणसांना इतिहास फार काळ जिवंत ठेवत नाही. शीतयुद्धाचा तो काळ होता. स्वातंत्र्यानंतर अवघ्या काही दिवसांत काँगोमध्ये राजकीय अस्थिरता सुरू झाली. सैन्यात बंड झालं. खनिजांनी समृद्ध असलेल्या कटांगा प्रांताने फुटीरतेची घोषणा केली. त्या फुटीरतेला काही परकीय व्यावसायिक हितसंबंध आणि बेल्जियन घटकांचा पाठिंबा असल्याचे आरोप झाले. देश तुकडे तुकडे होण्याच्या उंबरठ्यावर उभा राहिला. लुमुम्बांनी संयुक्त राष्ट्रांकडे मदत मागितली. त्यांना अपेक्षित मदत मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी सोव्हिएत संघाकडे मदतीचा हात पुढे केला. आणि इथून त्यांच्या आयुष्याची दिशा बदलली.

पाश्चात्त्य देशांच्या नजरेत लुमुम्बा आता केवळ आफ्रिकन राष्ट्रवादी नेता राहिले नव्हते; ते शीतयुद्धातील संभाव्य 'धोका' बनले होते. पुढील काही महिन्यांत त्यांचं सरकार कोसळलं, त्यांना अटक करण्यात आली आणि १७ जानेवारी १९६१ रोजी त्यांची हत्या करण्यात आली. नंतर त्यांचं शरीर आम्लात विरघळवण्यात आलं. इतिहासच पुसून टाकण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या मृत्यूभोवती अनेक दशकं गुप्ततेचं आवरण राहिलं. मात्र नंतर प्रसिद्ध झालेल्या कागदपत्रांनी आणि चौकशांनी इतकं स्पष्ट केलं की या संपूर्ण प्रकरणात बेल्जियन अधिकाऱ्यांची भूमिका होती. २००२ मध्ये बेल्जियम सरकारने या हत्येबाबत 'नैतिक जबाबदारी' स्वीकारत अधिकृत दिलगिरी व्यक्त केली.
लुमुम्बा व्हेआ : स्मृतीचा पहारेकरी
लुमुम्बा मृत्यू पावले तेव्हा त्यांचं वय अवघं पस्तीस वर्षांचं होतं. एका नव्या राष्ट्राचं स्वप्न पाहणारा नेता काही महिन्यांतच इतिहास झाला. पण इतिहास असा पुसता येत नाही…
पॅट्रिस लुमुम्बा हे त्यापैकीच एक. त्यांना संपवता आलं, पण त्यांचं प्रतीकत्व नाही. म्हणूनच आजही काँगोतील एखादा मिशेल कुका म्बोलादिंगा फुटबॉलच्या स्टेडियममध्ये पुतळा बनून उभा राहतो आणि जगाला सांगतो लुमुम्बा अजून जिवंत आहे.,,
लुमुम्बा व्हेआ यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, जग काँगोला अनेकदा युद्ध, गरिबी किंवा खनिजसंपत्तीच्या बातम्यांमधून ओळखतं; पण पॅट्रिस लुमुम्बा यांची कथा फार कमी लोकांना माहीत आहे. म्हणून ते प्रत्येक सामन्यात स्वतःला चालता-बोलता स्मारक बनतात. त्यांना वाटतं, एखादा प्रेक्षक का होईना, पण "हा कोण?" असा प्रश्न विचारेल आणि त्या प्रश्नातून इतिहासाचा दरवाजा उघडेल. त्यांच्या दृष्टीने हा निषेध नाही, ही स्मृती जपण्याची कृती आहे.
कॉँगोच्या सामन्यात मात्र त्याने पुतळ्याच्या मुद्रेच्या पुढे जाऊन आणखी दोन हावभाव केले. तोंडावर हात म्हणजे जगाचं मौन आणि डोक्याला बंदुकीचा इशारा म्हणजे पूर्व काँगोमध्ये आजही सुरू असलेला रक्तपात, हिंसाचार आणि मृत्यू. लाखो लोकांचे विस्थापन. जगाला लागणाऱ्या कोबाल्ट, कोलटान, तांबे आणि सोन्याच्या भूमीत आजही सामान्य माणूस सुरक्षित नाही. आपल्या मोबाईलमध्ये असलेली बॅटरी, इलेक्ट्रिक कार, लॅपटॉप, डेटा सेंटर्स... या सगळ्यांच्या पाठीशी काँगोची खनिज संपत्ती आहे. पण त्या संपत्तीची किंमत कोण मोजतं? काँगोची जनता. हा प्रश्न त्या माणसाने शब्दांशिवाय विचारला.

कदाचित म्हणूनच त्याची शांतता इतकी अस्वस्थ करणारी होती. एका माणसाने कोणतंही घोषवाक्य दिलं नाही. कोणावर थेट आरोप केला नाही. फक्त दोन हावभाव केले आणि त्या दोन हावभावांनी लाखो शब्दांपेक्षा मोठा संदेश दिला. कधी कधी इतिहास भाषणातून लिहिला जात नाही. तो एका शांत माणसाच्या उभं राहण्यात लिहिला जातो. एका पुतळ्याने जगाला आरसा दाखवला. त्यावर लिहिलं होतं...
लुमुम्बा जगतो आहे…



